इन्सेप्शन एक अस्वस्थ करून सोडणारे स्वप्न

Submitted by अश्विनीमामी on 23 January, 2012 - 01:35

तुमचं कधी असं होतं का? झोपेतनं उठता तरीही झोपेत बघितलेल्या स्वप्नाचा परिणाम जाणवत राहतो. स्वप्नात भेटलेली लोकं, त्यांनी आग्रहाने सांगितलेलं काहितरी, कसलं तरी विचित्र वातावरण, हे लगेच मनावेगळं करून आपण नव्या दिवसाला लगेच सामोरं जाउ शकतोच असे नाही. जागेपणीच्या वातावरणाशी जुळवून घ्यायला थोडा वेळ नक्की लागतो. स्वप्न होतं पण त्यात पाहिलेलं सारं किती खरं होतं नाही का? ह्या संभ्रमित अवस्थेत आपण काही क्षण घालवितो. २०१० साली आलेला इन्सेप्शन हा इंग्रजी सिनेमा ह्या भावनेलाच दिलेले एक पूर्ण रूप आहे. चित्रपट बघितल्यावर काही दिवस तरी तुम्ही निर्धास्तपणे झोपायला जरा बिचकालंच.

फॉलोइंग, इन्सोमिया, बॅट्मन बिगिन्स, द प्रेस्टिज, द डार्क नाइट अश्या चित्रपटांचा दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन यांना इन्सेप्शन चित्रपटाच्या संकल्पनेनं कितीतरी वर्षे झपाटून टाकले होते. आपण आपली स्वप्ने दुसर्‍या ओळखीच्या किंवा अनोळखीही माणसांच्या बरोबरीने बघू शकतो, ही ती मूळ संकल्पना. त्यावर त्यांनी एक अतिशय भावनाप्रधान पण थरारक अशी अनेक पातळ्यांवर जिवंत होणारी कथावस्तू बांधली आहे. त्याचे मोठ्या पड्द्यावरील सादरीकरणही फार प्रभावी झाले आहे. ऑस्करसारखा अत्युच्च सन्मान ह्या चित्रपटास प्राप्त झाला नसला तरीही संवेदनशील प्रेक्षकांच्या मनात चित्रपटाने आपले असे खास स्थान निर्माण केले आहे. स्टार वॉर्स मालिका, मॅट्रिक्स मालिका अश्या सिनेमांनी जसा त्यांचा खास चाहता वर्ग निर्माण केला आहे तसेच इन्सेप्शनचे आहे. शास्त्रीय संकल्पनांवर आधारित पण संपूर्ण पैसावसूल करमणूकपट असेच ह्या चित्रपटाबाबत म्हणता येइल.

चित्रपटाचा नायक डॉम कॉब हा लोकांच्या स्वप्नात शिरून त्यांनी खोल अंतर्मनात जपलेली गुपिते पळवून नेणारा माणूस. हेर किंवा चोर! किंबहुना दोन्हीही. त्याच्या पत्नीने त्याच्या बद्दल केलेल्या तक्रारीमुळे तो अमेरिकेत आपल्या मुलांकडे जाऊ शकत नाही. अमेरिकेत पाय ठेवताच त्याला पत्नीच्या खुनाबद्दल अटकच होइल अशी आत्महत्त्या करण्यापूर्वी पत्निनेच व्यवस्था करून ठेवली आहे. एक मोठा जपानी उद्योजक त्याला अमेरिकेत परत जाण्याची सुविधा देऊ करतो व त्या बदल्यात गुपिते पळविण्याचे नाही तर कल्पनारोपणाचे अवघड काम त्यास देतो. कॉब ही कामगिरी कशी पार पड्तो व ते करत असताना त्याच्या अंतर्मनात खोलवर लपलेली प्रिय पत्नीची स्मृती कसा त्रास देते, इतरांच्या जिवावर उठते ही चित्रपटाची कथा!

जगातल्या कोणत्याही जीवाणू, विषाणूंपेक्षाही जास्त शक्तिशाली आहेत कल्पना. एखादी कल्पना/ विचार मनात आला कि तो तिथे रुजतो, फोफावतो व आपल्याला त्यानुसार वागणे भाग पड्तो. समजा हा विचार तुम्ही सुषुप्तावस्थेत असताना कोणी तुमच्या मनात रुजवला तर? तुम्ही जागे झाल्यावर तो विचार तुमचा स्वतःचाच आहे असेच तुम्हाला वाटेल व तशी कॄती तुम्ही कराल. हा त्या संकल्पनेचा गाभा आहे.

माझे स्वप्न जीवन लहानपणा पासून अतिशय सम्रुद्ध राहिले आहे. एक मजेची गोष्ट म्हणजे कुठेही गेले व राहिले तरीही स्वप्नात माझे घर म्हणून पुण्यातील लकडीपुलाजवळचे, पांचाळेश्वराच्या मागे असलेल्या इमारतीतलेच घर येते. जेव्हाही काही संक्रमण अवस्था असते किंवा असह्य, न सुटणारे अवघड प्रश्न समोर येतात तेव्हा स्वप्ने पड्ली कि स्वप्नात सुपर सॉनिक विमाने मोठ्या संख्येने येऊन ते घर नष्ट करायचा प्रयत्न करतात. पाकिस्तान युद्धात १९७१ मध्ये त्या घरात ब्लॅक आउट करून राहिल्याचा परिणाम. असे मला वाट्ते. स्वप्नांशी माझे खूप जवळचे नाते आहे. कधी कधी काही प्रश्नांची उत्तरे जागेपणी शोधणे अवघड जाते पण स्वप्ने बघताना अंतर्मन एखाद्या अश्या ठिकाणी नेते की निदान ते प्रश्न सोडविण्याच्या मार्गावर आपण नकळत जाऊन पोहोचतो. अशक्य उंच असे पर्वत, भीतीदायक जोर असलेले पाण्याचे उन्मत्त प्रवाह, मनाला सुखविणार्‍या फुलांच्या पसरलेल्या बागा, भीतिदायक पक्षी, वेगात जाणारी विमाने व उड्त्या तबकड्या, आकाशातील भिवविणारे पण अचंबित करणारे तारे हे सर्व मी स्वप्नात पाहिलेले आहे. माझ्या कल्पनाविश्वात त्या स्वप्नांना एक अनन्यसाधारण स्थान आहे. त्यामुळे हा स्वप्नांवर आधारित चित्रपट माझ्यासाठी एक पर्वणीच होती.

सिनेमात लिओनार्दो डिकॅप्रिओ, मारिअन कोटिलार्द, केन वातानाबे, जोसेफ गॉर्डन लेविट, एलेन पेज व इतर सर्वांचीच कामे अतिशय सुंदर वठली आहेत. डिजिट्ल आणि ऑडिओ विभागाचे काम अप्रतिम आहे यात शंकाच नाही. त्या कलाकारांना ऑस्कर सन्मान मिळालेच आहेत. पण असे सिनेमे कधी कधी अगदी कोरडे, तंत्रबहुल होतात तसे इथे झालेले नाही. पहिल्या अ‍ॅक्शन दृष्यानंतर लिओ हॉटेलातील खोलीत बसतो मुलांशी फोनवर बोलतो नंतर हतबल होतो हे अगदी खरे आहे. मी फार वेळा अनुभवलेले आहे. काम आहे, मुलांना भेटू शकत नाही, आई नाही आहे, मुलाला ते समजत नाहीये. मुलांना अगदी बघावेसे वाट्ते आहे ही मनःस्थिती त्याने उत्तम साकार केली आहे. हे अगदी जगात कोणासही वाटू शकते. तिथेच चित्रपटाची पकड बसली व ती शेवटच्या दॄश्यापर्यंत सुट्लीच नाही.

एम. सी. एशरची चित्रे ज्यांना आवड्तात त्यांना हा चित्रपट नक्की आवडेल. त्याच्या इन्फिनिट लूप, पेनरोज स्टेअर्स चा चित्रपटात यशस्वी वापर केला आहे. माझ्याकडे एशरच्या चित्रांचा मोठा संग्रहच आहे. ६००० रु पगार असतानाही ते १६०० रु चे पुस्तक घेऊन घरी बोलणी खाल्ली होती. पण सिनेमा पाहताना ते जुने सुह्रुद भेट्ल्यासारखे वाटते. गोडेल एशर बाख नावाचे गणित, संगीत व एशरची चित्रे यांची सांगड घालणारे एक दिव्य पुस्तक आहे त्याचा वापरही सिनेमाचे संगीत बनविताना केला आहे. सिनेमाच्या स्क्रिप्ट वर ९ वर्षे काम झाले. ते अगदी परिपूर्ण बनविल्यावरच चित्रिकरणास सुरुवात झाली. या शिस्तीचे नक्कीच कौतुक आहे व ते सिनेमात दिसून येते.लिओ अरियाड्नी ला काम समजावून सांगतो तेव्हा स्वप्नात त्यांनी साकारलेल्या पॅरिसची अर्ध्यावर घडी पडते व ते चालत दुसर्‍या मितीत जातात हा सिक्वेन्स अतिशय सुंदर आहे. आयमॅक्समध्ये बघायला मिळाल्यास चुकवू नका. इन्सेप्शनच्या पट्कथेत एकही शब्द वावगा नाही. मध्येच हसवूनही जातात. साइतो ( उद्योजक ) एका ठिकाणी I bought the airline, that seemed neater. म्हणतो तेव्हा तर मला खूप मजा वाट्ली. अगदी खास उद्योजक विचारसरणी. त्यात रसायनांचे कंपाउंडींग करून निद्रिस्त करणारी औषधे बनविणे वगैरे अगदी ओळखीची गोष्ट आहे त्यामुळे सिनेमाशी जवळीक जास्त वाढ्ली.

आपण जागेपणी आपल्या मनःशक्तीचा थोडासाच भाग वापरतो. स्वप्ने बघताना त्यात आपले मन काहीही करू शकते. एखादी मोठी इमारत संकल्पित करताना आपण तिच्या प्रत्येक बाजूचा विचार करतो व उभारणी करतो. पण कधी कधी असं वाट्तं की हे आधी पासूनच इथे होतं अन आता ते फक्त आपल्यासमोर टप्प्या टप्प्याने प्रकट होते आहे. स्वप्नात आपल्या सभोवतालचे जग एकाच वेळी साकारत जाते व अनुभवता येते. हे इतक्या चपळाईने व सफाईने होते की आपल्याला त्यात काही वावगे आहे याचा पत्ताही लागत नाही. स्वप्नातील जग आपण स्वतः निर्माण करतो. त्यात काहीतरी विचित्र असले तरी ते तेव्हा जाणवत नाही तर उठल्यावर जागेपणीच ते ठळक होते.

कल्पनारोपणाच्या अवघड कामात कॉब व त्याचे सहकारी त्यांच्या सब्जेक्ट्च्या अंतर्मनात खोल खोल जातात. शेवटी अगदी अथांग पसरलेल्या निरामय अश्या लिंबो स्टेट मध्ये असताना चित्रपटातील खरे भावनिक नाट्य सामोरे येते. कॉब आपल्या अतिप्रिय पत्नीच्या स्मृतीला दूर करू इच्छित नाही. अगदी जिवाचा धोका पत्करायची पण त्याची तयारी असते. तरूण पणी कॉब व त्याची पत्नी मॅलरी ह्या लिम्बो अवस्थेत खूप काळ घालवितात. त्यांच्या स्वप्नातील घरे, इमारती बारकाईने बनवितात. तिला तेच आयुष्य खरे वाटू लागते. त्यातून तिला बाहेर काढण्यासाठी कॉब " हे जीवन खरे नाही. " ह्या विचाराचे रोपण तिच्या अंतर्मनात करतो व तिला जागे करतो. पण तो विचार तिला जागेपणी ही घेरून टाकतो. ती सत्य जीवन स्वीकारू शकत नाही व जीव देते. तिच्या मृत्यूस व मुलांना पोरके करण्यास आपण जबाबदार आहोत ह्या अपराधी पणाच्या जाणीवेतून कॉब बाहेर पडायला खूप वेळ घेतो. त्यात तोच शेवटी स्वतःस हरवून बसतो कि काय अशी शंका आपल्याला येऊ लागते.

प्रचंड गतिमान अशी थरारक दॄश्ये एका पातळीवर चालू असतात त्याचवेळी हे भावनिक नाट्य आपल्या उत्कर्ष बिंदूस पोहोचते व कॉब आपल्या सहकार्‍यांसकट स्वप्नातून बाहेर येतो. फिशर ह्या तरूण उद्योजकाच्या मनात कल्पनारोपणाची कामगिरी यशस्वीरीत्या पार पाडून अमेरिकेत प्रवेश करतो व आपल्या मुलांना भेटतो. इथे सिनेमा संपला पाहिजे पण तो टोटेम म्हणून वापरत असलेला धातूचा भोवरा फिरतच राहतो व प्रेक्षकांच्या मनात हे सत्य आहे कि स्वप्नच असे प्रश्नचिन्ह निर्माण करून सिनेमा संपतो.

एकाच वेळी, पहिले फिशरच्या स्वप्नातील जग, मग दुसर्‍या पातळीवरील हॉटेल व सर्वात शेवटी फिशरचे अंतरंग, जिथे कडेकोट सैन्याच्या बंदोबस्ताला तोंड देऊन त्याचे वडिलांबरोबर असणारे अवघड नाते सुरळित करून कॉबला एका नव्या उद्योगाच्या संकल्पनेचे आरोपण करायचे असते तो तुरुंग सदृश्य भाग व त्याही खाली दडलेले अथांग असे कॉब व मॅलरीचे ढासळते अंतर्मनातील विश्व अश्या चार पातळ्यांवर ह्या चित्रपटाच शेवटचा भाग घड्तो. ह्या सर्वांना घेऊन उड्णारे विमान व त्यात गाढ झोपलेले फिशर, कॉब व त्याचे सहकारी ही एक सत्य परिस्थिती पण आहेच. व चित्रपट बघणारे आपण ही अजून एक मिती याची एक सरमिसळ होते व प्रेक्षकाला एक वेगळाच अनुभव देऊन जाते.

मुख्य कलाकारांबरोबरच एलेन पेजची वास्तुशास्त्रज्ञ, जोसेफ गॉर्डन लेव्हिट चा आर्थर - कॉबचा शोधकाम करणारा मदतनीस. दिलीप राव यांचा युसूफ - झोप येणारी औषधे बनविणारा, स्वप्नात कोणतेही रूप घेऊ शकणारा टॉम हार्डीचा एम्स अश्या अनेक व्यक्तिरेखांनी चित्रपटाचा आलेख अधिकच समृद्ध केला आहे. एम्सची व्यक्तिरेखा जराशी बेदरकार, जेम्स बाँड्च्या मानसिकतेशी जवळिक साधणारी आहे. जुनो सारख्या धक्कादायक चित्रपटानंतर एलेन पेज चे ह्या चित्रपटातील दर्शन सुखद, आश्वासक आहे.

हान्स झिमर यांनी दिलेले संगीत म्हणजे कथावस्तूचा प्राण आहे. मोंबासातील पाठलागाच्या वेळी वेगवान होणारे, हाफ रिमेंबर्ड ड्रीम चे हळूवार पण अस्वस्थ करणारे. सर्व रचनांना चित्रपटातील घटनाक्रमाचे संदर्भ तर आहेतच पण संध्याकाळच्या धूसर वेळी ऐकल्यास मनात कालवाकालव करणारे हे परिणामकारक सूर आहेत.

सत्य, स्वप्न आणि आठवणी शेवटी खरे काय अन खोटे काय, ते ठरविणारे आपण कोण? शांतपणे डोळे मिटून घ्यावेत, निद्रादेवीच्या साम्राज्यात जावे, सामोर्‍या येणार्‍या चित्रविचित्र कल्पना निरखून बघाव्यात, आश्चर्य व्यक्त करावे, अजून पुढे अंतर्मनात झेपावावे, आपल्याला सोडून गेलेल्या प्रियजनांशी परत गळाभेट करावी.

परत जागे होण्यासारखे, तितके महत्त्वाचे काय आहे खरे तर असा प्रश्न उभा करणारे. अस्वस्थ करून सोडणारे आहे हे इन्सेप्शन नावाचे स्वप्न.

अश्विनी खाडीलकर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चित्रपटपरिक्षणाबद्दल ब्लॉग कधी काढताय ?>>
आय्या. लाजायले कि मी. जॉन मॅक्लेन आणि निओ ह्या व्यक्तिरेखांबद्दल ल्ह्यायचे आहे. इदरिच लिकतूं

जॉन मॅक्लेन डाय हार्ड का?? लिहा लिहा.
मला त्या चित्रपटातील चुरचुरीत संवाद फार आवडतात.
आणि निओ मॅट्रिक्स ??? ते ही लिहा.
वाट बघतोय. Happy

लई भारी लिहिलय.. त्यातली एक एक वाक्यं घर करुन राहतात मनात..

व्हॅनिला स्काय सोबतच, इटर्नल सनशाईन ऑफ स्पॉटलेस माइंड नावाचा सिनेमा नक्की पहा. केट आणि जिम गॅरीचा.. थोडाफार सेम कॉन्सेप्ट आहे पण इन्सेप्शन जास्त सफाईदार.. Happy

नोलन च्या दिग्दर्शन कौशल्याबद्दल काही लिहायलाच नको. त्याचा मेमेंटो, बॅटमॅन सेरीज आणि द प्रेस्टिज पण अशक्य आहेत... Happy

इन्सेप्शन..... प्रच्चंड आवडलेला मूव्ही. त्यावर कुणी इतकं छान आणि कळेलसं लिहू शकेल असं मला वाटलं नव्हतं.
मामी, तुस्सी ग्रेट हो....
चित्रपट अगदी "कान देऊन" बघण्यासारखा आहे... खरतर कान देऊन बघितला नाही तर बरच काही (मागच्या संगीतासकट) हरवेल...
स्वाती... <<जोवर एखादा विचार माणसाला त्याच्या स्वतःच्यात मनातून निर्माण झाला आहे असं वाटत नाही तोवर केवळ इतरांनी सल्ला वा उपदेश दिल्याने त्याची वर्तणूक बदलू शकत नाही. तर सब्जेक्टला तो त्याचाच विचार वाटेल अशा पद्धतीने तो त्याच्या मनात/डोक्यात रुजवणं म्हणजे इन्सेप्शन.>>
किती म्हणजे किती ठळक बाई? जियो..

अमा, चित्रपटाच्या निमित्तानं आत्मचिंतन. अप्रतिम. सिनेमा आवडला होताच पण या लेखाच्या प्रेमातच पडलेय. आता तुझ्या नव्या बारकाव्यांनिशी पुन्हा बघणार.

रात्री उशिरा झोप येत असताना हा पिक्चर बघायला सुरु केला आणि अर्ध्यातच बंद केला त्यामुळे अर्थातच डोक्यात शिरलेला नाही. तेव्हा पुन्हा एकदा जागेपणी बघून मगच तुमचा लेख वाचणार अमा. वरच्या प्रतिसादांवरुन चांगला लिहिलाय असं लक्षात आलंय.

माझ्या नवर्याचा प्रचंड लाडका सिनेमा...! मी अजून पाहिलेला नाही, अनेकदा त्याच्याकडून story ऐकलेय, स्वप्नात स्वप्न इ.इ. कळल काहीही नव्हत. मामी, तुमच परीक्षण छान...!

स्व्पानातल घराचा अनुभव माझा पण असाच, माझ्या आजोळच घर, आता पडून तिथे इमारत उभी राहिली तरी अजून जसच्या तस स्वप्नात दिसतं. इतक खर कि सकाळी उठल्यावर पण वाटत राहत ते तिथेच आहे अजून, आत्ता गेल तर असेल पहिल्यासारखाच.

मस्त!

> अश्या चार पातळ्यांवर ह्या चित्रपटाच शेवटचा भाग घड्तो
इथे आणि इतरही ठिकाणी GEB ची (पुन्हा पुन्हा) आठवण होते.

खूपच छान लिहिलय. मी बरेच दिवस बघीन बघीन म्हणत होते, पण तेवढी उत्सुकता वाटत नव्हती. पण आता पाहिलाच पाहिजे हा चित्रपट.

अश्विनी,खूपच छान परिक्षण्.पाहिला तेंव्हा कळालाच नाही.आता परत पाहायला मिळाला तर समजेल असे वाटते आहे.

धन्यवाद. मास्क चित्रपटात मास्क घातलेला जिम कॅरी जसे ऑस्कर स्वीकारतो त्या पद्धतीने. थॅण्क्यू थँक्यू.

मस्त लिहिलय. एकही फ्रेम देखील न चुकवता बघण्याचा/ऐकण्याचा चित्रपट आहे.

मला लिओनार्डोचं कायम कौतुक वाटतं. किती वेगवेगळ्या भूमिका तो उत्तम रीत्या करतो. अक्षरशः ती भूमिका जगत असल्यासारखं वाटतं. टायटॅनिक, ब्लड डायमंड, कॅच मी इफ यु कॅन, अ‍ॅव्हीएटर, शटर आयलंड, आणि इन्सेप्शन हे माझे आवडते.

स्वप्नातुन स्वप्न ४ वेळा व परत येणे ४ वेळा ... माझा शब्दशः आssss वासला होता ते पहाताना. अप्रतिम चित्रपट. मस्त लेख अमा. मी सुध्धा एकटीने, कोणीही घरात नसताना, सामसुम शांततेत पाहिला होता.

मस्त लेख... हा चित्रपट २ वेळा पहिला आणि आता सी.डी.. आणून ठेवली आहे. हवातेन्व्हा बघता येतो.. Happy

नंद्या... लिंक भारी... Happy

बरं झालं लिहलेय मामी, आताच मागे हा चित्रपट पचवण्याचा प्रयत्न केला होता, थोड्याच वेळात विकेट पडली. आता हा लेख काळजीपूर्वक वाचलाय, बघतो आता किती पचतोय तो..

>>तेव्हा पुन्हा एकदा जागेपणी बघून मगच तुमचा लेख वाचणार अमा. वरच्या प्रतिसादांवरुन चांगला लिहिलाय असं लक्षात आलंय.<< कधी कधी फक्त प्रतिसाद वाचणारा मी एकटाच नाही तर!! Happy

काल मी पुन्हा पाहिला. थांबवत, मागे नेत सावकाशीनं पाहिला. अमेझिंग!

मग या लेखाची आठवण आली. आता हे वाचून, साउंडट्रॅक ऐकून मग पुन्हा बघणार. एकदा बघून संपवण्याकरता हा सिनेमा नाहीच!

अश्विनीमामी.....

जानेवारी २०१२ मध्ये तुमचा मूळ लेख प्रकाशित झाला होता, त्यावेळी मी इथे नव्हतो....सबब 'इन्सेप्शन' वरील तुमचे सुंदर भाष्य [जे मराठीतील या चित्रपटाचे मानसशास्त्र सांगणारे एकमेव लिखाण असावे....] वाचन हुकले होते. आज प्रथम पानावर "इन्सेप्शन' दिसल्या क्षणी मी तिकडे गेलो आणि तो चित्रपट पाहाताना आनंदाचे जे क्षण मी उपभोगले आहे त्याची उजळणी झाली.

खूप खोलवर गेला आहात तुम्ही या अदभुतरम्य अशा विषयाच्या कोषाशी आणि ज्या चित्रपटाची कथा कशी सांगावी असा प्रश्न सर्वत्रच चर्चिला गेला होता त्याबाबतचे अवघड काम तुम्ही पेलले आहे. मी 'लिलया' पदर मुद्दाम लावत नाही....कारण "स्वप्नात जाऊन कल्पना चोरणे" ही ख्रिस्तोफर नोलनची कल्पनाच अफलातून आहे. त्यावर तांत्रिकतेची कमाल फिरविणे आणि प्रत्येक इंच दर्शनीय करणे हे एका विलक्षण मनाचा खेळ आहे.

हॉलीवूडमध्ये "प्रीडेटर...वॉटरवर्ल्ड...करेज अंडर फायर...बिहाईंड इनिमी लाईन..." आदी एकापेक्षा एक असे ब्लॉकबस्टर्ड सिनेमा तयार करणार्‍या जॉन डेव्हिसने "इन्सेप्शन" पाहिल्यावर म्हटले "मी आता निश्चितपणे सांगू शकतो की हॉलीवूडमधील झाडून सारे स्टुडिओज् आता "इन्सेप्शन" धर्तीच्या कथानकाकडे वळू पाहतील. इतकी बिग आणि बोल्ड संकल्पना पडद्यावर आणणारा ख्रिस्तोफर नोलन हा जादुगारच म्हणावा लागेल....". "टाईम" मध्ये डेव्हिसचे हे कौतुक वाचूनच मलाही कधी हा चित्रपट पाह्यला मिळतो असे होऊन गेले....आणि ज्या क्षणी पाहिला त्यातील लिओनार्डो डीकॅप्रिओच्या त्या समुद्रावर अर्धवट बेशुद्धीत पडलेल्या प्रसंगापासून मी अक्षरशः वाहून गेलो. नशीब माझे की चित्रपट सबटायटल्ससह पाहायला मिळाला अन्यथा पडद्यावर नेमके काय चालले आहे हे समजण्यापूर्वी झिंगूनच गेलो असतो.

"इन्सेप्शन" ने तांत्रिक बाजूची चारही प्रमुख ऑस्कर्स मिळविली असली तरी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर निर्माण केलेले रेकॉर्ड आपले डोळे विस्फारून टाकणारे आहे. चित्रपटाचे जवळपास सारे कथानक तुम्ही विस्ताराने लेखात दिले असल्याने त्याची द्विरूक्ती करीत नाही....गरजही नाहीच. फक्त ख्रिस्तोफर नोलनच्या जोडीने त्याच्या पत्नीचा....एम्मा थॉमस....ज्या स्वतः निर्माता आहेच चित्रपटाच्या....उल्लेख मी इथे करतो.

वर "मामी" यानी दिलेल्या ताज्या प्रतिसादात "...एकदा बघून संपवण्याकरता हा सिनेमा नाहीच!..." ही जी भावना व्यक्त केली आहे त्याच्याशी १००% सहमत..... मीही असेच समजणार्‍या गटातील आहे.

अशोक पाटील

दुसर्‍या प्रतिसादात तुम्ही "...एकदा बघून संपवण्याकरता हा सिनेमा नाहीच!..." ही जी भावना व्यक्त केली आहे त्याच्याशी १००% सहमत..... मीही असेच समजणार्‍या गटातील आहे.

>>>> अशोकजी, ती भावना माझी - मामीची. लेख लिहिलाय अश्विनीमामीनं. Happy

अश्विनीमामी....आणि मामी....ह्या दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत हे आता मला समजले.... "इन्सेप्शन" पाहून स्वप्न आणि कल्पना यांच्यात इतका गुरफटून गेलो की....प्रत्यक्षातील परिस्थिती समजावून घेणे कठीण गेले.

वेल....वरील भाग संपादित करतोच....धन्यवाद, कान पकडल्याबद्दल.

inception चा शेवट हे एक सत्य दाखविलेल आहे …
शेवटी ते टोटेम अगदी किंचित कलत …
त्याचा balance जाताना दाखवलं आहे ना …

सुरुवातीला इंग्रजीत बघितला. आवडला आणि अजिबात कळला नाही. {नेहमीप्रमाणे :)}.
नंतर दोनदा हिंदीत बघितला. बर्‍यापैकी समजला आणि नंतर दोनदा इंग्रजी... काय मजा आली. झकास....

माझा इ.न्ग्रजी सिनेमाचा लोच्याच असतो.(तसे मला हिन्दी चित्रपटाचेही थेट्रातले डायलॉग लवकर कळत नसत.. ) इ.न्ग्रजीचे डायलॉग मला कितीही सुगम असले तरी कळत नाहीत. सब्टायटलवर पहावा म्हटले तरी एकदा सबटायटलकडे बघावे की सीनकडे अशा द्विधा मनःस्थितीत दोन्हीकडचे हुकून जाते. अशा स्थितीत इन्सेप्शन २०१० ला थेट्रात पाहिला तेव्हा ९५ टक्के डोक्यावरूनच गेला. फक्त व्हिज्युअल्सचा अतर्क्य पणाने अचम्बित होणे एवढेच हाती !!
नुकताच हिन्दी व्ह्र्शन मध्ये पाहिला. २५ टक्केच कळला.टेक्स्टमधली स्टोरी वाचायची नाही असे ठरवले होते पण त्यावाचून तरणोपाय नाही असे जाणवले....

Pages