तुमचं कधी असं होतं का? झोपेतनं उठता तरीही झोपेत बघितलेल्या स्वप्नाचा परिणाम जाणवत राहतो. स्वप्नात भेटलेली लोकं, त्यांनी आग्रहाने सांगितलेलं काहितरी, कसलं तरी विचित्र वातावरण, हे लगेच मनावेगळं करून आपण नव्या दिवसाला लगेच सामोरं जाउ शकतोच असे नाही. जागेपणीच्या वातावरणाशी जुळवून घ्यायला थोडा वेळ नक्की लागतो. स्वप्न होतं पण त्यात पाहिलेलं सारं किती खरं होतं नाही का? ह्या संभ्रमित अवस्थेत आपण काही क्षण घालवितो. २०१० साली आलेला इन्सेप्शन हा इंग्रजी सिनेमा ह्या भावनेलाच दिलेले एक पूर्ण रूप आहे. चित्रपट बघितल्यावर काही दिवस तरी तुम्ही निर्धास्तपणे झोपायला जरा बिचकालंच.
फॉलोइंग, इन्सोमिया, बॅट्मन बिगिन्स, द प्रेस्टिज, द डार्क नाइट अश्या चित्रपटांचा दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन यांना इन्सेप्शन चित्रपटाच्या संकल्पनेनं कितीतरी वर्षे झपाटून टाकले होते. आपण आपली स्वप्ने दुसर्या ओळखीच्या किंवा अनोळखीही माणसांच्या बरोबरीने बघू शकतो, ही ती मूळ संकल्पना. त्यावर त्यांनी एक अतिशय भावनाप्रधान पण थरारक अशी अनेक पातळ्यांवर जिवंत होणारी कथावस्तू बांधली आहे. त्याचे मोठ्या पड्द्यावरील सादरीकरणही फार प्रभावी झाले आहे. ऑस्करसारखा अत्युच्च सन्मान ह्या चित्रपटास प्राप्त झाला नसला तरीही संवेदनशील प्रेक्षकांच्या मनात चित्रपटाने आपले असे खास स्थान निर्माण केले आहे. स्टार वॉर्स मालिका, मॅट्रिक्स मालिका अश्या सिनेमांनी जसा त्यांचा खास चाहता वर्ग निर्माण केला आहे तसेच इन्सेप्शनचे आहे. शास्त्रीय संकल्पनांवर आधारित पण संपूर्ण पैसावसूल करमणूकपट असेच ह्या चित्रपटाबाबत म्हणता येइल.
चित्रपटाचा नायक डॉम कॉब हा लोकांच्या स्वप्नात शिरून त्यांनी खोल अंतर्मनात जपलेली गुपिते पळवून नेणारा माणूस. हेर किंवा चोर! किंबहुना दोन्हीही. त्याच्या पत्नीने त्याच्या बद्दल केलेल्या तक्रारीमुळे तो अमेरिकेत आपल्या मुलांकडे जाऊ शकत नाही. अमेरिकेत पाय ठेवताच त्याला पत्नीच्या खुनाबद्दल अटकच होइल अशी आत्महत्त्या करण्यापूर्वी पत्निनेच व्यवस्था करून ठेवली आहे. एक मोठा जपानी उद्योजक त्याला अमेरिकेत परत जाण्याची सुविधा देऊ करतो व त्या बदल्यात गुपिते पळविण्याचे नाही तर कल्पनारोपणाचे अवघड काम त्यास देतो. कॉब ही कामगिरी कशी पार पड्तो व ते करत असताना त्याच्या अंतर्मनात खोलवर लपलेली प्रिय पत्नीची स्मृती कसा त्रास देते, इतरांच्या जिवावर उठते ही चित्रपटाची कथा!
जगातल्या कोणत्याही जीवाणू, विषाणूंपेक्षाही जास्त शक्तिशाली आहेत कल्पना. एखादी कल्पना/ विचार मनात आला कि तो तिथे रुजतो, फोफावतो व आपल्याला त्यानुसार वागणे भाग पड्तो. समजा हा विचार तुम्ही सुषुप्तावस्थेत असताना कोणी तुमच्या मनात रुजवला तर? तुम्ही जागे झाल्यावर तो विचार तुमचा स्वतःचाच आहे असेच तुम्हाला वाटेल व तशी कॄती तुम्ही कराल. हा त्या संकल्पनेचा गाभा आहे.
माझे स्वप्न जीवन लहानपणा पासून अतिशय सम्रुद्ध राहिले आहे. एक मजेची गोष्ट म्हणजे कुठेही गेले व राहिले तरीही स्वप्नात माझे घर म्हणून पुण्यातील लकडीपुलाजवळचे, पांचाळेश्वराच्या मागे असलेल्या इमारतीतलेच घर येते. जेव्हाही काही संक्रमण अवस्था असते किंवा असह्य, न सुटणारे अवघड प्रश्न समोर येतात तेव्हा स्वप्ने पड्ली कि स्वप्नात सुपर सॉनिक विमाने मोठ्या संख्येने येऊन ते घर नष्ट करायचा प्रयत्न करतात. पाकिस्तान युद्धात १९७१ मध्ये त्या घरात ब्लॅक आउट करून राहिल्याचा परिणाम. असे मला वाट्ते. स्वप्नांशी माझे खूप जवळचे नाते आहे. कधी कधी काही प्रश्नांची उत्तरे जागेपणी शोधणे अवघड जाते पण स्वप्ने बघताना अंतर्मन एखाद्या अश्या ठिकाणी नेते की निदान ते प्रश्न सोडविण्याच्या मार्गावर आपण नकळत जाऊन पोहोचतो. अशक्य उंच असे पर्वत, भीतीदायक जोर असलेले पाण्याचे उन्मत्त प्रवाह, मनाला सुखविणार्या फुलांच्या पसरलेल्या बागा, भीतिदायक पक्षी, वेगात जाणारी विमाने व उड्त्या तबकड्या, आकाशातील भिवविणारे पण अचंबित करणारे तारे हे सर्व मी स्वप्नात पाहिलेले आहे. माझ्या कल्पनाविश्वात त्या स्वप्नांना एक अनन्यसाधारण स्थान आहे. त्यामुळे हा स्वप्नांवर आधारित चित्रपट माझ्यासाठी एक पर्वणीच होती.
सिनेमात लिओनार्दो डिकॅप्रिओ, मारिअन कोटिलार्द, केन वातानाबे, जोसेफ गॉर्डन लेविट, एलेन पेज व इतर सर्वांचीच कामे अतिशय सुंदर वठली आहेत. डिजिट्ल आणि ऑडिओ विभागाचे काम अप्रतिम आहे यात शंकाच नाही. त्या कलाकारांना ऑस्कर सन्मान मिळालेच आहेत. पण असे सिनेमे कधी कधी अगदी कोरडे, तंत्रबहुल होतात तसे इथे झालेले नाही. पहिल्या अॅक्शन दृष्यानंतर लिओ हॉटेलातील खोलीत बसतो मुलांशी फोनवर बोलतो नंतर हतबल होतो हे अगदी खरे आहे. मी फार वेळा अनुभवलेले आहे. काम आहे, मुलांना भेटू शकत नाही, आई नाही आहे, मुलाला ते समजत नाहीये. मुलांना अगदी बघावेसे वाट्ते आहे ही मनःस्थिती त्याने उत्तम साकार केली आहे. हे अगदी जगात कोणासही वाटू शकते. तिथेच चित्रपटाची पकड बसली व ती शेवटच्या दॄश्यापर्यंत सुट्लीच नाही.
एम. सी. एशरची चित्रे ज्यांना आवड्तात त्यांना हा चित्रपट नक्की आवडेल. त्याच्या इन्फिनिट लूप, पेनरोज स्टेअर्स चा चित्रपटात यशस्वी वापर केला आहे. माझ्याकडे एशरच्या चित्रांचा मोठा संग्रहच आहे. ६००० रु पगार असतानाही ते १६०० रु चे पुस्तक घेऊन घरी बोलणी खाल्ली होती. पण सिनेमा पाहताना ते जुने सुह्रुद भेट्ल्यासारखे वाटते. गोडेल एशर बाख नावाचे गणित, संगीत व एशरची चित्रे यांची सांगड घालणारे एक दिव्य पुस्तक आहे त्याचा वापरही सिनेमाचे संगीत बनविताना केला आहे. सिनेमाच्या स्क्रिप्ट वर ९ वर्षे काम झाले. ते अगदी परिपूर्ण बनविल्यावरच चित्रिकरणास सुरुवात झाली. या शिस्तीचे नक्कीच कौतुक आहे व ते सिनेमात दिसून येते.लिओ अरियाड्नी ला काम समजावून सांगतो तेव्हा स्वप्नात त्यांनी साकारलेल्या पॅरिसची अर्ध्यावर घडी पडते व ते चालत दुसर्या मितीत जातात हा सिक्वेन्स अतिशय सुंदर आहे. आयमॅक्समध्ये बघायला मिळाल्यास चुकवू नका. इन्सेप्शनच्या पट्कथेत एकही शब्द वावगा नाही. मध्येच हसवूनही जातात. साइतो ( उद्योजक ) एका ठिकाणी I bought the airline, that seemed neater. म्हणतो तेव्हा तर मला खूप मजा वाट्ली. अगदी खास उद्योजक विचारसरणी. त्यात रसायनांचे कंपाउंडींग करून निद्रिस्त करणारी औषधे बनविणे वगैरे अगदी ओळखीची गोष्ट आहे त्यामुळे सिनेमाशी जवळीक जास्त वाढ्ली.
आपण जागेपणी आपल्या मनःशक्तीचा थोडासाच भाग वापरतो. स्वप्ने बघताना त्यात आपले मन काहीही करू शकते. एखादी मोठी इमारत संकल्पित करताना आपण तिच्या प्रत्येक बाजूचा विचार करतो व उभारणी करतो. पण कधी कधी असं वाट्तं की हे आधी पासूनच इथे होतं अन आता ते फक्त आपल्यासमोर टप्प्या टप्प्याने प्रकट होते आहे. स्वप्नात आपल्या सभोवतालचे जग एकाच वेळी साकारत जाते व अनुभवता येते. हे इतक्या चपळाईने व सफाईने होते की आपल्याला त्यात काही वावगे आहे याचा पत्ताही लागत नाही. स्वप्नातील जग आपण स्वतः निर्माण करतो. त्यात काहीतरी विचित्र असले तरी ते तेव्हा जाणवत नाही तर उठल्यावर जागेपणीच ते ठळक होते.
कल्पनारोपणाच्या अवघड कामात कॉब व त्याचे सहकारी त्यांच्या सब्जेक्ट्च्या अंतर्मनात खोल खोल जातात. शेवटी अगदी अथांग पसरलेल्या निरामय अश्या लिंबो स्टेट मध्ये असताना चित्रपटातील खरे भावनिक नाट्य सामोरे येते. कॉब आपल्या अतिप्रिय पत्नीच्या स्मृतीला दूर करू इच्छित नाही. अगदी जिवाचा धोका पत्करायची पण त्याची तयारी असते. तरूण पणी कॉब व त्याची पत्नी मॅलरी ह्या लिम्बो अवस्थेत खूप काळ घालवितात. त्यांच्या स्वप्नातील घरे, इमारती बारकाईने बनवितात. तिला तेच आयुष्य खरे वाटू लागते. त्यातून तिला बाहेर काढण्यासाठी कॉब " हे जीवन खरे नाही. " ह्या विचाराचे रोपण तिच्या अंतर्मनात करतो व तिला जागे करतो. पण तो विचार तिला जागेपणी ही घेरून टाकतो. ती सत्य जीवन स्वीकारू शकत नाही व जीव देते. तिच्या मृत्यूस व मुलांना पोरके करण्यास आपण जबाबदार आहोत ह्या अपराधी पणाच्या जाणीवेतून कॉब बाहेर पडायला खूप वेळ घेतो. त्यात तोच शेवटी स्वतःस हरवून बसतो कि काय अशी शंका आपल्याला येऊ लागते.
प्रचंड गतिमान अशी थरारक दॄश्ये एका पातळीवर चालू असतात त्याचवेळी हे भावनिक नाट्य आपल्या उत्कर्ष बिंदूस पोहोचते व कॉब आपल्या सहकार्यांसकट स्वप्नातून बाहेर येतो. फिशर ह्या तरूण उद्योजकाच्या मनात कल्पनारोपणाची कामगिरी यशस्वीरीत्या पार पाडून अमेरिकेत प्रवेश करतो व आपल्या मुलांना भेटतो. इथे सिनेमा संपला पाहिजे पण तो टोटेम म्हणून वापरत असलेला धातूचा भोवरा फिरतच राहतो व प्रेक्षकांच्या मनात हे सत्य आहे कि स्वप्नच असे प्रश्नचिन्ह निर्माण करून सिनेमा संपतो.
एकाच वेळी, पहिले फिशरच्या स्वप्नातील जग, मग दुसर्या पातळीवरील हॉटेल व सर्वात शेवटी फिशरचे अंतरंग, जिथे कडेकोट सैन्याच्या बंदोबस्ताला तोंड देऊन त्याचे वडिलांबरोबर असणारे अवघड नाते सुरळित करून कॉबला एका नव्या उद्योगाच्या संकल्पनेचे आरोपण करायचे असते तो तुरुंग सदृश्य भाग व त्याही खाली दडलेले अथांग असे कॉब व मॅलरीचे ढासळते अंतर्मनातील विश्व अश्या चार पातळ्यांवर ह्या चित्रपटाच शेवटचा भाग घड्तो. ह्या सर्वांना घेऊन उड्णारे विमान व त्यात गाढ झोपलेले फिशर, कॉब व त्याचे सहकारी ही एक सत्य परिस्थिती पण आहेच. व चित्रपट बघणारे आपण ही अजून एक मिती याची एक सरमिसळ होते व प्रेक्षकाला एक वेगळाच अनुभव देऊन जाते.
मुख्य कलाकारांबरोबरच एलेन पेजची वास्तुशास्त्रज्ञ, जोसेफ गॉर्डन लेव्हिट चा आर्थर - कॉबचा शोधकाम करणारा मदतनीस. दिलीप राव यांचा युसूफ - झोप येणारी औषधे बनविणारा, स्वप्नात कोणतेही रूप घेऊ शकणारा टॉम हार्डीचा एम्स अश्या अनेक व्यक्तिरेखांनी चित्रपटाचा आलेख अधिकच समृद्ध केला आहे. एम्सची व्यक्तिरेखा जराशी बेदरकार, जेम्स बाँड्च्या मानसिकतेशी जवळिक साधणारी आहे. जुनो सारख्या धक्कादायक चित्रपटानंतर एलेन पेज चे ह्या चित्रपटातील दर्शन सुखद, आश्वासक आहे.
हान्स झिमर यांनी दिलेले संगीत म्हणजे कथावस्तूचा प्राण आहे. मोंबासातील पाठलागाच्या वेळी वेगवान होणारे, हाफ रिमेंबर्ड ड्रीम चे हळूवार पण अस्वस्थ करणारे. सर्व रचनांना चित्रपटातील घटनाक्रमाचे संदर्भ तर आहेतच पण संध्याकाळच्या धूसर वेळी ऐकल्यास मनात कालवाकालव करणारे हे परिणामकारक सूर आहेत.
सत्य, स्वप्न आणि आठवणी शेवटी खरे काय अन खोटे काय, ते ठरविणारे आपण कोण? शांतपणे डोळे मिटून घ्यावेत, निद्रादेवीच्या साम्राज्यात जावे, सामोर्या येणार्या चित्रविचित्र कल्पना निरखून बघाव्यात, आश्चर्य व्यक्त करावे, अजून पुढे अंतर्मनात झेपावावे, आपल्याला सोडून गेलेल्या प्रियजनांशी परत गळाभेट करावी.
परत जागे होण्यासारखे, तितके महत्त्वाचे काय आहे खरे तर असा प्रश्न उभा करणारे. अस्वस्थ करून सोडणारे आहे हे इन्सेप्शन नावाचे स्वप्न.
अश्विनी खाडीलकर
मामी मस्त!! परत एकदा
मामी मस्त!! परत एकदा इन्सेप्शन बघणार.आधी फक्त काही माहिती नसताना केन वातानाबे साठी पाहिला होता. पण तरी प्रचंड आवडला होता. आज परत एकदा पहावासा वाटतोय. डीव्हीडी घरी आहेच..:-)
मामी एकदमच जबरी... परत
मामी एकदमच जबरी... परत बघायचाच आहे कारण अर्धवटच बघून झालाय...
ज्यांना समजला नसेल
ज्यांना समजला नसेल त्यांच्यासाठी ही एक चित्रमय लिंक.
ज्यांनी चित्रपट अजूनही बघितला नाही किंवा त्यामागचे गमक समजवून घ्यायचे नाही त्यांनी हे बघू नये.
खुपच सुंदर लिहल आहे...इतके
खुपच सुंदर लिहल आहे...इतके दिवस ह्यावर कोणी का लिहल नाही हा प्रश्न पडला होता मला...
अप्रतिम पिक्चर आहे हा.
माझ्या कल्पनाविश्वात त्या स्वप्नांना एक अनन्यसाधारण स्थान आहे. त्यामुळे हा स्वप्नांवर आधारित चित्रपट माझ्यासाठी एक पर्वणीच होती.
मामी, सुरेख विवेचन ! मला
मामी, सुरेख विवेचन !
मला किमान ७-८ वेळा तरी बघायला लागला हा चित्रपट (आणि तरीही पुर्णपणे कळलाय असे म्हणता नाही येणार )
बाकी एम.सी. एशरबद्दल वाचुन छान वाटले. मी पण त्याचा पंखा आहे. कॉलेजमध्ये असताना एका मित्राने माहिती दिली होती त्याच्याबद्दल. त्याची ह्युमिनीटी, आय वगैरे चित्रे आठवतात.
मामी, मस्तच लिहिलेत . मी
मामी, मस्तच लिहिलेत .
मी तेव्हा चित्रपट इंग्रजीतून दोनदा पहिला होता, आणि तो मला समजलाय अशी माझी समजूत होती.
मागच्या आठवड्यात हिंदीतून पहिला आणि पुन्हा काही नवीन गोष्टींची उकल झाली.
बाकी चित्रपट पाहिल्यानंतर चार दिवस 'स्वप्न आणि सत्य' चा गोंधळ डोक्यात नाचतच होता.
IMDB वर आत्तापर्यंतचा सर्वाधिक पसंतीचा चित्रपट म्हणून लोकांनी याची निवड केली आहे.
मामी मस्त लिहिले आहे. माझा
मामी मस्त लिहिले आहे. माझा आवडता चित्रपट आहे.
मामी सुरेख लिहीले आहे. मस्तच.
मामी सुरेख लिहीले आहे. मस्तच. मला आवडला होता हा चित्रपट. पहील्यांदा बघताना नीट कळला नव्हता पण नंतर टीव्हीवर २ वेळा बघीतल्यावर जाणवला.
मोठ्या पड्द्यावरील सादरीकरणही फार प्रभावी झाले आहे>>> अनुमोदन.
मामी चान्गले लिहीलस समजल
मामी चान्गले लिहीलस
समजल किती ते विचारू नकोस प्लिजच! कारण जे वाचून कळल्यासारखे वाटतय, ते पिक्चराईज्ड कसे केले असेल, याचे कल्पनाचित्रच नजरेसमोर उभे राहू शकत नाहीये. तरीही थोडीथोडी कल्पना येतिये पिक्चर बघायला मिळाल्यास जरुर बघेन (बायदिवे, ते अन्निसवाले इकडे कडमडणार नाहीत ना? नै अस्ले विषय म्हणजे त्यान्चा वीकप्वॉईण्ट अस्तो ना! )
मस्त लिहीले आहे! कारण
मस्त लिहीले आहे! कारण इन्सेप्शनबद्दल नीट लिहीता येणेही अवघड आहे!
पण असे सिनेमे कधी कधी अगदी कोरडे, तंत्रबहुल होतात तसे इथे झालेले नाही. >>> प्रचंड अनुमोदन, हा बॅलन्स मॅट्रिक्सवाल्यांना नंतर जमला नाही.
शेवटचा प्रसंग स्वप्न आहे की सत्य यावर जोरदार वाद घातले आहे, आणि घातले जातील. माझ्या मते ते सत्य आहे, कदाचित ते सत्य असावे, त्याला त्याची मुले भेटावीत हे माझे 'विशफुल थिंकींग' ही असेल. पण हा सिनेमा तुमच्यावर किती खोल परिणाम करतो त्याचेही हे उदाहरण आहे.
अमा, छान लिहिलाय, संधी मिळाली
अमा, छान लिहिलाय, संधी मिळाली तर नक्की पाहिन हा सिनेमा..
अश्विनीमामी तुमचे अनुभव
अश्विनीमामी तुमचे अनुभव गुंतवून तुम्ही खूप सुंदर लिहीलं आहेत या चित्रपटाबद्दल. हा चित्रपट Lucid dream या संकल्पनेवर आधारित आहे. ल्युसिड ड्रीम म्हणजे असे स्वप्न ज्यात तुम्हाला जाणीव आहे की तुम्ही स्वप्नात आहात. अशा स्वप्नांचे चार मजले बांधून घेऊन [ज्याचे स्वप्न आहे तो] एकेक जण एकेका मजल्यावर थांबतो बाकीचे पुढे जातात. असे काहीसे कथानक आहे.
मस्त आहे हा सिनेमा. मी
मस्त आहे हा सिनेमा. मी पाहिलाय पण अर्धवटच. इतक्यात कोणत्यातरी चॅनलवर लागला होता.
मस्त आहे हा सिनेमा. मी
मस्त आहे हा सिनेमा. मी पाहिलाय पण अर्धवटच. इतक्यात कोणत्यातरी चॅनलवर लागला होता.>>>हो star movies वर लागला होता
अ.मा. खुप मस्त लिहिलं आहे.
अ.मा. खुप मस्त लिहिलं आहे. सिनेमा आवडलाच होता पण हे लिहिलेलंही खुप आवडलं.
bought the airline, that seemed neater. हे मला पण लय भारी वाटलेलं.
ते शहर मधेच दुमडुन दुसर्या मितीत जाते ते पण मस्त आहे. ट्रान्सफॉर्मर मधे साधारण तसाच एक सिन आहे असे अंधुकसे आठवतेय.
शेवटी तो टोटेम फिरत रहातो त्यामुळे फारच अस्वस्थ वाटतं, म्हणजे स्वप्न आहे कि नाही याचा विचार थांबवताच येत नाही हे खरं.
नंद्या, ल्युसिड ड्रिम्स वर व्हॅनिला स्काय (टॉम क्रुझ) नावाचा एक सिनेमा पण आहे. त्यातही स्वप्न आणि सत्य यांमधे असाच गोंधळ आहे.
अश्विनीमामी, फार सुंदर
अश्विनीमामी,
फार सुंदर लिहीलंत. यु मेड माय डे. धन्यवाद.
चित्रपट पाहिलेला नाही. दोघांनी वेळ काढून शांतपणे पाहुयात म्हणून जेजे ठेवले त्यावर धूळच बसत गेली. धूळ पुसत गेलो पण पाहण्याएवढा वेळ काही अजून मिळाला नाही. एकट्याने पहायचा नाही हा करार मोडणार नाही मात्र.
सुरेख ओळख अमा!
सुरेख ओळख अमा!
धन्यवाद. हो रैना दोघांनी
धन्यवाद.
हो रैना दोघांनी बघा. मी सिनेमा पाहिला तेव्हा त्यात माल त्याला म्हणते की आपण एकत्र म्हातारे होणार होतो. आता त्याचे काय ? आणि मग थिएटर मधून बाहेर आल्यावर एक वयस्कर फिरंग जोडपे दिसले व ते ब्राउनी शेअर करत होते तेव्हा मला त्या ब्राउनीसारखेच मऊ आणि वॉर्म वाटलेले.
या सिनेमातील जाग येण्या साठी वापरलेले रिग्रेत रिया गाणे पण सुरेख आहे. त्यावरही मी एक ललित तेव्हा लिहीले होते भारावून जावून. शोधून लिंक देते. पूर्ण साउंडट्रॅक एका वेगळ्या साइट वर लिगली उपलब्ध आहे. ऐकता येतो व डाउनलोड नाही करता येत. मॅट्रिक्स मधल्यासारखेच यातील क्रिप्टिक पण साधे संवाद कल्ट क्लासिक झाले आहेत. यू मसंट बी अफ्रेड टू ड्रीम अ लिटल बिगर डार्लिंग! हे एमस चे वाक्य मला नेहमी स्फूर्ती देते. अजून काय पुढे काय ही उत्सुकता आहे तो पर्यंत जीवन आहे नाहि का?
मस्त आहे हा सिनेमा. मी
मस्त आहे हा सिनेमा. मी पाहिलाय. मस्त लिहिलंय.
अमा, चांगला परिचय. माझी
अमा, चांगला परिचय. माझी थोडीशी भर :
जोवर एखादा विचार माणसाला त्याच्या स्वतःच्यात मनातून निर्माण झाला आहे असं वाटत नाही तोवर केवळ इतरांनी सल्ला वा उपदेश दिल्याने त्याची वर्तणूक बदलू शकत नाही. तर सब्जेक्टला तो त्याचाच विचार वाटेल अशा पद्धतीने तो त्याच्या मनात/डोक्यात रुजवणं म्हणजे इन्सेप्शन.
हे अशक्य आहे अशी चित्रपटातील सर्व 'व्यावसायिकां'ची धारणा असते. पण लिओनार्दोने हा प्रयोग बायकोवर यशस्वीपणे केलेला असल्याने त्याला हे करता येतं, येईल याची खात्री असते.
दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोरडा विचार अशा प्रकारे रुजवता येत नाही. कुठल्यातरी अत्यंत मूलभूत भावनेला हात घातला गेला तरच विचार रुजतो. म्हणून चित्रपटात 'सब्जेक्ट'च्या वडिलांशी असलेल्या गुंतागुंतीच्या लव-हेट नात्याचा लिओनार्दोला आधार घ्यावा लागतो.
हा इतका तुफान चित्रपट
हा इतका तुफान चित्रपट आहे......... ख्रिस नोलनचा तर फॅन होतोच्........पण हा चित्रपट प्रसिद्धिआधीपासूनच हवा करत होता(मला वाटते 'सनडान्स्'ला हा दाखवला होता, नक्की माहित नाही). प्रत्यक्ष पाहिल्यावर तर अचंबितच झालो..........केवळ चांगली कन्सेप्ट असणे महत्वाचे नाही तर ती तितक्याच ताकदीने सादर करता आली पाहिजे. नोलनने त्या बाबतीत कमाल केली आहे.......
आवडलं! मामी, किती पारायणं
आवडलं!
मामी, किती पारायणं केलीत 'इन्सेप्शन'ची?
मीही मोठा पंखाय बरं ह्या पिक्चरचा.
अफाट सुंदर लिहिलय अ मा.
अफाट सुंदर लिहिलय अ मा.
अजुनतरी हा चित्रपट पाहिलेला नाहिये पण पाहणार हे नक्की.
असे चित्रपट एकतर चित्रपटग्रहात पहावेत किंवा घरी पुर्ण शांतता असल्यावर (शक्यतो रात्री बारानंतर).
मस्त झिरपतो चित्रपट अशावेळी.
घरी पुर्ण शांतता असल्यावर >>>
घरी पुर्ण शांतता असल्यावर >>> प्रचंड अनुमोदन!
अ. मामी नमस्कार, मी मायबोलीचं
अ. मामी नमस्कार,
मी मायबोलीचं नुकतच सदस्य्त्व घेतलय खुप सुंदर वाचायला मिळतय.तुमचा इन्सेप्शन वरील लेख वाचला मनापासुन आवड्ला सिनेमा बघायची उत्सुकता आहे. या सुंदर माहीतीबद्द्ल तुमचे आभार.
वा! सुंदर लेख. मेड माय डे
वा! सुंदर लेख. मेड माय डे बद्दल रैनाशी सहमत.
>> कुठल्यातरी अत्यंत मूलभूत भावनेला हात घातला गेला तरच विचार रुजतो.
+१
आणि त्या भावनेला कोणी हात घालू नये म्हणून, आपण आपली वल्नरेबिलिटी जपण्यासाठी केलेला कडेकोट बंदोबस्त!
अमा, अवघड विषय फार कुशलतेने
अमा, अवघड विषय फार कुशलतेने मांडला आहात.
छान लिहिलयत मामी. मला फारसा
छान लिहिलयत मामी. मला फारसा कळला नव्हता सिनेमा पाहिला तेव्हा. आता मुद्दाम परत पाहिन.
इन्सेप्शन माझ्या अत्यंत
इन्सेप्शन माझ्या अत्यंत आवडीचा चित्रपट. जबरदस्त पटकथा आणि एडिटिंग त्यात कथानकाचा वेग मस्तच. शेवटच्या सीनबद्दल तर किती दिवस वादावादी करत होतो आम्ही एकमेकांत ख्रिस्तोफर नोलानला दंडवतच.
मामी तुम्ही फार सुरेख लिहिलय या चित्रपटाबद्दल.
मस्त लिहिलंय
मस्त लिहिलंय मामी.
चित्रपटपरिक्षणाबद्दल ब्लॉग कधी काढताय ?
Pages