आज मी मोकळा आहे जरा. त्यामूळे निव्वळ टाईमपास म्हणून हे लिहितोय. यात (नेहमीप्रमाणेच) काहि फार महत्वाचे नाही. त्यामुळे दिवे, कंदील, काजवा किंवा थेट सूर्यप्रकाश घेऊनच वाचा.
माझ्या लहानपणी, काही नाटके विंगेतून बघायची संधी मिळाली होती. त्यावेळी असे दिसायचे कि मराठी नाटकात जे खाण्यापिण्याचे, सॉरी जास्त करुन खाण्याचेच, (आणि पिणे असेल तर तो चहाच ) जे प्रसंग असत, त्यात क्वचितच ते पदार्थ असत. आपले थोर नाट्यकलाकार निव्वळ अभिनयातून तो पदार्थ साकार करत असत. अपेय पिण्याच्या बाबतीत काही थोर कलाकार मात्र अभिनयात जिवंतपणा यावा म्हणून, अस्सल पेयाचाच आग्रह धरत असत.. पण तो काही माझा प्रांत नाही.
तर अश्याच काही आठवणी..
१) वाहतो हि दुर्वांची जुडी
आशा काळे आणि बाळ कोल्हटकर यांचे हे नाटक. या नाटकात टिपिकल ताई भाऊ ष्टोरी आहे. आशा काळे वर ताईचा शिक्का बसला तो याच नाटकाने. पुढे हे नाटक, जान्हवी पणशीकरने पण केले. या नाटकात रव्याच्या लाडवाची भुमिका आहे. भावाने डब्यात लाडूच आणलेत कि दुसरे काही, असा संशय घेतला जातो. त्यावेळी त्या लाडवाचा डबा उघडला जातो आणि लाडू स्टेजवर सांडतात. अगदी लहानपणी हे नाटक बघताना, मला या प्रसंगात रडूच आले होते. मग कळले कि स्टेजवर पडून देखील, लाडू फुटू नयेत म्हणून ते अगदी कडक बनवलेले असत.
२) देव दिनाघरी धावला
हेही आशा काळे आणि बाळ कोल्हटकर यांचेच नाटक. या नाटकात सुदाम्याचे पोहे आहेत. सुदामा कृष्णाकडे पुरचुंडीत बांधून पोहे घेऊन येतो. त्यावेळी कृष्ण हरखून ते पोहे तोंडात टाकतो. तो दुसरी मूठ तोंडात घालणार, त्यावेळी रुक्मीणी त्याचा हात धरते आणि म्हणते, मी तूमची धर्मपत्नी, दुसरा घास माझा. आणि तिही ते पोहे खाते. या प्रसंगात प्रकाशयोजना इतकी अनोखी असे, कि ते पोहे अगदी सुंदर दिसत. ते पोहे पांढरेशुभ्र असे बघून आणले जात, प्रत्येक प्रयोगाला.
३) बॅरिष्टर
विक्रम गोखले, सुहास जोशी, प्रदीप वेलणकर, चंद्रकांत गोखले आणि विजया मेहता अशी जबरदस्त कलाकार मंडळी. दळवींच्या अंधाराच्या पारंब्या या कादंबरीवर आधारीत हे नाटक. यात बाई विकेशा मावशीची भुमिका करत. विधवा झाल्यावर मावशीच्या खाण्यापिण्यावर अनेक बंधने आलेली असतात. पण पुढे राऊच्या सुधारीक मतांना अनुसरुन, त्याही बंधने झुगारुन देतात. त्यात एका प्रसंगात त्या लिंबाचे लोणचे खायचा अभिनय करत. अनेक वर्षांनी खाल्लेली ती फोड, आणि त्यांने होणारा आनंद. त्या असा काही व्यक्त करत. कि आपल्याला ते लोणचे खायची इच्छा व्हावी.
४) संध्याछाया
परत बाई आणि माधव वाटवे यांचे नाटक. म्हातारपणाला कंटाळलेल्या जोडप्यांची हि कथा. यात शेवटी दोघे चहातून झोपेच्या गोळ्या घेतात. त्या प्रसंगात बाई चहात चमचा ढवळण्याचा अभिनय इतका अस्सल करत कि ज्याचे नाव ते. शिवाय तो चहा पिताना, कानावर ठेवलेला हात, म्हातार्या नानीचाच वाटत असे.
मी ज्यावेळी हा प्रयोग बघितला, त्यावेळी त्या मध्यमवयीनच होत्या.
५) सावल्या
प्रेमा साखरदांडे, शिल्पा नवलकर, आदिती मुळगुंद यांचे हे नाटक. आजी आणि तिच्या तीन नाती यांची हि कथा. घरात तशी खायची मारामारच असते. अनेकदा नात, आजीला विचारतात, कि आज जेवायला काय आहे तर, काहीच नाही असे उत्तर मिळते. पण एका प्रसंगात, शिल्पा दहीभात आणि लोणचे खाते. त्यात दहिभात कालवण्याचा, लोणचे तोंडी लावण्याचा अभिनय. आजही विसरता येत नाही.
६) नातीगोती
दिलिप प्रभावळकर, अतुल पुरचुरे आणि स्वाती चिटणीस. मतिमंद मुलाची समस्या. यात अंगाने अगडबंब वाढलेला मुलगा, खाण्यासाठी वखवखलेला असतो. एका प्रसंगात केक आणि एका प्रसंगात मटण यावर तो अधाश्यासारखा हल्ला करतो. त्यावेळी हतबल वडील शेवटचा घास तरी मिळावा, यासाठी झटापट करतात. प्रभावळकर आणि अतुल.. आजही अंगावर काटा येतो. हे अतूलचे पहिले पहिले नाटक. त्याचा अभिनय इतका अस्सल होता, कि खरेच तो मतिमंद आहे का अशी शंका यायची.
७) ध्यानीमनी
हू इज अफ्रेड ऑफ व्हर्जिनिया वूल्फ चा हा मराठी अवतार. नीना कुलकर्णी, शिवाजी साटम आणि महेश मांजरेकर. यात नीनाने उभी केलेली गृहिणी आणि तिचा वावर, हा एक वस्तुपाठ होता. यात ती पोहे करते. अगदी व्यवस्थित परतून, त्यावर खोबरे कोथिंबीर घालून, ती ते करते. यातही तिचा अभिनय एवढा अस्सल असायचा, कि त्या पोह्यांचा खमंग वास आल्याचा भास व्हायचा.
८) गुंतता हृदय हे
आशालता, आशा काळे, मालती पेंढारकर, राजा मयेकर... आणि डाँ काशिनाथ घाणेकर.. जबरदस्त कथानक. उत्तम सादरीकरण आणि दर्जेदार अभिनय. यात महानंदा उर्फ मानूला डोहाळे लागतात, त्यावेळी तिला रावसाकडची भजी खावीशी वाटतात. ती ओच्यात लपवून भजी आणते, कल्याणी तिला अडवते आणि भजी खेचून घेते. आजही त्या प्रसंगातला दोघींचा अभिनय, विसरता येत नाही.
९) श्यामची आई
या नावाचे नाटकही आले होते. सुमती गुप्ते त्यात आईची भुमिका करत. कथानक तसेच होते. यात श्यामच्या खोकल्यासाठी आईने कांदेपाक केलेला असतो असा उल्लेख आहे. श्याम तो सारखा मागत असतो.
हा पदार्थ आईने कधी ऐकला नव्हता. मी बरेच दिवस तिच्यामागे भुणभुण लावली होती. पण तिला ती रेसिपी कधी मिळालीच नाही.
१०) सखाराम बाईंडर
या नाटकात चंपा (लालन सारंग) जेवताना सखाराम ( सयाजी शिंदे ) बाहेरून तिला काहीतरी लागट बोलतो. त्यावेळी ती रागाने ताट उधळून लावते. पण लगेच तिला कळते आपण अन्नाचा अपमान केला. अन्नाची किंमत तिला पुरेपूर माहीत असते. ती ते पदार्थ गोळा करते. अन्नाला नमस्कार करते. यात लालनच्या अभिनयाची तर कमाल होतीच, पण ती साकारत असलेली चंपा, पण अधिक गहीरी होत असे.
यातला तिचा चहा पिण्याचा प्रसंग आणि दाऊदला चहा पाजून, गोड झालाय का ? असे विचारणे, पण खास "चंपा" चेच होते.
११) कांचनमृग
या नाटकात रोहीणी हत्तंगडी नायिकेची भुमिका करत असत. त्यात त्यांचे दारु पिण्याचे बरेच प्रसंग असत.
त्या बाटलीतून पाणीच पित असत, पण पुढे त्यांनी लिहिले होते कि असे प्रयोग करता करता, त्यांना जलोदर व्हायचा धोका निर्माण झाला होता.
१२) नकळत सारे घडले
विक्रम गोखले आणि स्वाती चिटणीस यांचे हे अलिकडचे नाटक. यात स्वाती डब्यात भरुन सुरनोळी हा कारवारी पदार्थ आणते. विक्रम गोखले तो पदार्थ खातो, पण तो कोकणातला असल्याचा शेराही मारतो.
मूळात यावेळी डब्यात जो पदार्थ असे आणि विक्रम जो खाण्याचा अभिनय करे, तो माझ्या माहितीतल्या सुरनोळीला अजिबात साजेसा नव्हता.
१३ ) अधांतर
या नाटकात बाबांच्या श्राद्धाचा प्रसंग आहे. त्यात टिपीकल मालवणी जेवणाचा म्हणजे खीर, वडे, काळ्या वाटाण्याची ऊसळ असा बेत असतो. नाटकात हे पदार्थ प्रत्यक्ष दिसत नाहीत. पण या प्रंसंगातला ज्योति सुभाष, सविता मालपेकर आणि लिना भागवत यांचा अभिनय, हे पदार्थ कसे मस्त झालेत, हे नक्कीच दाखवून देत असे.
आधीच लिहिल्याप्रमाणे सहज लिहिलेले आहे हे. माझे लक्ष पहिल्यापासून खाण्याकडेच होते कि काय ते नकळे ? पण हेही तेवढेच खरे कि या थोर कलाकारांच्या अभिनयामूळे माझ्या मनात हे प्रसंग कायमचे ठसले गेले.
हिंदि सिनेमातल्या नायकांना
हिंदि सिनेमातल्या नायकांना जसे सर्वकाहि येते तसेच तुमचे आहे . कुठलाहि विषय व्यर्ज नाहि. हॅटस ऑफ टु यु.
तूम्हाला सगळ्यांना आवडले हे ?
तूम्हाला सगळ्यांना आवडले हे ? मला तर लिहिताना जरा अपराधीच वाटत होतं !
मीनाकुमारीच्या, दूष्मन मधे पण असा कुरमूर्याचा प्रसंग आहे ( तो बघून मी कुरमुरे खाणेच सोडले होते.) घरात खायला काही नाही, म्हणून मीनाकुमारी मूलांना फक्त कुरमुरे देते. आणि या कुरमुर्याशी, हृदयनाथ आणि आशा भोसले यांचा बालपणीचा किस्सा पण आठवला. आशा केवळ कुरमूरे आणि पाणी, यावर समाधानी असे. शिवाय तिची तब्येतही दणकट असे.
मदर इंडीया मधले, कन्हैयालाल सावकाराकडे जाऊन नर्गिसचे चणे मागणे किंवा, चिखलात मिळालेला एक कंद उकडून मूलांना खायला देणे. हे पण फार परिणामकारक प्रसंग होते.
मला माहित आहे, हे सगळे त्या कलाकारांच्या अभिनयाचा भाग होते. अगदी त्या प्रसंगाच्या चित्रीकरणाच्यावेळी पण ते कलाकार उपाशी नसतील. पण मॅन व्हर्सेस वाइल्ड एरवी आवडत असला, तरी त्यातले खरेखुरे खाण्याचे प्रसंग मी बघायचे टाळतोच.
वरच्या एका पोस्टमधे लिहायचे राहिलेच. करंजीला मुरड घालणे, हे तसे कौशल्याचेच काम आहे. सगळ्यांना जमत नाही. पण हम आपके है कौन, मधल्या पहिल्याच प्रसंगात, रेणुका शहाणे अशी मुरड घालताना दाखवलेली आहे.
खूपच छान दिनेशदा आज नेमका
खूपच छान दिनेशदा आज नेमका मला वेळ नाहिये उद्या निवांत वाचेन . वरवर वाचला तरीही तुमचा लेख असल्याने छान वाटतोय नेहमीप्रमाणेच
"...हे सगळे त्या कलाकारांच्या
"...हे सगळे त्या कलाकारांच्या अभिनयाचा भाग होते. ..."
~ मान्यच. पण असे असले तरी जातिवंत आणि कसदार अभिनयासाठी सुपरिचित असलेला कलाकार कथेच्या गाभ्याकडे आपल्या कौशल्याने प्रेक्षकाला कसे खेचून घेतो ते पाहणे वा अनुभवने हीदेखील एक चित्रपटाची कसोटीच मानावी लागेल. नर्गिसने ते चिखलात पडलेले दाणे टिपण्यासाठी केलेली यातायात ही अशाच जातकुळीतील. तिथे ती अभिनेत्री न राहता तीन मुलांच्या पोटात चार दाणे तरी जावेत म्हणून 'असे ना का ते दाणे त्या वैषयिक नजर ठेवणार्या सावकाराकडून आलेले...!' म्हणत अपत्याच्या रिकाम्या पोटाकडे पाहत तडफडणारी 'मदर इंडिया' साकारते.
पण असे हाताच्या बोटावर मोजू शकू इतकेच अभिनेते झाले असावेत. बलराज साहनी 'दो बिघा जमीन' मध्ये नट कधीच वाटले नाहीत....ते कलकत्यात हातरिक्षा चालविणारेच दिसले...'कोशिश' मधील संजीवकुमार, 'धारावी, आक्रोश' मधील ओम पुरी, तर 'मंडी' मधील नासिरूद्दीन खान असे काही निवडक अभिनेते त्या भूमिकेच्या अंतरंगात असे काही उतरत की, सहजोदगार निघावेत, "अरे... हा अभिनय नव्हेच नव्हे....". गिरिश कर्नाड यानीही 'निशांत' मधे अशाप्रकारचा हतबल शिक्षक साकारला होताच. अभिनेत्रीमध्ये तर शबाना आणि स्मिता पाटील ही दोन ठळक नावे सोडली तर कुणाचे नाव घ्यावे ?
हल्ली हल्ली राहुल बोस ही पोकळी काही प्रमाणात भरून काढत आहे असे म्हणावे लागेल.....अभिनेत्रीत तर आनंदच आहे.
मस्त लेख आणि प्रतिसाद
मस्त लेख आणि प्रतिसाद
मस्त लिहिलंय... जरा वेगळाच
मस्त लिहिलंय... जरा वेगळाच विषय
परींदा बघताना आमचा एक शेजारी
परींदा बघताना आमचा एक शेजारी म्हणालेला 'पहा!! पहा!! तुमची भटीण करून करून काय करणार, तर फोडणीच वरण..."
माधुरी ती आमटी त्या गाण्याचा ताल सांभाळत इतक्या नजाकतीने करते. वाह!!!
असाच नूतनचा सौदागर पहा. गुळ तयार करण्यातला तिचा सहजपणा लक्षात येतो
शुटींग पुर्वी ती त्या गावात जाऊन राहीली आणि तो गुळ बनवायला शिकली.
कोणी मै जिंदा हूं पाहीलाय...???
नसेल तर जरूर पहा
अनेक दिवसांचा उपाशी अमिताभ रस्त्यात पडलेल उष्ट सफरचंद खातो. त्या फळाकडे पहाण आणि खाण ... अप्रतिम
दुर्दैवाने अँग्री यंग मॅनचा हा प्रसंग लोक तेव्हा पचवू शकले नाहीत.
दिनेशदा, मी आताच हे ललित
दिनेशदा, मी आताच हे ललित वाचले. तुम्ही प्रत्येक गोष्ट किती वेग-वेगळ्या द्रुष्टिकोनतून बघता हो! "नातिगोती नाटकतील दिलीप प्रभावालाकारांचा तो सीन खरच अंगावर शहारे आणतो.
दिनेशदा, तुमचे खाण्यावरच लक्ष
दिनेशदा, तुमचे खाण्यावरच लक्ष असते, असे धरुन चालले तरीही इतके सगळे इतक्या बारकाईने तुम्हाला कसे काय आठवू शकते??? तुम्ही नेहमीच आम्हाला असे आश्चर्यचकित करण्यात आणि तुमच्याविषयीचा आदर अजूनच वाढवण्यात कसे यशस्वी हो?????
दिनेशदा, बाजारात सस्त्या
दिनेशदा,
बाजारात सस्त्या लावल्या असतील त्या भाज्या घ्याव्यात... एक नवरी रंगेल एवढी हळद.... जमल्यास पुडीचा कागद, पुडीचा दोरा पण घालावा... खाणार्याच्या गळ्याशी येईल एवढे सरसोचे तेल... कडोसरीची अधेली त्यात पडली...>>>>>> हा उल्लेख ' माझे खाद्यजीवन ' या लेखात नसुन पु. लं. च्या 'वंगचित्रे' या पुस्तकातील आहे. शांतिनिकेतन मधील खानावळीतील भाजीची पाककृती .
मस्त लेख.... आज कळले की आपण
मस्त लेख.... आज कळले की आपण इतक्या छान रेसिपी कश्या देता ते? तर आपणाला खाण्यापिण्याची जन्मजात च आवड आहे. पण नवल म्हणजे आपणाकडे कलाकाराची नजर व लेखनाचा हात ही आहे. फक्त १च खटकले की पिण्याचा (पाणी किंवा तत्सम) प्रांत आपला नाही ?.........
दिनेशदा, खरच मानल तुम्हाला.
दिनेशदा, खरच मानल तुम्हाला. या प्रांतात तुम्ही अगदी रमून जाता.
>>वरच्या एका पोस्टमधे लिहायचे राहिलेच. करंजीला मुरड घालणे, हे तसे कौशल्याचेच काम आहे. सगळ्यांना जमत नाही. पण हम आपके है कौन, मधल्या पहिल्याच प्रसंगात, रेणुका शहाणे अशी मुरड घालताना दाखवलेली आहे.
हा सिनेमा ६ वेळा थेटरात बसुन पाहिलाय. पण हे कस मिसल याचा विचार करतेय.
पण तुनळि वर चेक केल - बरोबर आहे तुमच म्हणण!!
म्हटलं नव्हतं दिनेशदा...
म्हटलं नव्हतं दिनेशदा... तुम्हाला आधी खाणं दिसतं?
नाटकं खूप बघितली नाहीयेत त्यामुळे... शिवाय तुमच्यासारखं आणि तुमच्या इतकं खाण्यात लक्षं नसल्यानंही हे सगळं नक्कीच मिसलय.
मस्तंच टिपलय तुम्ही...
मस्त लेख, एकदम वेगळा विषय
मस्त लेख, एकदम वेगळा विषय
बलराज साहनींची आठवण कोणीतरी
बलराज साहनींची आठवण कोणीतरी काढली. बलराजचे व्यक्तिमत्व असे होते की तो हातगाडीवालाही दिसू शकत असे अथवा बिझीनेस एक्झिक्युटीव्हही. हामाल , शेतकरी दिसे तसा लाला अथवा नेताही. शिक्शक अथवा प्रोफेसरही...मुल्ला शोभे तसा पंडितही. डाकू शोभे तसा कर्नलही...
डो. लागू , रिशी कपूर,हे हमाल ,हातगाडीवाला, दरोडेखोर, मजूर चुकून तरी वाटतील काय?
बलराज साहनी ची रूपे..
`बलराज साहन`' केवळ ग्रेट !
`बलराज साहन`' केवळ ग्रेट !
जुने अभिनेते ती भुमीका जगत
जुने अभिनेते ती भुमीका जगत त्याचमुळे त्यांची कामे वास्तव असत. अमुक केले म्हणजे माझी इमेज जाईल असला वाह्यातपणा नसे. अगदी मोठा हिरोही चुरगळलेले कपडे घालत असे.
लेख छानच. आपल्याला असले लेख लिहीण्याला भरपूर वेळ मिळो.
रविवारी कलिंगामधे अप्पम
रविवारी कलिंगामधे अप्पम खाल्ले. आता माबोवर अप्पम शोधताना अचानक हे सापडले.
मस्त लेख. नाटकांमधले सगळे प्रसंग अगदी डोळ्यासमोर उभे रहातात. प्रतिक्रियाही छान.
मस्त लेख आणि प्रतिसाद !
मस्त लेख आणि प्रतिसाद !
खूपच सुंदर लेख आणि
खूपच सुंदर लेख आणि प्रतिसाददेखील! काहीतरी दुसरंच शोधताना हा लेख सापडला. यातलं कुठलंच नाटक मी पाहिलेलं नाही. चित्रपट काही काही पाहिले आहेत पण या नजरेने पाहिले नव्हते. आता मात्र नक्की लक्ष देऊन पाहीन.
पुलंचं खाद्यजीवन मात्र कित्येक वेळा वाचलं आहे. वंगचित्रेमधलं ते मेसमधल्या भाजीचं वर्णनही लक्षात आहे. त्यात अजून एक राहिलं. " शेवग्याच्या शेंगा पातेल्यात राहणार नाहीत म्हणून ( बरं का भगिनींनो) त्या जराशा तुकडे करून घ्याव्यात. "
प्रज्ञा, ऋजुता दिवेकरच्या पुस्तकातली पदार्थांची नावं वाचून मलाही ते पदार्थ खावेसे वाटलेले आहेत.
माझं वाचायच सुटलं होतं हे..
माझं वाचायच सुटलं होतं हे..
धागा वर काढल्याबद्दल धन्यवाद वावे _/\_
अतिशय छान लेख !!!!
अतिशय छान लेख !!!!
प्रतिक्रियाही सुंदर....
Pages