एका स्कूल सायकॉलॉजिस्टची डायरी : २

Submitted by मितान on 6 March, 2012 - 09:28

२२ एप्रिल २०११

मागचा आठवडा एकदम हॅपनिंग होता... मजा आली.

ठरल्याप्रमाणे अबक शाळेत गेले. मु अ बाई म्हणाल्या कार्यवाह आल्यावर या. दुपारी गेले. सरांनी बोलावलं. गार पाणी प्यायला दिलं. सर तसे थेट शिक्षण क्षेत्रातले नाहीत हे गप्पांना सुरुवात झाल्यावर लगेच समजले. वेगवेगळ्या विषयांवर गप्पा सुरू झाल्या. पुस्तकं, राजकारण, खेळ, स्पर्धा आणि मग शिक्षण. मी माझ्या मुलीला मराठी शाळेत घातलंय हा त्यांना धक्का होता. मग त्यांनी माझं अभिनंदन केलं आणि मी खूप धाडसी आहे असा अभिप्रायही दिला !!!! वर शुभेच्छाही मिळाल्या मला Happy

मला खरंच फार वाईट वाटलं. सरांचा व्यासंग जाणवत होता. वयाकडे पाहता अनुभवही उदंड असणार. त्यांची नातवंडं इंग्रजी माध्यमात शिकत आहेत याची किंचित खंतही बोलण्यात होती. पण मराठी माध्यमातील शिक्षणावर विश्वासही नव्हता. मग ते मराठी माध्यमातील शिक्षक, अभ्यासक्रम इ वर अगदी निराशाजनक बोलले. मी म्हटलं," सर, मी हे सगळं ऐकूनही आशावादी आहे." तर पटकन अचानक म्हणाले - " मी थकलोय आता. संपूर्ण निराश झालोय... "
हे ऐकून मला कसंतरीच झालं.

विषय बदलून मी माझ्या कामावर आणला. तर उत्तर - " तुझ्या पात्रतेएवढा पगार देणं मला जमणार नाही. शिवाय सध्या संस्थांतर्गत राजकारण एवढं माजलंय की तुला हे लोक कितपत टिकू देतील माहीत नाही. "
हा नकार आहे हे गृहीत धरून पण एका चांगल्या माणसाला भेटल्याच्या समाधानात मी निघाले.

मग एक दिवस वाटलं, परत एकदा सुरुवातीला उमेदवारी केलेल्या शाळेतच परत का जाऊ नये ? खरं तर तिथे पैसे फार कमी मिळणार आहेत. पण त्या क्षणाला प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणं, समविचारी लोक अवतीभवती असणं, कामाच्या पद्धतीत स्वातंत्र्य असणं आणि मुख्य म्हणजे हवा तेवढाच वेळ काम करता येणं या गोष्टी माझी गरज होत्या. परदेशात काढलेल्या चार वर्षात प्रत्यक्ष काम केले नसले तरी अभ्यास, वाचन भरपूर झाले होते. आधीचा अनुभवही पाठीशी होता. पण या गॅपमुळे आत्मविश्वास बोंबलला होता. कामाला सुरुवात झाल्याशिवाय, पकड आल्याची जाणीव झाल्याशिवाय हे आत्मविश्वास नावाचं शिंगरू ताब्यात येणं कठीणंच !

हा सगळा गुंता घेऊन शाळेत गेले. तेच ओळखीचे चेहरे, ओळखीचं वातावरण पाहताना घरी आल्यासारखं वाटलं. सर भेटले आणि कामाला कधी सुरुवात करतेस असा थेट प्रश्न आला.. मला मनातून आनंद झाला. उत्साहाचे कारंजे नाचू लागले. त्यांना हो म्हणाले. सरांनी कामाचे प्लानिंग करताना उपचारात्मक आणि प्रतिबंधात्मक कामांची आखणी करायला सांगितली.

पूर्वी मी खेळाडूंसाठी काम केलं होतं. आता रेग्युलर शाळेतल्या दोन हजार विद्यार्थ्यांसाठी करायचं होतं. माझ्यासोबत अजून दोन सहकारी समुपदेशक असणार होत्या.

दोन दिवसात कामाची आखणी, सहकारी मैत्रिणींची ओळख, कामाची विभागणी अशी गडबड झाली.

आज वाटतंय... हेच करण्यासाठी किती आसुसले होते मी...आता नवी सुरुवात. परत एकदा अभ्यासाला लागलं पाहिजे. स्कूल सायकॉलॉजिस्ट! म्हणजे नेमकं काय करता तुम्ही ? असे प्रश्न नेहमीचे. काय करतो आम्ही ? पालकसभेत स्वतःच्या रोल ची ओळख करून द्यावी लागेल. एका कागदावर लिहिले -
स्कूल सायकॉलॉजिस्टची कामे - विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि समाज या सगळ्यांसोबत काम करायचे.

१. भावनिक, वर्तनविषयक आणि समायोजनाविषयक समस्यांशी झगडणार्‍या विद्यार्थ्यांना समूपदेशन करणे
२. विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेनुसार उत्तम शैक्षणिक कामगिरी करण्यासाठी मदत करणे, त्यासाठी शिक्षण प्रक्रियेत येणारे अडथळे नेमकेपणाने शोधणे
३. मानसिकरित्या स्वस्थ, निरोगी राहाण्यासाठी संवाद कौशल्य, स्व-नियमन, समस्या निवारण, उद्दिष्ट निश्चिती, स्वयंशिस्त आणि आशावाद शिकण्यास मदत करणे
४. कौटुंबिक समस्या, अपघात, दुर्दैवी घटना अशा परिस्थितीत समायोजन साधण्यास मदत करणे
५. अध्ययन अकार्यक्षमता, भयगंड, न्यूनगंड अशा प्रकारच्या समस्या हाताळणे
६. वरील सर्व कामांसाठी गरज पडेल तिथे विविध मानसशास्त्रीय चाचण्या वापरणे
७. मुलांचे मानसशास्त्र, विकासाचे टप्पे, मुलांच्या अभिक्षमता आणि मूलभूत कौशल्ये यासंदर्भात शिक्षक आणि पालकांशी संवाद साधणे, आवश्यक तिथे पालकांचे समुपदेशन
८. विशेष गरजा असणार्‍या मुलांना योग्य त्या तज्ञाकडे पाठवणे.
९. वर्गातील वातावरण निरोगी, आनंददायी आणि प्रेरणादायी ठेवण्यासाठी शिक्षकांना मदत करणे
१०. वेगवेगळ्या सांस्कृतिक परिस्थितीतून आलेल्या आणि भिन्न वातावरणात रुळू पाहणार्‍या मुलांना मदत करणे.

बापरे ! हे सगळं किती आदर्श वाटतं ना !

ह्म्म.. उद्यापासून हे सगळं प्रत्यक्ष करायला सुरुवात. समस्या असणारी मुलं आणि पालक येतीलच. पण मुळात समस्या निर्माणच होऊ नयेत म्हणून काही कार्यक्रम तयार करता येईल का ? शाळेत जसे शारीरिक शिक्षणाचे तास असतात, जिम असते, योगासनं आणि प्राणायाम असतात तसे मानसिक आरोग्य उत्तम रहावे म्हणून काही नियमीत कार्यक्रम आखता येईल का ?

आधी एक ठरवायचं, कोणत्याही संस्थेत राजकारण असणार, चांगल्यासोबत फारसे चांगले नसलेले लोकही असणार, गट असणार, वर्चस्व आणि हेवेदावेही असणार. यात माझी शक्ती मी कमीत कमी घालवेन.
मी मुलांसाठी काम करायला इथे आहे. त्यामुळे आधी मी माझं मानसिक आरोग्य जपेन. आणि अजून एक, मदत मागायला येणारा कोणत्याही आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक थरातला असला तरी माझी व्यावसायिक नीतिमत्ता मी जपेन.

जमेल नं ?????

गुलमोहर: 

जमेल जमेल; नक्कीच जमेल.
पुढच्या वाटचालीला शुभेच्छा. आणि पुढच्या लेखाची प्रतीक्षा. Happy

जमेल , जमेल नक्की जमेल.
चार्टर एकदा कागदावर लिहून काढलं की अर्धी बाजी जिंकली. काय करायचंय ( अन काय करायचं नाहीये ) हे सुस्पष्ट झालं ना . पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा !

मला तर आजकाल शाळेत सायकॉलॉजिस्ट असतात हे ऐकूनच खुप आनंद होतो. पालक, शिक्षक ह्यांना कितीही नाही म्हंटले तरी सायकॉलॉजिस्ट सारखा दॄष्टिकोन नसतोच. शुभेच्छा!! Happy

वा मितान! का नाही जमणार?

मदत मागायला येणारा कोणत्याही आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक थरातला असला तरी माझी व्यावसायिक नीतिमत्ता मी जपेन. >>> खुपच चांगला विचार. मनःपूर्वक शुभेच्छा! Happy

शाळेत ज्या शिक्षा केल्या जातात त्याबद्दलही काही करणे असेल नं कामात?
अनेकदा वैविध्य दाखविल्याने मदत होऊ शकते - आपली मते न लादता तसे काही प्रयत्न केल्या जातात का? करता येतात का?

जमेल ..नक्कीच.. तुम्हाला शुभेच्छा..
पण तुम्ही खरच भारतातल्या शाळेबद्दल बोलताय? मुलांसोबत शिक्षकांसाठी पण एक समुपदेशन विभाग पाहिजे.इथे कोणी टीचर्स असतील तर त्यांची माफी मागते पण मुलांचा भर वर्गात अपमान करणे, त्यांना लागेल असं बोलणे.. मुलांची चुकी नसताना त्यांना चूक देणे हे प्रकार खूप वाढतात आहेत हल्ली..

नक्की जमेल. तुमच्या ह्या वाटचालीला शुभेच्छा!! खुप चांगले विचार आहेत तुमचे. यश नक्कीच मिळेल.

छान लिहिलयं , खुप सार्‍या शुभेच्छा !

(अवांतर : लोकहो डायरी २०११ मध्ये लिहिलेली आहे , आत्तापर्यंत नक्कीच जमलंही असेल. )

छानच लिहीले आहे!
सायकॉलॉजिस्ट्च्या रोल्सची यादी सर्वसमावेशक आहे.

मनापासून धन्यवाद सर्वांना Happy

aschig, हो, तो शालेय मानसतज्ञाच्या कामाचा भाग आहे. शिवाय समूपदेशक कधीही कोणावरही आपली मते लादत नाही.

प्रित, हो मी भारतातल्या शाळांबद्दल बोलत आहे. तुम्हाला वाईट अनुभव आलेला दिसतोय. असे अनेकांना येतात. याबद्दल लिहीन.

श्री, जमतंय आता Happy Happy डायरी २०११ मधली आहे हे लोकांच्या लक्षात आलं नाही यात लेखनशैलीचे यश समजते Wink

तुम्हा सर्वांच्या प्रतिसादातून छान उत्साह आलाय. नवा लेख लवकरच टंकेन Happy

Pages