ही लेखमालिका आजच्या ह्या पोस्टने संपतोय. खरे सांगायचे तर ‘आता काही लिहायचे उरले नाही’ असे एकेठिकाणी वाटते आहे तर ‘हुश्श्श्.. झाले बाबा एकदाचे लिहून पूर्ण’ असेदेखील मनात आल्यावाचुन राहिलेले नाही. लडाखला बाईकवर जाउन येणे हे जितके परीक्षा पाहणारे होते तितकेच त्यावर लिखाण करणे सुद्धा परीक्षा पाहणारे होते. अर्थात माझे लिखाण वाचणे हे देखील तुमची परीक्षा पाहणारे होते बहुदा.. माझे इतके लांबलचक लिखाण खरच कित्ती वाचकांनी पूर्णपणे वाचले असेल काय माहीत.
आम्ही लडाखला जायचे का ठरवले??? मी आणि अभी आम्ही दोघेसुद्धा बऱ्याच वर्षापासून लडाख प्लान नुसतेच आखत होतो म्हणुन?, एक साहसी मोहिम पार पाडावी म्हणुन?, आपल्याच देशाच्या एका अविभाज्य भागाचे निसर्गसौंदर्य बघायचे म्हणुन?, की सैनिकांचे जीवन अधिक जवळून पाहता यावे म्हणुन??? प्रत्येकाची उत्तरे विभिन्न असतील. माझ्या स्वतःसाठी ही मोहिम प्रामुख्याने सैनिकांचे जीवन अधिक जवळून पाहता यावे ह्यासाठी होती. अर्थात एक साहसी मोहिम करत आगळे- वेगळे निसर्गसौंदर्य बघायचे हा उद्देश होताच. पण प्रत्येकाचे ह्या मोहिमेचे उद्दिष्ट वेगवेगळेच होते, त्यात कुठेही सुसुत्रता नव्हती आणि म्हणुनच अखेरपर्यंत पूर्ण टीममध्ये आवश्यक असा ताळमेंळ जमुन आला नाही. ज्या गोष्टीवर आम्ही प्लानिंग करण्यापासून भर देत होतो ती गोष्ट अखेरपर्यंत आम्हाला साधता आली नाही हे या मोहिमेचे एक मोठे अपयश होते. अश्या मोहीमांमध्ये टीमचे एकच उदिष्ट आणि विचार असावे लागतात. तुमच्यापैकी बरेच जणांना असा प्रश्न पडला असेल की मी असे का म्हणतोय. इतक्या दुर्गम प्रदेशात इतक्या उंचीवर बाईक्स चालवून कुठलाही मोठा अपघात न होता आम्ही यशस्वीरित्या परत आलोय तरी ही मोहिम अपयशी ठरली???
माझ्या दृष्टीने अगदी अपयश म्हणता नाही आले तरी हे पूर्ण यश नक्कीच नव्हते. अनेक उणीवा आणि त्रुटी त्यात राहिल्या. हवी तशी एकत्र सुरवात करता आली नाही आणि शेवट तर निराशाजनक ठरला. दिल्लीमध्ये 'इंडियागेट'ला 'अमर जवान ज्योती' येथे नतमस्तक होउन मोहिमेचा शेवट करायचा असे माझे मत होते आणि अभीने त्याला मान्यता दिली होती. पण तसे होऊ शकले नाही. कारणे काहीही असोत. पण ते धैय गाठण्यात आम्ही अपयशी ठरलो हे मी कधीच विसरु शकणार नाही. एखाद्या गोष्टीचा शेवट गोड झाला की ती गोष्ट कशी पुर्णच गोड लागते, तसे काही येथे घडले नाही.
आज सुद्धा लडाख असे उच्चारले किंवा मनात आले की आठवणी उचंबळून येतात. पार केलेला तो एक-एक पास, केलेली ती एक-एक चढ़ाई, गाठलेली सर्वोच्च उंची आणि तेथे घालवलेला एक-एक क्षण. क्षण जे होते आनंदाचे... क्षण जे होते अभिमानाचे... क्षण जे होते आत्मविश्वास वाढवणारे... कारगिल – द्रास येथे जाउन आपल्या जवानांना श्रद्धांजली देण्याचे क्षण, लेहमधील १५ ऑगस्ट अनुभवण्याचे क्षण, १८००० फुट उंचीपेक्षा उंच अश्या जगातील सर्वोच्च रस्त्यावरून बाईक चालवण्याचे क्षण आणि तेथे तिरंगा फड़कवण्याचे क्षण... शब्द अपुरे पडतील असे पेंगोंग आणि त्सो-मोरिरी येथील सौंदर्याचे क्षण, पांगच्या वाळवंटामधले आणि रोहतांगच्या चिखलातील राड्याचे क्षण. असे कितीतरी क्षण आज आठवणी बनून मनात साठवून ठेवल्या आहेत. म्हणूनच जेंव्हा लडाखमधल्या ढग फुटीची बातमी मला समजली तेंव्हा हे सर्वकाही डोळ्यासमोर उभे राहिले.
या लेख मालिकेतून १५ मेंबर्सच्या १३ दिवसाच्या एका थरारक मोहिमेचा पुन्हा एकदा शेवट होतोय. '१३ दिवसात २८१८ किलोमिटर्सचा' प्रवास करून अनेक अनुभव घेउन सफळ संपूर्ण झालेली ही भ्रमंती शेवटपर्यंत लक्ष्यात राहील यात काही शंका नाही. ह्या लिखाणातून मी काय साधले? बरेच काही. पुन्हा ते क्षण जगण्याचा आनंद आणि ते तुम्हा सर्वांसोबत वाटण्याचा आनंद सुद्धा. माझ्या लिखाणाच्या यथाशक्तिनुसार तो इकडे मांडायचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. मला अपेक्षा आहे की हे लिखाण तुम्हाला नक्कीच आवडले असेल. काही काळाने पुन्हा येथेच भेटुयात अजून एक हटके आणि आठवणीन्नी भरलेली भ्रमणयात्रा घेउन...
२ वर्षापूर्वी आम्ही पार पडलेल्या लेह - लडाख ह्या आनंदमय सफारीचा हा व्हिडिओ वृतांत...
ह्या संपूर्ण मोहिमेचे शुटींग आणि पुढचे एडिटिंग वगैरे वगैरे आयबीन - लोकमतने केले होते.
एकूण रेकोर्डिंग ५ भागात...
भटक्या, यु-ट्यूब ची लिंक दे
भटक्या, यु-ट्यूब ची लिंक दे न.
रोहन मनापासून तुझं आणी तुझ्या
रोहन मनापासून तुझं आणी तुझ्या टीम चं अभिनंदन..
सुंदर लिखाण आणी अप्रतिम फोटो.. हे लदाख दर्शन तू आम्हाला घरबसल्या घडवलस म्हनून तुझे आभार
यू ट्यूब बघतेच आता..
सॅम ... लेखाच्या शेवटी दिली
सॅम ...
लेखाच्या शेवटी दिली आहे ना... म्हणून तर भाग बदलून पुन्हा टाकला..
फारच मस्त ! तुमच्या टिमचा मला
फारच मस्त ! तुमच्या टिमचा मला फार हेवा वाट्तो, कारण असे कार्यक्रम सहजासहजि घडून येत नाहित. सलाम तुम्हा सगळ्याना.
..खुपच सुंदर
..खुपच सुंदर लिहिलय.........लडाख ला जाऊन आल्या सारखे वाटले..स्वतः.
मस्त मालिका.. अतिशय
मस्त मालिका.. अतिशय प्रेरणादायी. मी हा शेवटचा भाग आधी वाचलाय आणि अप्रतिम लिखाण आहे ... लदाख ला जाऊन आल्या सारखे वाटले ..
मस्त मालिका.. अतिशय
मस्त मालिका.. अतिशय प्रेरणादायी. मी हा शेवटचा भाग आधी वाचलाय आणि अप्रतिम लिखाण आहे ... लदाख ला जाऊन आल्या सारखे वाटले ..
प.भ., सुंदर लेखन. आणि मोहीमही
प.भ.,
सुंदर लेखन. आणि मोहीमही भन्नाट! सगळे भाग एका दमात वाचून काढले. अगदी प्रतिक्रियांसकट. सोबत गुगल नकाशावरून मोहिमेचा मागोवा घेत होतो. मजा आली.
सो मॉरिरीपासून सारचूपर्यंत गोंधळ उडाला. वाटलं मध्ये उपशी कसं लागलं नाही...? मग सो कर तलाव सापडला आणि उलगडा झाला. तुम्ही चक्क हिमालयाची डोंगररांग कच्च्या रस्त्यावरून पार केलीत. तुम्हाला साष्टांग लोटांगण! कोणी दिली या रस्त्याची माहिती याचं कुतूहल आहे.
आ.न.,
-गा.पै.
अप्रतिम लेख आणी चित्रण
अप्रतिम लेख आणी चित्रण
ग्रेट.. हि लेखमालिका मला फार
ग्रेट.. हि लेखमालिका मला फार आवडली. फार उशीरा वाचण्यात आली. पहिल्या लेखापासून सलगपणे शेवटच्या लेखापर्यंत वाचतच राहिलो. तेरा दिवसांत लेह.. हा आश्चर्य वाटण्याजोगा प्रवास सहजपणे घडवून आणला हे खरंच क्रेडीटेबल आहे.
प्रतिक्रियेसाठी
प्रतिक्रियेसाठी धन्यवाद..
गामा..
मनाली येथील आमचा एक मित्र आहे जो 'सो कर' मार्गाने जाऊन आलेला होता आणि अनेक परदेशी पर्यटकांना नेहमी घेऊन जातच असतो.. तो रस्ता अतिशय आव्हानात्मक होता..
सेनापती, "इतके लांबलचक लिखाण
सेनापती, "इतके लांबलचक लिखाण खरच कित्ती वाचकांनी पूर्णपणे वाचले असेल काय माहीत"
मी तर सगळे भाग वाचले खरच खूपच छान लिहिले आहेस हे "लडाख"चे प्रवास वर्णन.
आमचा ही "18 dolphin baik tours" नावाचा एक ग्रुप आहे. अनेक ठिकाणी आम्ही बाईक टूर केल्या आहेत. मात्र "लेह लडाख" बाईक टूर आज तरी आमच्या साठी स्वप्नच आहे. आम्ही हि लवकरच लेह लडाखला जाण्याची योजना आखतोय. तू लिहिलेले हे प्रवास वर्णन आजही आमच्या साठी मार्गदर्शक आहे. वेळ पडल्यास संपर्क साधू.
सेनापती, जबरदस्त लिखाण ! मजा
सेनापती, जबरदस्त लिखाण ! मजा आली वाचायला. विशेषतः त्सो मोरिरीच्या अलिकडेपलिकडे ते पहायच राहीलय.
बाकी, तुम्ही एकही दिवस मोकळा ठेवला नव्हता का? बहुतेक त्यामूळे वेळापत्रक कोलमडत गेल असाव.
Pages