दिवेआगर
दिवेआगरबद्दल अनेक दिवसांपासून ऐकून होतो.. तिथे सापडलेला सोन्याचा गणपती आणि स्वच्छ किनारा.. सगळ्यांकडूनच कौतुक ऐकले होते.. त्याबरोबर हेही, की तिकडे भरपूर गर्दी असते. हा दिवेआगर महिमा ऐकून तिकडे सुट्टी मिळाली की जायचेच असे ठरवले होते. त्याप्रमाणे डिसेंबरमधेच बूकिंग करून २४-२७ जानेवारी (२००८)मध्ये दिवेआगरची एक सुंदर सफर करून आलो. जाण्याआधी रस्ता, रूट, तिकडे अजून पहाण्यालायक स्थळे यासाठी नेटवर बराच सर्च मारला होता. पण समाधानकारक माहिती नव्हती मिळाली. त्यासाठी आणि एका अप्रतिम ट्रिपची उजळणी म्हणूनही हा लेखनप्रपंच.
पुण्याहून दिवेआगरला स्वत:च्या चारचाकीनी सर्वात सोपा रस्ता म्हणजे ताम्हिणी घाटातून. घाट ओलांडून आपण थेट मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर येतो- माणगाव या ’जंक्शन’ला. माणगाव जंक्शन अशासाठी की इथूनच कोकणात जायला अनेक फाटे फुटतात. त्यातला आपण ’म्हसाळा’हा फाटा घ्यायचा- म्हसाळ्यावर तेव्हाही दिवे आगर दिसत नाही, आपण दिशा पकडायची श्रीवर्धनची. मग श्रीवर्धनच्या बरंच जवळ पोचल्यानंतर दिवेआगरला जायला अचानक फाटा लागतो आणि आलं आलं म्हणेपर्यंत दिवेआगर येतंच! पुणे-माणगाव साधारणपणे १२० कि.मी. आणि माणगाव-दिवेआगर साधारण ४५ कि.मी. असे आटोपशीर १७० कि.मीच्या आत आपण चार-साडेचार तासात एका रम्य ठिकाणी पोचतोही.
पण कधी नव्हे ते सुट्टीला बाहेर पडलो होतो म्हणून आम्ही जरा फिरून गेलो.. आम्ही उलटा मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे गाठला. हायवेवर दुसर्या टोलनाक्याआधी ’पाली’ला जायला एक्झिट आहे.. ते घेतलं. पालीला बल्लाळेश्वराचं सुरेख दर्शन घेतलं आणि निघालो पुढे. एका नयनमनोहर वळणावळणाच्या रस्त्यावरून आम्ही पुन्हा मुंबई-गोवा महामार्गाला लागलो.. थोड्या वेळानी माणगाव आणि मग पुढे तोच रस्ता.. अर्थातच पुण्याहून उलटं गेल्यामुळे हे अंतर पडतं साधारण २३० कि.मी. पण चांगल्या रस्त्यांमुळे वेळ साधारण तेवढाच लागतो. सकाळी लवकर नाश्ता करून घराबाहेर पडले तर वाटेत एक चहा ब्रेक घेऊन गरम गरम जेवायला आपण दिवे आगरमधे असतो!
दिवेआगर हे श्रीवर्धन तालुक्यातील एक टुमदार गाव. गावाची लांबी साडेचार कि.मी आणि रुंदी दीड कि.मी. इतका छोटसा जीव याचा. हे गाव इतकं उजेडात कसं आलं? तर, गावात ग्रामदैवतासारखं एक गणपतीचं देऊळ आहे. जवळच्या ’बोर्ली-पंचतन’ या गावातल्या द्रौपदी धर्मा पाटील यांचीही बाग या देवळाच्या मागे आहे. पावसाळ्यानंतर, नव्हेंबर १९९७ मधे बागेत खताचं, झाडांना आळी करण्याचं काम चालू होतं. आणि असं खोदताना अचानक एका सुपारीच्या झाडाखाली ’खण्ण्’ असा आवाज झाला.. कसला आवाज म्हणताना काळजीपूर्वक खोदले असतां चक्क एक तांब्याची पेटी, साधारण जुन्या काळातल्या ’ट्रंक’ असतात ना, तशी मिळाली. तिच्याच एका कोपर्यात खोदताना पहार बसली होती. पेटीला कुलूप होतं. ’पेटी सापडली’ ही वार्ता त्या इवल्याश्या गावात वार्यासारखी पसरली. गावचे सरपंच, प्रतिष्ठीत मंडळी, पोलिस सगळे आले. सर्वांसमक्ष पेटीचं कुलूप तोडण्यात आलं. सर्वांनाच ’आत काय आहे?’ याची उत्सुकता.. खजिनाबिजिना असला तर? आणि खरंच एक खजीनाच लागला हाती. आत होता गणपतीचा शुद्ध सोन्याचा मुखवटा! बरोबर एक तांब्याचा डबाही होता. त्या डब्यात होते गणपतीचे अलंकार!!! समस्त लोकांनी आश्चर्यानी तोंडात बोटं घातली. हे तर आक्रितच होतं. लोकांचे जथ्थेच्या जथ्थे लोटले हे पहायला.
आता खरंतर ’पुरलेलं धन’ सापडलं तर ती असते सरकारी मालमत्ता. हे असं ऐतिहासिक महत्त्व असणारं धन सरकारदरबारी नोंद होऊन जातं दिल्लीच्या अथवा कलकत्त्याच्या राष्ट्रीय संग्रहालयात. आता हा मुखवटा आणि दागिने इतके लांब गेले तर पुन्हा पहायचे कधी? आणि जाणार कोण ते पहायला? मोठाच प्रश्न होता.. पण सापडली, त्यात एक वाट सापडली! असाही कायदा आहे म्हणे की जमिनीखाली ३ फूटांपर्यंत असं काही धन सापडल्यास त्याची मालकी मूळ मालकाकडेच रहाते. पण त्या खाली धन सापडलं, तर ते सरकारचं! आता पेटी तर लगेचच खाली सापडली होती. त्यामुळे तिची मालकी सुदैवानी द्रौपदी धर्मा पाटीलांकडेच राहिली. या कामी तेव्हाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. मनोहर जोशी यांनी बराच पुढाकार घेतला. तेव्हाच्या सांस्कृतिक मंत्र्यांना त्यांनी पटवून दिले की हा सांस्कृतिक ठेवा मूळ ठिकाणीच राहू द्यावा. त्या बदल्यात त्यांनी फक्त एक छोटे श्रेय मागितले- हा मुखवटा जिथे ठेवला आहे त्याच्यावर एक पाटी लिहिली गेली- ’महाराष्ट्र राज्याच्या सौजन्याने’!!!
मुखवटा आहे कसा? तर त्याला मुकुट आहे.. आणि आपल्याकडे दिसतो तसा छोटा मुकुट नाही, तर दक्षिणेत दिसतो तसा उंच मुकुट आहे.. मुकुट, चेहर्याचा भाग, खांदे आणि सोंड असा साधारण २६ इंच लांबीचा मुखवटा आहे.. तो मूळ दगडी मूर्तीवर अगदी ’फिट्ट’ बसतो! सोबत जे अलंकार आहेत तेही दाक्षिणात्य पद्धतीचेच आहेत.. छोट्या मोहोरांसारखा हार, बिंदल्या वगैरे.. आणि हे दागिने मुखवट्यावर चढवण्यासाठी मुखवट्यावर योग्य जागी भोकंही पाडली आहेत! मुखवटा आणि दागिन्यांच्या कारागिरीवरून हे काम दक्षिणेतल्या सोनाराने केलं असावं असा अंदाज आहे. सोनं असं शुद्ध आहे की कित्येक हजार वर्ष जमिनीखाली पुरलेलं असूनही त्यावर एकही डाग नाही! सापडल्यावर केवळ रिठ्याच्या पाण्यानी मुखवटा साफ केला आणि तो पुन्हा झळाळू लागला. तेच दागिन्यांबाबतही. मुखवट्याचे वजन आहे १ किलो ३०० ग्रॅम आणि दागिने आहेत २८० ग्रॅम वजनाचे.
हे सर्व तांब्याच्या पेटीत ठेवल्यामुळे हाती लागले. लोखंडी पेटी असती तर गंजली असती, लाकडी असती तर कुजली असती. तांब्याची असल्यामुळे त्याला गंज, कीड लागली नाही. झाकणावर कडी आहे , जेणेकरून ती पेटी खाली दोराच्या सहाय्याने सोडता येईल. हा मुखवटा म्हणजे त्या काळी गावाची प्रतिष्ठा असेल. तो परकीयांच्या, शत्रूच्या हाती लागू नये म्हणून एवढा बंदोबस्त. अजून एक प्रश्न पडतो की ही पेटी आधी कशी काय सापडली नाही? तर ही पेटी ज्या झाडाखाली सापडली तिथे एक आंब्याचं झाड होतं- खूपच मोठा विस्तार होता त्याचा. ते झाड काढलं आणि तिथे सुपारीचं छोटं रोप लावलं. त्या रोपालाच खळं करतांना हे धन हाती लागलं. रोज संध्याकाळी मंदिरात आरती असते. नेहेमीच्या आरत्यांबरोबरच खास दिवेआगरच्या गणपतीची एक आरती असते, ती खूप श्रवणीय आहे. तिथे श्री. विजय ठोसर म्हणून एक गृहस्थ आहेत, ते ही गणपतिची कथा अगदी रंगवून सांगतात. (गणपतीचे फोटो काढायची परवानगी नाही :()
खुद्द दिवेआगर हे गाव अगदी टुमदार आहे. अप्रतिम, अस्पर्श आणि सुरक्षित समुद्रकिनारा हे त्याचं वैशिष्ठ्य. किनाराही अगदी विस्तीर्ण आहे. किनार्यावर अजूनतरी भेळ, पेप्सी, लेजवाली मंडळी नाहीयेत, त्यामुळे किनारा स्वच्छही आहे. संध्याकाळी, थोडं ऊन उतरल्यावर समुद्रावर यावं, पाण्यात मनसोक्त खेळावं, डोळे निवेस्तोवर सोनेरी रंगाची जादू पहावी आणि घरी अप्रतिम रुचकर जेवणाचा स्वाद घेण्यासाठी परतावं!
दिवेआगर हे तसं संपन्न गाव. प्रत्येकाकडे नारळ, सुपारी, केलीच्या बागा आहेत. म्हशीही आहेत, त्यामुळे दूध-दुभतंही पुष्कळ. घरं मोठी, घरामागे बागा आणि शेजारी परसू, गोठा, मोकळी जागा इत्यादि. इथे रहायची सोय ही अशी घरीच होते. कमर्शियल हॉटेलं वगैरे नाहीत. पाहुण्यांसाठी सर्व सोय़ीयुक्त वेगळ्या खोल्या बांधल्या आहेत. आपले ’होस्ट’ आपल्या चहा, नाश्त्याची सोय करतात. शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही जेवण मिळतं. अतिशय रुचकर, गरमागरम जेवण सगळ्यांकडे मिळतं. फ़क्त आधी सांगावं लागतं. दिवे आगरमधेच ’रूपनारायण’ हे विष्णूचे मंदिर आहे. एका अखंड शीळेतून ही मूर्ति घडवली आहे आणि नवल म्हणजे मूर्तीच्या दोन्ही बाजूला चक्क दशावतार कोरले आहेत. तसंच शंकराचं ’उत्तरेश्वर’ म्हणून एक देऊळ आहे. या दोन्ही मंदिरांची नव्याने बांधणी सुरु आहे. यासाठी शासनाकडून त्यांना अनुदानही मिळाले आहे. लवकरच दोन प्रशस्त आणि सुरेख मंदिरं ही गणपतीच्या देवळाबरोबीनी इथली आकर्षणं होणार आहेत.
दिवेआगरहून श्रीवर्धन १६ कि.मी आहे आणि त्याच दिशेनी हरिहरेश्वर आहे ३२ कि.मी. हरिहरेश्वराचा किनारा साहसी आहे, पण त्यामुळेच त्यावर आता जाऊ देत नाहीत. अनेक तरूण मुलांनी वेड्या साहसापायी तिथे जीव गमावला आहे. पण किनारा अगदी मनोहर आहे. शंकराचं दर्शन घेऊन श्रीवर्धनच्या किनार्यावर आपण जाऊ शकतो. श्रीवर्धनचा किनारा दिवेआगरसारखाच शांत आहे, फक्त लांबी कमी आहे. त्यामुळे तोही पोहायला लोकप्रिय आहे. श्रीवर्धन तालुक्याचं गाव असल्यामुळे तिथे गर्दी असते. शिवाय ’स्टॉल’ही आहेत सर्व प्रकारचे.
श्रीवर्धनहून परततांना अवश्य ’शेखाडी’मार्गेच दिवेआगरला परतावे. शेखाडी या गावाच्या मागेच समुद्र आहे, आणि तो पूर्ण रस्ता केवळ समुद्राकाठून दिवेआगरला थेट जातो.. ही अगदी परदेशात समुद्राच्या काठाची ’राईड’ असते तशीच आहे. केवळ सुरेख. सूर्यास्ताच्या वेळी गेलं तर ह्या अश्या अप्रतिम दृश्याचे आपण साक्षीदार होतो.. केवळ मंत्रमुग्ध!
तसंच, दिवेआगरहून दिघीही १६ कि.मीवरच आहे. इथे जंजीरा किल्ल्याला जाण्यासाठी मोटरलाँच मिळते. खळबळत्या समुद्रातून सुमारे अर्धा तास सफर करून आपण जंजीर्याजवळ पोचतो. हो, जवळच. किल्ल्याच्या आत पोचण्यासाठी अजून एक दिव्य करायला लागतं. ते म्हणजे किल्ल्याच्या प्रवेशद्वारापासून साधारण १०० फूटांवर आपण आलो की मोटर लाँचवरून आपली रवानगी साध्या होडीत होते आणि ही होडी किल्ल्याच्या पायर्यांपर्यंत आपल्याला पोचवते. येताना तसंच- आधी होडी, मग तिच्यातून लाँचमधे ट्रान्स्फर. आणि हे बर्यापैकी घाबरवणारं असतं बरंका. समुद्रामुळे होडी आणि लाँच सतत हेलकावे खात असतात. त्यातच आपण उड्या मारून इकडून तिकडे पटकन जायचे. परत पब्लिक इतका गोंधळ घालतं- मी आधी, मी आधी करत सगळे एकाच वेळी चढण्याची किंवा उतरण्याची घाई करतं. यामुळे होडी पलटी होण्याचीही शक्यता असते.
किल्ला मात्र प्राचीन स्थापत्यकलेची साक्ष आहे. हा एकमेव सागरी किल्ला आहे तो कायम अजिंक्य राहिला. पुरातत्व खात्यानी ’ऐतिहासिक वास्तू’ म्हणून तिकडे एक बोर्ड चिकटवला आहे. त्यानंतर काहीही केलेले नाही. आज ४०० वर्ष झाली, पण तिथे अजूनही बरेच अवशेष शिल्लक आहेत. गोड्या पाण्याचं तळं आहे. इथे थोडीशी डागडुजी केली, तर पुरातन वास्तूचे जतनही होईल आणि अजून लोक येतील.. पण सरकारी खाती इतकी जागरूक असती तर काय? असो! किल्ल्याच्या माहितीसाठी स्थानिक गाईड मिळतात आणि ते किल्ल्याची बर्यापैकी ओळख करून देतात.
तर आमची ही छोटी सफर फ़ारच सुरेख झाली. सर्वांनी आवर्जून दिवेआगरला भेट द्या. एक अनामिक मानसिक शांती मिळते तिथे. मात्र एक कळकळीची विनंती- समुद्र किनारा खराब करू नका, कचरा करू नका. किनारा स्वच्छ आहे, त्याला आपण तरी डाग लावायला नको. दिवेआगरमधे जागोजाग लिहिलेल्या या पाटीवरच्या सूचनांचे आपण पालन नक्कीच करूया. हॅपी जर्नी!
(हा लेख १ वर्षापूर्वीचा आहे)
पूनम, खूप
पूनम, खूप दिवसातून हरिहरेश्वरला जायचय.
तो सुर्यास्ताचा फोटो छान आहे.
--------------
नंदिनी
--------------
पूनम,
पूनम, मस्तच वर्णन!
बर्याच वेळा गेलोय पण बर्याच वर्षांनी आता पुनरानुभुतीचा आनंद मिळाला!
छायाचित्रे सुरेख!
फारचं
फारचं साग्रसंगीत लिहिलं आहेस. छायाचित्र रेखीव आली आहेत. पण गणपतीचा फोटो हवाचं होता. तू त्यांना सांगायचं होतसं की तू मायबोलिची लेखिका आहेस आणि तू ही माहिती देशोदेशीच्या वाचकांपर्यंत पोचविणार आहेस. त्यामुळे इथे पर्यंटकांचा ओघ वाढेल. त्यातून मंदीरासाठी दान प्राप्ती देखील होऊ शकेल. कदाचित त्यांनी तुला अनुमती दिली असती. आता पुढल्या वेळी अशी काही अडचण आली तर, तू आणि इथले अभिप्रायी दोन्ही, मी सांगितलेले लक्षात ठेवा. असे सांगितले की बहुतेक वेळी अनुमती मिळते.
छान वर्णन
छान वर्णन पूनम फोटो तर अप्रतिम. पण बी म्हणतो त्या प्रमाणे गणपतीचा फोटो ....
दिवेआगर शब्द वाचताच मला पण तो सोन्याचा गणपती बघायची उत्सूकता
****************
ठेविले अनंते तैसेची रहावे
चित्ती असू द्यावे समाधान!
गणपतीचा
गणपतीचा सोन्याचा मुखवटा शेवटची पाटी आहे ना, त्यावर आहे बघा..
काही काही ठिकाणचे नियम आपण पाळावेत हेच बरं ना?
बाकी निसर्गाचे फोटो टाकलेच आहेत, जायचा रूटही.. आता खुद्द तिकडे जाऊन या पाहू
बी, मी असलं काही सांगायला लागले, तर किती तिरके कटाक्ष मला मिळतील? कोकण आहे बाबा ते!
मस्तच
मस्तच वर्णन आणि फोटो देखील. गेल्या वर्स्।ईपासुन तिथे जायच ठरवतोय पण योग (आयडी नाही) नाही. आता पुन्हा वाटतय हे वाचुन जायच जमवायलाच हव ह्या वर्षी
-------------------------------------------------------------------------------
मुंबई गटग वृत्तांत इथे वाचा http://www.maayboli.com/node/7035
http://www.youtube.com/watch?v=6_OfAvkxaTI कृपया ही अॅड बघा.
Donate Eye - Bring Light to Blind
तर किती
तर किती तिरके कटाक्ष मला मिळतील? कोकण आहे बाबा ते!
>> नुसते कटाक्ष??? बोलणं म्हण..
--------------
नंदिनी
--------------
पी एस
पी एस जी,
लेख आणि फोटो फार सुंदर...
सुर्यास्ताचा फोटो खूप आवडला... अगदी मस्त आलाय.
मी कधी दिवे आगारला गेले नाही, पण तुमच्या लेखातून एक सहल झाली..
दिवे आगार
दिवे आगार अहाहा ! सूर्यास्ताचा फोटो मस्त आलाय.
***
Real stupidity beats artificial intelligence.
बी ना
बी ना अनुमोदन,
खूप छान, स्वतः जाऊन आल्यासारखं वाट्लं
दिवेआगर,
दिवेआगर, तिथली घरगुती राहाण्याची/जेवणाची सोय सगळच मस्त!!
मी तिथे मित्रांबरोबर गेलो होतो. पहिल्यांदा मासे मि तिथेच खाल्ले!
तिथला समुद्रपण पोहायला सुरक्षीत आहे.
आम्हि गेलो तेंव्हा जवळपास ३ पैकी २ घरासमोर कार/जीप उभी. बाहेरच्या लोकांची एवढी गर्दी असुनही समुद्रकिनारा भरपूर मोठ्ठा असल्याने काही फरक पडत नाही.
सुंदर
सुंदर सचित्र वर्णन
------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो
पूनम,
पूनम, सुरेख लिहिलयस. फोटो ही मस्त.
आम्ही गेल्या वर्षीच गेलो होतो दिवेआगरला. सगळ्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या.
आता राहवत नाही म्हणून आणखी काही फोटो टाकतोय.
---------------------------------
देणार्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी
मस्त वर्णन
मस्त वर्णन केले आहे. फोटोही सुरेख!!
आम्ही सहकुटूंब दोन वेळा दिवे आगर ला जाऊन आलो आहोत. खूप शांत वाटते तिथे. गेल्या वर्षी मात्र काही हॉटेल नवीन झालेली दिसली. पण तिथल्या वाडीत राहण्याची मजा काही औरच. मस्त पैकी पोफळीची झाडे, गुरांचा गोठा, इकडे-तिकडे पळण्यार्या कोंबड्या, झोपाळा. तिथल्या वाडीमालकांचे आदरातित्यही खूपच छान. माझी मुलगी (वय वर्षे ३) तर मालकांच्याच घरात खेळायची (आणि काहीबाही खाऊ खाऊन यायची :)).
त्या आठवणी ताज्या करुन दिल्याबद्दल धन्यवाद.
किरु,
किरु, शेवटचे दोन फोटो अप्रतीम आहेत. शेवटचा तर केवळ आहे. काय पण निसर्गाचे रंग ढंग!!!!!
फोटो आणी
फोटो आणी वर्णन दोन्ही अप्रतीम... दिवेआगरला १५ वर्षापुर्वी गेलो होतो.. तेव्हा ती मुर्ती/मुखवटा सापडला नव्हता.. पण गाव अतिशय रमणीय आहे. किनार्यालगतच केवड्याचे प्रचंड मोठे बन आहे. केवड्याच्या बनात साप/नाग खुप सापडतात असे कोणीतरी सांगितले आम्हाला (कदाचित गारव्यासाठी). आणी खरच का योगायोग माहीत नाही पण त्या दिवशी आम्हाला २ साप दिसले तिथे.
अजुन फार व्यावसायीकरण झाले नाहीये हे एकुन फार बरे वाटले..
पूनम, दिवे
पूनम, दिवे आगर म्हणजे माझं गाव. तुला आवडल आणि तू इतक छान वर्णन केल आहेस ते वाचून खूप बरं वाटलं. आपल्या लेकराच कोणी कौतुक केल की जसा आनंद होतो तसा झाला. लहानपणापासूनच्या केवढ्या आठवणी जोडल्या गेल्या आहेत त्या गावाशी. माझ्या मुलांनाही इथून गेल की तेथेच जायच असत. त्यांना दिल्ली आग्रा बघायला नेलं पण त्यांचीही दोस्ती जमली ती दिवेआगर आणि बोर्लीशी.
सहीच एकदम
सहीच एकदम पूनम.. आवडलं सादरीकरण..
नात्या होय, केवड्याच्या वासाची धुंदी असते तशी.. त्यासाठी साप येतात म्हणे..
किरू तू टाकलेले फोटो ही आवडले..
हे असं वाचल़ की वाटतं असं असायला हवं राहातं ठिकाण निर्मळ, प्रसन्न, मोकळं.. ह्या यांत्रिक आणि धकाधकीच्या आयुष्याच्या पल्याड..
मस्तं आहे
मस्तं आहे दिवे आगर !
आणि तिथले ते मंदिरातले ठोसर आजोबा गणपतीची कथा सांगताना आपल्याला सगळं लक्षात आहे कि नाही एह पहायला प्रश्न पण विचारतात.
तिथले घरगुती जेवण, उकडीचे मोदक, पाटलांच्या खानावळीतल कोळंबीचं कालवण, सोलकढी ..यम्मी........
असो, दिवे आगर ला जाउन अजुन एका गोष्टी कडे लक्ष गेलं, रात्री तिथे आकाश किती स्वच्छ सुंदर श्रीमंत दिसत.. चांदणं, तारांनी भरलेलं ..
********** स्टाइल मे रहनेका !! ************
वैनी : मस्त
वैनी : मस्त लिहिलयस. कितीही वेळा दिवे आगर ला जाऊन आलो तरी पुन्हा पुन्हा जावंस वाटत. कोकणात अशी बरीच ठिकाणं आहेत - दिवे आगर, गणपतिपुळे, हरिहरेश्वर, तसंच देवगडच्या जवळ मिठबाव, जामसंडे वगैरे ........
~~~~~~~~~~~~~~
काटा रुते कुणाला, आक्रंदतात कोणी
मज फुलही रुतावे, हा दैवयोग आहे
सुंदर फोटो
सुंदर फोटो आणि वर्णन. खूप ऐकलं आहे दिवे आगर बद्दल.
छान लिहिलं
छान लिहिलं आहे... फोटोही मस्त आहेत.
मस्त
मस्त लिहिलयस, फोटो पण छान आहेत
वर्णन आणि
वर्णन आणि फोटो दोन्ही मस्त... दिवे आगरएवढा सुंदर समुद्रकिनारा मी नाही बघितला..
वैनी, मस्त
वैनी,
मस्त लिहिलं आहेस.. मी अजून तिथे गेलेलो नाही.. आता एक एवेएठि दिवे आगारला करू..
चिनु :
चिनु : दिवेआगर ला एविएठि ची कल्पना छान आहे. मुंबईकर सुद्धा तयार होतील यासाठी ........
~~~~~~~~~~~~~~
काटा रुते कुणाला, आक्रंदतात कोणी
मज फुलही रुतावे, हा दैवयोग आहे
अरे
अरे कोणीतरी ह्या चिनूक्सच्या कल्पनेला उचलून घ्या.....
पण खरंच, आम्ही तयार आहोत तिथे यायला....
खूप छान
खूप छान वर्णन अन फोटो
आता एक एवेएठि दिवे आगारला करू.. >>> पण खरंच, आम्ही तयार आहोत तिथे यायला....>>>
आम्ही पण..
पूनम आणि
पूनम आणि किरू.. दोघांचेही फोटो मस्त आलेत !!
पूनम, वर्णन मस्तच.. आम्हीही मागे गेलो होतो दिवेआगर ला.. खूपच सुंदर गाव आहे..
तिकडे बापट आणि आवळसकरांच्या वाड्या आणि तिथलं खास कोकणी जेवण फारच सुरेख असतं.. आणि पोतनीसांकडे मासे मस्त मिळतात एकदम. !
परत जावसं वाटायला लागलं आता..
आता एक
आता एक एवेएठि दिवे आगारला करू.. >>>
मी पन मी पण..
--------------
नंदिनी
--------------
Pages