डॉन-२

Submitted by पूनम on 27 December, 2011 - 05:04

तांत्रिक सफाई, परदेशातल्या महत्त्वाच्या ठिकाणी बेतलेलं चित्रिकरण, चित्रपटाला असलेला वेग, एकानंतर एक घडणार्‍या घटना, उत्तम ३डी ईफेक्ट्स... डॉन २ सज्ज आहे हे सर्व काही घेऊन. तरीही तो काही काळानंतर असह्य होतो- आणि त्याचं कारण शाहरूख नसतं! (हे एक नवलच!) ते कारण असतं चित्रपटाला नसलेली कथा आणि चकचकाटाकडे संपूर्ण लक्ष केन्द्रित केल्यानंतर वेळ न मिळाल्यामुळे त्यावर न केलेले काम.

डॉन अंडरवर्ल्डचा बेताज बादशाह आहे. पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निसटणे हा त्याच्या हातचा मळ, नव्हे ह्यातच त्याला 'थ्रिल' वाटतं. असा हा डॉन एक साधी ड्रग्जची कन्साईनमेन्ट, जी एका 'ब्रीफकेस'मध्ये मावते, ती घ्यायला स्वत: जाईल का? बरोबर कोणालाही न घेता? त्याला काहीही 'बॅक ऑफिस' नाही? का एन्ट्रीसाठी काहीतरी स्टंट असावा म्हणून हे तोंडीलावणे? सहाजिकच एकटा गेल्याने, त्याच्यावर हल्ला होतो आणि मग त्यातून अनेक चमत्कार करत तो सुटतो. आणि थेट इन्टरपोलच्या मुख्यालयातच येतो. स्वतःहून शरण जाण्यासाठी! त्यावेळेला मलिक रिटायरमेन्टची घोषणा करून बिल्डींगबाहेर निघतच असतो. पण नेमका डॉन शरण आल्यामुळे त्याला बिचार्‍याला तो प्लॅन पुढे ढकलावा लागतो! (अशी सोय असते का हो?)

रोमा स्वतःच्या हाताने, जातीने डॉनला तुरुंगात पोचवून येते. आता हा खतरनाक डॉन. ह्याला जगभरचे पोलिस शोधत असतात. जगभरातले गुंड ह्याच्या जीवाच्या मागे असतात. आणि ह्याला तुरुंगात एका साध्या कैद्याप्रमाणे ठेवतात? त्याला मृत्यूदंडाची शिक्षा झालेली असते. त्याला 'आयसोलेशन सेल' वगैरे काही नाही? शाहरूख कॅरेक्टरमध्ये असतानाही एकटा रहायला घाबरतो बहुतेक! त्याच तुरुंगात वर्धान त्याची वाट पहात असतो. आता मलिक आणि रोमा ह्याच केसवर काम करत होते की नै पूर्वी? मग त्यांना माहित असायला पाहिजे की नै की वर्धान आणि डॉन ह्यांना एकत्र ठेवण्यात धोका आहे म्हणून? जेलमधून ते पळून गेल्यानंतर रोमा विचारते- अय्या! वर्धानपण गेला डॉनबरोबर? आता काय होणार?

काय होणार? प्रियांका थेट फ्रान्समध्ये! हे बरं असतं बुवा एक चित्रपटांमध्ये! ह्यांनी ठरवलं की दुसर्‍या फ्रेमला ते त्या देशात हजर. तेही कार, सेलफोन, सुंदर कपडे, लॅपटॉप्स ह्यांसह. इथे आपल्याला एक सिमकार्ड घ्यायचं असलं तरी किमान ३ दिवस लागतात! मलिकही पाठोपाठ येतोच. (अहो, रिटायर होऊन घरी चालला होतात ना?) डॉनही पळून जातो आणि आयेशानामक सुंदरी त्याच्या स्वागताला सर्व जामानिम्यासकट हजर! कधी अरेंज करतात हे सगळं? मध्येच डॉन वाढलेले केस कुठे कापतो?

त्याच्या मग पुढची कथा घडते झुरिकमध्ये. 'युरो' जिथे छापले जातात, त्या बॅंकेतून युरोंचे साचे पळवून, नंतर खोट्या नोटा छापून खूप खूप श्रीमंत होण्याचा प्लॅन डॉन करतो. (आताची युरोची स्थिती पाहता, हा चित्रपट आणि त्याचा हेतूच फसतो आणि हास्यास्पदच वाटायला लागतं सगळं, हाही भाग आहेच. Very bad timing!) मग त्याच्या मदतीला येतो 'समीर'. हा असतो कॉम्प्युटर हॅकर. पण त्याला बहुतेक दिव्य दृष्टीही असते. कारण एकही सीन असा दाखवला नाहीये जिथे समीर काही अभ्यास करतोय, नेटवर चित्र बघतोय, लोकांशी बोलतोय वगैरे. पण बँकेच्या सॅनिटेशनच्या प्लॅनपासून युरोचे साचे जिथे आहेत त्या सेफ्टी वॉल्टपर्यंत सर्व बिल्डिंग आणि सेक्युरिटी प्लॅन्स ह्याचाकडे तयार असतात! हां. मुख्य म्हणजे पॅरिस, झुरिक, मलेशियात, बॅंगकॉक येथे लोक हिंदी बोलतात!!!

मग खुद्द चोरी. मग डॉन कसला भारी असतो हे दाखवणारे डायलॉग, मारामार्‍या. मग कोणीतरी फितूर होतो, मग डाव पलटतो वगैरे, मग परत एकदा डॉनची सरशी वगैरे सर्वकाही तेच ते. सर्वात खटकणारी गोष्ट म्हणजे इतकं सगळं करून डॉन शेवटी मुक्तच राहतो. अजून एका सिक्वलसाठीची ही महाभयंकर योजना करून ठेवलेली आहे! तेव्हा बीवेअर! Proud

दिसायला स्लीक, वेगवान. पण तरीही बंडल. ३डी ईफेक्ट मात्र चांगले आहेत. (हॅरी पॉटर पेक्षाही सरस वाटले). डॉन१ हा मूळ डॉनची शेवट वगळता असलेली कॉपी होती, म्हणून की काय, खूपच बरी होती. ह्यात ना कथा, ना कोणत्या गोष्टीचं स्पष्टीकरण. बर हे दुर्लक्ष करण्याइतपत अभिनयसामर्थ्य तरी हवं. पण शाहरूखचा अभिनय (?) तो डॉन आहे म्हणून त्याची दहशत वाटावी असा नाही. अभिनयच नाही असं म्हणूया. उलट सुरूवातीला लांब केसांमध्ये तो थोडा वेगळा दिसतो म्हणून बघवतो Proud कोणालाच काहीही छाप पाडण्याजोगं काम नाही. रोमाचं मूळ कॅरॅक्टर का आहे, कारण डॉनने तिच्या भावाला मारलेलं असतं. इथे रोमा भाऊ वगैरे विसरते आणि तिच्या मनात डॉनबद्दल सॉफ्ट कॉर्नर निर्माण होऊ पाहतो. हे इतकं हताश करणारं आहे! अरे, मूळ उद्देश काय, करताय काय? राहूनराहून अमिताभ आठवतोच. कशाला हवीत गॅजेट्स, की आधुनिक तंत्रज्ञान? नुसती नजर बांधून ठेवते!

तात्पर्यः नका पाहू Proud
(ह्या सिनेमानंतर शाहरूखने निवृत्ती घ्यावी. मलिकसारखी नाही, खरी!)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहिलं आहेस गं....... !! सगळ्यांनी बघितला आणि मला बघायला मिळाला नाही त्यामुळे खूप राग आला होता पण तुझ्या लेखामुळे राग गेला Happy पण इतका वाईट म्हणजे किती वाईट आहे हे बघायला आवडेल Happy अर्थात पैसे न खर्च करता Wink

पोर्णिमा, ते बर्लीन आहे, पॅरिस नाही.
नीट चित्रपट नाही पाहीलात तर असे होते..>>>>> असेच म्हणावे लागत आहे. मलिक प्रियांकाला जर्मनीला जायला सांगतो. फ्रान्सला नाही. पिक्चर काही फार दर्जेदार वगैरे नहीये, पण करमणूक नक्कीच करतो.

राफा खरेच फार सुरेख लिहितात. फार हसले ते वाचून. धन्यवाद. शारूख खरेच टुकार आहे. याची सुरुवात बादशहा नावे सिनेमात त्याने जिम कॅरी ( एस व्हेंचुरा ) च्या लकबी ची कॉपी मारायचा अयशस्वी प्रयत्न केला तेव्हा झाली असावी.

राफाने मस्त लिहिलंय. अमिताभचा डॉन नीटसा आठवत नाहीये आणि डॉन १ पाहिलेला नाही, पहाण्याची शक्यताही शून्यच तरीही नवीन डॉनबद्दल लिहिलेलं न बघताच पटलं.
हे प्रचंड आवडलं

>>I dislike shahrukh khan very much पण त्यापेक्षाही मला नावडते ती लोकांची त्याला अत्यंत डबडा नट आहे हे माहित असूनही आवडून घेण्याची तडजोडी वृत्ती. तो KANK मधे कसा पोपडे आलेल्या भिंतीसारखा दिसतो हे कळत असते तरी केवळ SRK चा मुव्ही म्हणून पहयाला जाणारे कमी नाहीत ! 'शाहरुख खानने काय ऍक्टींग केलीये ना' अशा भावार्थाचे काही मी त्याच्या फॅनच्य तोंडूनही क्वचितच ऐकले आहे. >> Proud

डॉन -२ मधला सगळ्यात थरकाप उडवणारा प्रसंग - शारुख मोटारसायकल चालवत पुलावर येतो आणि त्याच्या मोसाला नंबरप्लेट असते डॉन-३.............बाकी सगळं राफाने म्हटलेच आहे!!!

वर कोण ते म्हणालं ते...डॉन २ एकदातरी त्रिमिती मध्ये पहाच !
आयच्या गांवात.. मध्यंतरात दाखवलेल्या एका इंग्रजी सिनेमाच्या १ मि. च्या ट्रेलरमध्ये त्रिमितीची जी मजा घेतली ती या आख्ख्या सिनेमात कुठेच नाहीये.. त्रिमितीमध्ये पहावं असं याच्यात काहीच नाहीये...
या सिनेमाच्या कमनशिबाने मी आदल्याच दिवशी ३१ डिसेंबरला पिक्सवर मिशन इंपॉसिबलचे तिनही भाग बघितले होते. .

पाहिला. अतिशय बोअर होता. शाहरुख आणि प्रिचो अजिबात आवडत नाहीत तरीही गेले - चुक १. रात्री शेवटचा शो - ११वाजताचा पाहिला - चुक २. मागच्या सीटवरचा मुलगा घोरत होता एवढी एकच करमणुक होती आम्हाला आणि embarassment त्याच्या मैत्रिणीला. मीही डुलक्या काढल्या अधुनमधुन. मला सांगण्यात आलं कि अगदी फास्ट मुवी आहे. हे अगदी खोटं. इतका बोअर होता. पैसे वाया.

पाहिला. लेख वाचायच्या आधीच पाहिला होता. आवडला नाही.

मनुमाऊशी सहमत. चित्रपट स्लो आहे. वेगवान नाही. चोप्रा मला ऐतबार, फॅशन मुळे आवडायची ती अशा सिनेमात पाहिली की आवडेनाशी होईल अशी भिती वाटते. खान मला अगदीच आवडत नाही असे नाही पण ह्यात त्यानी काहीही विशेष केले आहे असे कुठेच वाटले नाही.

पण काहीना सिनेमा आवडला हे ही खरय.

पोर्णिमा, लेख मस्तय. मते पटली.

फायनली डॉन २ बघितलेला आहे... एकदा नक्कीच बघण्यासारखा आहे...

चित्रपटाला व्यवस्थित कथा आहे.. उदयवनने लिहिली आहेच.. एकदम चकाचक केलाय... सुरुवातीच्या काही गमती सोडल्यास मस्तच आहे...

Pages