आज मी मोकळा आहे जरा. त्यामूळे निव्वळ टाईमपास म्हणून हे लिहितोय. यात (नेहमीप्रमाणेच) काहि फार महत्वाचे नाही. त्यामुळे दिवे, कंदील, काजवा किंवा थेट सूर्यप्रकाश घेऊनच वाचा.
माझ्या लहानपणी, काही नाटके विंगेतून बघायची संधी मिळाली होती. त्यावेळी असे दिसायचे कि मराठी नाटकात जे खाण्यापिण्याचे, सॉरी जास्त करुन खाण्याचेच, (आणि पिणे असेल तर तो चहाच ) जे प्रसंग असत, त्यात क्वचितच ते पदार्थ असत. आपले थोर नाट्यकलाकार निव्वळ अभिनयातून तो पदार्थ साकार करत असत. अपेय पिण्याच्या बाबतीत काही थोर कलाकार मात्र अभिनयात जिवंतपणा यावा म्हणून, अस्सल पेयाचाच आग्रह धरत असत.. पण तो काही माझा प्रांत नाही.
तर अश्याच काही आठवणी..
१) वाहतो हि दुर्वांची जुडी
आशा काळे आणि बाळ कोल्हटकर यांचे हे नाटक. या नाटकात टिपिकल ताई भाऊ ष्टोरी आहे. आशा काळे वर ताईचा शिक्का बसला तो याच नाटकाने. पुढे हे नाटक, जान्हवी पणशीकरने पण केले. या नाटकात रव्याच्या लाडवाची भुमिका आहे. भावाने डब्यात लाडूच आणलेत कि दुसरे काही, असा संशय घेतला जातो. त्यावेळी त्या लाडवाचा डबा उघडला जातो आणि लाडू स्टेजवर सांडतात. अगदी लहानपणी हे नाटक बघताना, मला या प्रसंगात रडूच आले होते. मग कळले कि स्टेजवर पडून देखील, लाडू फुटू नयेत म्हणून ते अगदी कडक बनवलेले असत.
२) देव दिनाघरी धावला
हेही आशा काळे आणि बाळ कोल्हटकर यांचेच नाटक. या नाटकात सुदाम्याचे पोहे आहेत. सुदामा कृष्णाकडे पुरचुंडीत बांधून पोहे घेऊन येतो. त्यावेळी कृष्ण हरखून ते पोहे तोंडात टाकतो. तो दुसरी मूठ तोंडात घालणार, त्यावेळी रुक्मीणी त्याचा हात धरते आणि म्हणते, मी तूमची धर्मपत्नी, दुसरा घास माझा. आणि तिही ते पोहे खाते. या प्रसंगात प्रकाशयोजना इतकी अनोखी असे, कि ते पोहे अगदी सुंदर दिसत. ते पोहे पांढरेशुभ्र असे बघून आणले जात, प्रत्येक प्रयोगाला.
३) बॅरिष्टर
विक्रम गोखले, सुहास जोशी, प्रदीप वेलणकर, चंद्रकांत गोखले आणि विजया मेहता अशी जबरदस्त कलाकार मंडळी. दळवींच्या अंधाराच्या पारंब्या या कादंबरीवर आधारीत हे नाटक. यात बाई विकेशा मावशीची भुमिका करत. विधवा झाल्यावर मावशीच्या खाण्यापिण्यावर अनेक बंधने आलेली असतात. पण पुढे राऊच्या सुधारीक मतांना अनुसरुन, त्याही बंधने झुगारुन देतात. त्यात एका प्रसंगात त्या लिंबाचे लोणचे खायचा अभिनय करत. अनेक वर्षांनी खाल्लेली ती फोड, आणि त्यांने होणारा आनंद. त्या असा काही व्यक्त करत. कि आपल्याला ते लोणचे खायची इच्छा व्हावी.
४) संध्याछाया
परत बाई आणि माधव वाटवे यांचे नाटक. म्हातारपणाला कंटाळलेल्या जोडप्यांची हि कथा. यात शेवटी दोघे चहातून झोपेच्या गोळ्या घेतात. त्या प्रसंगात बाई चहात चमचा ढवळण्याचा अभिनय इतका अस्सल करत कि ज्याचे नाव ते. शिवाय तो चहा पिताना, कानावर ठेवलेला हात, म्हातार्या नानीचाच वाटत असे.
मी ज्यावेळी हा प्रयोग बघितला, त्यावेळी त्या मध्यमवयीनच होत्या.
५) सावल्या
प्रेमा साखरदांडे, शिल्पा नवलकर, आदिती मुळगुंद यांचे हे नाटक. आजी आणि तिच्या तीन नाती यांची हि कथा. घरात तशी खायची मारामारच असते. अनेकदा नात, आजीला विचारतात, कि आज जेवायला काय आहे तर, काहीच नाही असे उत्तर मिळते. पण एका प्रसंगात, शिल्पा दहीभात आणि लोणचे खाते. त्यात दहिभात कालवण्याचा, लोणचे तोंडी लावण्याचा अभिनय. आजही विसरता येत नाही.
६) नातीगोती
दिलिप प्रभावळकर, अतुल पुरचुरे आणि स्वाती चिटणीस. मतिमंद मुलाची समस्या. यात अंगाने अगडबंब वाढलेला मुलगा, खाण्यासाठी वखवखलेला असतो. एका प्रसंगात केक आणि एका प्रसंगात मटण यावर तो अधाश्यासारखा हल्ला करतो. त्यावेळी हतबल वडील शेवटचा घास तरी मिळावा, यासाठी झटापट करतात. प्रभावळकर आणि अतुल.. आजही अंगावर काटा येतो. हे अतूलचे पहिले पहिले नाटक. त्याचा अभिनय इतका अस्सल होता, कि खरेच तो मतिमंद आहे का अशी शंका यायची.
७) ध्यानीमनी
हू इज अफ्रेड ऑफ व्हर्जिनिया वूल्फ चा हा मराठी अवतार. नीना कुलकर्णी, शिवाजी साटम आणि महेश मांजरेकर. यात नीनाने उभी केलेली गृहिणी आणि तिचा वावर, हा एक वस्तुपाठ होता. यात ती पोहे करते. अगदी व्यवस्थित परतून, त्यावर खोबरे कोथिंबीर घालून, ती ते करते. यातही तिचा अभिनय एवढा अस्सल असायचा, कि त्या पोह्यांचा खमंग वास आल्याचा भास व्हायचा.
८) गुंतता हृदय हे
आशालता, आशा काळे, मालती पेंढारकर, राजा मयेकर... आणि डाँ काशिनाथ घाणेकर.. जबरदस्त कथानक. उत्तम सादरीकरण आणि दर्जेदार अभिनय. यात महानंदा उर्फ मानूला डोहाळे लागतात, त्यावेळी तिला रावसाकडची भजी खावीशी वाटतात. ती ओच्यात लपवून भजी आणते, कल्याणी तिला अडवते आणि भजी खेचून घेते. आजही त्या प्रसंगातला दोघींचा अभिनय, विसरता येत नाही.
९) श्यामची आई
या नावाचे नाटकही आले होते. सुमती गुप्ते त्यात आईची भुमिका करत. कथानक तसेच होते. यात श्यामच्या खोकल्यासाठी आईने कांदेपाक केलेला असतो असा उल्लेख आहे. श्याम तो सारखा मागत असतो.
हा पदार्थ आईने कधी ऐकला नव्हता. मी बरेच दिवस तिच्यामागे भुणभुण लावली होती. पण तिला ती रेसिपी कधी मिळालीच नाही.
१०) सखाराम बाईंडर
या नाटकात चंपा (लालन सारंग) जेवताना सखाराम ( सयाजी शिंदे ) बाहेरून तिला काहीतरी लागट बोलतो. त्यावेळी ती रागाने ताट उधळून लावते. पण लगेच तिला कळते आपण अन्नाचा अपमान केला. अन्नाची किंमत तिला पुरेपूर माहीत असते. ती ते पदार्थ गोळा करते. अन्नाला नमस्कार करते. यात लालनच्या अभिनयाची तर कमाल होतीच, पण ती साकारत असलेली चंपा, पण अधिक गहीरी होत असे.
यातला तिचा चहा पिण्याचा प्रसंग आणि दाऊदला चहा पाजून, गोड झालाय का ? असे विचारणे, पण खास "चंपा" चेच होते.
११) कांचनमृग
या नाटकात रोहीणी हत्तंगडी नायिकेची भुमिका करत असत. त्यात त्यांचे दारु पिण्याचे बरेच प्रसंग असत.
त्या बाटलीतून पाणीच पित असत, पण पुढे त्यांनी लिहिले होते कि असे प्रयोग करता करता, त्यांना जलोदर व्हायचा धोका निर्माण झाला होता.
१२) नकळत सारे घडले
विक्रम गोखले आणि स्वाती चिटणीस यांचे हे अलिकडचे नाटक. यात स्वाती डब्यात भरुन सुरनोळी हा कारवारी पदार्थ आणते. विक्रम गोखले तो पदार्थ खातो, पण तो कोकणातला असल्याचा शेराही मारतो.
मूळात यावेळी डब्यात जो पदार्थ असे आणि विक्रम जो खाण्याचा अभिनय करे, तो माझ्या माहितीतल्या सुरनोळीला अजिबात साजेसा नव्हता.
१३ ) अधांतर
या नाटकात बाबांच्या श्राद्धाचा प्रसंग आहे. त्यात टिपीकल मालवणी जेवणाचा म्हणजे खीर, वडे, काळ्या वाटाण्याची ऊसळ असा बेत असतो. नाटकात हे पदार्थ प्रत्यक्ष दिसत नाहीत. पण या प्रंसंगातला ज्योति सुभाष, सविता मालपेकर आणि लिना भागवत यांचा अभिनय, हे पदार्थ कसे मस्त झालेत, हे नक्कीच दाखवून देत असे.
आधीच लिहिल्याप्रमाणे सहज लिहिलेले आहे हे. माझे लक्ष पहिल्यापासून खाण्याकडेच होते कि काय ते नकळे ? पण हेही तेवढेच खरे कि या थोर कलाकारांच्या अभिनयामूळे माझ्या मनात हे प्रसंग कायमचे ठसले गेले.
दिनेशदा मस्तच ! सुरनोळी
दिनेशदा मस्तच ! सुरनोळी म्हणजे अप्पम सारखं अस्तं ना ?
>>कोण्या अभिनेत्रीच्या
>>कोण्या अभिनेत्रीच्या मुलाखतीत ऐकले होते की चहाचा देताना रिकामा कप दिला तर तो आणताना बशीत
>> डगमगतो, म्हणून त्यात निदान पाणी तरी भरायचे.
परफेक्ट!
* खाण्याबद्दल नाहीये, पण बॅगा उचलताना आपले नट कसे चुरमुर्याच्या पोत्यासारखं उचलतात.
@ गजानन.... व्वा ! "संत
@ गजानन....
व्वा ! "संत तुकाराम" ~ आम्हाला 'टीएफटी युनिट' अंतर्गत 'मराठी चित्रपट सुवर्णकाळ सप्ताह' मध्ये पाहायला मिळाला. तोपर्यंत वाचनात होते की विष्णुपंत पागनिस यानी तुकाराम अमर केलाय...असेलही, पण चित्रपट पाहाताना अखेरपर्यंत लक्षात राहिली ती आवलीच्या भूमिकेतील "गौरी"....!
गॉश्श....जातिवंत अभिनय म्हणजे काय याचे धडे जर कुणा नवख्या अभिनेत्रीला गिरवायचे असेल तर तिने या चित्रपटाची डीव्हीडी मिळवून गौरीचा अभिनय अभ्यासावा.
मुलांच्या अंगावरील दागिने आणि ते भरजरी कपडे ओरबाडून काढून सैनिकांना देताना संतापाने फुरफुरणारी आवली.....पाहातच राहावी....सलाम !
मस्त लेख दिनेशदा!
मस्त लेख दिनेशदा!
कुणाला, शबाना आणि नासिरचा
कुणाला, शबाना आणि नासिरचा "पार" आठवतोय ? त्यात तिचा रोटी खाण्याचा प्रसंग आहे. अनेक दिवसांच्या उपवासानंतर तिला ते अन्न मिळालेले असते, ती अगदी तूटून पडते, मग तिच्या लक्षात येते नवरा पण भुकेला आहे. त्याच्यासाठी ती काही भाग बाजूला ठेवते.. अभिनय तरी का म्हणायचे त्याला ?
मस्त लेख. आवारामधली
मस्त लेख. आवारामधली बटाट्याची भाजी आठवली.
ध्यानीमनीतला तो प्रसंग खरंच
ध्यानीमनीतला तो प्रसंग खरंच अंगावर येतो. अतुल परचुरेचा अभिनय अगदी लाजवाब!
'श्यामची आई' या पुस्तकात पण गुळातल्या कांद्यांविषयी लिहिलेले आहे. त्या पुस्तकात वाचूनच मी आईला ताकतई करायला लावली होती ते आठवले.
नाटकातल्या प्रसंगात खाण्याचा
नाटकातल्या प्रसंगात खाण्याचा अभिनय ही तशी अगदी जमेत धरण्यासाठी फार क्षुल्लक बाब. पण तुम्ही या लेखाद्वारे सर्वांचे लक्ष वेधलेत... मला खात्री आहे की मायबोलीकर पुढे कोणत्याही नाटकाला गेले तर त्यातले 'खाण्याचे' प्रसंग मन लावून पाहतील, ते ही तुमची आठवण काढत. >>>> अगदी अगदी. मला हेच वाटलं होतं लेख वाचुन. यापुढे नक्की नोट केलं जाणार आम्हा सगळयांकडुन आणि त्या प्रत्येक वेळी तुमची आठवण ही येइल.
दिनेशदा....काय लिहावे "पार"
दिनेशदा....काय लिहावे "पार" बद्दल ?
खरा भारत दिसतो त्यात.....कुणावरून जीव ओवाळून टाकावा त्या चित्रपटाबद्दल? दिग्दर्शक गौतम घोष....की मुख्य कलाकार नसिरूद्दीन शाह आणि शबाना आझमी वरून ? पुरात वाहून जाऊ नयेत म्हणून त्या डुक्कराना सावरण्याचा शबानाचा तो अभिनय....गॉड...पारितोषिकांची माळा वाहाव्यात तिच्यावर केवळ त्या एका दृष्यासाठी.
....आणि शेवट....येणार्या बाळाचा हुंकार ऐकण्यासाठी नसीरचे तिच्या गर्भार पोटाला कान लावणे !!! हॅट्स ऑफ टु ऑल...!
@ दक्षिणा.... पु.लं.च्या त्या
@ दक्षिणा....
पु.लं.च्या त्या खाद्यजीवनातील तुम्ही रंगविलेला प्रसंग अगदी डोळ्यासमोर आला. काय मस्त जीवन जगले त्यानी खाण्यासाठी....व्वा ! दिनेशदा याना जसे ते पदार्थ आठवले, नेमके तसेच वर्णन त्या भारून टाकणार्या लेखात आहे....
एक छोटीसी झलक देण्याचा आगाऊपणा इथे करू का ? देतोच :
"....शाकाहारी मंडळींना शाकान्न आणि शाक्तान्न जोडीजोडीने कसे नांदते हे कळणार नाही. तुरीच्या डाळीच्या सांबार्याबरोबर भाजलेल्या सुक्या बांगड्याचा तुकडा काय विलक्षण साथ जमवून जातो ! मटारीत कोलंबी आणि वांग्यात सोडे. व्हिस्की-सोडा आणि वांगे-सोडा ह्या जोडीत श्रेष्ठनिष्ठ ठरविणे कठीण आहे. काळ्या वाटाण्याची किंवा मसूरची मसालेदार आमटी असली, तर उगीच जोडीला कोलंबी किंवा ताजे बोंबील तळून पाहावे. स्वर्ग ताटात येतो ! मटणात बटाटा घरच्यासारखा येऊन बसतो. पण कोंबडी एरवी स्वतः शाकाहारी असली तरे पकवल्यावर तिला पालेभाजीचा सहवास चालत नाही. तीच गत हरभर्याची. हरभए आणि मासे यांचे जम्त नही. म्हणून पिठल्याच्या जोडीला मासे-मटण चालत नाही. मसूर ही जातीने शाकाहारी असली तरी वृत्तीने सामिष. नागपुरी वडाभात हा पुढे अख्खी दुपार झोपायला मोकळी असली तर खावा. आणि डाळबाटे या इंदुरी प्रकारात बाटे हुकवून नुसती डाळ ओरपता आली तर पहावी. हरभर्याच्या डाळीच्या आमटीला तसे खास व्यक्तित्व नाही, पण पुरणपोळीच्या प्रसंगी ती जेव्हा 'कटा'त सामील होते त्या वेळी ती कधी कधी पोळीच्या तोंडात मारून जाते....."
~ व्वा....काय म्हणावे पु.ल. निरिक्षणाला ? इथल्या सदस्यांनी हा लेख जरूर वाचावा अशी शिफारस करावीशी वाटते, या लेखाच्या निमित्ताने.
दिनेशदा खुप सुंदर.
दिनेशदा खुप सुंदर. गाण्यांप्रमाणे तुम्हाला नाटकांचीही आवड दिसते.
प्रतीक त्याच लेखातील
प्रतीक त्याच लेखातील खाणावळीतली भाजी हा भागही छान आहे.
बाजारात सस्त्या लावल्या असतील त्या भाज्या घ्याव्यात... एक नवरी रंगेल एवढी हळद.... जमल्यास पुडीचा कागद, पुडीचा दोरा पण घालावा... खाणार्याच्या गळ्याशी येईल एवढे सरसोचे तेल... कडोसरीची अधेली त्यात पडली...
जागू, जून्या मायबोलीवर रंगदेवतेस अभिवादन करुन, ही माझी ५ भागातली लेखमालिका आहे. जवळजवळ ७५ नाटकांची ओळख करुन दिली आहे त्यात.
लेख तर सह्हीच आहे आणि त्यावर
लेख तर सह्हीच आहे आणि त्यावर प्रतिक्रिया पण मस्तच आहेत
दिनेशदा म्हणजे झाडं आणि पाकृ असं समीकरणच बनलय <<< त्यात गाणी, सिनेमे, नाटकं, नटनट्या, प्रवासवर्णन इ इ हे पण अॅडा
झाडाखाली, गाणी म्हणता म्हणता मस्त एखादा पदार्थ दिनेशदा बनवतायत असे चित्र डोळ्यापुढे आले
अगदी अग्गदी...दिनेशदा....तोही
अगदी अग्गदी...दिनेशदा....तोही भाग झटकन जसाच्या तसा नजरेसमोर येतो. "सरसोचे तेल" तर जबरदस्त. जी.ए.कुलकर्णींच्या एका कथेत वडाच्या झाडाखाली कामगार डुक्कर शिजवित आहेत असा एक प्रसंग आहे...तर त्या वातावरणाचे वर्णन जी.ए.नी असे काही खुमासदार तोंडाला पाणी सुटावे असे केले आहे की व्वा !!
".....आपल्यासमोर ढीगभर भात आहे, काळ्या वांग्याची तिखट भाजी आहे, पण हे काहीच नाही...कुणीतरी आता एक मोठे भांडे घेऊन येते. मग लाल गरम रस्सा त्यातून भातावर पडतो...त्या मागोमाग मऊ मसालेदार असे तळहाताएवढे मासाचे तुकडे पानात येतात...असे लज्जतदार की जे शिजत असाता वास घ्यायला वडाच्या झाडाने देखील ओणवे व्हावे, असे तुकडे...!"
प्रत्यक्ष झाडालाही मोह व्हावा ! सुरेखच.
मला वाटते पु.लं. वा एका 'खाणावळवाल्या'वरही असाच आपुलकीचा लेख आहे.
दिल है के मानता नही मधील पूजा
दिल है के मानता नही मधील पूजा भट्ट, आमीर खान आणि कलिंगड.
प्रतिक अरे माझा सलाम आहे तुला
प्रतिक अरे माझा सलाम आहे तुला मित्रा .. खरंच.. काय अप्रतिम शैली आहे तुझी...
म्हणलं तर मी पण पुलंचं लिखाण इथे टाकू शकते, पण तुझ्या लिखाणाला एक जी अदा आहे ती निराळीच.
जो जीता वही सिकंदर मध्ये आमिर
जो जीता वही सिकंदर मध्ये आमिर जेव्हा आयेशा जुल्काच्या घरून पोळीभाजी पेपरात बांधून नेतो, ती सुद्धा मला पाहिली की खाविशी वाटते बहुतेक गवार आहे त्यात
हायला .. मी हे मिसले
हायला .. मी हे मिसले कसे???
दिनेशदा, प्रतीक दोघानाही__/\__
पंचपक्वानाच्या गोडीचे आभार...
पंचपक्वानाच्या गोडीचे आभार... दक्षिणा आणि राम.....
~ या विषयाचे मूळच इतके गोडसर आहे की, त्याच्या आजूबाजूच्या मातीलाही स्पर्शले तरी हात लज्जतदार वासाने माखून जावेत. थॅन्क्स.
या निमित्ताने जसे नाटक आणि चित्रपट आठवत गेले आपणा सर्वाना, तद्वतच मला काही लेखकांचे अशा अंतर्याचे लिखाणही. जी.ए.कुलकर्णी असली वर्णने करण्यात जबरे होते. त्यांच्या एका कथेत भिंतीवरील चित्रातील एक गुलाबी तरुणी 'व्हिम्टो' पिणारी आहे. शिक्षण आणि नोकरीनिमित्य मी स्वतः इतके फिरलो असूनही हे व्हिम्टो प्रकरण म्हणजे काही उमगले नव्हते, ते अचानक एकदा बेळगाव मुक्कामी अशाच एका आडवाटेच्या खेडेगावातील खुराडेवजा सोडावॉटरच्या दुकानात सापडले. मोडकेतोडके मराठी बोलणार्या त्या दुकानदाराकडे ते पेय (अर्थातच) नव्हते, पण आत्ताच्या आपल्या कोकाकोलाचा तो 'सायबी' अवतार होता....हे 'सायबी' नामदेखील त्या दुकानदाराकडूनच कळले....फॉरेस्ट रेन्जर्स, तहसिलदार, कस्टम फौजदार वा तत्सम अधिकारी रात्रीच्या मुक्कामात व्हिस्की माईल्ड करण्यासाठी ते व्हिम्टो पेय नेत असत...म्हणे ! त्याच्याकडूनच समजले की, ज्या दिवसात सोडा आणि लेमन दहा पैशा (होय १० पैसे...!) ला मिळे, त्या काळात व्हिम्टोची किंमत चक्क २ रुपये असायची. खेड्यात शाळेला जाणार्या गण्यागंप्याचे ते एकेकाळी स्वप्न असायचे की, कधीतरी 'मोठे' झाल्यावर तात्याच्या दुकानात येऊन एक फुल्ल 'व्हिम्टो' पिणारच...! गंमतच.
त्यांच्या एका नायिकेला कडू कारल्याची भाजी खूप आवडे...मैत्रीण चिडवितदेखील "तू एवढी गोड, पण तुला कशी ग आवडतात कडू कारली?"
तुम्ही त्यांची 'गुंतवळ' कथा वाचल्यीय ? नसल्यास जरूर वाचा....[एकट्याने, मोबाईल बंद करून]. त्या कथेतील भजी तळण्याचे आणि धरण मजुरांनी ती खाण्याचे वर्णन आहे....प्रसंग जसाच्या तसा उभा राहतो, वाचणार्यापुढे.
ह्यातले कुठलेच नाटक मी बघितले
ह्यातले कुठलेच नाटक मी बघितले नाहिये, पण तुमच्या लिखाणातून ते ते प्रसंग अगदी डोळ्यांपुढे उभे राहिले.
दिनेशदा, मस्त निरिक्षण. या
दिनेशदा, मस्त निरिक्षण.
या नाटकात सुदाम्याचे पोहे आहेत>>
एक भा.प्र. पोह्यांचा इतिहास खुप मोठा दिसतोय.?
दिनेशदा, पुन्हा एकदा
दिनेशदा, पुन्हा एकदा __/\__
<<मला खात्री आहे की मायबोलीकर पुढे कोणत्याही नाटकाला गेले तर त्यातले 'खाण्याचे' प्रसंग मन लावून पाहतील, ते ही तुमची आठवण काढत.>> अगदी अगदी !
प्रतीक गुंतवळ आठवतेय ना.
प्रतीक गुंतवळ आठवतेय ना. त्यातली ती हॉटेल मालकीण. खायला देताना पण, बापबिप उलथला कि काय तूझा म्हणणारी. आणि भाव्यांची, पिंपळपान, त्यातले वाळ्याचे सरबत.
दूर्गाबाईंचे तर खमंग नावचे पुस्तकच आहे.
या कथांमधे जे खाद्यपदार्थांचे वर्णन येते ते त्या पात्रांचे त्या पदार्थाकडे बघणे असते. गुंतवळ मधेच ती भजी तळणे, कामगारांच्या हातातून ती खाली पडणे. ती त्यांनी उचलून खाणे. कमी तिखट झालीत, म्हणून शिव्या देणे., कूत्र्यासमोर टाकलेले बिस्कीट..
इथे तर निदान शब्द तरी आहेत... पण गाण्यातून भूकेचा कळवळा ऐकायचाय ? धर्मकन्या चित्रपटातले, आशाचे देव नाही जेवलेला, हे गाणे ऐकाच. इथे आहे. http://www.raaga.com/channels/marathi/moviedetail.asp?mid=MA000214
जी.ए.कुलकर्णींच्या एका कथेत
जी.ए.कुलकर्णींच्या एका कथेत वडाच्या झाडाखाली कामगार डुक्कर शिजवित आहेत <<< 'तळपट' या कथेत ना? 'पिंगळावेळ'मधली.
धन्स. एकतर जुनी नाटके आठवली
धन्स. एकतर जुनी नाटके आठवली आणि माझे खाद्यजीवन-दर्शन पाहिले.
जब्बरदस्त निरिक्षण दिनेशदा
जब्बरदस्त निरिक्षण दिनेशदा ___/\___!
नाटके पाहिलेली नाहीत तरी जसेच्या तसे उभे केलेत प्रसंग! आता आम्हीही हे लक्षात ठेवुन यापुढचे प्रत्येक सिनेमे-नाटकं अशीच बघणार.
<<<परफेक्ट!
* खाण्याबद्दल नाहीये, पण बॅगा उचलताना आपले नट कसे चुरमुर्याच्या पोत्यासारखं उचलतात<<<
अनुमोदन!!
इथे मला भरत जाधवच. 'श्रीमंत दामोदरपंत' आठवलं! आजोबा अंगात येतात तेव्हा तो काठी धरुन रुबाबात चालण्याचा, आणि खांद्यावरुन उपरणं हातावर घेत चालल्याचा अभिनय एवढा सही करतो की बस्स!! इतका की काठीची मुठीवर हाताचा पंजा असतांना चालतांना तो कसा होत असेल हे ही सही करतो.
होय गजानन..."तळपट"..... ते
होय गजानन..."तळपट"..... ते लोक म्हणजे गारूडी जमातीचे असतात....(कामगार शब्द माझ्याकडून अनवधानाने टंकला गेला.)...."पिंगळावेळ" संग्रहातील कथा.
@ दिनेशदा....."धर्मकन्या" ऐकतोय.
या गीतामुळे आठवण झाली ती सुलोचनाबाईंच्या 'प्रपंच' मधील त्या दृश्याची, ज्यावेळी मुलांसाठी जेवण नाही म्हणून रुपयाचे चुरमुरे टॉवेलमध्ये बांधून आणून त्यांच्यासमोर ठेवतात आणि ती भुकेलेली पोरे त्यावर अक्षरशः तुटून पडतात. "कुटूंब नियोजन' कार्यक्रमांतर्गत शासनातर्फे हा चित्रपट पूर्वी खेडोपाड्यात सातत्याने दाखविला जात असे.
दिनेशदा आणि प्रतिक, दोघांनाही
दिनेशदा आणि प्रतिक, दोघांनाही दंडवत
सगळेच सुंदर...
सगळेच सुंदर...
थॅन्क्स....भ्रमर आणि साधना
थॅन्क्स....भ्रमर आणि साधना (मीही त्या 'सगळेच सुंदर' म्हटल्या जाणार्या बाकावर बसलोय हे गृहित धरत्योय !!)
भरपूर आणि अधाशासारखे खात (आणि आरामात...) बसलेला एक नायक आठवतोय... दिलीपकुमार...'राम और श्याम' चित्रपटात. खेड्यातून आलेला बेरकी श्याम शहरातील हॉटेलमधील वेटरला तो ज्या ज्या डिशेस सांगतो त्या 'दोन दोन' प्लेट्स घेऊन ये म्हणून फर्मावतो....वेटर चक्रावूनच जातो....'भेजा भी दो प्लेट?" त्यालाही श्याम, "हाँ...वो भी दो प्लेट"....आणि सारे टेबल भरून गेल्यावर नायकाचे ते पोट फुटेपर्यंत खाणे, आणि हळूच सूंबाल्या करणे....मग रामच्या अंगावर ते बिलाचे प्रकरण शेकणे....मजेशीर होता तो प्रसंग..!
Pages