पाहुणी

Submitted by क्रांति on 27 September, 2011 - 23:41

आज घटस्थापना. नवरात्रासाठी माय जगदंबा घरी आली, तेव्हा तिचं जे रूप दिसलं त्याचं जमलं तसं वर्णन केलं.

नवरात्र जागवित आली घरी पाहुणी
माय अंबिका देखणी || धृ ||

मांडते मी चंदनी पाट
काय आईचा वर्णू थाट
भरजरी कुसुंबी काठ, हिरवी पैठणी
माय अंबिका देखणी || १ ||

गळा शोभे माळ पुतळ्यांची
कानी कुडी मोती-पोवळ्याची
पैंजणे सोनसाखळ्यांची, रत्ने कंकणी
माय अंबिका देखणी || २ ||

साज सोन्याचा बावनकशी
चंद्रहार, वजरटिक, ठुशी
हिरकणी शोभली कशी सोन्याच्या कोंदणी
माय अंबिका देखणी || ३ ||

अंबा जगतजननी माउली
आली शकुनाच्या पाउली
नित्य राहो तुझी सावली माझ्या ग अंगणी
माय अंबिका देखणी || ४ ||

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

छान !