हे कुसुमाग्रज ! तुम्हि रहिवासी गगनाचे -
परि कृतार्थ केली तुम्ही मराठी माती
या मातीमधल्या अगण्य अणुरेणूंची
जोडलीत सार्या नक्षत्रांशी नाती
कविवर्य वसंत बापटांनी जणू सार्या मराठी जगाच्या कुसुमाग्रजांप्रतीच्या भावना या कवितेत शब्दबद्ध केल्या आहेत. उत्तुंग कल्पनाशक्ती, अलौकिक प्रतिभा, वैभवशाली भाषा लाभलेले आदर्शांचे पूजक आणि अन्यायाचे विरोधक असे कुसुमाग्रज मराठी साहित्याच्या आकाशातील सूर्यासमान भासत आले आहेत. मनाला विसाव्याची गरज भासते अशा क्षणांना कुसुमाग्रजांच्या कवितेकडे, लेखनाकडे वळलो नाही; तरी त्यांचे साहित्य सूर्यप्रकाशासारखे आपसूक भेटत राहिले. मायबोली-मराठी भाषा दिन आणि कुसुमाग्रजांची जन्मशताब्दी ही निमित्ते आज त्यांच्या साहित्याशी जाणीवपूर्वक जवळीक घडवून आणण्यास कारण ठरली.
’वाटेवरच्या सावल्या’ हा वि.वा.शिरवाडकरांचा लेखसंग्रह ’विरामचिन्हे’ या नावाने आधी प्रकाशित झालेल्या संग्रहात आणखी काही लेखांची भर घालून साकारण्यात आला. आठवणींत घर करून राहिलेल्या व्यक्ती, घटना, स्थळे यांच्याकडे त्रयस्थपणे मागे वळून पाहताना उमटलेल्या प्रतिक्रिया असेच बहुतेक लेखांचे स्वरूप आहे. त्रयस्थपणा महत्त्वाचा यासाठी की या विषयवस्तूंकडे पाहणारे मन संतुलित , समजूतदार आहे आणि त्या आठवणींची अभिव्यक्ती संयत आहे. हे लेख स्वातंत्र्योत्तर काळात नियतकालिकांसाठी लिहिलेले, तर आठवणी अर्थात बालपणापासून ते कवी/लेखक म्हणून वलयांकित होण्यापूर्वीच्या काळातल्या.
जन्म पुण्यात झाला आणि घराण्याने लगेच पुणे सोडले व नाशिक परिसरातील एका खेडेगावात वास्तव्यास आले. अगदी लहानपणी, पिंपळगावात, "शाळा म्हणजे एकप्रकारचे एकतर्फ़ी समरांगण होते. शिक्षक शिकवण्यापेक्षा मारण्यामध्ये अधिक पटाईत असत. हात,पाय, छडी, रूळ, किल्ल्या, दौती, झाडाच्या फ़ांद्या अशी अनेक शस्त्रे घेतलेले हे शिक्षक मुलांना कसे, किती आणि कशाने बडवावे याचा सांगोपांग विचार करीत." ही परिस्थिती नाशिकमधील राजेबहाद्दर वाड्यातील न्यु इंग्लिश स्कूलमध्ये येईतो बदलली. देशप्रेमी मंडळींनी काढलेल्या या शाळेत शिक्षक-विद्यार्थी संबंध जिव्हाळ्याचे होते. वाङ्मया-काव्यासंबंधी प्रेम , क्रिकेटची आवड, नट म्हणून पदार्पण, हस्तलिखिताची ’भूमिगत चळवळ’, तालीमखान्यातील ’पराक्रम’ या सगळ्यात माध्यमिक शाळेतल्या त्या पाच वर्षांत आपण खूपच घडलो; हे सांगतानाच "माध्यमिक शाळेत विद्यार्थी जेवढा घडतो तेवढा प्राथमिक शाळेतही नाही आणि कॉलेजातही नाही. पहिल्या ठिकाणी माती फ़ारच ओली असते आणि दुसर्या ठिकाणी फ़ारच घट्ट" असे निरीक्षणही नोंदवले जाते. विद्यार्थी, शिक्षक आणि प्रेक्षक म्हणून नागरिकांच्या गुंतवणुकीतून बहरलेल्या आंतरशालेय क्रिकेटस्पर्धांतील सहभाग, त्यातल्या ’आहेरे आणि नाहीरे’ यांतला (पुढे हिंदी चित्रपटांत नेहमी दिसणारा) अंतिम फ़ेरीचा सामना आणि नाहीरेंचा रोमहर्षक विजय यांचे वर्णन; क्रिकेट भारतीय मातीत कसे, कधीपासून आणि किती खोलवर रुजले, मुरले आहे याचा सुखद प्रत्यय देते. जोरदार फ़टकेबाजीच्या जोरावर संघात स्थान मिळवले तरी क्षेत्ररक्षणात आपल्याला कोठे लपवायचे याची चिंता कप्तानाला असे हे सांगताना जणू भारतीय क्रिकेटमधल्या सार्वकालिक समस्येवर बोट ठेवले आहे.
शाळेत ’दत्तक’ तासाला आलेल्या इतिहासाच्या शिक्षकांनी भा.रा.तांब्यांची ’वारा’ ही कविता शिकवायला घेतली. "पुढे वर्षानुवर्षे अस्तित्व ज्या एका नशेत गुरफ़टले त्याची पहिली धुंदी त्या दिवशी जाणवली." त्याच पुरोहित या शिक्षकांसाठी एक निरोपाची कविता लिहिली आणि सरांच्या हाती द्यावी न द्यावी अशा शंभर हेलकाव्यांनंतर, एक दिवस त्यांच्या हाती देऊन पोबारा केला.
सिनेमाच्या क्षेत्रात प्रवेश करून धामधून उडवून द्यायच्या इच्छेचे आणि सिनेमासृष्टी पादाक्रांत करण्याच्या महत्त्वाकांक्षेचे पर्यवसान सिनेमा कंपन्यांच्या/स्टुडिओंच्या फ़ाटकावरील लालाजींशी सामन्यांत आणि त्यानिमित्ताने ’राष्ट्रभाषेच्या कत्तली’तच होत राहिले. प्रभात फ़िल्म कंपनीत व्ही. शांताराम यांच्याशी मुलाखत तर घडली; पण "तुम्हाला सिनेमात क्रांती करता येते का? अभिनय/ दिग्दर्शनादी क्षेत्रातील परमोच्च विक्रम तोडता येतील का?" अशा प्रश्नांऐवजी "तुम्हाला गाता येते का?" असा प्रश्न आल्यावर, शांतारामांसारख्या श्रेष्ठाला आपण आपल्या स्वराच्या सहाय्याने कसे ’चरकात’ घातले याचे खुसखुशीत वर्णन केले आहे. चित्रपटलेखन/निर्मिती, अभिनय करण्याचे स्वप्न अखेर नाशिक येथेच हिंदुस्थान कंपनीच्या मामा शिंदे यांच्यासाथीने साकार झाले; तोही अखेर ’अव्यापारेषु व्यापार’च ठरला.
चित्रपटांप्रमाणेच नियतकालिक/वृत्तपत्रांच्या क्षेत्रात क्रांती घडवायच्या मनसुब्यांची मजल पुण्यातील प्रभात दैनिकात नोकरी, मुंबईतील सारथी, प्रभा (सकाळ), धनुर्धारी या साप्ताहिकांत उपसंपादक आणि नाशिक येथे स्वदेश या द्विसाप्ताहिकात सहसंपादक इथपर्यंतच राहिली. त्या निमित्ताने त्या त्या नियतकालिकांच्या कार्यालयांची, तसेच वा.रा.ढवळे, वा.ल.कुलकर्णी, चित्रकार गोडसे, प्रभाकर पाध्ये, पां.वा. गाडगीळ इत्यादिकांची रंजक चित्रणे समोर येतात.
ज्यासाठी मोठ्या उत्सुकतेने वाचायला घेतले, कुसुमाग्रजांच्या त्या लेखनाबद्दल या पुस्तकात फ़ारच कमी मजकूर आहे. पुणे आकाशवाणीसाठी लिहिलेल्या लेखात कवित्वाविषयी, कवितेविषयी लिहिले आहे तेवढेच. "कवी नुसता जगतच नाही, तर ठराविक कालावधीमध्ये इतरांपेक्षा अधिक जगत असतो. विकृत आसक्तीपासून अविकृत भावविचारापर्यंतचे एक अनुभवविश्व त्याच्या सभोवार उमलते आणि त्याची भावात्मक प्रतिक्रिया झपाटलेल्या लयबद्ध शब्दांत ओतल्याशिवाय त्याला समाधान लाभत नाही." "कवी म्हणजे सुसंस्कृत समाजातील असंस्कृत अथवा रानटी मनुष्य. याचा अर्थ कवीजवळ संस्कृती नसते असा नाही, किंबहुना इतरांपेक्षा बहुधा अधिक असते. पण त्याची निष्ठा असते ती संस्कृतीच्या मूल, विशुद्ध तत्त्वावर, त्यावर उभारलेल्या रंगीत , नक्षीदार ताबुतावर नव्हे."
"’तिने दिले त्यापेक्षा अधिकाची अभिलाषा धरली नाही. ती कायमची अंतर्धान पावली तरी त्याची खंत नाही, कारण जे द्यायचं आहे ते तिने दिले आहे. तिने अनेक व्यथा दुखणी दिली असली , तरी तिने जे सुख व समाधान दिले ते अन्यत्र मिळाले नसते." अशी कवितेसंबंधी कृतज्ञ नोंद आहे..
"नाटकाच्या बाबतीत कथानक हा पहिल्यापासूनच माझा मर्मबिंदू-वीक पॉइंट होता. (अद्यापही आहे!) एखादे स्वभावन जितके मनात घुसते तितके कथानक घुसत नाही." हे वाचल्यावर शिरवाडकरांच्या नाटकांतील उत्तुंग व्यक्तीरेखांची आठवण होतेच.
"लहान मुलीसारखी कविता कोणासमोर उभी करणे आणि अनुकूल अभिप्रायासाठी कटोरा पुढे उभे करणे म्हणजे कवितेचा अपमान आह"; अशा हळव्या भावनांच्या कवित्वाच्या प्रथमावस्थेत लिहिलेल्या शेदीडशे कविता, (त्यातील काही अग्रेसर मासिकांत प्रसिद्ध झालेल्या) कुसुमाग्रजांनी आपल्या संग्रहातही घेतल्या नाहीत अथवा शिल्लकही ठेवल्या नाहीत!
पुस्तकातील लेखनाची शैली त्या काळातील जगण्याला साजेशी पाल्हाळिक, मोकळीढाकळी आहे; ,तिथेच "सावरकरांच्या सार्या मतांना आणि तत्त्वज्ञानाला आपण तरी केव्हा अव्यभिचारी नमस्कार केला आहे?". "त्या राजधानीच्या शहराने(मुंबई) आपल्या घरापेक्षा रस्त्यांचाच परिचय मला अधिक करून दिला होता." अशी थोडक्यात खूप काही सांगून जाणारी वाक्ये आहेत. "पहाडावरील पाणी जितक्या सहजतेने खाली उतरते तितक्या सहजतेने मी सत्याग्रही पक्षात सामील झालो"; "एखाद्या तटस्थ राष्ट्राप्रमाणे मी इच्छा आणि अपेक्षा नसताना युद्धात गोवला गेलो." असा उपमांचा मारा जागोजागी आहे. लहानसहान प्रसंगांचे नाट्यमय वर्णन आहे, तसेच भावनांच्या ओघात वाहून न जाण्याची संयत जाग आहे. "संपादकीय विभागात ते हस्तक्षेप काय पदक्षेपही करीत नस";"कवींना नावेही असतात आणि हजेरीपटावर लिहिल्याप्रमाणे त्यांच्या संपूर्ण नावाचा उपयोग केला जातो हेही नवीन होते." अशा विनोदांची पखरण आहे. आचार्य अत्रे, वि.स.खांडेकर यांसारख्या व्यक्तींची मोजकी रेखाटने आहेत; तशीच नाशिकातील विजयानंद थिएटर, नदी यांच्याशी संबंधित आठवणी आहेत. अधिकतर लेखांची शीर्षके ही स्थलनामे आहेत.
हे पुस्तक वाचताना कुसुमाग्रजांच्या सुरुवातीच्या प्रवासाची, धडपडीची, त्या काळाची कल्पना येते. पण एक माणूस म्हणून वि.वा.शिरवाडकरांबद्दल अधिक काही कळते का? खरे तर त्यांच्या कवितेतून दिसणारी कुसुमाग्रजांची प्रतिमा अधिक ठसठशीत होते. "ते त्यांच्या लेखनासारखेच आहेत." असे शिरवाडकर वि.स.खांडेकरांबद्दल म्हणतात, तेच शिरवाडकरांबद्दलही म्हणावेसे वाटते.
- भरत मयेकर
प्रकाशचित्रे प्रताधिकार आणि मनःपूर्वक आभार- कुसुमाग्रज प्रतिष्ठान
तुम्ही नेहमी लिहीत का नाही
तुम्ही नेहमी लिहीत का नाही मयेकर ?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान आढावा. आवडला. काही नवीन गोष्टी समजल्या.
कसला सुंदर लेख आहे हा.. रैना
कसला सुंदर लेख आहे हा..
रैना यांना अनुमोदन
"कवी नुसता जगतच नाही, तर ठराविक कालावधीमध्ये इतरांपेक्षा अधिक जगत असतो. विकृत आसक्तीपासून अविकृत भावविचारापर्यंतचे एक अनुभवविश्व त्याच्या सभोवार उमलते आणि त्याची भावात्मक प्रतिक्रिया झपाटलेल्या लयबद्ध शब्दांत ओतल्याशिवाय त्याला समाधान लाभत नाही." "कवी म्हणजे सुसंस्कृत समाजातील असंस्कृत अथवा रानटी मनुष्य. याचा अर्थ कवीजवळ संस्कृती नसते असा नाही, किंबहुना इतरांपेक्षा बहुधा अधिक असते. पण त्याची निष्ठा असते ती संस्कृतीच्या मूल, विशुद्ध तत्त्वावर, त्यावर उभारलेल्या रंगीत , नक्षीदार ताबुतावर नव्हे."
विचार करायला लावणारा नवा विचार.. पटतंय !!
मस्तच लेख मयेकर, अत्यंत
मस्तच लेख मयेकर, अत्यंत आवडला.
सुंदर लिहिलय
सुंदर लिहिलय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुरेख लेख. आवडला.
सुरेख लेख. आवडला.
रैना +१
रैना +१
छान
छान![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भरत, मस्त आढावा घेतलात. हे
भरत, मस्त आढावा घेतलात. हे पुस्तक नक्की मिळवून वाचणार.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भरत मयेकर, छान आढावा घेतलात
भरत मयेकर, छान आढावा घेतलात आपण लेखामधे. अप्रतिम पुस्तक आहे हे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एकच लहानशी चूक सुधारणार का कृपया? कुसुमाग्रजांचं पुस्तक आहे ते 'वाटेवरच्या सावल्या'.
वाटेवरल्या सावल्या हे माझ्यामते माडगूळकरांचं आहे
ख्प सुंदर लेख...नक्की वाचणार
ख्प सुंदर लेख...नक्की वाचणार हे पुस्तक![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भरत, छान आढावा घेतलात. नेटकं
भरत, छान आढावा घेतलात. नेटकं लेखन.
हा लेख वाचल्यावर, 'वाटेवरच्या सावल्या' पुस्तक वाचावसं वाटतंय.
सुंदर आढावा भरत... खुप
सुंदर आढावा भरत... खुप भावला..
"कवी म्हणजे सुसंस्कृत समाजातील असंस्कृत अथवा रानटी मनुष्य. याचा अर्थ कवीजवळ संस्कृती नसते असा नाही, किंबहुना इतरांपेक्षा बहुधा अधिक असते. पण त्याची निष्ठा असते ती संस्कृतीच्या मूल, विशुद्ध तत्त्वावर, त्यावर उभारलेल्या रंगीत , नक्षीदार ताबुतावर नव्हे."--- क्या बात है !