'पाऊलवाट'- सुबोध भावे

Submitted by माध्यम_प्रायोजक on 16 November, 2011 - 00:54

photoset-subodh.jpg

आदित्यने दिग्दर्शित केलेला या पहिल्याच चित्रपटात मी नायकाची भूमिका करतो आहे, ही माझ्यासाठी आनंदाची आणि महत्त्वाची गोष्ट आहे. अनेक प्रोजेक्ट्स मध्यंतरी आले, त्यावर विचार झाला, पण काही ना काही कारणाने ते पूर्णत्वास गेले नाहीत. पण 'पाऊलवाट' त्याला अपवाद ठरला. ही नवी वाट आदित्यला मराठी चित्रपटसृष्टीतल्या एका महत्त्वाच्या मुक्कामावर घेऊन जाईल, असा मला विश्वास आहे.

पात्राबद्दल बोलायचं, तर अनंत देव हा छोट्या गावाहून महानगरात आलेला होतकरू गायक. आपल्याला गाणं येत आहे. आपलं हे नाणं खणखणीत आहे, त्यामुळे आपल्याला या मायानगरीत काम सहज मिळेल असं काहीसं भाबडं स्वप्न घेऊन तो मुंबईला येतो. इथे आल्यावर मात्र यशस्वी होण्यासाठी केवळ गाणंच पुरेसं नाही हे त्याला लक्षात येतं. त्याचा मित्र बाब्या, ज्यांच्याकडे तो रहातो त्या आक्का, रेवती, अनेक लोकांशी त्याचा संबंध येतो आणि त्याला सगळ्यांचेच संघर्ष जवळून दिसतात, भिडतात. उस्मान सारंगीवाल्यामध्ये त्याला एक फिलॉसॉफर आणि गाईड भेटतो. ह्या सगळ्यांबरोबर, सर्वांच्या वैयक्तिक संघर्षाबरोबरच सगळ्यांनी मिळून चाललेली एक वाट म्हणजे ’पाऊलवाट’ हा सिनेमा.

SB.jpg

’पाऊलवाट’ या शब्दाचं माझ्यासाठी एक वेगळंच महत्त्व आहे, असं मला वाटतं. मी ह्या इंडस्ट्रीत आलो ते कशासाठी? इथे नाव आहे, पैसा आहे, लोक ओळखतात, मी थोड्याच अवधीत मोठ्ठा बॅंक बॅलन्स जमवू शकतो म्हणून? की अभिनयासाठी? मी आलो ते अभिनयाच्या इच्छेपायी. पण या इच्छेच्या जोडीला प्रयत्नांचीही जोड लागतेच. नेहमी आधीपेक्षा उत्तम काहीतरी कसं करता येईल, याचा विचार करावा लागतो. दहा वर्षं काम करूनही आज मला लख्ख जाणवतंय- या क्षेत्रात करण्यासारखं आणखी खूप आहे. आणखी चांगलं काम करण्यासाठी मला वाव आहे, संधी आहे. त्या दृष्टीने विचार केला, तर आज दहा वर्षांनीही माझा संघर्षही चालूच आहे, असं मला वाटतं.

इतकी वर्षे केलेल्या त्या संघर्षाचं फलित मला ’बालगंधर्व’च्या रूपात सापडलं. ही कल्पना माझी होती. ती आम्ही पुढे नेली आणि आज एका महान व्यक्तीमत्त्वाला आदरांजली म्हणून आम्ही काहीतरी करू शकलो, याचा सार्थ अभिमान वाटतो आहे.

मात्र यापुढेही माझी सतत चांगलं काम करत राहण्याच्या इच्छेपोटीचा हा संघर्ष, उत्तम अभिनयासाठीची धडपड चालूच राहील. चित्रपटातला अनंत देव- ह्याचा संघर्ष कशासाठी आहे? चांगलं गाणं मिळावं, चांगलं काम हातून व्हावं ह्यासाठी त्याचा संघर्ष आहे. तसं म्हणलं तर ही समांतर वाटचाल आहे. ह्या इन्डस्ट्रीत वैफल्याचे, मानहानीचे प्रसंग अनेक येतात. कधीकधी पार निराश व्हायला आणि खचून जायला होतं. पण 'मला माझी स्वतःची पाऊलवाट तयार करायची आहे, जी वाट कोणी चोखाळली नाहीये त्यावरूनच चालून मला माझं ध्येय गाठायचं आहे' या तीव्र इच्छेच्या बळावर त्यावर मात करता येते, हा माझा अनुभव आहे. माझ्या या छोट्या पाऊलवाटेने आणखी काहींना नवी वाट दाखवली, तर ते समाधान माझ्यासाठी फार मोठं असणार आहे.

एक उत्तम संगीतकार म्हणून नरेंद्र नावाजलेला आहे. एक 'टेस्टफूल' संगीत दिग्दर्शक आहे तो. त्याच्याकडे संगीताची जबाबदारी असली, की प्रॉडक्ट उत्तम असणारच ही खात्री. वैभवच्या सुंदर शब्दांना त्याने अप्रतिम स्वरसाज चढवला आहे. त्याचबरोबर, तो सिनेमाचा निर्माताही असल्यामुळे, सिनेमाच्या प्रत्येक विभागात त्याने लक्ष दिलेलं आहे. त्यामुळेच 'पाऊलवाट' नावाचं एक अप्रतिम, देखणं प्रॉडक्ट आम्ही प्रेक्षकांना देऊ शकलो आहोत.

---

मुलाखतः पूनम छत्रे
शब्दांकनः साजिरा

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुबोध भावेचा बालगन्धर्व खूप आवडला होता. आता या सिनेमातल्या त्याच्या कामाबद्दलही उत्सुकता आहे. नक्कीच बघणार
धन्यवाद Happy

छान

मस्त Happy