गणगोत ..

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

ग्रेसच्या कविता ही अनुभवायची गोष्ट. आज असाच एक अनुभव समोर मांडतो आहे.
'झाडांशी निजलो आपण, झाडात पुन्हा उगवाया' ग्रेस म्हणतो ते काही खोटे नाही.

माझं आजोळ पुण्याजवळचं एक छोटं गाव. आजी तिथे शिक्षिका होती. तिला शाळेतर्फे रहायला दोन खोल्यांचं छोटंसं कौलारू घर होतं. घर अगदी आगगाडीच्या डब्यासारखं. पुढच्या दारातून मागच्या दारापर्यंत एक सरळसोट अरुंद बोळ. त्याच्या एका बाजूला झेंड्याच्या कापडासारख्या, एका, छतांपर्यंत न टेकणार्‍या भिंतीने दुभागलेल्या दोन खोल्या उगवलेल्या. त्याला पुढच्या दाराला, मागच्या दाराला दोरीचे झोपाळे टांगलेले. आम्हा नातवांना पर्वणीच. पुढच्या अंगणात, एका कोपर्‍यात कडुलिंबाचे झाड होते. त्याची सावली पूर्ण अंगणभर पडलेली, तशाच उन्हाळ्यात लिंबोण्याही पसरलेल्या. दुसर्‍या बाजूला पारिजातक, आणि अबोलीची खूपसारी झाडं, शेजार्‍यांना अंगणाची सीमारेषा दाखवत उभी. संध्याकाळी ५ नंतर, आजीने दिलेले दूध पिऊन आम्ही नातवंडं अंगणात खेळायचो. एकजण झोपाळ्यावर तर बाकीचे अंगणात. अर्थातच आजीने झोपाळ्याच्या वेळा ठरवून दिलेल्या. अंगणापुढे दगडी खवले वागवणारा मातीचा रस्ता, बाजूच्या दोन मोठ्या डांबरी रस्त्यांना जोड्णारा. आणि पलीकडे मोट्ठा ट्रांसफॉर्मर. त्यापुढे ते डांबरी रस्ते हातात हात घालून लांबवर जात. त्या रस्त्यांलगत दुतर्फा मोठ्ठी जुनी वडाची झाडे, गेरूचे आणि पांढरे पट्टे अंगावर मिरवत उभी असत.

कधीतरी संध्याकाळी, सातच्या सुमारास रस्त्यावरचा पिवळ्या प्रकाशाचा दिवा पेटे, लंगडीचा खेळ रंगात आलेला असे. झोपाळ्यावर झुलताना, समोरचे रस्ते अंधारात विरून जात. कडुलिंबाच्या फ़ांद्यांवर हलका सफ़ेद प्रकाश, पिवळ्या प्रकाशात मिसळे, आणि मग जे दृष्य दिसे ते ग्रेसनी दोन ओळीत कसे पकडले? ते त्याला कसे कळले ब्वॉ?

गणगोत परतले जेव्हा चिवचिवली चिमणी घरटी
चांदणे जसे झिळमिळले वृक्षांच्या वृद्ध ललाटी.

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

सुंदर!!!

आणि मग जे दृष्य दिसे ते ग्रेसनी दोन ओळीत कसे पकडले? ते त्याला कसे कळले ब्वॉ?>>

या ओळी पुन्हा वाचून पुन्हा तितक्याच आवडल्या

अशा कविता अनुभवायला मिळणं भाग्याचं. प्रत्येक शब्दाचा अर्थ लावून कविता समजली असं म्हणता येतं पण अनुभवता नाही येत.
सुरेख लिहिलय!

Pages