श्रीमती वीणा कुलकर्णी : फळप्रक्रिया (कॅनिंग) व्यवसाय (माझा छंद, माझा व्यवसाय)

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 14 December, 2011 - 04:12

कॅनिंग किंवा फळप्रक्रिया म्हटले की प्रथम नजरेसमोर येतात ते हवाबंद डबे. एखादा अन्नपदार्थ विशिष्ट प्रक्रिया करून हवाबंद डब्यात सील करून जास्तीत जास्त टिकविण्याच्या पद्धतीला कॅनिंग असे म्हटले जाते. फळांवर वेगवेगळ्या प्रक्रिया करून त्यांपासून सॉस, सरबते, पावडरी इत्यादी टिकाऊ प्रकारांत त्यांचे रुपांतर करण्याचा व्यवसाय हा जसा घाऊक प्रमाणात चालतो तसाच तो घरगुती स्वरुपातही करता येतो.

घरगुती पातळीवर कॅनिंग व्यवसायाचा गेल्या पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या पुण्याच्या श्रीमती वीणाताई कुलकर्णी यांनी काही महिन्यांपूर्वी आपले व्यावसायिक थर्ड इनिंग एका आगळ्या पद्धतीने सुरू केले. त्यांच्याबरोबर त्यांची बहीण श्रीमती वंदना कुलकर्णी व समवयस्क मैत्रीण श्रीमती सुनंदा शेवाळे यांचाही सहभाग आहे.

हराळी, ता. लोहारा, जि. उस्मानाबाद येथे चालू असलेल्या ज्ञानप्रबोधिनीच्या प्रकल्पातील फळप्रक्रिया विभागात आपला अनुभवी सल्ला, मार्गदर्शन, देखरेख व प्रत्यक्ष सहभाग यांद्वारे एक्सपर्ट म्हणून काम करताना वयाची साठी जवळ आलेली असतानाही आपण नव्या उमेदीने, जोमाने एक ध्येय साकारण्यासाठी वाटचाल करू शकतो हे या सर्व मैत्रीणी स्वतःच्याच उदाहरणाने सिद्ध करून दाखवत आहेत. त्यांचे काम, अनुभव प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी वीणाताईंची या तिघींच्या प्रतिनिधी म्हणून घेतलेली ही मुलाखत :

प्रश्न : ही तुमची थर्ड इनिंग म्हटली तर फर्स्ट इनिंग कोणती?

वीणाताई : गेली पस्तीस वर्षे मी व्यावसायिक पातळीवर शिवणकाम करत आहे. अगदी घरगुती शिवणापासून सुरुवात करून नंतर व्यावसायिक दर्जाचे, त्याच सफाईने शिवणकाम केले आहे, तयार ड्रेसेसची प्रदर्शने भरवली आहेत, मोठ्या प्रमाणावर कामाच्या ऑर्डरी घेतल्या आहेत. मुलींचे पार्टी वेअर फॉक्स, गॅदरिंगचे ड्रेसेस यांचेही बरेच काम केले आहे. आजही तयार नऊवारी शिवायची कामे मी हौसेने घेते. कधी काळी संसाराची गरज म्हणून ही कामे केली. पण आता माझी स्वतःची हौस म्हणून करते.

प्रश्न : मग शिवणकामातून कॅनिंगच्या व्यवसायाकडे कशा काय वळलात?

वीणाताई : तर्‍हेतर्‍हेचे पदार्थ बनविणे व इतरांना खाऊ घालण्याची आवड आधीपासून होतीच! निरनिराळी सरबते बनवून बघायची, मोरंबे, लोणची घालायची, त्यांत प्रयोग करत राहायचे हा तर माझा छंदच होता. माझ्या मुलीच्या शाळेत आम्हा सहा पालक मैत्रिणींचा एक छानसा ग्रूपच बनला. आमच्या आवडी, छंद जुळणारे होते. आणि आम्हाला आपापली घरे-संसार-जबाबदार्‍या सांभाळून अर्थार्जनही करायचे होते. मग आम्ही सर्वजणी मिळून फराळाच्या पदार्थांच्या मोठ्या ऑर्डरी घ्यायचो, एकमेकींच्या मदतीने त्या ऑर्डरी पूर्ण करायचो. रुखवताच्या पदार्थांच्या ऑर्डर्स असायच्या. तिथूनच पुढे आमच्या कॅनिंग व्यवसायाची सुरुवात झाली. त्यासाठीचे आवश्यक प्रशिक्षण घेतल्यावर आमच्यातील काहीजणींनी मिळून कॅनिंग व्यवसायासाठी लागणारी अशी औद्योगिक दर्जाची मशिनरी विकत घेतली. गावात शनिवारात भाड्याची जागा घेऊन तिथे सगळ्याजणींनी पद्धतशीरपणे काम सुरू केले. सहाजणींचे मिळून खूप सोशल कॉन्टॅक्ट्स होते. त्यामुळे सुरुवातीला ओळखीतून, आणि नंतर नंतर कामाच्या दर्जाबद्दल ऐकून ऑर्डर्स येत गेल्या. तोंडी जाहिरात आणि केलेल्या कामाचा दर्जा हेच तिथे पुरेसे पडले. त्या काळात माझा भर जास्त करून शिवणावर व पदार्थांच्या ऑर्डरीवर होता, बाकीच्या मैत्रिणी कॅनिंग सेंटर मस्त चालवत होत्या.

प्रश्न : नंतर तुम्ही स्वतः वेगळे युनिट टाकलेत ना?

वीणाताई : हो, मी सिंहगड रोडला शिफ्ट झाल्यावर शिवणकाम जरा कमी केले. पण स्वस्थ बसायचा स्वभाव नव्हता. माझ्या बहिणीच्या, वंदनाच्या बंगल्यात मोकळी खोली होती. शिवाय ती अगोदर आर सी एम कॉलेजमध्ये शिकवायची तिथून सेवानिवृत्त झाली होती. मग तिच्याबरोबर मी वेगळे युनिट सुरू केले. त्यासाठी वेगळी मशिनरी विकत घेतली.

प्रश्न : मशिनरी म्हणजे त्यात नक्की काय काय येते?

वीणाताई : कॅनिंग सेंटरसाठी महत्त्वाची उपकरणे म्हणजे पल्पर, ड्रायर, कमर्शियल मिक्सर, वजनकाटा, सील करायचे मशीन, पॅकिंग मशीन, लिंबू चिरायचे मशीन हे मुख्य, आणि यांशिवाय वेगवेगळ्या प्रकारची नरसाळी, गाळणी, चिमटे, उलथणी, वेगवेगळ्या आकारांच्या - प्रकारांच्या बाटल्या, स्वच्छतेसाठीची सर्व साधने, प्रिझर्वेटिव्हज् इत्यादी हे तर लागतेच. आम्ही घरगुती स्वरुपाच्या व्यवसायासाठी ही मशिनरी घेतली तेव्हा आम्हाला सुरुवातीस साधारण तीस ते पस्तीस हजार रुपये खर्च आला. आता त्यासाठी किमान पन्नासेक हजार रुपये तरी लागतीलच. याशिवाय कॅनिंग व्यवसायासाठी जागाही लागते. भाजी मंडई किंवा मार्केटजवळची, मुख्य रस्त्यावरची जागा जास्त सोयीची पडते. कारण तेवढा वाहतुकीचा खर्च वाचतो. भाड्याची जागा असेल तर तो खर्च वेगळा धरायचा. वीजभाडे, पाणी व्यवस्था, लेबर हेही पाहावे लागते.

प्रश्न : संपूर्ण कॅनिंग प्रोसेस मध्ये कोणकोणत्या पद्धती तुम्ही वापरता?

वीणाताई : आम्ही ज्या प्रकारचे कॅनिंग करतो त्यात आम्ही फळे, कच्चा माल स्वच्छ करतो व त्यांपासून मुरंबे, लोणची, सरबते इत्यादी तयार करतो. सॉस वगैरेंसाठी बाटल्यांचे उकळून घेणे, पल्प करून घेणे, पदार्थाचे पाश्चराईझ करून घेणे असते. प्रिझर्व्हेटिव्ह म्हणून सोडियम मेंझाईट, पोटॅशियम मेटाबायसल्फेट हे पदार्थांनुसार, ठराविक प्रमाणात, सरकारी नियमांनुसार वापरतो. काही पदार्थांना सायट्रिक अ‍ॅसिड वापरावे लागते. सॉससाठी सील वापरावे लागते, सरबताचे पॅकिंग करताना फॉईल पॅकिंग करावे लागते, लोणच्यांचे पाऊचेस असतात त्यांचे पाऊच सीलिंग करावे लागते. आवळा कँडी सारख्या पदार्थांना ड्रायर वापरावा लागतो.

प्रश्न : प्रिझर्व्हेटिव्हजच्या वापराविषयी सांगाल का?

वीणाताई : कॅनिंगमध्ये ज्या पदार्थांमध्ये साखरेचे प्रमाण भरपूर आहे तिथे वेगळी प्रिझर्व्हेटिव्हज वापरावी लागत नाहीत. साखरच प्रिझर्व्हेटिव्हचे काम करते. उदा : मुरंबे. परंतु इतर पदार्थांमध्ये मात्र आम्हाला ते पदार्थ टिकण्याच्या दृष्टीने प्रिझर्व्हेटिव्हज वापरावीच लागतात व ती नियमांनुसार व तेवढ्याच प्रमाणात आम्ही वापरतो. त्यांचे प्रमाण अत्यल्प असते. त्यापासून आरोग्याला धोका नाही. मात्र जर तुम्ही रोजच प्रिझर्व्हेटिव्ह्ज घातलेले ज्यूस वगैरे पिऊ लागलात तर त्यांचा व्हायचा तो परिणाम होणारच! रोजच्या आहारात प्रिझर्व्हेटिव्ह्ज चांगली नाहीत.

प्रश्न : तुमचा व्यवसाय हा लघु-उद्योग होता की घरगुती स्वरूपाचा?

वीणाताई : लघु-उद्योग म्हटला की बाकीच्या बर्‍याच तांत्रिक बाबी येतात. त्यामुळे आम्ही आमचा व्यवसाय हा घरगुती स्वरूपाचा असाच ठेवला होता. गावातील कॅनिंग सेंटरचा मात्र परवाना होता. तो परवाना तिथे बाहेर लावायला लागतो. त्यासाठीही बरीच कागदपत्रे सादर करावी लागतात.

प्रश्न : कॅनिंगच्या ऑर्डरी मिळवण्यासाठी तुम्ही काही विशेष प्रयत्न करायचात का?

वीणाताई : अगोदर म्हटल्याप्रमाणे, आमचे सोशल सर्कलच एवढे मोठे आहे की ओळखीतूनच बर्‍याच ऑर्डर्स यायच्या. मुलीच्या शाळेच्या माध्यमातून इतर पालकांशी ओळखी झालेल्याच होत्या, माझ्या शिवणकामाच्या, फराळी पदार्थांच्या, कपड्यांच्या प्रदर्शनांच्यामुळेही भरपूर ओळखी होत्या. त्यामुळे सतत कोणत्या ना कोणत्या ऑर्डरी असायच्याच. शिवाय आम्ही सीझनल स्टॉकही करून ठेवायचो. लिंबे स्वस्त झाली की लिंबापासूनची उत्पादने, टोमॅटो स्वस्त झाले की सॉस वगैरे. आणि त्याचा स्टॉक करून ठेवला तरी तो पण हातोहात खपायचा. त्यामुळे माल पडून राहिलाय असे कधी झालेच नाही.

प्रश्न : ह्या व्यवसायात फायदा कितपत आहे?

वीणाताई : तुमची श्रम करायची तयारी, चिकाटी आणि नवीन काही करत राहण्याची वृत्ती असेल तर या व्यवसायात तुम्ही नक्कीच फायदा मिळवू शकता. आम्हाला जाहिरातीवर कधी पैसा खर्च करावा लागला नाही कारण मुळात सोशल कॉन्टॅक्ट्स भरपूर होते व एकदा आमच्याकडून माल नेल्यावर ते गिर्‍हाईक पुन्हा आमच्याकडेच येत असे. तेवढा दर्जा राखणे, उत्पादनांमध्ये नाविन्य राखणे व सातत्याने तोच दर्जा देणे हे जर तुम्हाला जमले तर ह्या धंद्यात यश अवघड नाही. अर्थात इतर समीकरणेही सांभाळावी लागतात. शहरात मुख्य प्रश्न म्हणजे हाताखाली सुयोग्य मदतनीस मिळण्याचा असतो. कॅनिंगचा व्यवसाय हा मुख्यत्वे सीझनल असतो. तसे वर्षभर काम चालू असते. परंतु त्या त्या फळाच्या मोसमात कामाचा व्याप जास्त असतो. त्या वेळी तुम्हाला हाताखाली मदतीला माणसे मिळणे, भारनियमनाच्या वेळांनुसार कामाचे वेळापत्रक अ‍ॅडजस्ट करणे, पाणीपुरवठा हेही पाहावे लागतेच लागते. आणि आम्ही हा व्यवसाय करताना त्याच जोडीला आपापली घरे, संसार, इतर जबाबदार्‍याही सांभाळत होतो.

अगदी आकडेवारीच द्यायची झाली तर सध्या १ किलोचा टोमॅटो सॉस करून द्यायचा स्टॅंडर्ड रेट (करणावळ) किलोमागे १५ रुपये आहे. पाच किलोच्या सॉसचे ७५ रुपये सुटतात. सॉससाठी लागणारा कच्चा माल, बाटल्या ग्राहकांनीच द्यायच्या असतात. मात्र या ७५ रुपयांमध्ये वीज, पाणी, लेबरचार्जेस, गॅस इत्यादी सारे खर्च धरलेले असतात. मोठ्या प्रमाणात सीझनल ऑर्डर्स असतात तेव्हा चांगले पैसे मिळतात. आंब्याच्या सीझनमध्ये आमचा व्यवसाय तेजीत असतो. इथे स्पर्धाही प्रत्येक एरियानुसार असतेच. पण एक चांगले आहे की शहरात बहुतेक सर्व ठिकाणी तेच करणावळ दर असतात. जर कोणी त्याहीपेक्षा स्वस्तात करून देत असेल तर त्याप्रमाणे त्यांचा नफाही कमी होतो. विविध कारणांमुळे सध्या आपल्याकडे लोकांचा कल घरगुती कॅनिंग करून घेण्याकडे दिसतो. बाहेरच्या मोठ्या कंपन्यांच्या तयार उत्पादनांपेक्षा हे नक्कीच स्वस्त पडते. सीझनमध्ये घाऊक प्रमाणात तयार करून घेता येते. भेसळीची भीती नसते.

प्रश्न : नंतर तुम्ही तुमचे कॅनिंग सेंटर बंद केलेत ना?

वीणाताई : हो. एके काळी हा व्यवसाय म्हणजे आमची आर्थिक गरजही होती व त्याचबरोबर आपल्या आवडीच्या कामातून आनंद मिळवणे हेही होते. पुढे आमच्या मुलामुलींची लग्ने झाली, त्यांचे संसार मार्गी लागले, आम्हालाही व्यवसायाची ती सारी जबाबदारी नको वाटू लागली. मग आम्ही सारी मशिनरी विकली व आता फक्त घरगुती पातळीवर आणि तेही अधून मधून ऑर्डर्स घेतो. त्यासाठीची सामग्री आहे अजून. पण बाकी सारे विकून टाकले. त्यामुळे आजही जर कोणी मला घरी कॅनिंगसाठीचा माल (उदा : टोमॅटो, लिंबे, आवळे इत्यादी) आणून दिले तर ती ऑर्डर मी घेते. पण आता पूर्वीसारखी दगदग करत नाही.

प्रश्न : तुमच्या या व्यवसायातील बाकीच्या मैत्रिणी आता काय करतात?

वीणाताई : आमची सगळ्या मैत्रिणींची वये आता लहान नाहीत. शिवाय प्रत्येकीचे व्याप वाढलेत. मी, वंदना व सुनंदा तर हराळी प्रकल्पात काम करत आहोत. शिवाय अधून मधून कॅनिंगच्या घरगुती ऑर्डर्स घेत असतो. एकमेकींना मदत करतो. सुनंदाचे घर तर मंडईजवळच आहे. कधी तिच्याकडे ऑर्डर पुरी करतो. बाकीच्याही आता घरगुती स्वरूपातच ऑर्डर्स घेतात. पण एकमेकींशी संपर्कात असतो. कधी कोणाला मदत लागली तर जातो.

प्रश्न : या व्यवसायात घरच्यांची साथ मिळाली का?

वीणाताई : हो, हो, मिळाली तर. एक म्हणजे यातून मिळणार्‍या उत्पन्नाची आम्हाला गरज होतीच! आणि घरच्यांच्याही लक्षात आले की यातून आर्थिक हातभार लागतोय. त्यामुळे घरच्यांचा विरोध वगैरे नव्हता. एक व्हायचे, माझ्या शिवणकामामुळे आणि कॅनिंगमुळे माझ्या हालचालींवर फार मर्यादा यायच्या. पण त्याला इलाज नव्हता.

प्रश्न : हराळीच्या ज्ञानप्रबोधिनीच्या फळप्रक्रिया प्रकल्पाशी तुम्ही कशा काय जोडल्या गेलात?

वीणाताई : आमच्या ओळखीचे श्रीयुत आठल्ये हे स्वतः नियमित शाखेत जातात. हराळीला भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी ज्ञानप्रबोधिनीतर्फे बरेच काम चालू आहे हे आम्ही त्यांच्याकडूनच ऐकले होते. तिथे जवळपास ५७ एकर जमिनीत त्यांनी ७,००० पेक्षा जास्त फळझाडांची लागवड केली आहे. यावर्षी त्यांच्याकडे पहिल्यांदाच आंब्याचे खूप उत्पादन झाले. त्यांना मँगो पल्प करण्याचा व्यावसायिक अनुभव असलेल्या एक्स्पर्ट व्यक्तींची गरज होती. आठल्यांमार्फत आम्हाला विचारणा झाल्यावर आम्हीही उत्सुकतेपोटी होकार कळवून टाकला. मी, बहीण वंदना व मैत्रीण सुनंदा, आम्ही तिघीही तेव्हा पहिल्यांदाच हराळीला गेलो. तिथला प्रकल्प, वातावरण, शिस्त, वेगवेगळ्या क्षेत्रांतील अनुभवी व सेवानिवृत्त व्यक्तींचे मार्गदर्शन, तरुण कार्यकर्त्यांची तळमळ व सेवाभावी वृत्ती आणि मुख्य म्हणजे ज्या प्रकारे या प्रकल्पातून आजूबाजूच्या गावांमधील निर्वासित, भूकंपग्रस्त लोकांचे पुनर्वसन चालू आहे, निराधार महिलांना रोजगाराचे साधन मिळत आहे, मुलांना विनामूल्य शिक्षण मिळत आहे ते सर्व पाहिल्यावर या प्रकल्पात आपलेही योगदान देण्याचा आमचा निश्चय पक्का झाला.

प्रश्न : तुमच्या तेथील कामाचे स्वरूप समजावून सांगाल?

वीणाताई : हराळीला त्यांनी बांधलेले फळप्रक्रिया केंद्र अतिशय सुसज्ज आहे. सर्व अद्ययावत प्रकारची मशिनरी आहे. प्रशस्त जागा आहे. उत्तम सोयी आहेत. त्यांच्या फळशेतीतूनच उत्तम दर्जाच्या फळांचा पुरवठा आहे. हाताखाली काम करायला त्याच परिसरातील निराधार मदतनीस महिला आहेत. शिवाय त्यांचे स्वतःचे विक्री केंद्रही आहे. आमचे काम हे फक्त तिथे त्या महिलांना प्रशिक्षित करायचे, त्यांना सूचना देऊन त्यांच्याकडून त्या त्या पद्धतीने काम करवून घ्यायचे, उत्पादनाची चव - दर्जा - पॅकिंग - सादरीकरण हे उत्तम ठेवायचे, नवनवीन प्रयोग करून उत्पादनांच्या वैविध्यतेतही नाविन्य ठेवायचे असे आहे. पहिल्यांदा आम्ही येथे आलो तेव्हा त्या अगोदरही तिथे काही काही उत्पादने बनत होती. परंतु त्यांच्यात सुधारणेला खूपच वाव होता. शहराकडील ग्राहकाला ज्या प्रकारचे उत्पादन पसंत पडते तसे ते नव्हते. आता आम्ही आमच्या देखरेखीखाली बनवलेली उत्पादने शहरातील चोखंदळ ग्राहकांना जशी हवी असतात तशी आहेत. आम्ही सध्या आमचे एक वेळापत्रक आखून घेतले आहे. त्यानुसार आम्ही पुण्याहून हराळीला एका आठवड्याआड जा-ये करतो. पुणे ते सोलापूर रेल्वेने व पुढे संस्थेच्या खाजगी वाहनाने दोन तासांचा प्रवास करतो. या कामाचे आम्हाला कोणतेच मानधन नको होते, परंतु संस्थेच्या आग्रहाखातर आम्ही येण्याजाण्याचा खर्च तेवढा घेतो. तिथे असताना तेथील महिला मदतनिसांकडून वेगवेगळी उत्पादने आमच्या निगराणीखाली बनवून घेतो. त्या बायका आता चांगल्यापैकी ट्रेन होत आहेत. आमच्या गैरहजेरीत त्या पॅकिंगची कामे करणे, फळांचे रस काढून ठेवणे वगैरे कामे करतात. मात्र जिथे आमच्या विशेषज्ञानाची गरज असते ती ती कामे आम्ही जातीने लक्ष घालून करवून घेतो. तिथे अनेकदा वीज नसते. वीजेच्या वेळापत्रकानुसार आमचेही वेळापत्रक अ‍ॅडजस्ट करावे लागते.

इथे आणखी एक महत्त्वाचे म्हणजे अतिथिगृहाची सोय अतिशय उत्तम आहे. आपल्यासारख्या लोकांना आवडतील अशा स्वच्छ, टापटिपीच्या खोल्या, राहायची आरामशीर सोय, भोजनव्यवस्था हे खूप व्यवस्थित सांभाळले आहे. अशा ठिकाणी काम करायचा अनुभवही मग सुखदायक ठरतो.

प्रश्न : ह्या वर्षी तुम्ही कोणकोणती उत्पादने तयार केलीत?

वीणाताई : आम्ही या वर्षी हराळीला मँगो पल्प, आवळा कँडी, आवळा सिरप, आवळा लोणचे, मोरावळा, आवळा कीस, मुरंबा, आवळा पावडर, कैरी लोणचे, चिंचेच्या गोळ्या, चिंचेचा सॉस, पेरू जेली, पेरू सिरप, पेरूच्या वड्या, बोरवड्या, बोरकूट, खारातल्या हिरव्या मिरच्या, हिरव्या मिरच्यांचा खर्डा, लाल मिरच्यांचा खर्डा, सीताफळाचा गर हवाबंद, लिंबाचे सिरप, आले-लिंबू सिरप, लिंबाचे गोड लोणचे, लिंबाचे तिखट लोणचे, लेमन ब्रेड स्प्रेड इत्यादी उत्पादने बनवली आहेत व ती विक्रीस उपलब्ध आहेत.

प्रश्न : ह्या उत्पादनांची विक्री-केंद्रे कोठे आहेत?

वीणाताई : या वर्षीच ही उत्पादने विक्रीस आली आहेत. त्यामुळे सध्या तरी ज्ञानप्रबोधिनीच्या हराळी येथील विक्री केंद्रात ही उत्पादने उपलब्ध आहेत. पुण्यात माझ्या सिंहगड रोड येथील घरी मी ती विक्रीसाठी ठेवली आहेत. आणि मोठ्या व्यावसायिक ग्राहकपेठेत ती विक्रीला उपलब्ध करता यावीत यासाठी आमची हालचाल सुरू आहे. या उद्योगासाठीचा एफ् पी ओ परवाना संस्थेकडे आहे.

प्रश्न : तुमचा तेथील कामाचा अनुभव कसा आहे?

वीणाताई : मला मुख्य म्हणजे येथे एका चांगल्या संस्थेबरोबर काम करण्याचे समाधान मिळत आहे. माझा वेळ सत्कारणी लागतो आहे. इथे नव्या-नव्या आणि वेगवेगळ्या क्षेत्रांतील लोकांशी ओळखी होत आहेत. कामाच्या निमित्ताने बरेच काही पाहायला, अनुभवायला, शिकायला मिळत आहे. या वयातही आपण असे आव्हान पेलू शकतो, ह्या प्रकारची मोठी जबाबदारी निभावू शकतो हे नव्याने जाणवले. तसेच काही नवे प्रयोगही करायला मिळाले. त्यासाठी येथील व्यवस्थापकांचा असणारा पाठिंबा हाही हुरूप देणारा आहे. इथे आमच्या हाताखाली काम करणार्‍या ज्या मजूर बायका आहेत त्यांना या कामातून रोजगार मिळतो आहे, त्यांचं कुटुंब चालतंय हेही समाधान आहेच! आणि इथे सर्व सोयींमध्ये, मोठ्या प्रमाणावर काम करताना आपला व्यावसायिक अनुभव उपयोगी येण्याचे जे समाधान आहे तेही उत्साह देणारे आहे. आपल्या गुणांना वाव मिळणे, नवनवे प्रयोग करता येणे, आणि एका चांगल्या प्रकल्पात आपलाही हातभार लागणे या सर्वांतून जे काही समाधान मिळते आहे ते माझ्यासाठी अनमोल आहे. माझ्या बहिणीचा व मैत्रिणीचा अनुभवही असाच काहीसा आहे.

प्रश्न : पुढे काय करायचे योजिले आहेत?

वीणाताई : सध्या तरी आमचा जाऊन - येऊन या प्रकल्पात हातभार लावायचा मानस आहे. त्यांनी तिथेच कायमस्वरूपी राहून फळप्रक्रिया केंद्राचे काम बघण्याबद्दल विचारणा केली आहे. परंतु अद्याप संसाराच्या सार्‍या जबाबदार्‍या संपलेल्या नाहीत. त्यामुळे तूर्तास तरी असेच ये-जा करत तिथले काम बघणार आहोत. बाकी पुढचे पुढे!

वीणाताईंचा संपर्क दूरभाष : ७७०९०४२०६७.

----------------------------------------------------------------------------------

ज्ञानप्रबोधिनीच्या हराळी प्रकल्पाची थोडक्यात माहिती :

अध्यक्ष : डॉ. वसंतराव गोवारीकर
कार्याध्यक्ष : डॉ. गिरीश बापट

विश्वस्त व केंद्रप्रमुख : डॉ. वसंत सी. ताम्हनकर
विश्वस्त व केंद्रप्रमुख : डॉ. स्वर्णलता चं. भिशीकर

पार्श्वभूमी :

इ. स. १९९३ मध्ये दक्षिण मराठवाड्यात लातूर - किल्लारीला झालेल्या भूकंपाच्या जोडीला आजूबाजूच्या अनेक गावांमध्येही मोठ्या प्रमाणात पडझड, वित्तहानी झाली. त्यात ज्या गावांना प्रसिद्धी मिळाली त्यांच्यापर्यंत मोठ्या प्रमाणात मदत पोचली. परंतु काही गावे या मदतीपासून वंचित राहिली. त्यांना ना सरकारी मदत मिळाली, ना खासगी संस्थांची मदत. हराळी हे त्यातीलच एक गाव. धूळभरले चिंचोळे खड्डेयुक्त रस्ते, जमिनींचे लहान-लहान तुकडे, मातीची ओबडधोबड घरं, शेळ्या-मेंढ्या, गाई-गुरं, दिवसातून एखादी एस. टी. त्या मार्गावरून जाणार अशी गावाची परिस्थिती. भूकंपानंतर इतर अनेक गावांबरोबर हराळी गाव होत्याचं नव्हतं झालं. घरांची पडझड झाली, पशुधन नष्ट झालं, माणसांचा निवारा हरपला, पण मदत मिळत नव्हती. कारण तिथे कोणती प्राणहानी झाली नव्हती. मदतकर्त्यांची सारी मदत जिथे प्राणहानी झाली होती तिथे जात होती.

त्यावेळी ज्ञानप्रबोधिनीच्या सोलापूर शाखेचे डॉ. वसंत ताम्हनकर व इतर कार्यकर्ते हराळी गावाच्या मदतीला धावून आले. गावातील लोकांना वैद्यकीय मदत मिळवून देणे, त्यांचे व्यवसाय पूर्ववत होण्यासाठी त्यांना मदत करणे, अवजारे आणून देणे, देवळात गावातील मुलांसाठी तात्पुरती शाळा सुरू करणे यासारख्या साहाय्याच्या रूपाने त्यांनी या दुर्लक्षित गावाला आधार दिला. तीन वर्षे या गावात वैद्यकीय केंद्र चालविल्यानंतर इ.स. १९९५ पासून हराळीला प्राथमिक - माध्यमिक शाळा, निवासी शाळा व गुरुकुल सुरू झाले. ही शाळा विनानुदान व विनाशुल्क आहे. निवासी विद्यार्थ्यांकडून जेवण व अन्य खर्चांसाठी अल्प शुल्क आकारले जाते. परंतु ते न देऊ शकणारेही अनेक विद्यार्थी आहेत. सध्या इथे २०० गावांमधून आलेले २७५ विद्यार्थी व परिसरातील गावांमधून आलेले १०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

फळप्रक्रिया उद्योग :

उस्मानाबाद जिल्हा हा तसा अवर्षणग्रस्तच! भूकंपानंतर हराळीतील कोरडवाहू शेतीही बंद पडली होती. त्या परिस्थितीत कमी पाण्यावरही यशस्वीपणे फळशेती करता येते व शेतीला पूरक असे अन्य व्यवसाय करता येतात हा विश्वास शेतकर्‍यांच्या मनात निर्माण होणे आवश्यक होते. त्यातूनच हराळीच्या फळशेती प्रकल्पाला सुरुवात झाली. संस्थेने टप्प्याटप्प्याने एकूण ५७ एकर जमिनीत डोंगरी आवळा, केशर आंबा, पेरू, चिंच, सीताफळ, लिंबे, काजू, बोर अशा जवळपास ७,००० पेक्षा जास्त फळझाडांची लागवड केली. ऑक्टोबर ते डिसेंबर काळात फळफळावळांनी फुललेल्या प्रसन्न बागा, उन्हाळ्यात फुलणार्‍या आंबा-काजूच्या बागा पाहून आजूबाजूच्या शेतकर्‍यांनाही उत्साह येऊ लागला. परिसरातील शेतकर्‍यांचे ज्ञानप्रबोधिनीने त्यासाठी मेळावे घेतले. आता हे शेतकरी स्वतःही फळशेती करू लागले आहेत. सल्ला-मार्गदर्शनाबरोबरच त्यांच्यासाठी बाजार-माहिती केंद्र, शेतीसंबंधित इतर उपक्रम यांद्वारे या शेतकर्‍यांना संस्थेने आर्थिक व व्यावसायिक प्रगतीचा मार्ग खुला करून दिला आहे.

या शिवाय संस्थेने दहावीनंतर २ वर्षांचा मराठवाडा कृषी विद्यापीठाची मान्यता असलेला कृषी-तंत्र पदविका अभ्यासक्रम सुरू केला असून या कृषी-तंत्र विद्यालयात विद्यार्थ्यांची निवासी सोय आहे. सध्या येथे १२० तरुण शेतकरी प्रशिक्षण घेत आहेत. संगणक प्रशिक्षण, उत्तम प्रयोगशाळा, अभ्यासिका व ग्रंथालय यांचीही इथे सोय आहे.

शेती विषयक खालील आधुनिक तंत्रे या प्रकल्पात पाहावयास मिळतात :

१. गांडूळखत निर्मिती
२. नाडेप पद्धतीचे हौद
३. जैव-वायु निर्मिती
४. ठिबक-सिंचन, तुषार-सिंचन इ. सिंचन पद्धती
५. दुर्मिळ वृक्ष व वनस्पतींची लागवड
६. शेतमालाच्या विक्रीची यंत्रणा
७. पाणी वाचवायच्या योजना, शेततळी, जलपुनर्भरण, सांडपाण्याचा पुनर्वापर इ.
८. आधुनिक शेळीपालन
९. सौर, पवन अशा अपारंपारिक उर्जास्रोतांचा वापर
१०. कडुनिंबाच्या २५० झाडांची लागवड
११. शासनमान्य रोपवाटिका व कलमे
१२. कांदाचाळ
१३. सेंद्रिय शेतीचे प्रयोग
१४. माती-पाणी तपासणी प्रयोगशाळा
१५. आधुनिक गोठा व गोबरगॅस
१६. काढणी पश्चात तंत्रज्ञान
१७. फलप्रक्रिया उद्योग एफ् पी ए परवान्यासह
१८. जैव पद्धतीने जलशुद्धीकरण यंत्रणा
१९. इंडस्ट्रियल फ्लाय-अ‍ॅश (नॉन डिग्रेडेबल) वापरून ठोकळे (ब्लॉक्स) उत्पादन
२०. शेत-तळी

पाहुणे, अभ्यागतांसाठी सोय :

या प्रकल्पांस भेट देण्याची इच्छा असेल तर तुम्ही तसे अवश्य करू शकता. प्रकल्पस्थळी निवास व भोजनाची चांगली सोय आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधा :

ज्ञानप्रबोधिनी - सोलापूर
केंद्र हराळी,
डाक तोरंबा, ता. लोहारा, जिल्हा उस्मानाबाद, महाराष्ट्र, पिन - ४१३६०४.
दूरभाष : ८८८८८०२६६०.
ईमेल : annaharali@gmail.com, latabhishikar@yahoo.com

संस्थेच्या परवानगीने त्यांच्या माहितीपत्रकातील ही काही छायाचित्रे इथे देत आहे :

हराळी येथील निवासी शाळा व गुरुकुल

0haraali1A copy (1).jpgकृषी-तंत्र पदविका विद्यालय

0haraali1 copy.jpgफळप्रक्रिया प्रकल्प

0haraali2 copy (1).jpg

मुलाखतकार : अरुंधती कुलकर्णी

विशेष आभार : डॉ. स्वर्णलताताई भिशीकर व डॉ. वसंत ताम्हनकर (त्यांच्या सौजन्यानेच संस्थेची माहिती व छायाचित्रे उपलब्ध होऊ शकली.)

* रैनाचे खास आभार, काही महत्त्वाचे प्रश्न सुचविल्याबद्दल! Happy

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

फारच माहितीपूर्ण मुलाखत! आणि हराळीमधल्या इतर प्रकल्पांची माहितीपण सविस्तर मिळाली. अरुंधती तुमचे खूप खूप आभार.

उत्तम माहिती ..
मुलाखतही चांगली घेतलेली आहे .
विणाताईंचे आभार ... त्यांनी सर्व प्रश्नांना सविस्तर आणि माहितीपूर्ण उत्तरे दिली आहेत.

मस्तं. प्रेरणादायी. धन्यवाद वीणाताई आणि अरुंधती.
२५ वर्षे काम केले की 'मी' 'मी' करायची गरज भासत नसावी. तुमचे कामच पुरेसे बोलके ठरावे !!

सहज झाले नसणार हे सर्व.

छान्_माहिती.
या_संदर्भात्_नव्याने_सुरवात_करणार्‍यांना_याबाबतीतच्या_सरकारी_नियमांची_पण्_माहीती_करुन
घ्यवी_लागते.

छान मुलाखत. धन्यवाद अरुंधती!!
या वयातला तिघींचाही उत्साह वाखाणण्यासारखा आहे.

खुपच छान..मला पडलेल्या सर्व प्रश्नांची उकल सविस्तर पद्धतीने केली आहे..मुलाखत खुपच छान घेतली आहे..अरुन्धती धन्यवाद..

परवाच या हराळी प्रकल्पावर एक दिवस रहाण्याचा योग आला... ८० वयातही काम करण्याचा आण्णांचा उत्साह पाहुन थक्क व्हायला होते..
यातल्या फळप्रक्रिया विभागातली सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे स्वच्छता आणि शिस्त.. कुठेही माशी नाही , घाण नाही.. आणि सगळी माहिती अजिबात आठ्या न घालता उत्साहाने सांगणारी मंडळी..
अगदी जेवताना सुध्दा तुम्ही आमचे पाहुणे म्हणुन आग्रह करकरुन वाढणारी लोक पाहुन डोळ्यात पाणीच येते..

अकु तुझी परवानगी असेल तर काढलेल्या फोटोंचा झब्बु देते..

Pages