छत्रपति शिवरायांची बलस्थाने ... ४. युद्धतंत्र ... !

Submitted by सेनापती... on 25 December, 2011 - 08:17

छत्रपति शिवरायांची बलस्थाने - १: कोशबल -
छत्रपति शिवरायांची बलस्थाने - २ : दुर्गम-दुर्ग
छत्रपति शिवरायांची बलस्थाने - ३. लष्करी व्यवस्था

मराठ्यांचे युद्धतंत्राचे ब्रीद होते - 'मति कुंठित करणारा वेग आणि अक्कल गुंग करणारी चपळाई.' याला दिले गेलेले नाव म्हणजे'गनिमी कावा'. पण गनिमी कावा म्हणजे नेमके काय??? हे नाव कोणी ठेवले? कसे पडले? म्लेच्छांसाठी गनिम म्हणजे मराठे. तर कावा म्हणजे कपटाने केलेला हल्ला. थोडक्यात शत्रुने आपल्या लढाईच्या पद्धतीला दिलेले हे नाव इतकी ढोबळ माहिती आपल्या सर्वांना असते. पण मराठ्यांचे युद्ध तंत्र इतकेच होते का??? ह्याच तंत्रावर त्यांनी साल्हेरी पराक्रम गाजवला??? दक्षिण दिग्विजय फत्ते केला? पुढे दिल्लीवर कब्जा मिळवला??? उत्तर अर्थात 'नाही' हेच आहे. मराठ्यांचे स्वतःचे असे एक विकसीत तंत्र होते. त्याबद्दल आपण थोड़ी माहिती घेउया पण त्याआधी 'गनिमी कावा' या शब्दाबद्दल थोड़े अधिक जाणून घेउया.

कावा म्हणजे कपट, हुलकावणी असे त्याचे सरळ अर्थ असले तरी त्याचा अजून एक अर्थ आहे तो म्हणजे 'घोड्याची रग जिरवण्यासाठी त्यास वेगाने घ्यावयास लावलेले फेरे'. अधिक स्पष्टपणे सांगायचे तर घोड़ा वेगाने वाटेल तसा वळवणे, फिरवणे आणि मंडल, फेर किंवा घिरटी घेत वेगाने पुढे नेणे. आता ह्या मधून काव्याबद्दल अधिक योग्य माहिती हातात येते. मराठ्यांचे घोड़े हे अश्या प्रकारच्या तंत्रात तरबेज केलेले होते. वेग कमी करून घोड़ा हवा त्या दिशेला वळवणे कोणालाही जमेल पण वेग कमी न करता घोड़ा हव्या त्या दिशेला वळवणे हे कठीण काम असते. कारण वेग मंदावून मोहरा बदलल्यास शत्रूला आपली पुढची चाल सहज समजू शकते तेंव्हा घोडेस्वार कोणत्या दिशेला वळणार आहे ह्याचा अंदाज शत्रूला बांधू न देता मोहरा बदलणे अतिशय महत्वाचे असते.

अश्या प्रकारची अनपेक्षित वळणे वेग मंद न करता घेत काव्याच्या ह्या तंत्रात तरबेज असलेले मराठे घोड़े आणि घोडेस्वार शत्रूला बरोबर चुकवीत असत. आणि काव्याच्या लढाईमध्ये शत्रूची दिशाभूल हे प्रमुख उद्दिष्ट मराठा सैनिक साध्य करत असत. सर्वच बाबतीत वरचढ असलेल्या शत्रुपक्षाला पराजीत करण्यासाठी मराठ्यांनी हे युद्ध तंत्र वापरात आणले होते. अश्या वेगवान हल्यांमुळे शत्रुपक्षात मुसंडी मारत मराठा फ़ौज घुसे आणि शत्रु फळीमध्ये खिंडार पाडून लगेच परत फिरत असे. गोंधळलेल्या शत्रूच्या पिछाडीवर दुसरी तुकडी हल्ला करत असे आणि शत्रुला मागे फिरून मोहरा बदलवण्यास भाग पाडत असे. आता शत्रुच्या डाव्या-उजव्या बाजूवर हल्ले केले जात आणि शत्रूची पूर्ण फळी विस्कळीत केली जाई. याला 'Pincer Movement' असे म्हणतात.

मराठा पायदळ सुद्धा अश्याच तंत्राचा वापर करून शत्रूला हैराण करून सोडे आणि गुढगे टेकण्यास भाग पाडे. शत्रू बेसावध असताना अचानक हल्ला करणे आणि आपली सैन्यसंख्या कमी असून देखील ती जास्त आहे असे भासवणे असे विशिष्ट तंत्र वापरून शिवरायांनी सुरवातीच्या काळात शत्रुवर विजय प्राप्त केले. ह्या सर्वात 'वेग' हा मूलभूत महामंत्र आणि सोबत असते अखंड सावधानता.

पण गनिमी काव्याचे हे युद्ध खरच किती योग्य आहे??? प्राचीन भारतीय राजनीतीमध्ये कुठ-कुठली युद्धतंत्रे सांगितली गेली आहेत?

प्राचीन भारतीय राजनीतीमध्ये युद्धाचे ३ प्रकार नमूद केलेले आहेत. १. प्रकाशयुद्ध, २. कूटयुद्ध आणि ३.तूष्णीयुद्ध. यामध्ये तूष्णीयुद्ध हे निषिद्ध मानलेले आहे. तर प्रकाशयुद्ध म्हणजे उभय पक्ष काळ-वेळ ठरवून जेंव्हा एकमेकांसमोर उभे ठाकतात ते. प्रकाशयुद्ध हे 'धर्मिष्ट' असल्याचे स्पष्ट असले तरी कूटयुद्ध सुद्धा 'अधर्मिष्ट' नसते.

जेंव्हा कुठल्याही एका पक्षास प्रकाशयुद्ध करणे शक्य नसते तेंव्हा कूटयुद्ध करावे असे कौटील्य सांगतो. जसे... शत्रूचे सैन्य आपल्यापेक्षा संखेने वरिष्ठ असेल पण युद्धक्षेत्र आपल्याला अनुकूल असेल तर कूटयुद्ध करावे. शत्रु सैन्य नदी पार करत किंवा डोंगर उतरत-चढत असेल तरी त्यावर हल्ला करावा. कौटील्य सांगतो की, 'गिरीदुर्ग, वनदुर्ग, कंटककिर्ण अरण्य, पाणथळ जागा, गिरीशिखरे, उंचसखल भूभाग हे प्रकाशयुद्धाने हाती लागत नाहीत. ह्यासाठी कूटयुद्ध करावे. पुढे तो म्हणतो,'वादळी वारा सुटला असताना, वातावरण धुक्याने भरलेल असताना शत्रू स्थळावर आक्रमण करावे, रात्रीच्या वेळी देखील हल्ले करावेत.'

छत्रपति शिवरायांनी याच कूटयुद्धनीतीचा पुरेपुर वापर करत शत्रूला पराजीत केले. आपण त्याला आज 'गनिमी कावा' म्हणतो इतकेच. संख्येने सदैव कमी असलेल्या मराठा सैन्याला विजय प्राप्त व्हावे म्हणुन त्यांनी लढाईची रणक्षेत्रे अनुकूल निवडली. शत्रु जर आपल्या प्रतिकूल रणक्षेत्रामध्ये असेल तर स्वतः शत्रूला अनुकूल न होता शत्रूला आपल्या अनुकूल रणक्षेत्रामध्ये खेचून आणणे यात त्यांचे कौशल्य होते. उदा. अफझलखान प्रकरण. वाई येथे बसलेल्या खानास राजांनी हरप्रयत्ने जावळीच्या जंगलात खेचून आणलेच. अनुकूल रणक्षेत्र निवडताना शिवरायांनी एक पथ्य नियमितपणे पाळले ते म्हणजे लढाई स्वराज्याच्या भूमीत शक्यतो होऊ द्यायची नाही. (अपवाद - पुरंदरचे युद्ध.) कारण उभय पक्षात लढाई झाली की विजय कोणाचाही होवो नुकसान हे सामान्य जनतेचे होते. पिके जाळली जाणे, घरे लुटणे असले प्रकार सर्रास होत असत. कधीही भरून येणार नाही अशी हानी होत असे.

कूटयुद्धामध्ये वापरले जाणारे अजून एक प्रभावी तंत्र म्हणजे 'बेरीरगिरी' - म्हणजे फिरती लढाई. लढाई करता-करता एका जागी न थांबता रणक्षेत्र थोड्या अंतराने बदलणे आणि शत्रूला पांगवणे. त्यानंतर चहुबाजूने हल्ले करून हैराण करणे. (उदा. जालना, खानदेश येथील हल्ले १६७९) दुसरे अजून एक तंत्र म्हणजे रात्री चालकरून शत्रू जवळ पोचणे आणि भल्या पहाटे शत्रुवर हल्लाबोल करणे. हे तंत्र तर मराठ्यांनी कैक वेळा वापरले. तानाजी मालुसरे यांनी घेतलेला सिंहगड(१६७०), कोंडाजी फर्जंद यांनी घेतलेला पन्हाळा(१६७३), प्रतापराव - आनंदराव यांचे बहलोलखानाबरोबरचे उमराणीचे युद्ध, मोरोपंत - प्रतापराव यांचे मुघलांविरूद्धचे साल्हेरचे युद्ध अशी अनेक उदाहरणे आहेत.

गनिमी काव्यामध्ये सर्वात महत्वाचे असतात त्या 'लष्कराच्या गतिमान हालचाली' आणि 'शत्रुवर अनपेक्षित आक्रमण.' शिवरायांनी लालमहालामध्ये शाहिस्तेखानावर केलेल्या हल्याने संपूर्ण भारत अचंभीत झाला. विजापुरचा कवी नुस्नाती त्याच्या 'अलिनामा' मध्ये म्हणतो,'पापणी लवण्यास जेवढा अवधी लागत नाही, खालचा श्वास वर येण्यास जितके क्षण लागतात तेवढ्या कालावधीत एखाद्या भुजंगाने झडप घालावी तदवत शिवाजीने शास्ताखानावर हल्ला केला.'

कूटनितीच्या प्राचीन युद्धतंत्राचे पालन करत छत्रपति शिवरायांनी विजयाची एक मोहोर दख्खनेवर उमटवली. एका नव्या साम्राज्याचा पाया निर्माण केला. पण ह्या सर्वांसोबत चोख लष्करी व्यवस्था, दुर्गमदुर्ग बांधणी आणि कोशबल यांची योग्य सांगड घातली.

छत्रपति शिवरायांची बलस्थाने ... ५. परराष्ट्रीय धोरण...

संदर्भ - सभासद बखर, राजव्यवहारकोश, आज्ञापत्रे (लेखक- रामचंद्रपंत अमात्य), शिवकालीन राजनिती आणि रणनिती (लेखक- श्री. रं. कुलकर्णी), छत्रपती शिवराय - पत्ररूप व्यक्तीदर्शन - डॉ. रामदास, अथातो दुर्गजिज्ञासा (लेखक- प्र. के. घाणेकर)

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान माहिती! गनीम म्हणजे शत्रू ना? हे वेगवान छाप्यांचे तंत्र ही मराठी सैन्याची ओळख बनली, आणि संताजी धनाजीच्या काळात हे युद्धतंत्र कळसाला पोचून निर्नायकी अवस्थेत मराठ्यांनी औरंगजेबाला जबरदस्त झुंज दिली.

स्वतः महाराजांची तर सुरतेवर हल्ला, अफझुलखानाच्या सैन्यावर जावळीच्या जंगलात केलेला भयानक वार अशी किती उदाहरणे सांगावीत! मराठी सैन्य वेगाने हालचाल करू शकत असे, कारण सैन्याजवळ घोडा आणि तलवार याशिवाय काही नसायचं. उलट मोगलांच्या सैन्यात जनानखाना, हत्ती, खजिना अशा अनेक हळू हलणार्‍या गोष्टी असायच्या.

महाराजांपूर्वी हे तंत्र फार कोणी वापरल्याचं ऐकिवात नाही. पण बाजीरावाच्या काळापर्यंत गनिमी कावा हीच मराठी सैन्याची ओळख होती. पूर्वीचा काळ पाहता देवगिरीचा रामदेवराय सुद्धा समोरासमोरच्या लढाईत पराभूत झाला होता, आणि महाराजांनंतर पेशवाईच्या काळात पानिपतावर मराठ्यानी समोरासमोरचं युद्ध लढलं नसतं तर असा दारूण पराभव झाला नसता.

सेनापती,

>> रात्री चालकरून शत्रू जवळ पोचणे आणि भल्या पहाटे शत्रुवर हल्लाबोल करणे.

पहाटहल्याचे तंत्र तर आजदेखील वापरतात. त्याचे जनक शिवाजीमहाराज (किंवा मराठे) होते हे आत्ता कळलं. Happy

महाराजांना मानाचा मुजरा!

आ.न.,
-गा.पै.

धन्यवाद सेनापति...
पण या वेगवान युध्द्नीतीमध्ये शत्रुची माहीती, तिथल्या परिस्थीची माहीती हा ही भग महत्वाचा असणार.आजच्या काळाहुन अधिक चांगले गुप्तहेर खाते हाही राज्यांच्या युध्दनीतीतला महत्वाचा भाग असावा, असे वाटते.
त्याबद्दल फारसे लिहिलेही गेले नाही इतके ते खरोखरीच गुप्त होते.
महाराजांच्या राज्यशैलीवर, युधदतंत्रावर कौटील्य-चाणक्या हा प्रभाव अनेकदा दिसुने येतो..

सेनापती तुम्ही प.भ. आहात होय? Happy मस्तच आहे लेख. आता मगचे लेखही वाचून काढतो.

शत्रू-सैन्याच्या म्होरक्याच्या मानसिकतेचा पक्का अभ्यास हे पण महाराजांच्या युध्दनितीचे एक महत्वाचे अंग होते. त्या म्होरक्याच्या मानसिकतेनुसार महाराज डावपेच आखत. शाईस्ताखानाचा विलासी सुस्तपणा, अफजलखानाचा खूनशीपणा यांचा महाराजांनी सखोल अभ्यास केला आणि त्यानुसार डावपेच आखले.

त्याशिवाय इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात दिल्याप्रमांणे -
१. भिमतटी घोड्यांचा वापर - हे घोडे उंचीला कमी असून डोंगराळ प्रदेशात खूप चपळ हालचाली करू शकतात.
२. प्रत्येक सैनीक आपली रसद आपल्याच खांद्यावर बाळगत असे. त्यामुळे मुदपाकखाना हा सैन्याच्या वेगातला मह्त्वाचा अडथळा दूर होई.
३. सैनीकाची रसद अगदी मामुली वजनाची पण पुरेशी असे - भाकरीचे पीठ, कांदे, मीठ.

ज्योती...
गनीम म्हणजे शत्रूच. इथे मराठे असा अर्थ घेतलाय. शिवरायांआधी मलिक अंबर आणि शहाजी राजे यांनी निजामशाही वाचवण्यासाठी गनिमी काव्याचा पुरेपूर वापर केला होता. (१६३२-१६३६)

गा.पै.
पहाटहल्याचे तंत्र तर आजदेखील वापरतात. त्याचे जनक शिवाजीमहाराज (किंवा मराठे) होते हे आत्ता कळलं.
>>> महाराज जनक नव्हते पण त्यांनी ह्या तंत्राचा पुरेपूर वापर नक्की केला. हे तंत्र कौटिल्य काळापासून अस्तित्वात आहे. Happy

घारूअण्णा..
राजांचे गुप्तहेर खाते इतके गुप्त राहिले की त्याबद्दल अधिक किंवा विशेष माहिती हाती लागताच नाही. बहिर्जी नाईक हा एक सोडला तर बाकी सर्व गुलदस्त्यातच राहिले. त्यांचे कार्य प्रचंड मोठे आहे. आधी म्हटल्याप्रमाणे -

Quick Cavalry movements & excellent, well-paid intelligent services were the main cause of Shivaji’s success. - मार्टिन.

..तांच म्ह्टलां! पक्क्यासारख्या व्यासंगी लेखन करणारो ह्यो सेनापती कोण आणखी उगावलो!! Happy
एकदम मस्त माहिती सेनापती.

छान माहिती नेमक्या शब्दात मान्डलीये Happy धन्यवाद.
गुप्तहेर खात्यासम्बन्धी कार्यात माहिती सुरक्षितपणे योग्यस्थळी वेगाने पोचविण्यामधे "समर्थ मठांचा" सह्भाग कितपत होता? अकरा मारुती व त्यान्ची स्थाने यान्चा सम्बन्ध कोणी तपासुन बघितला आहे का? जी सान्गोवान्गी तोन्डी माहिती मिळते त्यानुसार तो सम्बन्ध होता, पण "कागदोपत्री" पुरावे नसल्याने (आणि सद्यस्थितीतील ...द्वेषाचे राजकारणापोटी) तो नाकारण्यात येतो. यावर काही भाष्य करु शकाल का? [अर्थात आज एकवीसाव्या शतकातही ही माहिती गुप्त रहाणेच योग्य वाटत असेल तर सोडुन द्या तो विषय]

लिंबूटिंबू..

अकरा मारुती व त्यान्ची स्थाने >>> ह्याबद्दल मी तरी अजून काहीच वाचलेले-ऐकलेले नाही. समर्थ मठ आणि रामदासी गुप्तहेर हा वादातीत विषय असून ह्यावर बरीच उहापोह झालेली आहे. अनेक रामदासी गुप्तहेर होते असे मत अनेकांचे असले तरी त्यावर हवातसा भक्कम पुरावा नाही.

मागे मी हे एक पत्र पोस्टले होते.

छान

सेनापती,

तुमचा हा उपक्रम अतीशय स्तुत्य !!

ह्या लेखाच्या निमित्याने तरी आम्हाला अशी नव नविन माहीती मिळत आहे. खर तर अशी सर्व माहीती
शालेय शिक्षणातच आली पाहीजे.

काही दिवसा पुर्वीच महाबळेश्वरला जाण्याचा योग आला होता, तेंव्हा प्रतापगडला ही भेट दिली. तिकड च्या
शासकिय गाईडला सोबत घेतल्याने बरीच अधिक माहीती मिळाली. ५२ एकरात पसरलेल्या
शिवजी महाराजांनी जातीने बाम्धलेल्या पहील्या गडाला बांधायला फक्त २ वर्षे लागली.

हा गड काय किंवा नतंरचा कुठचा ही गड बांधतानां राजानी किती विचार केला होता ह्याची जाणीव हा गड
बघताना फक्त गाईड बरोबर असल्याने झाली. गाईड ने खुपच सविस्तर माहीती दिल्यानेच हे शक्य झाले.

प्रकारची

विवेक... प्रतापगडचा महादरवाजा चढून गेलात की डावीकडे मागे फिरून वाट वरती जाते.. बरोबर? तिथे सध्या तलावाच्या बाजूने ज्या पायऱ्या भवानी मातेच्या देवळापर्यंत जायला बांधल्या आहेत त्या नव्या आहेत. डाव्या बाजूला जुना दरवाजा दिसतो बघ. तो सध्या कोणी वापरतच नाही. कचरा पडलाय तिथे आता. Sad

सेनापती,

आता प्रतापगडचा पडलेला भाग आताशा परत बांधताहेत. सरकारी गाईड च्या सर्विस मधून
मिळालेल्या ऊत्पन्नातुन हा प्रयास होतोय,

तुळजा भवानी मंदिरा कडे जाण्यार्या Original Stoneच्या पायर्‍या (मोजक्याच काही) भूकंपा मूळे
छती ग्रस्त झाल्या नंतर त्यांच्या जागी सिमेंटंच्या पायर्‍या सरकार ने परत बांधल्यात, त्या दर वर्षी परत
परत बांधाव्या लागतात.

ह्या प्रताप गडा चा महत्वाचा भाग म्हणजे त्यातल्या चोरवाटा. ह्या चोरवाटा सरळ गडावर येतात.

ह्या चोर वाटानीच गरजू शरणार्थी भगीनींनाच गडावर प्रवेश दिला जायचा. अश्या चोरवाटांच्या प्रवेश
व्दारावर शेंदूर लावलेल्या मारुतीच्या प्रतिमा कोरल्या आहेत. आज ही त्या प्रतीमा आपण बघू शकतो.

शत्रू हल्ला ऊलटवून लावण्याच्या बर्याच क्लूप्त्या ह्या गडावर करून् ठेवलेल्या आहेत,

प्रतापगडा वर सातार हून येण्यासाठी जंगलातून राज मार्ग होता (अजूनही आहे). त्या मार्गा वरून फक्त
घोड्या वरून येता येऊ शकेल. ह्या वाटेत काही ठिकाणी उंच माची सारख्या जागा आहेत जेणे करून पुर्ण
मार्गाची वरूनच देखरेख के ली जात असावी.

जय शिवराय,जय जिजाऊ.
शिवरायानचि अजोड युद्दनीती दिसुन येते. विलक्षण बुद्दीमत्त्ता, सतत मेहनत करन्याचि व्रुत्त्ती दिसते.
मराठ्यानच्या गनिमी काव्याला जगात तोड नाही.
पानीपत- पानीपत या ठिकाणी २०० ते ३०० मयल अन्तरात कोठेहि साधि टेकडी सुद्दा आढळत नाही , तिथे रस्त्यानसाठी खडी मिळत नाही , रस्त्यानसाठी तिथे मातिच्या विटा वापरल्या जातात. तिथे गनिमी
काव्याची पद्दत ऊपयोगि नव्हति, तिथे सूल्तान ढवा अथवा ऊरोपियन पद्दतिचाच वापर करण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. पानिपत मयदानि युद्द होते त्यामुळे आपली युद्दपद्दत बरोबरच होती.

मित्र हो,
सेनापतींच्या माहितीपूर्ण लेखाने आनंद झाला. शिवाजी महाराजांच्या युद्धतंत्राचे व राजकारणातील डावपेचांचे विश्लेषण एन डी ए सारख्या प्रशिक्शण संस्थांतून केला जात असे त्यावर कोणी प्रकाश टाकावा.
वेग किंवा गतीमान हालचालींना मारक दोन गोष्टी. एक सैनिकांची भोजन व्यवस्था आणि आर्मरी व अन्य लॉजिस्टिक सपोर्ट त्यावर महाराजांनी कशी मात केली ते जाणून घेणे महत्वाचे. त्यावर सेनापतींनी काही लेखन करावे अशी त्यांना विनंती.
आता प्रतापगडचा पडलेला भाग परत बांधला जात आहे. सरकारी गाईड च्या सर्विस मधून
मिळालेल्या ऊत्पन्नातुन हा प्रयास होतोय,

असे वर म्हटले गेले आहे. त्यात थोडी भर घालतो.
ते ढासळलेले बुरूज बांधायचे कार्य पुन्हा कौस्तुभ बुटाला यांनी 'प्रतापगड जीर्णोद्धार समिती' तर्फे 'माननीय हिराभाई बुटाला विचार मंच' मधून सुरू केले त्यातील पहिला 'शिवगड प्रेमींचा मेळावा' प्रतापगडावर ०९ मे २०१० ला झाला. त्या जीर्णोद्धाराचे वैशिष्ठ्य असे की त्या बांधकामाला वापरला गेलेला चुना शिवकालील कागदपत्रातून मिळालेल्या माहिती बरहुकूम तयार करून वापरला गेला. त्याला सरकारी मान्य़ता मिळाली नसली तरी लाखो रुपयांचे काम एकट्या बुटालांतर्फे केले गेले.आता काही अनुदान मिळाले आहे असे कळते.