बच्चेकंपनीसाठी सुट्टीतले उद्योग - ३ - 'ट्विंकल ट्विंकल लिट्टील जार'

Submitted by लाजो on 11 May, 2011 - 23:29


सुट्टीतला उद्योग - ३ - 'ट्विंकल ट्विंकल लिट्टील जार'

हल्ली बाजारात स्नो डोम्स मिळतात. त्यात आपला फोटो लावुन तो उलट सुलट हलवला की स्नो फॉल होतोय असा भास होतो. असाच स्नो डोम घरच्या घरी बनवता आला तर काय मज्जा Happy

वयोगट: ५ ते १२ वर्षे

लागणारा वेळ: १ तास .

साहित्य:

काचेची/ क्लियर प्लॅस्टिकची घट्ट झाकणाची रिकामी बाटली (जॅम वगैरे चा जार) - लेबल काढुन आणि स्वच्छ धुवुन, उकळुन गार केलेले पाणी, एक ते दीड चमचा ग्लिसरीन, एक छोटे बाटलीच्या आत नीट बसेल असे प्लॅस्टिकचे खेळणे, सुपर ग्लु /अराल्डाईट किंवा तत्सम, रंगीत चमकी, स्टार्स, सजावटीचे सामान.

IMG_0508.jpgकृती:

१. प्लॅस्टिकचे खेळणे जारच्या झाकणाच्या आतल्या बाजुला सुपर ग्लु ने घट्ट चिकटवुन घ्या. पूर्ण वाळु द्या.

IMG_0509.jpg

२. जारमधे उकळुन गार केलेल पाणी काठोकाठ भरा.

३. खेळणे चिकटवलेले झाकण जारवर लावा....थोडे पाणी बाहेर येइल.. येऊ देत.

IMG_0510.jpg

४. झाकण काढुन पाण्यात ग्लिसरीन घाला. साधारण चमचाभर चमकी घाला, चकमकीत स्टार्स घालणार असाल तर ते ही घाला.

५. आता खेळणे चिकटवलेले झाकण जारवर लावा.. आता पाणी बाहेर येणार नाही.

६. जारचे झाकण घट्ट बंद करा. त्यावर सुपर ग्लु लावा. पूर्ण वाळु द्या.

७. आता तयार जार ला आपल्या आवडीप्रमाणे सजवा. मी प्ले डो आणि मोठे स्टार्स लावले आहेत.

IMG_0526_0.jpg

८. कलाकृती पूर्ण वाळली की उलट-सुलट हलवा. पाण्यात घातलेली चमकी स्नो पडल्यासारखी खेळण्या वरुन खाली पडेल. परत हलवा... झाला आपला घरच्या घरी 'ट्विंकल ट्विंकल लिट्टील जार' Happy

IMG_0515.jpg

अधिक टीपा:

- काचेची / प्लॅस्टीकची बाटली/जार सिलेक्ट करताना शक्यतो कमी उंचीच झाकण असलेली आणि काही डिझाईन नसलेली सिलेक्ट करा.

- चमकी शक्यतो जाड/भरड वापरा म्हणजे जास्त वेळ तरंगते.

- ग्लिसरीन केमिस्ट/फार्मसिस्ट किंवा काही सुपरमार्केट्स मधे पण मिळते. घरी नसेल तर छोटी बाटली विकत आणायला हरकत नाही कारण ग्लिसरीनचा उपयोग तोंडात फोड आल्यास त्यावर लावणे, कॉन्स्टिपेशन झाल्यास चमचाभर कोमट पाण्यासोबत घेणे यावर सुद्धा होतो. त्यामुळे विकत आणलेलं ग्लिसरीन फुकट जाणार नाही Happy

IMG_0520.jpg

----------------------------------------------------

सुट्टीतला उद्योग: १ : 'अळी मिळी गुपचिळी' http://www.maayboli.com/node/25345

सुट्टीतला उद्योग: २ : 'कडकु मडकु' http://www.maayboli.com/node/25526

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हेल्लो,

काय म्हणताय बच्चेकंपनी? सुट्टीत अगदी धम्माल चालु असेल ना?
हा घ्या तुम्हाला करायला अजुन एक उद्योग. आवडला का सांगा ...आणि नक्की करुन पहा Happy

मस्त....
ग्लिसरीन घालून असे करतात हे माहित नव्हते..

दिल चाहता है मध्ये एक शो-पीस होता. लाटे सारखे पाणी इकडे तिकडे जायचे...ते मी नंतर कुठेही पाहीले नाही. कुणाला माहीत आहे का ते कसे करायचे... नेटवर मला त्याचा फोटो पण सापडला नाही...

लाजो, मस्त!! हे नक्की करणार.

बच्चा कंपनीला वाढदिवसाचे गिफ्ट/ रीटर्न गिफ्ट देण्यासाठी पण एकदम भारी आयडीया आहे ही. मस्तच लाजो. Happy

खूप मस्त, लाजो, तुझं अळिमिळि मी आणि लेकाने केलं होत, अजुन येणार्‍या जाणार्‍यांना घाबरवत असतो.
आत हे पण करून बघते! खूप आभार तुझे!

__/\__

मी प्रयत्न केला. सगळे जमलेही....पण्......एक गंमत झाली!
आम्ही वापरलेल्या फेव्हीकॉलचा जोड मजबूत नाही निघाला Sad आणि झाकणात बसवलेले खेळणे जार हलवल्यावर तरंगू लागले Biggrin ( जाहिरातीत तर अगदी पाण्याखालीही खुर्ची सुटत नाही ह्यांची !)

टीपः फेव्हिकॉल वापरू नये.

आयडिया मस्त! धन्स!

भन्नाट कल्पना. लाजो __/\__ Happy

( जाहिरातीत तर अगदी पाण्याखालीही खुर्ची सुटत नाही ह्यांची !)>>>>>>अश्विनी Happy Happy

लाजो, सगळं साहित्य तयार आहे. ग्लिसरीन आणि वेळ या दोन गोष्टी मिळवल्या की होणार आमच्याकडेही. आमची शाळा अजून सुरू आहे आणि घरीही जरा गडबडीत.

कस्सलं गोडु आहे हे पण. आता ह्या विकांताला करून बघणार.
" अली-मिली-गुपचिली " केलं होतं. मज्जा आली होती. फोटो टाकायचा राहिलाच. आज टाकते.

अश्विनी.. खेळणं चिकटवायला फेविक्विक वापरा.. फेविकॉल टिकणारच नाही.. पाण्यात बर्‍याच प्रमाणात विरघळते फेव्हि़कॉल..

Pages