डॉन-२

Submitted by पूनम on 27 December, 2011 - 05:04

तांत्रिक सफाई, परदेशातल्या महत्त्वाच्या ठिकाणी बेतलेलं चित्रिकरण, चित्रपटाला असलेला वेग, एकानंतर एक घडणार्‍या घटना, उत्तम ३डी ईफेक्ट्स... डॉन २ सज्ज आहे हे सर्व काही घेऊन. तरीही तो काही काळानंतर असह्य होतो- आणि त्याचं कारण शाहरूख नसतं! (हे एक नवलच!) ते कारण असतं चित्रपटाला नसलेली कथा आणि चकचकाटाकडे संपूर्ण लक्ष केन्द्रित केल्यानंतर वेळ न मिळाल्यामुळे त्यावर न केलेले काम.

डॉन अंडरवर्ल्डचा बेताज बादशाह आहे. पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निसटणे हा त्याच्या हातचा मळ, नव्हे ह्यातच त्याला 'थ्रिल' वाटतं. असा हा डॉन एक साधी ड्रग्जची कन्साईनमेन्ट, जी एका 'ब्रीफकेस'मध्ये मावते, ती घ्यायला स्वत: जाईल का? बरोबर कोणालाही न घेता? त्याला काहीही 'बॅक ऑफिस' नाही? का एन्ट्रीसाठी काहीतरी स्टंट असावा म्हणून हे तोंडीलावणे? सहाजिकच एकटा गेल्याने, त्याच्यावर हल्ला होतो आणि मग त्यातून अनेक चमत्कार करत तो सुटतो. आणि थेट इन्टरपोलच्या मुख्यालयातच येतो. स्वतःहून शरण जाण्यासाठी! त्यावेळेला मलिक रिटायरमेन्टची घोषणा करून बिल्डींगबाहेर निघतच असतो. पण नेमका डॉन शरण आल्यामुळे त्याला बिचार्‍याला तो प्लॅन पुढे ढकलावा लागतो! (अशी सोय असते का हो?)

रोमा स्वतःच्या हाताने, जातीने डॉनला तुरुंगात पोचवून येते. आता हा खतरनाक डॉन. ह्याला जगभरचे पोलिस शोधत असतात. जगभरातले गुंड ह्याच्या जीवाच्या मागे असतात. आणि ह्याला तुरुंगात एका साध्या कैद्याप्रमाणे ठेवतात? त्याला मृत्यूदंडाची शिक्षा झालेली असते. त्याला 'आयसोलेशन सेल' वगैरे काही नाही? शाहरूख कॅरेक्टरमध्ये असतानाही एकटा रहायला घाबरतो बहुतेक! त्याच तुरुंगात वर्धान त्याची वाट पहात असतो. आता मलिक आणि रोमा ह्याच केसवर काम करत होते की नै पूर्वी? मग त्यांना माहित असायला पाहिजे की नै की वर्धान आणि डॉन ह्यांना एकत्र ठेवण्यात धोका आहे म्हणून? जेलमधून ते पळून गेल्यानंतर रोमा विचारते- अय्या! वर्धानपण गेला डॉनबरोबर? आता काय होणार?

काय होणार? प्रियांका थेट फ्रान्समध्ये! हे बरं असतं बुवा एक चित्रपटांमध्ये! ह्यांनी ठरवलं की दुसर्‍या फ्रेमला ते त्या देशात हजर. तेही कार, सेलफोन, सुंदर कपडे, लॅपटॉप्स ह्यांसह. इथे आपल्याला एक सिमकार्ड घ्यायचं असलं तरी किमान ३ दिवस लागतात! मलिकही पाठोपाठ येतोच. (अहो, रिटायर होऊन घरी चालला होतात ना?) डॉनही पळून जातो आणि आयेशानामक सुंदरी त्याच्या स्वागताला सर्व जामानिम्यासकट हजर! कधी अरेंज करतात हे सगळं? मध्येच डॉन वाढलेले केस कुठे कापतो?

त्याच्या मग पुढची कथा घडते झुरिकमध्ये. 'युरो' जिथे छापले जातात, त्या बॅंकेतून युरोंचे साचे पळवून, नंतर खोट्या नोटा छापून खूप खूप श्रीमंत होण्याचा प्लॅन डॉन करतो. (आताची युरोची स्थिती पाहता, हा चित्रपट आणि त्याचा हेतूच फसतो आणि हास्यास्पदच वाटायला लागतं सगळं, हाही भाग आहेच. Very bad timing!) मग त्याच्या मदतीला येतो 'समीर'. हा असतो कॉम्प्युटर हॅकर. पण त्याला बहुतेक दिव्य दृष्टीही असते. कारण एकही सीन असा दाखवला नाहीये जिथे समीर काही अभ्यास करतोय, नेटवर चित्र बघतोय, लोकांशी बोलतोय वगैरे. पण बँकेच्या सॅनिटेशनच्या प्लॅनपासून युरोचे साचे जिथे आहेत त्या सेफ्टी वॉल्टपर्यंत सर्व बिल्डिंग आणि सेक्युरिटी प्लॅन्स ह्याचाकडे तयार असतात! हां. मुख्य म्हणजे पॅरिस, झुरिक, मलेशियात, बॅंगकॉक येथे लोक हिंदी बोलतात!!!

मग खुद्द चोरी. मग डॉन कसला भारी असतो हे दाखवणारे डायलॉग, मारामार्‍या. मग कोणीतरी फितूर होतो, मग डाव पलटतो वगैरे, मग परत एकदा डॉनची सरशी वगैरे सर्वकाही तेच ते. सर्वात खटकणारी गोष्ट म्हणजे इतकं सगळं करून डॉन शेवटी मुक्तच राहतो. अजून एका सिक्वलसाठीची ही महाभयंकर योजना करून ठेवलेली आहे! तेव्हा बीवेअर! Proud

दिसायला स्लीक, वेगवान. पण तरीही बंडल. ३डी ईफेक्ट मात्र चांगले आहेत. (हॅरी पॉटर पेक्षाही सरस वाटले). डॉन१ हा मूळ डॉनची शेवट वगळता असलेली कॉपी होती, म्हणून की काय, खूपच बरी होती. ह्यात ना कथा, ना कोणत्या गोष्टीचं स्पष्टीकरण. बर हे दुर्लक्ष करण्याइतपत अभिनयसामर्थ्य तरी हवं. पण शाहरूखचा अभिनय (?) तो डॉन आहे म्हणून त्याची दहशत वाटावी असा नाही. अभिनयच नाही असं म्हणूया. उलट सुरूवातीला लांब केसांमध्ये तो थोडा वेगळा दिसतो म्हणून बघवतो Proud कोणालाच काहीही छाप पाडण्याजोगं काम नाही. रोमाचं मूळ कॅरॅक्टर का आहे, कारण डॉनने तिच्या भावाला मारलेलं असतं. इथे रोमा भाऊ वगैरे विसरते आणि तिच्या मनात डॉनबद्दल सॉफ्ट कॉर्नर निर्माण होऊ पाहतो. हे इतकं हताश करणारं आहे! अरे, मूळ उद्देश काय, करताय काय? राहूनराहून अमिताभ आठवतोच. कशाला हवीत गॅजेट्स, की आधुनिक तंत्रज्ञान? नुसती नजर बांधून ठेवते!

तात्पर्यः नका पाहू Proud
(ह्या सिनेमानंतर शाहरूखने निवृत्ती घ्यावी. मलिकसारखी नाही, खरी!)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पौर्णिमा, सही लिहीलंय.
मी हिंदी चित्रपटांच्या नादाला फारसा लागत नाही याचा पुन्हा आनंद झाला.

राहूनराहून अमिताभ आठवतोच. >>> अगदी खरं. ही इज द डॉन. त्याची देहबोली, ते डोळे, ती भेदक नजर...सगळ्यांतून त्याचं 'डॉन' असणं जाणवायचं. शाहरुख हास्यास्पद वाटतो. Happy

ह्या सिनेमानंतर शाहरूखने निवृत्ती घ्यावी. मलिकसारखी नाही, खरी!>>> Lol

जी एका 'ब्रीफकेस'मध्ये मावते, ती घ्यायला स्वत: जाईल का? बरोबर कोणालाही न घेता? का एन्ट्रीसाठी काहीतरी स्टंट असावा म्हणून हे तोंडीलावणे?>>>>>>>>>>> पहिल्या चित्रपटात डॉन स्वतः सगळी कामे करतो असेच दाखवले आहे...जुन्या डॉन मधे सुध्दा... Happy

पण बँकेच्या सॅनिटेशनच्या प्लॅनपासून युरोचे साचे जिथे आहेत त्या सेफ्टी वॉल्टपर्यंत सर्व बिल्डिंग आणि सेक्युरिटी प्लॅन्स ह्याचाकडे तयार असतात! >>>>>>>>> नीट चित्रपट नाही पाहीलात तर असे होते...... Happy सगळे प्लान वगैरे बॅंक मॅनेजर देतो.... Happy

काही लुप फोल्स आहेत.......हॉलीवुड वाल्यांची सर तर कधी येणारच नाही हो........म्हनुन बॉलीवुड च्या प्रत्येक प्रयत्नांना कमी लेखु नये.. Happy

>>> पहिल्या चित्रपटात डॉन स्वतः सगळी कामे करतो असेच दाखवले आहे...जुन्या डॉन मधे सुध्दा..

अरे पण तेव्हा तो एवढा मोठा झालेला नसतो.

तुलाही नाहीच आवडला नं शारुख? Lol

पण आता आम्हाला तिकिटांसाठी खर्चिलेल्या पैश्यांना जागून पूर्ण सिनेमा पाहणं भाग आहे. Sad

ह्म्म्म.. मॉर्निंग शो ला ६० रु देउन बघावा झालं. Happy
डॉन२ चा अजुन एक वीकनेस म्हणजे गाणी, कुठलंच गाणं लक्षात राहावं असं नाहीये.

काय आहे की...... आपल्याला जो आवडत नाही त्याच्या चित्रपटाला जबरदस्ती ने घेउन गेले ना की असा बाफ उघडुन राग व्यक्त होतो.... Happy

तळ्टीप दिवा घ्या.............मला शाहरुख आवडत नाही

राहूनराहून अमिताभ आठवतोच. कशाला हवीत गॅजेट्स, की आधुनिक तंत्रज्ञान? नुसती नजर बांधून ठेवते!
तात्पर्यः नका पाहू
(ह्या सिनेमानंतर शाहरूखने निवृत्ती घ्यावी. मलिकसारखी नाही, खरी!)

यांतच सगळं आलं!!!

मॉर्निंग शो ला ६० रु देउन बघावा झालं.
>>
चिंगे, कित्ती ती हौस आपल्या पायावर धोंडा पाडुन घ्यायची?? Proud

वैनी, धम्माल परिक्षण..

मस्त लिहीले आहे.

मला पण ते युरोची प्लेट्स ची चोरी हे फार विनोदी वाटले. मंजे प्लेट चोरी गेल्या की ते युरो वाले लोक शेवट्च्या नोटेचा नंबर लिहून ठेवतील कि नाही. मग तिथून पुढल्या डॉनने चोरून बनविलेल्या नोटा. हो ना? मग नोटे द्वारे रॅकेट चा माग काढता येइलच. गाणी बेकार ना? आधीच्या डॉन मध्ये मस्त गाणी होती. शाम है जाम है वगैरे.

फरहानाचे जास्त कौतुक झाले वाट्ते. ही खिचडी फसलीच.

वर लेखात लिहलय यात फारच तथ्य आहे. पण इतका काही वाईट नाही सिनेमा. एकादा तरी पहावा तो त्यातल्या ३डी ईफेक्ट, उत्त्म लोकेशन यासाठी. आणि यावेळी फ. अ. ने या चित्रपटाच्या पटकथेवर ही काम केलेय.

एकदम फडतूस व बकवास चित्रपट आहे. रा-वन पडल्यापासून शाहरुकला वेड लागलेय बहूतेक, आणि त्याच केस वाढलेल्या अवतारात व त्याला वेडाचे झटके येत असताना या सिनेमाचा सुरवातीचा काही भाग चित्रीत केल्या सारखा वाटतो.

शहारुक म्हातारा पकाव, बोमन इराणी महा बोरींग आणि तिरळी प्रियंका. सगळाच सावळा गोधंळ म्हणजेच डॉन २
तात्पर्य. अजिबात पाहू नका हा चित्रपट.

म्हनुन बॉलीवुड च्या प्रत्येक प्रयत्नांना कमी लेखु नये.. >>
अगदि अगदी.

फरहान अख्तरने छान बनवला आहे. मला तरी चित्रपट खुप आवडला. एकदम फास्ट. प्रियांका आणी शहारुख चा पाठलाग वाला सीन तर मस्तच.

जबरी!

अय्या! वर्धानपण गेला डॉनबरोबर?>>> Lol

तिच्या मनात डॉनबद्दल सॉफ्ट कॉर्नर निर्माण होऊ पाहतो.>>> हे अचाटच दिसते.

Very bad timing!>>> हे निरीक्षण सगळ्यात भारी Happy

>>आणि त्याच केस वाढलेल्या अवतारात व त्याला वेडाचे झटके येत असताना या सिनेमाचा सुरवातीचा काही भाग चित्रीत केल्या सारखा वाटतो.

>>शहारुक म्हातारा पकाव, बोमन इराणी महा बोरींग आणि तिरळी प्रियंका.

अशक्य हसलो Rofl Rofl Rofl

अय्या! वर्धानपण गेला डॉनबरोबर? >>> Rofl

मस्त लिहिलंय. मी डॉन-१ पण पाहिला नव्हता, त्यामुळे हा पाहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

Don 2 classic naahiye... Pan enjoy karnyaasaarkhaa aahe...

Ani ho...
Saleem-Javed / Chandra Barot / Amitabh cha Don suddha Shakti Samanta / Shammi Kapoor cha CHINA TOWN varun ghetla hota...

Pages

Back to top