एक मुलगा एका दुकानाबाहेर पडतो.
"ए हीरोss आजचे धरून तीनशे साठ रुपये बाकी आहेत तुझे, किती?" मागून हाक.
"तीनशे साठ."
"हां बरोब्बर तीनशे साठ. तेवढं लवकर द्यायचं बघा."
"शेट, लक्षात आहे माझ्या, देतो."
"दहा दिवस झाले, हेच सांगतय राव."
"देतो, देतो, दोन दिवसात नक्की देतो."
ओशाळलेला चेहरा घेऊन तो मुलगा त्याच्या दुचाकीवर बसून निघून गेला.
लेखाचं नाव बघितल्यानंतर हा संवाद वाचून कदाचित तुमचा गैरसमज होण्याची शक्यता आहे. नाही, हा संवाद एखाद्या दारूच्या गुत्त्यावरचा किंवा परमिट रूमबाहेरचा नाही (अर्थात तिथे उधारी चालत असावी असं मला तरी वाटत नाही - अनुभव नाही), किंवा किराणामालाच्या थकलेल्या बिलांबाबतही नाही. हा संवाद आहे एका सायबर कॅफे बाहेरचा. शेजारी एका दवाखान्यात आलो असता कानावर पडलेला. सहज रिसेपशनिस्टला विचारलं तर हे असले प्रेमळ(!) संवाद रोजचेच आहेत असं समजलं. ऑनलाईन गेम्सच्या विळख्यात सापडलेल्या विद्यार्थीदशेतील मुलांचे आणि सायबर कॅफेच्या गल्ल्यावर बसलेल्यांचे. "अहो काय सांगू, अनेक वेळा समजावून झालं, पेशंट आहेत त्रास होतो, काहीही परिणाम नाही".
असेल अपवादात्मक ठिकाण म्हणून फार विचार केला नाही. असंच एकदा प्रिंटाआउट काढायला अन्य एका सायबर कॅफे मध्ये जावं लागलं. तिथे शालेय गणवेशातली अनेक मुलं दिसली. ही मुलं करताहेत तरी काय पहावं म्हणून एकाच्या नकळत सहज डोकावलो तर कसलासा ऑनलाईन युद्धाचा गेम तो खेळत होता. शेजारीच त्याचा मित्र त्याला कसं खेळायचं याचं मार्गदर्शन करताना दिसला. माझं काम झाल्यावर सायबर कॅफेच्या मालकाला विचारलं, "काय हो, दोघांना कसं काय बसून देता तुम्ही एका पी.सी. वर?"
"अहो शेट, लय भारी गिर्हाईकं आहेत ही. रोज येत्यात. बराच वेळ बसत्यात, लई खेळत्यात. बक्कळ कमाई यांच्यामुळं", मालक उत्तरले.
निराशेने मान हलवून बाहेर पडलो, तर मागोमाग वरच्यासारखाच संवाद कानावर पडला. उधारी बाकी असल्याचा. फक्त ह्या वेळी रक्कम कमी होती.
मित्रमंडळी आणि अन्य काही सायबर कॅफेचे मालक यांच्याशी चर्चा करता समजलं की ही परिस्थिती धक्कादायकरित्या सर्वसामान्य आहे. कोपर्याकोपर्यावर कुत्र्याच्या छत्रीसारखे उघडलेले सायबर कॅफे यांमुळे घरी इंटरनेटची जोडणी नसलेले किंवा इतर काही कारणांमुळे घरी गेमींग न करू शकणारे यांची चांगलीच सोय झाली आहे. शिवाय नजिकच्या भूतकाळात जितक्या झपाट्याने तुरडाळीचे दर वाढले त्यापेक्षाही वेगाने घसरलेले सर्फिंगचे दर ही ऑनलाईन गेम्सचं वेड फोफावण्यासाठी एक अत्यंत सुपीक जमीन ठरली आहे. दुर्दैवाने अधिकाधिक लोक ऑनलाईन गेम्सच्या विळख्यात सापडत आहेत.
समुपदेशन करणारे अनेक तज्ञ म्हणतात की इंटरनेट सहज उपलब्ध असणं या व्यतिरिक्त ऑनलाईन खेळ यांचे अतिशय वेगाने लागू शकणारे व्यसन ही प्रामुख्याने चिंतेची बाब आहे. वैयत्तिक/प्रत्यक्ष आयुष्यात छटाकभर सत्ताही नसलेल्यांकडे ऑनलाईन खेळात मोठ्या सैन्याचे अधिपत्य किंवा एका शहराचे नेतृत्व येऊ शकते. इंग्रजीत असलेल्या ''Power corrupts, and absolute power corrupts absolutely' या प्रसिद्ध उक्तीप्रमाणे ही नशा ऑनलाईन असली, तरी ही सत्ता मनाचा झपाट्याने ताबा घेते, आणि मग शाळा, शिकवणीची फी, खाऊचे पैसे इत्यादीतला एक मोठा हिस्सा या खेळांवर खर्च होऊ लागतो.
माझा एक प्रोग्रामर मित्र ऑनलाईन खेळ बनवतो. त्याने काही महत्त्वाची माहिती सांगितली. ऑनलाईन खेळ बनवणारे मानसशास्त्राचा उत्तमरित्या उपयोग करुन घेतात. प्रत्यक्ष आयुष्यात नैराश्याचे किंवा मानसिक कणखरतेची कसोटी प्रसंग पाहणारे प्रसंग आले की अशा ऑनलाईन खेळांच्या नादी लागलेल्या लोकांना खेळातल्या विजयाचे प्रसंग आठवून त्यांची पाऊले आपोआप गेमिंगकडे वळतात. मानसशास्त्रात हा प्रकार 'क्लासिकल कंडिशनिंग' या नावाने ओळखला जातो.
हे खेळ काही वेळ खेळून सोडून देण्यासारखे निश्चित नाहीत. ते खेळायचे असतील तर बराच वेळ द्यावा लागतो. खेळात एखाद्या जागी माघार घ्यावी लागणं आणि एखाद्या प्रसंगी जिंकणं यात अशा प्रकारे समतोल साधला जातो की खेळणार्यापुढे जिंकण्याचं गाजर सतत नाचवलं गेल्याने त्याला पुढे खेळत राहण्याशिवाय पर्याय नसतो. खेळताना आपण नक्की कधी जिंकणार हे सांगता येत नाही. विजय हा अगदी पुढच्या क्षणाला मिळू शकतो, पुढच्या तासात तुम्ही जिंकू शकता, किंवा जिंकायला अगदी दिवसभरही लागू शकतो. पण बराच वेळ हरतोय म्हणून आपण खेळ खेळणं थांबवलं तर तो जिंकण्याचा क्षण गमावू ह्या भीतीने खेळणारे अमर्याद काळ खेळतच राहतात. सतत अनेक तास असे खेळ खेळल्याने ताणामुळे काहींनी आपला जीव गमावल्याचीही उदाहरणं आहेत.
किशोरावस्थेत असलेल्या मुलांत या व्यसनाचा प्रामुख्याने प्रादुर्भाव असला तरी लहान मुलेही याला अपवाद नाहीत. माझ्या एका मित्राची प्राथमिक शाळेत जाणारी लहान मुलगी त्यांच्या घरातल्या संगणकावर बार्बी हा खेळ खेळते. त्याबद्दल हटकलं असता चिडचिडी होते आणि हट्टीपणा करते. जी मुले बंदुका, तोफा आणि तत्सम गोष्टी असणारे खेळ खेळतात त्यांना राग लवकर येतो आणि अशी मुले हिंसक होण्याची शक्यता असतेच असते.
ही बाब आता फक्त ऑनलाईन खेळांपुरती मर्यादित नाही तर अश्लील मजकूर, चित्रे आणि चलतचित्रे असलेली संकेतस्थळे, चॅटींग आणि सोशल नेटवर्किंग यांनीही या व्यसनाचा मोठा भाग व्यापला आहे. आंतरजालीय जुगार, समभाग खरेदी-विक्री, पोर्नोग्राफी, आणि सेक्स चॅट हे या ई-व्यसनाचे काही घटक.
इंटरनेट उर्फ आंतरजालाचे व्यसन ह्या गोष्टीने आता इतके गंभीर स्वरूप धारण केले आहे की पुण्यातल्या मुक्तांगण या व्यसनमुक्तीसाठी काम करणार्या संस्थेत आता दारू आणि अंमली पदार्थांचे व्यसन याबरोबरच इंटरनेट व्यसनमुक्ती ही एक वेगळी उपचारपद्धती विकसित करण्यात आली आहे. संस्थेत या नवीन व्याधीवर उपचार घेणार्यांमधे बहुतांश शाळा आणि महाविद्यालयात शिकणारी तरुण मुले आहेत. उपरोल्लेखित अनेक समस्यांबरोबरच 'सायबर रिलेशनशिप अॅडिक्शन' हा एक अत्यंत धोकादायक प्रकार आहे. सोशल नेटवर्किंग, आंतरजालावरचे मित्र अशा गोष्टींमुळे वेळ-काळाचे भान न राहिल्याने घरी पालकांशी आणि इतर घरच्यांशी अगदी तुटक किंवा उद्धटपणे संभाषण करणे, प्रत्यक्ष आयुष्यातील नातेसंबंधांकडे होणारे दुर्लक्ष, वाचन-लेखन-मनन आणि मैदानी खेळ खेळण्यास अनुत्सुक असणे यासारख्या बाबींकडे घरातल्या मोठ्यांचे एक तर वेळेवर लक्ष जात नाही, किंवा अक्षम्य दुर्लक्ष केले जाते. शेवटी सहामाही/वार्षिक परीक्षेत दिवे लागल्यावर प्रगती पुस्तकात दिसणारी अधोगती हा पालकांसाठी एक मोठा धक्का असतो. मग सुरवातीला आपली मुलं संगणक लिलया हाताळतात हा अभिमान गळून पडतो आणि पालकांच्या जीवाला नवीन घोर लागतो. इतर व्यसनग्रस्तांप्रामाणेच आपल्याला व्यसन आहे हेच मुळात या मुलांच्या गावी नसते. मुक्तांगण संस्थेतले समुपदेशक अशा मुलांना हीच गोष्ट आधी पटवून देतात.
उपचारांच्या दुसर्या टप्प्यात मग त्यांच्या भावी प्रगती बाबत बोलून त्यांना प्रोत्साहित केले जाते. समुपदेशनाबरोबरच ध्यानधारणा, वाचनास उद्युक्त करणे, वेगवेगळे मैदानी आणि घरगुती खेळ खेळायला लावणे, अशा विविध प्रकारे 'बरे' केले जाते. अडनिडं वय आणि या आजाराचे विचित्र स्वरूप यामुळे या मुलांना ई-व्यसनमुक्त करण्यासाठी घेतली जाणारी मेहनत आणि लागणारा वेळ हा अर्थातच इतर व्यसनाधीन लोकांपेक्षा अधिक असतो. मुलांबरोबरच पालकांचंही समुपदेशन केलं जातं. कारण फक्त मुलांचंच नव्हे तर संपूर्ण घराचं सौख्य आणि शांती अशा गोष्टींमुळे हिरावली जाते. मुलं संगणक वापरत असताना त्यांना विचित्र वाटणार नाही अशा प्रकारे त्यांच्यावर लक्ष ठेवावे असा सल्ला पालकांना दिला जातो.
सद्ध्या मुक्तांगणमधे ई-व्यसनांवर उपचार घेणार्यांमधे मुलं आणि तरुणांचे प्रमाण जास्त असलं तरी भविष्यात संस्थेत उपचारासाठी दाखल होणार्यांमधे मोठ्यांची संख्या वाढू लागल्यास आश्चर्य वाटायला नको. ऑनलाईन नात्यांमधे गुंतल्याने प्रत्यक्ष आयुष्यातल्या नात्यांवर परिणाम होण्याबरोबरच प्रत्यक्ष आयुष्यातल्या असमाधानकारक नात्यांमुळे अनेक जण ऑनलाईन नात्यांमधे गुंतण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. आर्थिक नुकसान, दैनंदिन वेळेचा अपव्यय याबरोबरच ऑफिसमधल्या कामावर परिणाम होणे याही गोष्टी लक्षणीयरित्या वाढल्या आहेत. यापायी अनेकांनी आपल्या नोकर्या गमावल्याचीही उदारहणे आहेत. समविचारी लोकांशी संपर्कात राहणे आणि स्वतःला रचनात्मक पद्धतीने व्यक्त करणे या उद्देशाने आपण अनेक सोशल नेटवर्किंगच्या संकेतस्थळांचे सभासदत्व घेतो खरे, पण मग त्याच बरोबर अनेक अनावश्यक गोष्टींमधे आपला सहभाग वाढतो आणि इतर अनेक अनावश्यक गोष्टी आपल्या मेंदूत प्रवेश करतात. आंतरजाल हे साधन आहे, साध्य नव्हे याचा वेगाने विसर पडतो.
मी आत्ता ज्या आस्थापनात काम करतो तिथे एकेकाळी कर्मचार्यांना आंतरजाल मुक्तपणे उपलब्ध होतं. जीमेल, याहू, ऑर्कुट, फेसबुक, विविध चॅट संकेतस्थळे, युट्युब आणि इतर सगळ्या संकेतस्थळांवर दिवसातल्या कुठल्याही वेळी सगळयांचा मुक्त वावर असायचा. पण प्रमाणाबाहेर वापर वाढला आणि कामावर परिणाम होऊ लागला तसा हा वेळ नियमबद्ध करुन फक्त दिवसातला अर्धा तास असा केला गेला. आम्हाला निदान सलग अर्धातास मिळतो. अनेक आस्थापनांत हाच वेळ एक तास असला तरी एका वेळी फक्त दहा मिनिटं अशा प्रकारे तो वापरावा लागतो. याचाच अर्थ आंतरजालाचा वापर कसा आणि किती करावा यासंबंधात मोठ्यांनीही आत्मपरीक्षण करणे अत्यंत आवश्यक झाले आहे.
इतर काही नाही म्हणून करमणुकीसाठी आंतरजालावर फेरफटका मारायचा याला काही अर्थ नाही. आंतरजाल की करमणुकीची जागा आहे हा समज निखालस चुकीचा आहे. कारण आंतरजाल हे टीव्ही सारखं इडीअट बॉक्स नव्हे. नेटवर बसल्यावर सतत माणसाचा मेंदू जागृत असतो, त्याला आराम मिळत नाही. सतत 'अॅलर्ट' रहावं लागत असल्याने मग थकवा येणं हे ओघाने आलंच.
मुळात आपल्याला आंतरजालाचे व्यसन लागले आहे ह्याची जाणीव होणे हे अत्यंत महत्वाचे आहे. एखादे महत्वाचे काम करण्यासाठी आपण लॉग-इन केले, आणि काही क्षणांच्या कामासाठी आलेलो असताना आपण अर्धा-एक तास किंवा त्यापेक्षा अधिक वेळ ऑनलाईन आहोत असे लक्षात आले आहे का कधी? आंतरजालावर सोशल नेटवर्किंगमधे किंवा इतर गोष्टींमधे गुंतल्याने ऑफिसची काही अर्थातच महत्वाची असलेली पण बिनतातडीची कामे पुढे ढकलायची सवय लागली आहे का? वैयत्तिक आयुष्यातले वैफल्य किंवा ते निर्माण करणार्या समस्या सहन होत नसल्याने त्यापासून पळण्यासाठी तुम्ही आंतरजालावर येता का? या आणि तत्सम अनेक प्रश्नांपैकी एकाचे जरी उत्तर "हो" असले तरी सावध व्हा. एखाद्या संस्थेत जाऊन ई-व्यसनमुक्ती कार्यक्रमात सहभागी व्हायला कमीपणा वाटत असेल तर स्वतःवर नियंत्रण ठेवा. 'मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक' हेच सूत्र इथेही उपयोगी पडते. एकदा निग्रह करा, मग वास्तवाशी सामना करणे ही बाब ई-व्यसनांच्या विस्तवाशी खेळ करण्यापेक्षा नक्कीच सोपे वाटू लागेल.
मग करताय ना निश्चय?
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
ब्लॉगवर पूर्वप्रकाशित
सर्व छायाचित्रे: स्वतः काढायला आवडली असती पण सायबर कॅफेत परवानगी मिळाली नाही त्यामुळे नाईलाजास्तव आंतरजालावरून साभार.
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
बाप रे! मंदार, खूप चांगले
बाप रे! मंदार, खूप चांगले लेखन!
यावरून आठवले. आपण राहतो तेथील सृष्टी इमारत आहे ना? त्यात दोन सायबर कॅफे आहेत आणि दोन्हीमध्ये दिवसभर हाच धिंगाणा चाललेला असतो. ती मुले कर्कश्श ओरडून खेळत असतात. मला आधी माहीतच नव्हते, नंतर समजले की ते सगळे जण विविध पीसींवर एकच गेम सगळे मिळून खेळत असतात. तो आरडाओरडा अजून कानात घुमतो.
अक्षरशः व्यसन आहे हे!
खूप चांगला लेख!
एक गंमत सांगतो. मुक्तांगणच्या
एक गंमत सांगतो.
मुक्तांगणच्या ई-व्यसनमुक्तीबद्दल माबोवरच्याच एका मैत्रिणीला सांगितले. तिने ही गोष्ट तिच्या नवर्याला सांगितली.
त्याने काय विचारावे? "हा ई-व्यसनमुक्ती चा कोर्स ऑनलाईन आहे का?"
अरे ह्या लेखा कडे लक्षव
अरे ह्या लेखा कडे लक्षव नव्ह्ते माझे...
छान लिहले आहे.. यासाठी मुलांना मैदानी खेळ खेळ्ण्यास पालकांनी प्रवृत्त करणे आवश्यक आहे ... :स्मितः
मंदार एक जळजळीत लेख. या खेळात
मंदार एक जळजळीत लेख. या खेळात एवढे गुंतवून ठेवणारे काय असते तेच मला कधी कळले नाही. घे बंदूक आणि मार गोळी. असे करुन प्रत्यक्ष गोळी मारायची वेळ आली, तर यांचे हात थरथरणार नाहीत, अशी भिती वाटते.
ह्म्म्म खरच छान प्रकारे
ह्म्म्म खरच छान प्रकारे मांडली आहे ही समस्या...
पण माबो हे पण व्यसनच की हो एक प्रकारचे.
अनेकांना तर दर थोड्या थोड्या वेळाने माबो उघडून पाहिले नाही तर अस्वस्थ वाटत असेल.
"हा ई-व्यसनमुक्ती चा कोर्स
"हा ई-व्यसनमुक्ती चा कोर्स ऑनलाईन आहे का?">>>
जळजळीत वास्तव ! धन्स रे ..... आवडेश !
मंदार खूपच छान लिहिले आहेस.
मंदार खूपच छान लिहिले आहेस. अगदी वास्तव आहे हे.देशोदेशी हे लोण इतक्या मोठ्या प्रमाणात पसरलंय कि आता समाज ही या व्सनाकडे दुर्लक्ष करतोय सहजपणे. एखादं फ्याड बोकाळलं कि सर्वच तर करतायेत म्हणून घरांतून ती गोष्ट सहजपण स्वीकारली जाते.
दिनेश दाना अनुमोदन..
आजकाल बरोबरचं कुणी नाही म्हणून बोअर होऊ नये म्हणून (किंबहुना आपल्याला त्रास देऊ नयेत म्हणून) मुलांना रेस्टॉरेंट्स मधून,,नातेवाईकांकडे पीएस ,डीएस असले गेम्स घेऊन चलायला पेरेंट्स च प्रवृत्त करताना दिसतात.
ऑनलाईन नात्यांमधे गुंतल्याने
ऑनलाईन नात्यांमधे गुंतल्याने प्रत्यक्ष आयुष्यातल्या नात्यांवर परिणाम होण्याबरोबरच प्रत्यक्ष आयुष्यातल्या असमाधानकारक नात्यांमुळे अनेक जण ऑनलाईन नात्यांमधे गुंतण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. >>
आंतरजाल हे साधन आहे, साध्य नव्हे >> अनुमोदन..!
शेवटचा फोटोही लेखाचा विषय अधिक गडद करतो.
छान लिहलएस मंदार.
मंदार,
मंदार, अ...................त्यं.................त सुंदर, संयत, अभ्यासपूर्ण, अंतर्मुख करणारा असा लेख लिहिल्याबद्दल अभिनंदन आणि आभार!!!!!!!!! तुझे लेखन अत्यंत दर्जेदार असते. ते वाचतांना कधी कधी वाटते, की एखादे उत्तम ख्यातीचे वर्तमानपत्र वाचतेय... कीप इट अप... मंदार.
क्लासिकल कंडिशनिंगची एक वेगळीच आणि कधीच विचार केला नव्हता अशी प्रॅक्टिकल व्याख्या सांगितलीस, धन्यवाद! मास्टर्स करत असतांना 'मल्टिमिडिया अॅन्ड अॅग्रेशन' यावर प्रोजेक्ट केला होता. त्याचा रिपोर्टच एकदम डोळ्यासमोर तरळून गेला.
शेवटचा पॅरेग्राफ फार फार महत्वाचा आहे. माझ्यासारख्या माबोव्यसनाधीन व्यक्तीसाठीच जणूकाही लिहिला गेलाय, असे वाटते...
अन्न्न्न्न्न्न्न्नेक आभार लेख निवडक १० त नोंदवत आहे.
मंदार अतिशय माहितीपुर्ण आणि
मंदार अतिशय माहितीपुर्ण आणि अभ्यास पुर्वक लिहलेला लेख आवडला फोटो खरे मिळाले असते तर वास्तवतेची दाहकता वाढली असती असो हे ही छानच आहेत
उपरोल्लेखित अनेक समस्यांबरोबरच 'सायबर रिलेशनशिप अॅडिक्शन' हा एक अत्यंत धोकादायक प्रकार आहे. सोशल नेटवर्किंग, आंतरजालावरचे मित्र अशा गोष्टींमुळे वेळ-काळाचे भान न राहिल्याने घरी पालकांशी आणि इतर घरच्यांशी अगदी तुटक किंवा उद्धटपणे संभाषण करणे, प्रत्यक्ष आयुष्यातील नातेसंबंधांकडे होणारे दुर्लक्ष>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> अनुमोदन
विचारप्रवर्तक लेख! माबो/फेबु
विचारप्रवर्तक लेख!
माबो/फेबु या व्यसनांचं काय करायचं?
ब्राव्हो मंदार ! खुप छान
ब्राव्हो मंदार ! खुप छान !!!!
मंदार ! खुप छान लिहीलं आहेस !
मंदार ! खुप छान लिहीलं आहेस ! आवडला लेख !
ह्म्म्म... खरच काळजी करावी अन
ह्म्म्म... खरच काळजी करावी अन घ्यावी असं वास्तव ! छान लिहिलय्स !
वाचिंग.. पटेश अगदी !!
वाचिंग.. पटेश अगदी !!
जळजळीत लेख ! मंदार, धन्यवाद
जळजळीत लेख ! मंदार, धन्यवाद इतक्या छान लेखाबद्दल.
हे असे व्यसनी लोक खूप पाह्ते आजुबाजूला.
आमच्या रिसेप्शन काऊंटरवरच्या पोरी एक टोकन देऊन झालं की त्याची पावती प्रिंट होईपर्यंतच्या २-३ क्षणांच्या अवधीत सुद्धा फेबुवर डोकावून घेतात.:फिदी:
ह्या गेम्सचं व्यसन तर खूप पटकन लागतं. मला स्वतःला व्हिडीओ गेम्स खेळायला आवडतं (अर्थात माझी मजल अजून फार्म फ्रेन्झी, फिडींग फ्रेन्झी,टर्टल ओडिसी, अॅन्का असल्या चंपक गेम्सपर्यंतच आहे. )
नवीन गेम मिळाली की एकदा सगळ्या लेवल्स पूर्ण केल्याशिवाय चैन पडत नाही. (पूर्ण खेळून झालं की मग परत तिकडे बघतही नाही.) तोपर्यंत मात्र येताजाता, क्वचित रात्री जागून खेळत बसते. नवर्याची बोलणी बसत असतात तिकडे दुर्लक्ष !
लेकालाही निवडक गेम्स खेळायला देते. पण अर्थातच त्याला वेळेचं बंधन असतं. दिवसात २ तासापेक्षा जास्त नाही. त्याने बर्याच प्रकारे प्रयत्न केले ही वेळ वाढवायला. पण आता त्यालाही कळलंय, आम्ही बधत नाही ते !
अजिबात खेळू न देणं हा उपाय मला स्वतःला पटत नाही. पण पेरेन्टल कन्ट्रोल नक्कीच हवा.
अत्यंत ऊत्क्रुष्ट लेख, निवडक
अत्यंत ऊत्क्रुष्ट लेख, निवडक दहात समाविष्ट.
मी संगणक क्षेत्रात जवळपास गेल्या १८ वर्षापासून आहे. पण मी अगदी क्वचितच गेम्स खेळलोय. मला खुप कंटाळा येतो ऑनलाईन गेम्स खेळायला.
ईकडे (यु.के.) ऑनलाईन गेम्स ची प्रचंड क्रेझ आहे. एखादा नवा गेम रिलीज झाला की लोक आदल्या रात्रीपासुन रांगा लावुन तो गेम हजारो रूपयांत खरेदी करतात.
पण नीट निरीक्षण केले की जाणवते ह्यांच्या मध्ये संवादाचा अभाव आहे, मग स्वतःला कुठेतरी गूंतवायचे म्हणुन गेम्स...
आपल्याकडे ही हळुहळु हे फॅड वाढायला लागले आहे. पण काही अंशी पालक सुद्दा ह्याला जबाबदार आहेत. पाल्यांसोबत मैदानी खेळांमध्ये ईंटरेस्ट घ्यायला पाहीजे. त्यांना निसर्गाची ओळख करून द्यायला पाहिजे. लॅपटॉप घेऊन दिला किंवा कँपची फी भरली की आपली जबाबदारी संपली अशी भुमिका झाली तर मग सगळंच संपलं.
मुलांसोबतचा संवाद संपला किंवा कमी झाला की ते बिचारे जिथे त्यांना संवाद साधता येईल असे मार्ग शोधतात.
थोडक्यात संवाद संपला की विसंवाद सुरू होतो.
मंदार खूप छान लिहिलंय!
मंदार खूप छान लिहिलंय! मुलांमध्ये लहानवयापासुन जर मैदनी खेळांची आवड निर्माण केली तर हे प्रमाण बर्याच अंशी कमी होत असावं अस मला वाटतं. अर्थात हा माझा अनुभव आहे!
खुप छान लेख.. खरच
खुप छान लेख..
खरच इंटरनेटसुद्धा एक जहाल व्यसन बनत चालले आहे.
मनाचा ब्रेक ... उत्तम ब्रेक हाच उपाय योग्य राहिल.
मंदार, खरच खू.............प
मंदार, खरच खू.............प छान लिहिलयस. आज प्रत्येक घरतील हि समस्या आहे. आणि त्याच्या वरच तू प्रकाश टाकलास त्याबद्दल धन्यवाद. आताची पिढी यामुळेच वाया जात आहे. तुझ्या या पुर्ण लेखालाच माझे १००% अनुमोदन.
<<<<<<मंदार एक जळजळीत लेख. या खेळात एवढे गुंतवून ठेवणारे काय असते तेच मला कधी कळले नाही. घे बंदूक आणि मार गोळी. असे करुन प्रत्यक्ष गोळी मारायची वेळ आली, तर यांचे हात थरथरणार नाहीत, अशी भिती वाटते.>>>>>>>>दिनेशदा १००००००० मोदक.
(आपल्यालाही माबोचे व्यसनच लागलेले आहे. सावधान!!!!)
धक्कादायक! जेंव्हा माझी मुलं
धक्कादायक! जेंव्हा माझी मुलं या वयाची असतील तेंव्हा काय परिस्थिती असेल आणि मी काय करू शकेन काय माहित?! लेख मस्त लिहिलाय.. मुलांमधील व्यसनापासुन सुरू करुन माझ्यातलं व्यसन देखिल दाखवून दिलस याबद्दल आभारी आहे!!
पण मी कुठेतरी असही वाचलं की, स्वभावातील चिडचिडेपण, हट्टीपण, हिंसा याला हे गेम्स 'कारण' (cause) नसुन 'लक्षणं' (symptom) आहे.
>> सोशल नेटवर्किंगच्या संकेतस्थळांचे सभासदत्व घेतो खरे, पण मग त्याच बरोबर अनेक अनावश्यक गोष्टींमधे आपला सहभाग वाढतो
यात मायबोलीपण आली का?!!
छान लेख. आवडत्या दहात
छान लेख. आवडत्या दहात
मंदार खुपच उदबोधक लेख. एक
मंदार खुपच उदबोधक लेख. एक विदारक सत्य मांडलयस तु या लेखातून. मारधाडीचे हे असले खेळ नकळत्या वयात मनावर नक्कीच परिणाम करत असणार. आपल्या बंदुकीतून निघालेल्या गोळीमुळे एवढी माणसं सहज मरतायत आणि त्यामुळे आपल्याला पॉइंट्स मिळतायत यामुळे त्यांना काय संदेश मिळत असणार ते उघडच आहे.
पण याचबरोबर काही खरोखरचे सुरेख गेम्सही आहेत. पण मैदानी खेळ खेळण्याचा वयात ते सोडून हे असले गेम्स खेळणं हितावह नाहीच.
मंदार, खूप छान लेख आणि माहिती
मंदार, खूप छान लेख आणि माहिती देखिल. तंत्रज्ञानाच्या भस्मासूराचे एक रुप तू या लेखाद्वारे दाखवून दिलं आहेस. अश प्रकारच्या व्यसनमुक्तीसाठी देखिल समुपदेशन केंद्रे आहेत हे वाचुन थोडे समाधान देखिल वाटले.
खूप जणांनी 'मैदानी खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहन' वगैरे लिहिले आहे, खरं आहे ते. परंतु आता मैदानेच शिल्लक नाहीत मग ही मुले खेळणार कुठे? शिवाय शाळा, क्लासेस, बाकीच्या 'अॅक्टिविटिज' यामधुन त्यांना मिळणारा वेळ याचाही विचार व्हायला हवा.
अमेरिकेमधे शालेय विद्यार्थी बंदुन घेऊन हत्या करतात, त्यामागे दिनेशदादा म्हणाले तशीच मानसिक अवस्था असेल नाही कां???
मायबोली हे देखिल एक व्यसनच आहे. माझ्यापुरते सांगायचे झाले तर मी जेव्हा ऑफिसात नसतो तेव्हा देखिल मोबाईलवरुन लॉगिन होऊन आढावा घेत असतो. आता 'माबो व्यसनमुक्ती' यासठी कोणी समुपदेशन करणार असेल तर ते स्वागतार्ह आहे.
बाप रे भयानक आहे हे
बाप रे भयानक आहे हे सगळं.
>आता 'माबो व्यसनमुक्ती' यासठी कोणी समुपदेशन करणार असेल तर ते स्वागतार्ह आहे.
अगदी, अगदी
छान लेख , सायबर कॅफेत तासनतास
छान लेख , सायबर कॅफेत तासनतास गेम खेळत बसलेली मुलं पाहुन आश्चर्य वाटतं.
<<< आम्हाला निदान सलग अर्धातास मिळतो.>>> ये बात कुछ हजम नही हुवी
मंदार, व्हिडियो गेम्सची
मंदार,
व्हिडियो गेम्सची पार्लर्स, सायबर कॅफे, आंतरजाल इ. च्या लागलेल्या नवीन व्यसनाचा अगदी व्यवस्थित परामर्श घेतला आहेस.
“पुण्यातल्या मुक्तांगण या व्यसनमुक्तीसाठी काम करणार्या संस्थेत आता दारू आणि अंमली पदार्थांचे व्यसन याबरोबरच इंटरनेट व्यसनमुक्ती ही एक वेगळी उपचारपद्धती विकसित करण्यात आली आहे…………..”
लेखाच्या अनुषंगाने ही महत्वाची माहिती मिळाली.
सर्वच पालकांनी याबाबत सतर्कता बाळगली पाहिजे. एका मर्यादेपर्यंतच मुलांना घरातच ही साधने उपलब्ध करून दिल्यास आणि त्याना या गोष्टींचा अतीवापर म्हणजे व्यसन आहे समजावून सांगीतलं पाहिजे. अर्थात् पालकांची, यातलं गांभीर्य आणि संभाव्य धोके समजण्याची पात्रता असायला हवी हा महत्वाचा मुद्दा.
उत्तम लेख!
उत्तम लेख!
सुंदरे लेख आहे... अजून एका
सुंदरे लेख आहे... अजून एका वाढत्या समस्येवर प्रकाश टाकणारा..
(No subject)
Pages