एक तरी.................................??

Submitted by Unique Poet on 13 May, 2011 - 01:09

एक तरी.................................??

मला काहीच नाही आठवत हल्ली
बस्स.........केवळ कानात मनात देहात
तुझे ते जीवघेणे सूर घूमत असतात
मल्हाराचे ..........
माझ्या डोळ्यातून आठवणी दाटून
केंव्हा घळघळायला लागतात ते माझे
मलाच कळत नाही.........
अताशा चेहराही साथ नाही देत ग मला
गर्दी नकोनकोशी होते...ओळखणार्‍यांची
मग आपण जायचो तसे नदीवर जातो.......
काठावर तासनतास बसून राहतो...
नितळ प्रवाही पाणी..........................
त्यात आपल्या खूणा शोधत राहतो
काही गडद , काही पुसटलेल्या
पाण्यात पाय सोडून बसलेल्या
वेड्या प्रेमिकांच्या जोडीगत.......................
तो बकुळीचा पार .....
दिवसच्या दिवस गप्पा
ऐकल्यात त्याने आपल्या
त्याला आता आपली खूप आठवण
येत असणार..................
मला आवडायचे म्हणून तू
भल्या पहाटे प्राजक्ताची फुले
वेचायला लागलीस.....
पहाटेची तुझी प्रिय झोप सोडून
माझ्यासाठी , माझ्या सोबत..............
तो भरभरून ओसंडणारा पारिजातक..
अजूनच रसरसून फुलायला लागला.
तूझ्या प्रेमातच पडला होता तो..
जिथे एरवी सडा पडायचा .. तिथे
खच पडायला लागला होता
नाजूकशा फुलांचा.....
अंगणामध्ये दिवे बंद करून
चांदण्यात बसायला कितीतरी
आवडायचं तुला..............
बहरलेल्या रातराणी सोबत
तू ही बहरून यायचीस......
तूझे लांबसडक मोकळे केस
सोडून तू समोर बसलीस की....
तुझ्या मांडीवर डोकं ठेवून
चांदण्याने भारलेल्या तूझ्या चेहर्‍याकडे
भान हरपून पहात रहायचो मी
चांदण्यात हरवलेल्या तुझ्या चेहर्‍याकडे
तूला ते माहीत असायचं.. नेहमीच
अचानक तूझे पाणीदार डोळे माझ्यावर रोखून
पहायचीस ....आणि खळखळून
हसायचीस...........
ते तूझे हसणं , सतत कानात
रूंजत असतं.....आजही , आताही..
नेमक्या अशाच चांदण्यारात्री
माझ्या कविता ऐकायचा
हट्ट असायचा तूझा.............
माझ्या कवितांना जोपासलं,
त्यात प्राण तूच ओतलेस......
क्वचित त्या चूकीच्या दिशेला
जाऊ नयेत म्हणून तूच
धडपडलीस.........
त्यांची प्रेरणाच तू होतीस ....
त्या तूलाच त्या कविता ऐकवण्यास
आतुरलेला मी बरसायचो उत्तररात्रीपर्यंत
माझ्या कितीतरी कवितांना या
उत्तररात्रीने जन्म दिला आहे......
तूझ्या अखंड प्रेमवर्षावात
भिजणारा मी !
आज तू जवळ नाहीस इथे ...
पण तरीही ज्या क्षणात तू
नाहीस असा एकही क्षण नाही...
तू सदैव आहेस...................
माझ्यात..............................
मी फक्त वाट पाहतोय तुझ्या परतण्याची
कुठूनतरी डोकावलेले आपापले अहं जपण्याच्या
नादात नातं जपायला , एकमेकांना जपायला
विसरलो आपण....
एका निसरड्या वेळी..
प्रेमालाच गृहीत धरण्याची चूक
केली का ग आपण ??????????
पार भंडावून टाकणारे प्रश्न .........
परतून ये ......
चूका सार्‍या विसरून आपल्या नात्याला ,
आपल्याला सावरण्याची एक तरी...
संधी दे..............................................!

- समीर पु. नाईक

गुलमोहर: