नाटकातलं खाणं

Submitted by दिनेश. on 8 June, 2011 - 10:14

आज मी मोकळा आहे जरा. त्यामूळे निव्वळ टाईमपास म्हणून हे लिहितोय. यात (नेहमीप्रमाणेच) काहि फार महत्वाचे नाही. त्यामुळे दिवे, कंदील, काजवा किंवा थेट सूर्यप्रकाश घेऊनच वाचा.

माझ्या लहानपणी, काही नाटके विंगेतून बघायची संधी मिळाली होती. त्यावेळी असे दिसायचे कि मराठी नाटकात जे खाण्यापिण्याचे, सॉरी जास्त करुन खाण्याचेच, (आणि पिणे असेल तर तो चहाच ) जे प्रसंग असत, त्यात क्वचितच ते पदार्थ असत. आपले थोर नाट्यकलाकार निव्वळ अभिनयातून तो पदार्थ साकार करत असत. अपेय पिण्याच्या बाबतीत काही थोर कलाकार मात्र अभिनयात जिवंतपणा यावा म्हणून, अस्सल पेयाचाच आग्रह धरत असत.. पण तो काही माझा प्रांत नाही.

तर अश्याच काही आठवणी..

१) वाहतो हि दुर्वांची जुडी

आशा काळे आणि बाळ कोल्हटकर यांचे हे नाटक. या नाटकात टिपिकल ताई भाऊ ष्टोरी आहे. आशा काळे वर ताईचा शिक्का बसला तो याच नाटकाने. पुढे हे नाटक, जान्हवी पणशीकरने पण केले. या नाटकात रव्याच्या लाडवाची भुमिका आहे. भावाने डब्यात लाडूच आणलेत कि दुसरे काही, असा संशय घेतला जातो. त्यावेळी त्या लाडवाचा डबा उघडला जातो आणि लाडू स्टेजवर सांडतात. अगदी लहानपणी हे नाटक बघताना, मला या प्रसंगात रडूच आले होते. मग कळले कि स्टेजवर पडून देखील, लाडू फुटू नयेत म्हणून ते अगदी कडक बनवलेले असत.

२) देव दिनाघरी धावला

हेही आशा काळे आणि बाळ कोल्हटकर यांचेच नाटक. या नाटकात सुदाम्याचे पोहे आहेत. सुदामा कृष्णाकडे पुरचुंडीत बांधून पोहे घेऊन येतो. त्यावेळी कृष्ण हरखून ते पोहे तोंडात टाकतो. तो दुसरी मूठ तोंडात घालणार, त्यावेळी रुक्मीणी त्याचा हात धरते आणि म्हणते, मी तूमची धर्मपत्नी, दुसरा घास माझा. आणि तिही ते पोहे खाते. या प्रसंगात प्रकाशयोजना इतकी अनोखी असे, कि ते पोहे अगदी सुंदर दिसत. ते पोहे पांढरेशुभ्र असे बघून आणले जात, प्रत्येक प्रयोगाला.

३) बॅरिष्टर

विक्रम गोखले, सुहास जोशी, प्रदीप वेलणकर, चंद्रकांत गोखले आणि विजया मेहता अशी जबरदस्त कलाकार मंडळी. दळवींच्या अंधाराच्या पारंब्या या कादंबरीवर आधारीत हे नाटक. यात बाई विकेशा मावशीची भुमिका करत. विधवा झाल्यावर मावशीच्या खाण्यापिण्यावर अनेक बंधने आलेली असतात. पण पुढे राऊच्या सुधारीक मतांना अनुसरुन, त्याही बंधने झुगारुन देतात. त्यात एका प्रसंगात त्या लिंबाचे लोणचे खायचा अभिनय करत. अनेक वर्षांनी खाल्लेली ती फोड, आणि त्यांने होणारा आनंद. त्या असा काही व्यक्त करत. कि आपल्याला ते लोणचे खायची इच्छा व्हावी.

४) संध्याछाया

परत बाई आणि माधव वाटवे यांचे नाटक. म्हातारपणाला कंटाळलेल्या जोडप्यांची हि कथा. यात शेवटी दोघे चहातून झोपेच्या गोळ्या घेतात. त्या प्रसंगात बाई चहात चमचा ढवळण्याचा अभिनय इतका अस्सल करत कि ज्याचे नाव ते. शिवाय तो चहा पिताना, कानावर ठेवलेला हात, म्हातार्‍या नानीचाच वाटत असे.
मी ज्यावेळी हा प्रयोग बघितला, त्यावेळी त्या मध्यमवयीनच होत्या.

५) सावल्या

प्रेमा साखरदांडे, शिल्पा नवलकर, आदिती मुळगुंद यांचे हे नाटक. आजी आणि तिच्या तीन नाती यांची हि कथा. घरात तशी खायची मारामारच असते. अनेकदा नात, आजीला विचारतात, कि आज जेवायला काय आहे तर, काहीच नाही असे उत्तर मिळते. पण एका प्रसंगात, शिल्पा दहीभात आणि लोणचे खाते. त्यात दहिभात कालवण्याचा, लोणचे तोंडी लावण्याचा अभिनय. आजही विसरता येत नाही.

६) नातीगोती

दिलिप प्रभावळकर, अतुल पुरचुरे आणि स्वाती चिटणीस. मतिमंद मुलाची समस्या. यात अंगाने अगडबंब वाढलेला मुलगा, खाण्यासाठी वखवखलेला असतो. एका प्रसंगात केक आणि एका प्रसंगात मटण यावर तो अधाश्यासारखा हल्ला करतो. त्यावेळी हतबल वडील शेवटचा घास तरी मिळावा, यासाठी झटापट करतात. प्रभावळकर आणि अतुल.. आजही अंगावर काटा येतो. हे अतूलचे पहिले पहिले नाटक. त्याचा अभिनय इतका अस्सल होता, कि खरेच तो मतिमंद आहे का अशी शंका यायची.

७) ध्यानीमनी

हू इज अफ्रेड ऑफ व्हर्जिनिया वूल्फ चा हा मराठी अवतार. नीना कुलकर्णी, शिवाजी साटम आणि महेश मांजरेकर. यात नीनाने उभी केलेली गृहिणी आणि तिचा वावर, हा एक वस्तुपाठ होता. यात ती पोहे करते. अगदी व्यवस्थित परतून, त्यावर खोबरे कोथिंबीर घालून, ती ते करते. यातही तिचा अभिनय एवढा अस्सल असायचा, कि त्या पोह्यांचा खमंग वास आल्याचा भास व्हायचा.

८) गुंतता हृदय हे

आशालता, आशा काळे, मालती पेंढारकर, राजा मयेकर... आणि डाँ काशिनाथ घाणेकर.. जबरदस्त कथानक. उत्तम सादरीकरण आणि दर्जेदार अभिनय. यात महानंदा उर्फ मानूला डोहाळे लागतात, त्यावेळी तिला रावसाकडची भजी खावीशी वाटतात. ती ओच्यात लपवून भजी आणते, कल्याणी तिला अडवते आणि भजी खेचून घेते. आजही त्या प्रसंगातला दोघींचा अभिनय, विसरता येत नाही.

९) श्यामची आई

या नावाचे नाटकही आले होते. सुमती गुप्ते त्यात आईची भुमिका करत. कथानक तसेच होते. यात श्यामच्या खोकल्यासाठी आईने कांदेपाक केलेला असतो असा उल्लेख आहे. श्याम तो सारखा मागत असतो.
हा पदार्थ आईने कधी ऐकला नव्हता. मी बरेच दिवस तिच्यामागे भुणभुण लावली होती. पण तिला ती रेसिपी कधी मिळालीच नाही.

१०) सखाराम बाईंडर

या नाटकात चंपा (लालन सारंग) जेवताना सखाराम ( सयाजी शिंदे ) बाहेरून तिला काहीतरी लागट बोलतो. त्यावेळी ती रागाने ताट उधळून लावते. पण लगेच तिला कळते आपण अन्नाचा अपमान केला. अन्नाची किंमत तिला पुरेपूर माहीत असते. ती ते पदार्थ गोळा करते. अन्नाला नमस्कार करते. यात लालनच्या अभिनयाची तर कमाल होतीच, पण ती साकारत असलेली चंपा, पण अधिक गहीरी होत असे.
यातला तिचा चहा पिण्याचा प्रसंग आणि दाऊदला चहा पाजून, गोड झालाय का ? असे विचारणे, पण खास "चंपा" चेच होते.

११) कांचनमृग

या नाटकात रोहीणी हत्तंगडी नायिकेची भुमिका करत असत. त्यात त्यांचे दारु पिण्याचे बरेच प्रसंग असत.
त्या बाटलीतून पाणीच पित असत, पण पुढे त्यांनी लिहिले होते कि असे प्रयोग करता करता, त्यांना जलोदर व्हायचा धोका निर्माण झाला होता.

१२) नकळत सारे घडले

विक्रम गोखले आणि स्वाती चिटणीस यांचे हे अलिकडचे नाटक. यात स्वाती डब्यात भरुन सुरनोळी हा कारवारी पदार्थ आणते. विक्रम गोखले तो पदार्थ खातो, पण तो कोकणातला असल्याचा शेराही मारतो.
मूळात यावेळी डब्यात जो पदार्थ असे आणि विक्रम जो खाण्याचा अभिनय करे, तो माझ्या माहितीतल्या सुरनोळीला अजिबात साजेसा नव्हता.

१३ ) अधांतर

या नाटकात बाबांच्या श्राद्धाचा प्रसंग आहे. त्यात टिपीकल मालवणी जेवणाचा म्हणजे खीर, वडे, काळ्या वाटाण्याची ऊसळ असा बेत असतो. नाटकात हे पदार्थ प्रत्यक्ष दिसत नाहीत. पण या प्रंसंगातला ज्योति सुभाष, सविता मालपेकर आणि लिना भागवत यांचा अभिनय, हे पदार्थ कसे मस्त झालेत, हे नक्कीच दाखवून देत असे.

आधीच लिहिल्याप्रमाणे सहज लिहिलेले आहे हे. माझे लक्ष पहिल्यापासून खाण्याकडेच होते कि काय ते नकळे ? पण हेही तेवढेच खरे कि या थोर कलाकारांच्या अभिनयामूळे माझ्या मनात हे प्रसंग कायमचे ठसले गेले.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

<<
आज मी मोकळा आहे जरा. त्यामूळे निव्वळ टाईमपास म्हणून हे लिहितोय. यात (नेहमीप्रमाणेच) काहि फार महत्वाचे नाही. त्यामुळे दिवे, कंदील, काजवा किंवा थेट सूर्यप्रकाश घेऊनच वाचा.
>>

वाह दिनेशदा डिस्क्लेमर गटात स्वागत Happy Proud आता वाचतो Wink

--> दुर्दैवानं नाटकं इतकी बघितली नाहियेत त्यामुळे तेव्हढा फील आला नाही. Sad पण टीपलंय भारीच. Wink

दिनेशदा .. खाण्यावर भारीच लक्ष! Wink

रव्याचे टण़ लाडू.. पडल्यावर गडगडत पुढे पडले असते तर? (भो. प्र.)

छानच निरिक्षण दिनेशदा...
लहानपणी पिक्चर बघताना समजा समोर चहा, खाण्याचं असं काही ठेवलेला प्रसंग असला की माझे पण हात आपोआप माझ्यासमोर काही आहे हे चाचपडत Proud

तुम्ही सांगितलेली ही नाटकं आता त्या त्या प्रसंगासाठी तरी बघावी असं वाटतंय.

कुठल्याश्या सिनेमात एक बाई कांदाभजी आणते म्हणून मी लग्गेच संध्याकाळी कां.भ. करून खाल्ली होती!

नाटक-सिनेमात समोर दिसतं तरी.....मी तर इथे ऋजुता दिवेकर ची माहिती वाचून (आणि गुंडाळून ठेवून Proud ) त्या आठवड्यात २ वेळा साजूक तुपातला शिरा रात्री खायला केला होता!

नातीगोतीतला तुम्ही वर्णन केलेला प्रसंग आठवतोय. वाहतो हि दुर्वांची जुडी, देव दिनाघरी धावला ही नाटकं फारचं लहान असताना पाहिली त्यामुळे काही आठवत नाही. पण या निमित्ताने कणकवलीला असताना आम्ही जे लागलेलं असेल ते नाटक पहायचो त्याची आठवण झाली. एकही नाटक चुकवायचो म्हणून नाही.

५ व ११ सोडून हीं सर्व नाटकं मी पण पाहिलीत. पण हे नाही लक्षात आलं किंवा लक्षात राहिलं ! तुम्हाला या विषयात अभ्यासू दृष्टी व रस असल्याने छान टीपलंय व मांडलंय !
[ मालवणीत एक म्हण आहे- " कोणाक कित्याचां, रामाक सीतेचां !"; कोणाला कसल्या कसल्या विवंचना असतात, कशा कशात रस असतो, पण रामाला मात्र एका सीतेचाच ध्यास !. Wink ]

<<माझे लक्ष पहिल्यापासून खाण्याकडेच होते कि काय ते नकळे ?>> बहुतेक , त्याशिवाय का या गोष्टी इतक्या बारकाईने बघितल्या , लक्षात ठेवल्या अन आमच्यासमोर मांडल्यात Happy अगदी नेहमीच्या ताज्या ताज्या रेसीपी प्रमाणे Happy

मस्तच दिनेशदा Happy

माझे लक्ष पहिल्यापासून खाण्याकडेच होते कि काय ते नकळे << तुम्ही काय काय कराल खाण्यासाठी भरोसा नाही Lol तुम्ही ही Light 1 घ्या Happy

मस्त..मजा आली वाचायला..

माझे लक्ष पहिल्यापासून खाण्याकडेच होते कि काय ते नकळे ?>>>>>> मला लेख वाचायला सुरुवात केली त्यावेळी अगदी हाच विचार मनात आला... Happy दिनेशदा म्हणजे झाडं आणि पाकृ असं समीकरणच बनलय Happy

७) ध्यानीमनी

हू इज अफ्रेड ऑफ व्हर्जिनिया वूल्फ चा हा मराठी अवतार. नीना कुलकर्णी, शिवाजी साटम आणि महेश मांजरेकर. यात नीनाने उभी केलेली गृहिणी आणि तिचा वावर, हा एक वस्तुपाठ होता. यात ती पोहे करते. अगदी व्यवस्थित परतून, त्यावर खोबरे कोथिंबीर घालून, ती ते करते. यातही तिचा अभिनय एवढा अस्सल असायचा, कि त्या पोह्यांचा खमंग वास आल्याचा भास व्हायचा.

मला नाटक आठवत नाही पण नीना कुलकर्णी जेव्हा खराखुरा रवा स्टेजवर शिरा करायला भाजायला घेत, मस्त खरपुस वास दरवळे.

एकदम वेगळाच अँगल, मस्त!!!
असं माझं जेम्स हॅडली चेस किंवा बाबा कदमांच्या रहस्यकथा वाचताना होतं, काय वर्णनं असतात खाण्याची!
वाह दिनेशदा डिस्क्लेमर गटात स्वागत>>> Proud

छान निरीक्षण..! आवड्या..! Happy

काही काही नाटकांत चहा पिण्याच्या प्रसंगात कलाकार चहा दोन घोटांत संपवतात. तेव्हा आपली खात्री पटते, कपात चहा नव्हताच.

दिनेश मस्त लेख.... नाटकातल्या प्रसंगात खाण्याचा अभिनय ही तशी अगदी जमेत धरण्यासाठी फार क्षुल्लक बाब. पण तुम्ही या लेखाद्वारे सर्वांचे लक्ष वेधलेत... मला खात्री आहे की मायबोलीकर पुढे कोणत्याही नाटकाला गेले तर त्यातले 'खाण्याचे' प्रसंग मन लावून पाहतील, ते ही तुमची आठवण काढत. Happy

नाटकातले खाण्याचे प्रसंग मी फार गंभीरपणे पाहिले नाहियेत आजतागायत, आता पाहिन. पण चित्रपटातले सुद्धा काही प्रसंग भूक चाळवून जातात.. Happy

दोन मला ठळक आठवतात, आम्ही जातो आमुच्या गावा मध्ये कोणत्या तरी प्रसंगात उमा भेंडे मोकळ्या भातावर पितळेच्या पातेल्यातून गोल डावाने आमटी वाढते आणि धुमाळ मस्त जेवतात... तो सिनेमा मी अक्षरश: इयत्ता ४थी फारतर ५वीत पाहिला असेल, पण तो प्रसंग मला आठवला तरी पोटात भूकेची जाणिव होते..
दुसरा प्रसंग म्हणजे पुर्वी टिव्हीवर पुणेरी पूणेकर नावाची सिरियल लागायची त्यातल्या एका भागात सुधीर जोशींची खानावळ असते आणि त्यातल्या गमतीजमती दाखवल्या आहेत. त्यात दाखवलेलं साधं मराठमोळं ताट, त्यातला कांदा, भाकरी, पिठलं आणि मिरची.. मला भयंकर बेचैन करून जात. एकदा तर रात्री उशिरा केव्हातरी तो एपिसोड पुन:प्रक्षेपित झाला होता तेव्हा मी त्या सगळ्या पदार्थांची भूक रात्री १२ वाजता फ्लॉवरची भाजी आणि भातावर भागवली होती.. Lol

अरे वा, सगळ्यांना आवडलं कि.
एक आवर्जून लिहावेसे वाटले, मराठी चित्रपटात बहुदा मराठमोळेच पदार्थ दिसतात. जून्या मराठी चित्रपटातील कलाकार चुलीजवळ भाकर्‍या भाजताना दिसायच्या, त्यावेळी त्या खरेच निपुण आहेत असे वाटायच्या.
सांगत्ये ऐका मधे सुलोचना चहा कसा गाळतात आणि केला इशारा जाता जाता मधे, लिला गांधी माडगं थाळ्यात कसे ओततात किंवा बर्ची बहाद्दर, बुक्कीने कांदा कसा फोडतात, ते अगदी बघण्यासारखे आहे.

ललित लेखनाचा हा एक वेगळाच आविष्कार. लेखक नाट्यरसिक तर आहेतच यात शंका नाही, पण ज्या "बल्लवी" नजरेने त्यानी स्टेजवरील घडामोडी टिपल्या आणि स्मरणात ठेवल्या त्या साठी खास 'पु.ल.' स्टाईल दाद द्यावी लागेल....म्हणजे लागलीच पु.लं.च्या 'माझे खाद्यजीवन' या लेखाची आठवण झाली (नव्हे 'हसवणूक' कपाटातून काढून तो लेख वाचलाही.)

परवाच येथील एका धाग्यावर 'नवरंग' चित्रपटातील 'आ दिलसे दिल मिला ले...' या आशाताईंच्या गाण्यावर चर्चा चालू होती. त्या निमित्ताने त्या चित्रपटाची डीव्हीडीही पाहण्याचा योग आला. तर यातीलच 'श्यामल श्यामल बरन, कोमल कोमल चरण..." ह्या गाण्याच्यावेळी 'मोहिनी' कवीराजासाठी स्वयंपाक करीत असल्याचा प्रसंग आहे. याचे गाणे आणि तिची चुलीजवळची लगबग, दोन्ही पाहण्यासारखे आहे. शेवटी गाणे संपल्यावर मोहिनी त्याच्यासाठी जे ताट भरून आणते आणि त्याला जेवणासाठी आमंत्रित करते त्यावेळी ताटातील डझनावारी आणि चमचमीत पदार्थ पाहून पाहणार्‍याचे पोट भरते.

प्रतिक अनुमोदन... मला पण पु.लं. चा तो लेख प्रचंड आवडतो. Happy
त्यात अंबाडीच्या भाजीला दिलेली फोडणी, कोशिंबिर, शेंगदाण्याचे कुट, सुरंगी का सारंगीचा Uhoh तुकडा (मी खात नाही तरिही) नेहमी तोंडाला पाणी सोडून जातो...

प्रतीक, एवढी तयार नजर नाही माझी !

कधी कधी आवश्यक ते कौशल्य नसेल, तर एरवी समर्थ असलेली अभिनेत्री कशी हतबल होते त्याची उदाहरणे : ज्योति कलश झलके मधे मीनाकुमारीला रांगोळी घालताना बघा, सखाराम बाईंडर च्या सीडी मधे सोनाली कुलकर्णी (सिनियर) ला भाकरी थापताना बघा. तिलाच गाभ्रीचा पाऊस मधे, पुरणपोळी लाटताना बघा. (ज्या प्रमाणात ती डाळ आणते त्या मानाने भिजवलेली कणीक बघा. )

कधी कधी दिग्दर्शक सुद्धा या क्षेत्रात अनुभवी नसेल तर काय होते ते जोधा अकबर मधल्या जेवणाच्या प्रसंगात बघा, जोधा (ऐश्वर्या ) जो मेनू सांगते तो ताटातला मेनू आहे. पण आधीच्या जेवणाच्या तयारीत त्याला लागणारे पदार्थ दिसत नाहीत. घीवर साठी लागणारी खास कढई पण दिसत नाही. त्या काळाशी मेळ न खाणार्‍या कॉलीफ्लॉवर सारख्या भाज्या मात्र ढीगाने दिसतात.

कोण्या अभिनेत्रीच्या मुलाखतीत ऐकले होते की चहाचा देताना रिकामा कप दिला तर तो आणताना बशीत डगमगतो, म्हणून त्यात निदान पाणी तरी भरायचे.

जयश्री गडकर तमासगिरनीच्या भूमिकेत सूर्यकांत साठी चहा करतात तो स्वतःच्या पदराने गाळतात (मल्हारी मार्तंड का?) असे मला आठवतेय.

जून्या मराठी चित्रपटातील कलाकार चुलीजवळ भाकर्‍या भाजताना दिसायच्या <<< दिनेश, संत तुकाराम चित्रपटातील नायिका कोण? तिचा चुलीवर भाकर्‍या भाजतानाचा अभिनय माझ्या कायम लक्षात राहिलाय. काय जबरदस्त बारकावे दाखवलेत बाईंनी. अगदी हात ओल्या पिठाने माखल्यामुळे चिमटीने डोक्यावरचा पदर सावरणे देखील. ती गरमगरम भाकर्‍या भाजून मुलांना खाऊ घालते ते पुन्हा बघाच. खरेतर त्या चित्रपटातील सगळ्यांचाच अभिनय अगदी जिवंत आहे. बालकलाकार देखील तोंडात बोट घालायला लावतात.

(नाहीतर आजचे अभिनय आणि वेशभूषा - अगदी बेडरुमातून जागे होऊन बाहेर येऊ द्या, नाहीतर स्वयंपाक घरात राबून येऊ द्या; नाहीतर चक्क आग लागल्याच्या प्रसंगातून धावत पळत बाहेर येऊ द्या. चेहर्‍यावर एखादा घामाचा टिपूस नाही की एक केस इकडचा तिकडे नाही.)

खुप खुप मस्त लेख, आसे ललित कधिच वाचले नव्हते. त्यातुन तुमचे नाट्यप्रेमही कळते, आणी पाककला प्रेमही कळते.
एक वेगळाच दृष्टीकोन!

Pages