बा रा ए. वे. ए. ठि. म्हणजेच दस का दम

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

होणार होणार म्हणून गाजत असलेलं बा. रा. चं ए. वे. ए. ठि. पार पडलं. दर सहा महिन्यानी ए. वे. ए. ठि. होतंच पण ते होणार की नाही यावर 'हो' 'हो', 'नाही', 'नाही' चं ग्यानबा तुकाराम चालू असतं. नेहमीची मंडळी हो म्हणत असते, पण पार दक्षिणेपासून सिंगापूर पर्यंत बरेच लोक, 'चक् चक्' काही होणार नाही असं म्हणत असतात. यावेळी स्थानिकानी 'मला नाही जमणार,' असा सूर लावला तर दक्षिण वारे अगदी यायला तयार. तिकडे सिंगापूरहून, 'कचर्‍याच्या पिशव्या कोण आणणार? आणि Dustbin असणार का अशी प्रेमळ विचारपूस सुरू झाली. एकंदरीत 'जलने वाले जला करें' असं वाटावं एवढ्या लोकांनी ए. वे. ए. ठी. होणार असा संकल्प सोडला. त्यांचं काय जातंय म्हणा. झालं तरी 'वावा' म्हणायचं आणि नाही झालं तरी. तसं मॄ चं तिकीट सोडता फारसं कुणाचंच काही गेलं नाही, हे ही खरंच.

जय्यत तयारी करावी आणि माशी शिंकावी तसं काहीतरी माझं झालं. एक Client त्याच दिवशी परीक्षेला बसायचं म्हणून अडून बसला, आणि त्यामुळे मला 'हाताला हात' म्हणून त्याच्या बरोबर बसून रहावं लागलं. पावभाजी आणणार अशी मी मोठ्ठी जाहिरात करून ठेवली होती. शेवटी ती परीक्षा तो पास झाला आणी पाऊण वाजता माझी सुटका झाली. घरी गेलो, बायकोला गाडीत घेतली (पावभाजी तिनेच केली होती) आणि निघालो. एका वळणावर ब्रेक मारावा लागला, आणि पावभाजीचा Trey गाडीतच आडवा झाला. (गरजूनी हवी तर माझ्या गाडीत पुन्हा एकदा बसून खात्री करावी, पावभाजी किती छान झाली होती ते वासावरून कळेल). मग अर्ध्या वाटेत गाडीतली पडलेली पावभाजी काढणे, शक्य तेवढी गाडी स्वच्छ करणे इत्यादी प्रकार करून झाले. आता एवढी वायफळ बडबड केलेली आहे, तेव्हा परत Veg Biryani ऑर्डर करणे, ती तयार होईपर्यंत वाट बघणे इत्यादी प्रकार करणे आलेच. शेवटी मी पोहोचलो तेव्हा.. जवळपास सगळं जेवण संपलेलं होतं.

भेळ संपलेली, मिसळीच्या Trey मध्ये फारसं काही न उरलेलं, अजून कोणी कोणी काय काय आणलेलं त्याचा पत्ता नाही. फक्त काही समोसे आणि मी आणलेली Veg Biryaani एवढंच शिल्लक होतं. त्यात एक डब्यात लाडू दिसले. मला जुनियर लाडवाक्कांची आठवण होतेय न होतेय, तेवढ्या आद्य लाडवाक्काच समोर दिसल्या. त्या येणार नव्हत्या म्हणे, त्यामूळे मी दोनदा डोळे उघडझाप करून खात्री केली. लाडवाक्का समोरच होत्या. त्याअर्थी लाडू त्यानीच केले हे मान्य करायला पर्यायच नव्हता. मी आता काय बोलू असा विचार करत होतो, पण तेवढ्यात नयनीश नामक माणसाने 'एकदा खाऊन बघा, तुम्हाला बोलायला जागाच उरणार नाही' असं म्हणाला. बेसनाचा लाडू म्हणजे नक्कीच टाळूला चिकटेल त्यामुळे बोलता येणार नाही असं तो म्हणत असावा असं मला वाटलं, पण लाडू खाल्यावर पण 'आलीस का?' असं म्हणून शकलो मी. तेव्हा तो तारीफ करत होता हे लक्षात आलं.

थोडी बिर्याणी घेऊन मी मायबोलीकरांकडे मोर्चा वळवला. त्यात नयनीश मला 'काका' म्हणेल की काय अशी भीती वाटावी एवढ्या वेळा 'अहो देसाई', 'अहो देसाई' म्हणाला. शेजारी बघतो तर लालू. मला एक क्षण हेच कळेना की माझा मोरू करायला हे सगळे जमले होते की काय? लालू तर दरवाजा उघडण्यापासून हजर होती म्हणे. कालपर्यंत 'मला वेळ नाही रे, एवढी कामं आहेत' असं म्हणत होती आणि आज एकदम मुहुर्तावर हजर. मी इकडे तिकडे शोधून 'मॄ' आल्याची खात्री करून घेतली. ती आली नसती तर सगळे मिळून 'April Fool' असं Fedbruary' मधेच ओरडणार असं मला वाटायला लागलं. मॄ होतीच पण ती 'बालगीत' वगैरे काही म्हणताना दिसली नाही. पण कुणितरी लांबून 'ती मॄ' असं मला सांगितलं. तिकडे अजून एक चेहरा. मी ओळख दाखवावी म्हणून 'हसलो' तर ती ढीम्म. मी या मुलीला ओळखतो. नुसता ओळखतोच असं नाही तर पुण्याला गेलो तर तिला भेटल्याशिवाय मी परत येत नाही. ज्यानी ज्यानी मला 'परदेसाई' मधे मदत केली त्यात आरतीचा नंबर पहिला. ती अचानक 'बा. रा. ए. वे. ए. ठि.' ला आणि मला ओळख पण दाखवत नाही. हे सगळे विचार माझ्या डोक्यात आले. मी परत अस्पष्ट असं हसून पाहिलं पण तरी ती ढीम्म. मग कोणीतरी मला ती 'सिंडरेला' आहे असं सांगितलं. माझ्याकडे एका दोघानी विचित्र नजरेने पाहिल्याचा भास झाला. ही सिंडरेला? मी गेली दोन वर्ष तिच्याशी गप्पा मारतो ती सिंडरेला? मी चक्रावलोच. मग मी तिला तिचं जन्मगाव, आडनाव आणि 'आरती' बद्दल विचारलं तर ती तिची बहीण निघाली. या दोघी बहिणी माझ्या चांगल्या मैत्रिणी आहेत पण त्या एकामेकाच्या Mirror Image आहेत हे मला माहीत नव्हतं. या कानाची त्या कानाला खबर न लागू देणे म्हणजे काय ते कळलं. त्या जुळ्या असाव्यात असा माझा संशय आहे. कपाळावरच्या आठ्या पण Same आहेत असं ती म्हणाल्याचं मला आठवतं.

तसं मला सगळंच आठवतं, कारण मी अजून 'करोना प्यार है' कडे वळलो नव्हतो. खरं तर झक्की सोडता कुणीच ते अग्निहोत्र सुरू केलेलं मी पाहीलं नाही. पण आल्या आल्या 'रुणी' ने ग्लू वाईन केल्याचं आणि त्याचा परीणाम बर्‍याच लोकांवर झाल्याचं दिसत होतं. झक्की मात्र होमात समिधा टाकल्यागत करोनाच्या प्रेमात पडले होते. आणि हो, मैत्रेयीने वेळेवर येऊन तिचा आतापर्यंतचा विक्रम मोडला म्हणे. खरं तर सर्वात आधी कोण आलं हा अजुनही वादग्रस्त मुद्दा आहे. लालू, रुणी (की रुनि?) हे दरवाजा उघडायच्या वेळी हजर होते म्हणे. पण त्याआधी त्याना संदीप दिसला असं ते म्हणाले. संदीपनेही वेळेआधी येऊन त्याचाही आधीचा विक्रम मोडला होता. पण चावी मैत्रेयीकडे असल्यामुळे दरवाजा दुसरा कोणी उघडणार नव्हते. पण ग्लू वाईन पोटात गेल्यावर बहुतेक मंडळी मी आधी मी आधी करत असावी.

थोडं फार खाऊन झाल्यावर मग मी Amplifier, Microphone, Speakers वगैरे लावले. यात मला 'अहो' म्हटल्याबद्दल नयनीशला शिक्षा म्हणून भला मोठ्ठा Amplifier उचलायला लावला. श्री फु़जीसान (म्हणजेच सायोनारा यांचे उत्तमांग (Better Half)) Laptop घेऊन काराओकी करायला सज्ज होते. मी माझा मोरू होणार या भीतीने ओळख म्हणून सगळ्यांची नांव आणि ID विचारून घेतले. त्यात काही लोकांनी आपले किती Duplicate ID आहेत, आणि ते आपण कोणकोणत्या कामासाठी वापरतो हे जाहीर केलं (नाही). चि. आदित्यने आपलं नाव सांगितलं पण आईचं नांव सांगायला लाजला. श्री. अजयकुमार 'मासे' नसल्यामुळे थोडे नाराज वाटले. सँटिनो 'अनुराधा' असं काही तरी म्हणणार होता पण त्याला 'गूरू अनुराधा नहीं, बिंदू... बिंदू' अशी समज कुणीतरी दिली. झक्कीनी नवीन बाटली उघडली. नयनीश तरूण असला तरी त्याला बियरची बाटली दातानी उघडता आली नाही तेव्हा त्याचे प्रशिक्षण द्यावं लागलं. बायकोसमोर आणि शिंडेसमोर मी बाटली त्याला देऊ नये अशी त्याने कळकळीची विनंती केली. काराओकीवर गाणी कोण म्हणणार असा प्रश्न निघताच स्वाती सोडता कोणीच हो म्हणेना. शेवटी मी एक गाणं म्हटलं. ते काराओकीपेक्षा नुसतच 'ओकी' झालं. त्यामुळे विनय गाऊ शकतो तर मी का नाही असं विचार करून अजून काही लोक तयार झाले. सँटीनो, श्री. फु़जीसान, आणि मग नयनीश यानी गाणी म्हटली. नयनीश गातोय म्हटल्यावर सौ. नयनीश उठून फेर्‍या मारायला लागल्या, का ते कळलं नाही. गृहिणी (हा आयडी आहे) स्वतः म्हणून गायला तयार झाली. तिचं गाणं Prompting मध्ये पूर्ण करावं लागलं. म्हणजे एक ओळ ती म्हणाली, मग ऊठून जायला लागली, मग मी पुढची ओळ सांगितली, मग ती ती ओळ म्हणाली, मग उठून जायला लागली, मग मी अजून दोन शब्द असा प्रकार बराच वेळ झाला. खरं तर अश्यावेळी लोक, 'तूच ते गाणं पूर्ण का करत नाहीस?' असं म्हणतात पण माझ्या गाण्याची Quality आधीच लक्षात आल्याने लोकाना 'Prompting चालेल पण विनय नको' असं झालं होतं. अश्यावेळी लोक खरं बोलत नाहीत आपण ओळखावं लागतं. फक्त झक्की तेव्हा खरं बोलत होते म्हणे.

मग स्वातीने माईकचा ताबा घेतला (माईक हा आयडी नाही, आणि माबोकर पण नाही). ती गायला लागल्यावर मात्र समोर काहीतरी चांगलं घडतंय म्हणून ऐकू लागले. तिचं गाणं आणि ग्लू वाईन यांच्या एकत्रिक परीणामामुळे लोक इतर गाणी विसरले असावेत (विशेषतः माझं) असा अंदाज आहे. मध्येच संदीपच्या जावयबापुनी 'तुझे देखके मेरी मधुबाला' म्हणून करमणूक केली. संदीप 'सपनोकी रानी' म्हणणार होता, पण बायको समोर असल्यामुळे त्याच्या विचार रद्द झाला. मग भाईनी Closing म्हणून GTG गाणं म्हणून दाखवलं. ते हिमेशपेक्षा चांगलं पण हिमेशच्या चालीत गात होते. त्यात ए. वे. ए. ठि. न म्हणता GTG म्हटल्यामुळे झक्कीनी हरकत घेतली असं ऐकिवात आलं. पण ती हरकत नसून नुसताच घोट होता हे कळलं. मध्येच शोनू उठून Parol संपला म्हणुन निघाली. मला वाटलं Petrol संपलं म्हणाली का काय? झक्की पेट्रोल टाकत होते.

मग Stand up Comedy ची वेळ होती. संदीपने सुरुवात केली. सगळे हसले. विनोद पुण्यावर होते. त्यामुळे पुणेकर जरा जपून जपून हसत होते. संपल्यावर 'त्यात काय, सगळं खरं आहे पुण्याबद्दल, त्यात हसायचं काय?' असं म्हणून झक्कीनी पुणेकरांची बाजू घेतली. हा करोनाचा परीणाम असावा. कारण झक्की आणि पुणेकर यांच्यातून 'पोस्ट' (विस्तवासारखे ) जात नाही हे सगळ्यांना माहीती.

मी पुणेकरान्ना 'तुमच्यावर विनोद नाही' असं आश्वासन दिलं म्हणून मग ते हसायला तयार झाले. काही लोक 'पुणेकरांवर विनोद नाही, तर हसणार कशावर म्हणून नाराज दिसत होते', विशेषत: बायको पुण्याची आणि नवरा पुण्याचा नाही असे लोक. त्यानी नंतर मला भेटून त्यांची नाराजी स्पष्ट शब्दात व्यक्त केली आणि ते संदीपची पाठ थोपटायला गेले.

मृ बालगीतं म्हणणार होती, सँटीनो मुलं संभाळणार होता, पण हजर असलेली मुलं आपल्यापेक्षा खूप लहान आहेत हे त्याच्या लक्षात आलं. मग ते दोघे चहा कॉफी आणायला निराकारला घेऊन गेले. 'निराकार' हा जुना Original ID आहे पण हल्ली त्याची बायको तो Duplicate म्हणून वापरते असं कळलं. भाईंचे Duplicate Id कोणते यावर चर्चा झाली. Garbage Can बघून 'तुम्ही 'बी' च्या सगळ्या सूचनांचा मान राखलात' असंही कोणीतरी म्हणालं.

लालूने काहीतरी पदान्यास करून दाखवले. पण Plainsboro मध्ये भुकंप नको म्हणून ती थांबली. त्याला हिलेरी क्लिंटन Steps म्हणतात असं म्हणाली. One small step for a woman, one giant step for womankind असं हिलेरीचं भाषण तिने लिहून आणलं होतं. सिंडरेला चारचौघात सावासारखी असते, पण अंदरसे मामला निराला है, हे तिनेही मान्य केलं. नयनीश 'तरी मी तुम्हाला रोज ओरडून ओरडून हेच सांगत असतो,' असं म्हणाला. त्यावर त्याच्या सौंनी डोळे वटारले म्हणे. प्राजक्ता हल्ली 'तुका म्हणे आता उरले ए. वे. ए. ठि पुरती' म्हणणार होती, पण भजनाची कारओकी नव्हती. 'बर्‍याच दिवसानी दिसलीस' असं मी म्हटल्यावर 'काय करणार तुम्ही Busy ना' असा पुणेकरी खाक्या दाखवून मोकळी झाली.

मग कॉफी आली. त्यात Who's line is this Anyway' या भाईंकॄत गेमात लाडवाक्कानी बाटली लाटली. शेवटच्या क्षणी यायचं ठरल्यामुळे त्या सगळ्यांची मुक्ताफळे वाचून आल्या होत्या. रुनि यांचे यजमान आणि रुनि यानी पण बरीच उत्तरे बरोबर दिली म्हणे, पण Cheating केले असणार नाही तर मायबोलीकर नग बरोब्बर कसे ओळखता येईल असा त्यांच्यावर संशय घेण्यात आला म्हणून त्यांचे बक्षिस रद्द झाले. लाडवाक्क्काना 'Mayabo Liquor' ची बाटली मिळाल्यावर चि. आदित्यने ती प्राणपणाने जपली. मी शेजारचा भाताचा डबा ढापायचा प्रयत्न केला तेव्हा 'Hey that is ours' असं भीमपलासीत म्हणाला.

पुढंचं ए. वे. ए. ठि. झक्कींच्या बागेत, पुन्हा एकाद्या हॉल मध्ये, किंवा माझ्या घरी करावे असं लोक म्हणायला लागल्यावर मी काढत पाय घेतला. मला पावभाजी साफ करायची होती. लोकानी आपला मोरू करायच्या आधी सटकले म्हणजे बरे नाही का?

समाप्त... (आणि सगळ्यांना एक भला मोठ्ठा दिवा). Lol

तळटीप:
१. लालू (हजर रहाणे), संदीप आणि मैत्रेयी (वेळेवर हजर रहाणे) आणि झक्की (करोना प्यार) यानी बरेच विक्रम मोडल्यामुळे हल्ली वेताल एकटाच फिरतो म्हणे.
२. सँटीनोने सगळ्यांना भेटल्यावर आपल्या आयडीत 'बी' असावा असा निर्णय घेतला.
३. वॄत्तांत वाचायला मिळत नाही त्यामुळे नाईलाजाने नयनीश सध्या परदेसाई वाचतोय अशी बातमी आहे.
४. वॄत्तांताचा घाऊक ठेका मी घेतला आहे का? या प्रश्नाला 'हो' असे उत्तर देऊन 'मधुरिमा' यानी 'हम भी कुछ कम नहीं' हे सिध्द केलंय.
५. यात कुणाचा अनुल्लेख झाला असेल तर मी जबाबदार नाही. बियर बाटल्या दाताने उघडल्यामुळे होते असे कधी कधी.
६. भाईंनी बंगाली StandUp करून दाखवले. पण हा बिक्रोम लोक्षात ठेबता ऑलॉ नॉही.
७. पुढच्या ए. वे. ए. ठि. ला सूचनांपेक्षा हजेरीकडे जास्त लक्ष देण्यात येईल असा ठराव मी पास केला आहे.
८. 'अजून येऊ द्या' म्हणणार्‍या आणि 'ए. वे. ए. ठि' च्या आधी वॄत्तांत मागणार्‍या मंडळीना पुढच्या वेळी 'उरलेली पावभाजी' साफ करायच्या कामावर नियुक्त करण्यात येईल.

प्रकार: 

विनय,
अजुन तुमचे "करोना प्यार है" सत्र चालुच दिसतय ए.वे.ए.ठी. ला सुरु केलेले त्यामुळेच शेवटचा पॅरा २ वेळा लिहीला गेलाय की मलाच ग्लुवाईन मुळे २-२ वेळा दिसतय Proud
बाकी वृतांत झक्कास.

झकास झालाय वृत्तांत. अगदी जसाच्या तसा लिहीलाय हो! कायपण मसाला नाही घातला!

सगळ्या पदार्थांवर यथेच्छ ताव मारुनही भाताचा 'एक घास' म्हणत म्हणत चांगला वाटीभर भात खाल्ला! "विनयनी आणलेला मसालेभात ए-वन आहे" असं मी म्हंटल्यावर मागून कुणीतरी "मसाले भात नाही, बिर्याणी आहे ती." आणि "हॉटेलातली दिस्तेय" असे पाठीमागून आवाज आले. (मी वळून बघायला घाबरले Happy )

लहान मुलांसाठी बालगीतं शक्यच नव्हती. चिल्लर मंडळी एकमेकांच्या (खेळणातल्या) मोटरगाड्या, पेन ह्यात अत्यंत बिझी होती. उरलेली पिल्लुकंपनी येता जाता चॉकलेटं-चिप्सच्या व्हेंडींग मचीनच्या काचेला नाक लावून बघण्यात दंग होती. आई-बाबांकडून घेतलेल्या नोटा आणि नाणी त्यात कोंबण्याचा प्रयत्न सुरु होता. पण ते सज्जन व्हें. म. कुणाचकडून पैसा घ्यायला तयार नव्हतं. ह्या गोंधळात मी "माकडं निघाली शिकारीला, उसाची बंदुक खांद्याला" असं काही 'म्हणू' लागले अस्ते तर काही खरं नव्हतं.

'निराकार' हे नागपुरकार आपलं नागपुरकर्-अमरावतीकर असल्याचं समजलं. म्हणून त्यांना एक स्पेशल कपचिनो ऑफर केली. पण त्यांनी आदरपूर्वक "नको .सगळ्यांना मिळतेय त्याच तोटीवाल्या डब्यातली कॉफी मी घेईन" असं सांगीतलं.

झक्की लाडू खाऊनही "मिळाला नाही" असं सांगतात. हा पूर्वानुभव लक्षात घेऊन लाडावाक्कांनी "मृ, हातात कॅमेरा आहे तर पटकन फोटो काढ झक्कांचे. लाडू बरोब्बर तोंडात जातानाचा एक क्लोज-अप असु दे" सांगीतलं. मी हुकमानुसार फोटो काढताच, "मला सुखानं लाडू खाऊ द्या. बरं काढलेच असतील तर फोटो पाठवू नका. एव्हिडन्स नको" झक्की पुटपुटले! Happy

काही दुरुस्त्या केल्या आहेत. रविवारी काय करताय काय माबो वर?
विनय Wink

रवीवारी पण सगळे पडीक असतात, लपून! Happy

पावभाजी सांडल्यावर बरंच निस्तरायला लागलं का? इतक्या मेहेनतीनी बनवलेलं, सगळं वाया गेलं! Sad

झक्कास वृत्तांत Happy

देसाईंचे गाणे ऐकुन त्यांना, "तुम्ही रेडिओवर का गात नाही ?" असे कुणीतरी म्हणाले ब्वॉ Lol

त्या जुळ्या असाव्यात असा माझा संशय आहे >>> जुळी अपत्ये चार तासांच्या अंतराने जन्माला आल्याचे ऐकीवात आहे पण चार वर्षे म्हणजे Uhoh

वैद्य तुम्हाला काय काका म्हणतात. तुम्ही (म्हणजे देसाई) दोन मुलीं असूनही फार्फार तरुण दिसता असे त्यांचे म्हणणे आहे.

पण हजर असलेली मुलं आपल्यापेक्षा खूप लहान आहेत >>>> हजर असलेली मुलं सांभाळायला आपण अजून खूप लहान आहोत असे(च) त्याला वाटले असेल Wink

फेमस लाडु आणि धुळ्यांनी आणलेली जिलबी. 'खाता' कोण ते ओळखा.gtgladu.jpg

>>मी शेजारचा भाताचा डबा ढापायचा प्रयत्न केला तेव्हा 'Hey that is ours' असं भीमपलासीत म्हणाला.
Happy
आला बाई शेवटी वृतांत! ए.वे.ए.ठि. पेक्षा याचीच जाहीरात जास्त होती! Light 1

<<एका वळणावर ब्रेक मारावा लागला, आणि पावभाजीचा Trey गाडीतच आडवा झाला. >>
झक्की करोना आणतील की नाही असं वाटून तुम्ही घरूनच एखादी घेऊन निघालात वाटतं... Proud Light 1

मृ बालगीतं म्हणणार होती, सँटीनो मुलं संभाळणार होता, >>

हो तर, मी लक्ष ठेवून होतो सगळ्या मुलांवर.... Happy
सुरूवातीला मी जेव्हा आलो तेव्हा तिथे फक्त चित्रेंचा आदित्य होता. त्याने जंगल बुक मधले कॅरॅक्टर्स असलेले, म्हणजे मोगली, बघिरा वगैरे, असे मस्त कपडे घातले होते. मग मी त्याला- 'ए आदित्य, तुझा शर्ट मला दे आणि माझा तू घे ना' - असं करत करत खूप छळला. हा मनुष्य आपण दिसलो की आपल्याला काहीतरी मागतो असं त्याला कळलं आणि मग मी दिसलो की तो लांब पळायला लागला.
नंतर मग त्याने समवयस्कांचं कोंडाळं जमवलं, आणि सर्वांनी मिळून प्रचंड कलकलाट केला. त्याचा आवाज 'मायबोलीवरच्या कविता' या विषयावर चालू असलेल्या बायकांच्या गॉसिपच्या कलकलाटाला लाजवील इतका होता.

कॅरिओकी सुरू झालं तेव्हा झक्की माझ्या शेजारी बसले होते. अचानक मला म्हणाले, 'अरे, माझ्या खुर्चीच्या खाली काय चालू आहे बघ रे जरा'. बघतो तर दोन मुलं झक्कींच्या खुर्चीच्या खाली आडवी पडून त्यांना खालून काहीतरी टोचत होती.

नयनीशचा मुलगा त्याच्या नाकाला लागलं होतं म्हणून नाकावर स्पायडरमॅनचं चित्र असलेलं बँड्-एड लावून आला होता. ते बघून मी त्याला सरळ 'ए स्पायडरमॅन' अशीच हाक मारली. त्यावर तो भलताच खूश झाला आणि स्वत:च्या बाऊलमधलं आइसक्रीम मला देऊ केलं. नंतर जेव्हा मी स्वतःसाठी आइस्क्रीम घेऊन आलो तेव्हा सिंड्रेलाच्या मुलाने- इशानने- माझ्याकडे आइस्क्रीम मागितलं. मी त्याला चार पाच वेळा दिलं खायला तरी तो थांबेचना. मग मीच लहान मुलासारखी त्याच्या वडलांकडे तक्रार केली की, अहो हा मला माझं आइस्क्रिम खावूच देत नाहीये. मग त्यांनी जाऊन त्याच्यासाठी वेगळं आइस्क्रीम आणलं. ते संपल्यानंतर तो ऑरेंज ज्यूसमध्ये बेसनाचा लाडू बुडवून खात हॉलभर फिरत होता. सायोनाराच्या मुलाचे व्हेंडिंग मशिनचे किस्से वर मृण्मयीने सांगितले आहेतच. शेवटी चित्रेंच्या आदित्यने माझ्याशी असलेलं वैर विसरून मला त्यांच्यासाठी आणलेलं एक फ्रूटीसारखं पेय दिलं. तेव्हा मला भरून आलं Proud

हा होता लहान मुलांतर्फे ए.वे.ए.ठी. चा वृत्तांत... ज्या ज्या मुलांचा अनुल्लेख झाला आहे तीच मुलं खरोखर गुणी होती हे विसरू नये.. Wink

एवढे सगळे उपद्व्याप सांभाळून मी 'whose line is it anyway' या परिक्षेत दुर्दम्य यश मिळवलं... तरी भाईंनी तरूणांना संधी देण्याऐवजी मायबोलीच्या ज्येष्ठ सभासदाला- स्वातीला - बक्षिस देण्याचं काँग्रेसी धोरण स्विकारलं.... पण स्वातीने मराठी गाणी इतकी मस्त म्हटली होती की बक्षिस स्वातीला गेल्याचं काही वाटलं नाही.. Proud

नयनीश गातोय म्हटल्यावर सौ. नयनीश उठून फेर्‍या मारायला लागल्या, का ते कळलं नाही>>>>>>ते एक एम्बॅरॅसमेंट अवॉयडन्स टेकनीक आहे....थोडक्यात "हा जो गृहस्त गातोय....याचा आणी माझा काहीएक संबंध नाहीये......... " आणी ईंग्रजीत म्हणायचं तर " ही ईज नॉट वीथ मी...." Proud
नयनीश 'तरी मी तुम्हाला रोज ओरडून ओरडून हेच सांगत असतो,' असं म्हणाला>>>>> चला देर आए .. पण दुरुस्त आए... Wink
वॄत्तांत वाचायला मिळत नाही त्यामुळे नाईलाजाने नयनीश सध्या परदेसाई वाचतोय अशी बातमी आहे>>>>>> नाईलाजाने नाही पण तुमच्या आणी तुमच्या लिखाणा बद्दल उत्सुकता असल्या मुळे वाचायला घेतली... याच्या आधी एक दोनदा वाचन पुन्हा चालु करायचे निष्फळ प्रयत्न होवुन गेलेत... वाचायला काही मजा येईना... परदेसाई म्हणजे वाचायला एकदम मस्त आहे.. ह्रुषिकेश मुखर्जींच्या सिनेमा सारखं..... तुमचं पुस्तक कदाचित माझ्या वाचनाच्या आवडीला जीवदान देईल असं दिसतय.... Happy

(आणि सगळ्यांना एक भला मोठ्ठा दिवा). >>>>>>>> Lol वेरी फनी.....

अहो मृ, लाडू खातानाचा फोटो काढला, तर प्लेटमधे जिलबी का दिसते आहे? लोकांना उगाच शंका यायची की लाडवाक्कांचे बेसनाचे लाडू जिलेबीसारखे असतात की काय?
म्हणजे लाडवाक्कांना लाडू म्हणजे काय कळत नाही की, तुम्हाला? असाहि प्रश्न पडतो.
आता काही विचारवंत म्हणतील झक्कीच लाडू समजून जिलेबी खाताहेत!

खुलासा करतो की मनसोक्त लाडू नि जिलेबी खाल्ली. (लाजतो क्काय? का भीति आहे कुणाची?)
झक्कींच्या नावाने काहीहि बोलावे, तो रागवत नाही.
हटकेश्वर, हटकेश्वर.

झक्की, जिलबीवर अर्धा खाल्लेला लाडू आहे. तो दिसला का? लाडु तोंडात घालताना फोटो काढणार होते. पण अचानक तोंडावर आलेल्या कॅमेर्‍याच्या फ्लॅशमुळे धक्का बसून लाडु घशात अडकला तर.. ह्या सूज्ञ विचाराने तो बेत रद्द केला. म्हणून मग इन ऍक्शन फोटो न घेता लाडु खाता खाता जिलबीवर टेकवलात तेव्हा फोटो काढला! बाय द वे, प्लेट कुठे दिसली? हात पुसायच्या कागदी रुमालावर खात होता आपण!!!

सचीनने लहान मुलांना शिताफीनं पिडलं. त्यामुळे नंतर कुणी त्याच्या वाटेला गेलं नाही! Happy आई बाबा सोडून सगळ्या मोठ्यांचा धसका घेतल्यामुळे माझी बालगीतं ऐकायला एक पोर एका जागी उभं राहीलं नाही.

सिंडीच्या बाळानी संत्र्याच्या रसातच काय पण बहुतेक पाणीपुरीच्या पाण्यात (आणि मिसळीच्या कटात) पण लाडु बुडवून खाल्लाय. Proud

सचिनचा शिशुवृत्तांत पण भारी Happy

माझा लेक खात होता त्याला बेसन लाडु फ्लोट म्हणतात. कै बै आडाणी बाया Wink

पण स्वातीने मराठी गाणी इतकी मस्त म्हटली होती की बक्षिस स्वातीला गेल्याचं काही वाटलं नाही.. >> आईशप्पत! स्वाती, तुझ्या हिन्दी गाण्यांबद्दल बघ हा काय म्हणतोय !! Proud

बाकी मी एवे ए ठि चं एक फॅशन पोलिस /रेड कार्पेट स्पेशल रिपोर्टिन्ग करणार होते पण खेदाने नमूद करावं लागतंय की कुणीही बायांनी भ मे केला नव्हता की काही भारी फ्याशनी, ट्रेन्डी कलर्स वगैरे ट्राय केले नव्हते त्यामुळे लिहायला मटेरियल च मिळालं नाही! सगळ्या फारच सेफ, सोबर कपड्यात होत्या.
पण नाही म्हणायला नयनिश, श्री रुनि, लक्ष्मीकान्त, अन निराकार यांनी मात्र पिवळा, केशरी, गुलाबी, लाल असले बोल्ड कलर्स वापरले होते ! त्यामुळे फ्याशन डिझायनिंग चं बक्षिस या चौघांना विभागून द्यायला हरकत नाही:) - बेस्ट की वर्स्ट ड्रेस्ड ते गुलदस्त्यात ठेवते Proud

मृ.
लक्ष्मीकांतनी घातलेल्या रंगाला माबोवर पीच कलर म्हणतात. तू माबोचे टीशर्ट ऑर्डर करुन बघ पुढच्यावेळी त्या रंगाचे म्हणजे तुझी खात्री होईल (माझी यावेळीच झाली) Proud

विनयदा आलोच मी खूप सारे प्र. घेउन Wink

सहीयेत सगळ्यांचे वृत्तांत.. Happy

ज्या ज्या मुलांचा अनुल्लेख झाला आहे तीच मुलं खरोखर गुणी होती हे विसरू नये.. >>>> म्हणजे सिंडी चा मुलगा अगदी आईच्या वळणावर गेलेला दिसतोय... Wink

विनय, जोरदार व्रुत्तांत ... भरपुर मजा केलेली दिसते सगळ्यांनी Happy

आता मी आभारप्रदर्शनाचं गोSSSSSड काम करते.

ए.वे.ए.ठि. साठी ठि. उपलब्ध करून दिल्याबद्दल मैत्रेयीचे आभार.
ग्लुवाईनसाठी रुनीचे आभार.
बाकी चवदार खाद्यपदार्थांसाठी ते आणणार्‍या मायबोलीकरांचे आभार.
माझे लाडू नवरसांत बुडवून खाल्ल्याबद्दल सिंडीच्या मुलाचे आभार.
झक्कांचा 'रंगे हाथ' फोटो प्रसिद्ध केल्याबद्दल मृणचे आभार.
नैवेद्याला (नैवेद्यापुरतंच नव्हे) आईसक्रीम आणल्याबद्दल लालूचे आभार.
ए.वे.ए.च सादर केलेल्या गुणदर्शनासाठी गुणी मायबोलीकरांचे आभार.
मायबो लिकरचं बक्षीस most deserving candidateलाच दिल्याबद्दल भाईंचे आभार.
ए.वे.अ. मायबोलीकरांना हसतमुखाने सहन केल्याबद्दल अमायबोलीकर अर्धांगांचे आणि चतुर्थांशांगांचे आभार.
तसंच विनयने नेहमीप्रमाणेच (विनोदी) वृत्तांत लिहायचं गांभीर्याने मनावर घेतल्याबद्दल (आणि त्यात लाडवांचा तीन वेळा उल्लेख केल्याबद्दल) मी त्याचेही आभार मानते.
इथे नजरचुकीने उल्लेख राहूनही जे चिडले नाहीत त्यांचेही स्पेशल आभार.

Proud

<<मायबो लिकरचं बक्षीस most deserving candidateलाच दिल्याबद्द<<>>
आता कशाला ते वादग्रस्त मुद्दे पुन्हा पुन्हा उकरून काढता? बर्‍याच लोकांचे मत वेगळे आहे. तरी बरे हे लोक अमेरिकेत रहातात. नाहीतर भारतीय संस्कृतीनुसार त्यांनी 'मनासारखे झाले नाही की कर 'राडा' असे केले असते.

की स्वतःची स्तुति स्वतःच करायची हौस आहे? आम्हाला का बक्षीसे मिळाली नाहीत का? पण आम्ही असे नाही करत.

ते 'लाडवांचे कमीत कमी तीन वेळा नांव काढल्याबद्दल' चे आभार राहिले... Sad

कुलदीप, चालू कर प्रश्नांची फैर..

कुणीही बायांनी भ मे केला नव्हता की काही भारी फ्याशनी, ट्रेन्डी कलर्स वगैरे ट्राय केले नव्हते <<<

बायानो हे काय ऐकतोय मी? पुढच्या वेळी लक्षात ठेवा.... Happy
चार सुज्ञ माणसानी मायबोली चहा सदरा घातला होता.. त्यात दोन पीच, एक काळा-पांढरा आणि अक राखाडी रंगाचा होता हे पण विसरलेली दिसते मैत्रेयी....

विनय Lol

पीच बीच कै नै बर्का, गु ला बी च होता तो सदरा Happy
बाकी काळा, पांढरा, राखाडी हे अदखलपात्र रंग असल्यामुळे अनुल्लेख Proud

आणि मायबोलीची टोपी घालून डुआय-गौरवगीत गाणार्‍या सूज्ञ माणसाचे काय? Proud
MT, काळा पण अदखलपात्र? मग pink is the new black का? Proud

अग काळा, राखाडी वगैरे भ मे च्या अन रेड कार्पेट च्या दृष्टीने 'टू सोबर' ना Happy

हे बा. रा. म्हणजे काय? << रामाची सीता कोण? Lol

बा. रा. म्हणजे बाग राज्य , Garden State म्हणजे New Jersey.

विनय Happy

>>मृ. लक्ष्मीकांतनी घातलेल्या रंगाला माबोवर पीच कलर म्हणतात.
मी बापडी काही म्हणत नाहीये. पीच तर पीच. गुलाबी का? बरं गुलाबी! तसा टी शर्ट मी पण घेतलाय आणि एक काळा! बॅगेत भरायला विसरले. (पां.शा.मो. **आणला असता तरी घातला असता का माहिती नाही.** ) Proud

विनय, मस्त वृत्तांत. तुमचा कार्यक्रमही छान झाला.

जेवण शिल्लक होते हां.. पाणीपुरी, मिसळ, कटलेट. शेवटी आवराआवर करणार्‍या मंडळींना सोपे जावे म्हणून मग जाता जाता मी काही संपवले. योगिनी आणि प्राजाला विचारा हवं तर. Proud

इशान दोन हातात एक एक लाडू घेऊन पुन्हा मिसळीचा ब्रेड घ्यायला आला होता, तेव्हा मी त्याला म्हटलं आधी हातातले खाऊन संपव, मग ब्रेड देते. मग तो बिचारा गेला तिथून. पण बहुतेक त्याला लाडू घालून सँडविच वगैरे करायचे असावे असे वरचे वाचून वाटते आहे. Happy

का माझ्या लेकाच्या मागे लागलात Wink तरी अजून कोणी, "आई खायला देत नाही वाटते घरी" असे नाही म्हणालात किंवा मला, "घरुन निघताना मुलाला पोटभर खाउ घालुन निघावं" असा सल्ला नाही दिलात Proud

अग झक्कींनी दिला की' की मुलगा छळतो असं नाही म्हणू'.. विसरलीस की काय?

स्वातीचं 'ऐका दाजिबा' खूपच आवडलं.

Pages