डाळ तांदूळ खिचडी

Submitted by तृप्ती आवटी on 9 March, 2012 - 20:54
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ वाटी तांदूळ, अर्धी वाटी मुगाची डाळ, २ पाकळ्या लसूण, ३-४ चमचे नारळाचा चव, १ हिरवी मिरची, १ मोठा चमचा (टे स्पू) लोणकडे तूप, मीठ, कोथिंबीर

फोडणीसाठी- तेल, हळ्द, हिंग, जिरे.

क्रमवार पाककृती: 

डाळ आणी तांदूळ स्वच्छ धुवून घ्यावे. ५-६ वाट्या पाणी आधणास ठेवावे. लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर बारीक चिरुन घ्यावे. हिंग- हळद-मोहरीची फोडणी करावी. मोहरी तडतडली की जिरं घालावं. त्यात हिरवी मिरची आणि लसूण घालावा. लसूण जरा फुलला की डाळ-तांदूळ, नारळाचा चव घालून छान परतून घ्यावे. वरुन गरम झालेले पाणी, चवीप्रमाणे मीठ घालून नीट हलवुन घ्यावे.

खिचडी जरा शिजत आली की तूप घालून नीट हलवुन घ्यावे. सात्विक चव येते खिचडीला. ही खिचडी तशी मऊसर असते तेव्हा लागल्यास थोडे आणखी गरम पाणी घालावे.

भाजलेले पापड, बारक्या कैर्‍यांचं ताजं लोणचं, ही खिचडी, तिखट-मीठ लावलेल्या काकडीच्या किंवा कैरीच्या फोडी असा सगळा सरंजाम गच्चीवर न्यावा. गार वार्‍याच्या झुळुकी घेत ह्या सगळ्याचा आस्वाद घ्यावा. कॉलोनीतुन चक्कर मारणारी मैत्रिण दिसल्यास तिला पण जेवण्यासाठी हाक मारावी Happy

वाढणी/प्रमाण: 
२ साधारण खाणारी मोठी माणसे
अधिक टिपा: 

_ लागणारा वेळ खिचडी कढईत चढवण्यापर्यंतचा आहे. खिचडी शिजायला थोडा आणखी वेळ लागेल
_ जरा आंबट कैरीची फोड किसून घातली तर वेगळाच स्वाद येतो खिचडीस
_ खाणार्‍यास मिरची चालणार असेल तर हि मी, लसूण, नारळ असं भरड वाटून घातलं तरी चालेल
_ ह्या खिचडीत दुसरा मसाला घालायची गरज नाही. अगदी वाटलच तर अर्धा चमचा गरम मसाला घालावा
_ इथे डाळ तांदूळ खिचडीच्या आणखी काही कृती आहेत

माहितीचा स्रोत: 
बहिणीच्या मैत्रिणीची आई (बहुतेक)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अशी ही "पुर्णान्न "खिचडी अन डावी-उजवी बाजुने परिपुर्ण ताट हे खाल्ल्यावर तृप्ततेची ढेकर येणारच...आवडली.

<<भाजलेले पापड, बारक्या कैर्‍यांचं ताजं लोणचं, ही खिचडी, तिखट-मीठ लावलेल्या काकडीच्या किंवा कैरीच्या फोडी असा सगळा सरंजाम गच्चीवर न्यावा. गार वार्‍याच्या झुळुकी घेत ह्या सगळ्याचा आस्वाद घ्यावा. कॉलोनीतुन चक्कर मारणारी मैत्रिण दिसल्यास तिला पण जेवण्यासाठी हाक माराव>>

खरच मस्त बेत ....

मस्त. मस्त. थोडे मटारचे दाणे पण घालता येतील. सात्विक चवबद्दल अगदी अगदी.
करेंगा जी. बरोबरीस तूप आणि दही/ कढी. अर्धा तास झोप. आत्मा तृप्त.

माझी ऑल टाईम फेव्ह. बरोबर कढी, सार मस्त लागतं. फारच उत्साह असल्यास हिरव्या मिरच्या तळून किंवा गॅसवर भाजून तिखट.
मी ह्यात भरपूर भाज्याही घालते.

अशीच मसूर डाळीची "फिक्की खिचडी" मी पहिल्यांदाच इकडे नगर भागात खाली.
१ वाटी लांब बासमती/दिल्ली राइस, अर्धी वाटी मसूर डाळ, १ मोठा कांदा बारीक चिरून, १ टोमॅटो बारीक चिरून, कोथिंबीर वरून घालायला, आलं +लसूण + हिरवी मिरची ठेचून(हिरवी मिरची स्वादापुरतीच. ही फिक्की खिचडी आहे.), मीठ, तेल, जिरं,मोहोरी . पण फोडणीत हळद घालू नये. या खिचडीला मसूर डाळीचा फिकट लालसर रंग येतो.
बाकी नेहेमीप्रमाणे फोडणीत आधी कांदा परतावा, मग ठेचलेले वाटण, त्यावर धुतलेले डाळतांदुळ, मीठ घालून अगदी ही खिचडी अगदीच फडफडीत करावी. पाणी दुप्पट घालावे.
करून पहा.

गोड्या मसाल्याशिवाय असलेली अशी खिचडी करून पाहिली पाहिजे! छान आहे रेसिपी!
सहज आठवलं....
खिचडीके ये चार यार
घी पापड दही आचार!
विसुभाउ बापट यांची कविता आठवली..
मऊ मऊ खिचडी, साज्जुक तुप
वेगळं राह्यचं भारीच्च सुख्!!:स्मित:

फारच भारी लागते. साक्षात सिंडीच्या हातची ही खिचडी, अगदी गरमागरम आणि आयती खाल्लीय. दुपारी बागराज्यातल्या ए वे ए ठीत मनसोक्त हादडून झाल्यावर, इतकं सात्त्विक खायची सवय नसूनही भरपूर खाल्ली होती.

मृण्मयीने साक्षात सुदाम्याचे पोहे खाल्लेत अशा थाटात लिहिले आहे. Wink साध्या खिचडीला फारच छान अभिप्राय Happy

सायो , एरवी मी पण भाज्या घालते पण ही लसूण खोबर्‍याची खिचडी अशी साधीच करते सहसा.

अमा, मटार - फरस बी बारीक चिरुन - बोटभर गाजराचा कीस (:फिदी:) असं काहीही घालु शकता. पण लसूण हि मी नारळ ह्याचा जो मंद स्वाद येतो ना तो खूपच खास लागतो. ती चव मरु नये म्हणून इतर काही न घालता करा Happy

मानुषी, तुम्ही दिलीये तशी खिचडी खाल्ली आहे. ती जरा कोरडी असते. कढीशिवाय घशाखाली उतरणार नाही अशी Happy

लसूण घातलेला पदार्थ सात्विक? कैच्याकै.. लसूणीचे गुणधर्म तरी माहीती आहेत ना? का सात्विक शब्दाचा अर्थ माहीत नाही.
लसूणीसारखा उग्र वासाचा पदर्थ घालून सात्विक चव कशी येइल? Wink

का सात्विक शब्दाचा अर्थ माहीत नाही. >>
झंपे, या वाक्यानंतर प्रश्नचिन्ह नाहीये, पूर्णविराम दिला आहेस. म्हणजे, सात्त्विक शब्दाचा अर्थ तुला माहित नाही आहे असा त्याचा अर्थ होतो बरं का! Wink

खास करून कोकणात ही खिचडी शिळी खायची असेल तर खिचडीवर लसूण तेलात कढवून घेऊन घालतात आणि खातात. पोटासाठी हलका आहार म्हणून ताज्या खिचडीवर साजूक तूप, जोडीला फोडणीचं ताक, भाजलेला पापड आणि चवीला आंब्याचं नाहीतर लिंबाचं लोणचं असा बेत मुद्दाम एखाद्या दिवशी करतात. बिनमसाल्याची खिचडी म्हणजे सात्त्विक Happy

छान आहे रेसिपी. Happy डाताखि करताना मी डाता धुवून १०-१५ मि. त्यात पाणि ठेवून काढुन टाकते आणि अर्ध्या पाऊण तासाने खिचडी करते. ओठांनी खावी इतकी मऊसूत मोकळी होते.

मंजुडी,
>>झंपे, या वाक्यानंतर प्रश्नचिन्ह नाहीये, पूर्णविराम दिला आहे>><<
भारीच बाई विनोदी तुम्ही.... पुर्णविराम दिला व प्रश्णचिन्ह नाही म्हणजे मलाच अर्थ माहीत नाही? मला काहीही म्हणा हो काही वाटत नाही कारण काय आहे ना तुम्ही काय कुठलाही अर्थ काढाल.. तुमच्या बुद्धी नुसार. Wink मुद्द्यावर बोला ना पण...

तुम्ही लेखिकेच्या वतीने खिंड लढवता आहात का? तर ठिक आहे.
पण तुमचे ज्ञान यथातथाच असावे अशी शंका येतेय.

बिनमसाल्याची खिचडी म्हणजे सात्विक आणि लसूण घातलेली काय म्हणतात तुमच्यात/?(इथे 'तुमच्यात' लिहिते..) Wink

विनोदाला म्हणून ठिक आहे. पण इतके डेरींग वाक्य माहीती असल्याशिवाय टाकताय? कमाल आहे. मास्तरकी करत होतात का की करता?
हलका आहारात 'लसूण' घातलेला पदार्थ मोडते का? वा छान.
तुम्ही काय करा, तामसिक, राजसिक व सात्विक अश्याची वाख्या माहित करून घ्या. ती कळलीच तर मग पुढचे बोल्लु.. त्याआधी उगाच वेळ घालण्यात अर्थ नाही.

Lol
झंपे, तुझी ही आगपाखड अपेक्षितच होती. अगं तुला जो आहार सात्त्विक वाटतो तो तू खा, आम्हाला जो आहार सात्त्विक वाटेल तो आम्ही घेऊ, ठीक आहे ना? Happy

झालं लगेच दुसर्‍याने मुद्द्यावर टोकले की चुक आहे सांगितले की आगपाखड वगैरे शब्द. त्या कॅटगरीतले दिसता. तुम्ही.. बरं तुमचेच खरं. अता खुश.

प्रश्ण कोणी काय खायचं न्हव्ता.. पण जावू दे तुम्हाला सांगून समजायचे नाही.
तुम्ही पुन्हा तुमची आगापाखड( तुमचाच शब्द तुम्हाला परत) कराल. खुश रहा तुमचा सात्विक आहार खावून.;)

तुम्ही पुन्हा तुमची आगापाखड( तुमचाच शब्द तुम्हाला परत) कराल.>>>> आगापाखड नाही, आगपाखड! शब्दच परत करते आहेस ना, मात्रेचं व्याज नको गं त्यावर Wink

छान वाटत्येय. एकदा अशी (मसाला, गूळ न घालता, लसूण घालुन ) करुन बघेन.
मऊ मऊ खिचडी, साज्जुक तुप
वेगळं राह्यचं भारीच्च सुख्!! > Lol भारीच्च !

मी तांदूळ, असोली मूग डाळ, साधी मूग डाळ, दलिया, तूर डाळ आणि मसूर डाळ यांचे ठराविक प्रमाण घेऊन मिक्स डाळ्-तांडळाची खिचडी करते. बर्‍याचदा बटाटा व टोमॅटो यांच्या ठोकळा फोडी घालते. अधून मधून पालकाची पेस्ट पण. मस्त खिचडी + ताक (किंवा सार किंवा कढी किंवा मिश्र भाज्यांचे सूप इ.) + बटाट्याचे (वा पोह्याचे) पापड = मस्त तोंपासु बेत! Happy

ही खिचडी आज एका बाळंतिणीसाठी केली. मिरचीऐवजी मिरं घातलं. तिलाच खायची असल्यामुळे सढळ हातानं तूप घालता आलं. खिचडी आवडल्याचा फोन आला.

Pages