फॅशन कशाशी खातात!
२००५ की २००६ साली 'ती' नावाचे एक मासिक चालू झाले त्यात 'फॅशन कशाशी खातात!" ही लेखमाला लिहिणार होते. त्यासाठी हा पहिला लेख लिहिला होता. तो त्या मासिकात प्रसिद्धही झाला पण माझ्याकडचा सातत्याचा अभाव आणि इतर अनेक कारणांन्वये लेखमाला काही होऊ शकली नाही. तोच पहिला लेख थोडी डागडुजी करून इथे टाकतेय. पहिला लेख टाकतेय म्हणजे मी पूर्ण लेखमाला लिहेन असं काही नाही.
-------------------------------------------------------------------
‘‘हल्ली आमच्या कॉलनीच्या गणपती उत्सवात आम्ही अगदी नवनवीन कार्यक्रम करतो बाई! या वर्षी आम्ही फॅशन शो पण करणारोत! आम्हा मोठ्या बायकांचा फॅशन शो बरंका..’’
‘‘हो का? म्हणजे काय करणारात?’’
"तू एवढी ड्रेस डिझायनर (नाही हो मी कॉश्च्यूम डिझायनर आहे!) आणि तुला नाही माहित? अगं आमच्या शेजारची ती अपर्णा आहे ना ती यावर्षी आमचा फॅशन शो बसवून देणारे."
(तो काय नाच आहे बसवून द्यायला!)
काकू उत्साहात सांगत होत्या त्यामुळे ’अरे वा!’ एवढंच म्हणून मी तिथनं सटकले. पण मग शिकलेलं, वाचलेलं सगळं मला म्हणायला लागलं की बये तुला खटकलंय ना, कळतंय ना काकू घोळ घालतायत म्हणून तर मग सांग तरी काय बरोबर आहे ते. कळू तरी देत सगळ्यांना. लिहूनच का नाही काढत तू? हं, कल्पना चांगली आहे असं म्हणून मी हे सगळं डोक्यात घडी घालून नीट ठेवून दिलं. मग आता इथे असं काही लिहिशील का असं विचारल्यावर आळस झटकून लिहायला लागल्याशिवाय पर्यायच नव्हता. असं लिखाण सुरू करायचं ठरलं. आता ही सगळी लेखमाला आपण फॅशन , कपडे, कॉश्च्यूम्स या शब्दांच्या आजूबाजूने झिम्मा घालणार आहोत.
तर श्रीगणेशा फॅशन म्हणजे काय इथूनच करूया. अगदी साधंसोपं म्हणायचं तर त्या त्या ठराविक काळात, ठराविक समाजात लोकप्रिय असणारी पद्धती. मग ती कपड्यात, सौंदर्य खुलवण्यापासून घर, वाहन अगदी वापरातल्या छोट्या छोट्या वस्तूंपर्यंत दिसते. म्हणजे अगदी रविवर्म्याच्या चित्राप्रमाणे नऊवारी नेसण्यापासून ते खाली घसरणारी जीन्स घालण्यापर्यंत सगळं. गुप्तकालात म्हणजे इसवीसनाच्या चौथ्या-पाचव्या शतकाच्या दरम्यान रंगीत कपडे, वैविध्यपूर्ण दागिने घातले जात ती एक फॅशन, स्वातंत्र्यपूर्वकाळात देशभक्तांची ओळख म्हणून वापरली जाणारी खादी ही पण एक फॅशन, पेशवाईच्या काळात नऊवारी साडी नेसून मग रेशमी शेला अंगभर पांघरूनच घराच्या बाहेर पडण्याची पद्धत ही ही फॅशनच. थोडक्यात काय हा शब्द जरी गेल्या काही दशकात आपल्याकडे रूळला असला तरी संकल्पना आपल्याकडेही जुनीच आहे.
कुठलीही पद्धत अशीच उगाचच जन्माला येत नाही. समाजाच्या प्रत्येक कानाकोपर्यात तिच्या जन्माची कारणं दडलेली असतात. कधी गरज असते, कधी एखादा महत्वाचा बदल असतो, कधी एखादा नवीन शोध असतो आणि हे सगळं आपल्यावर परिणाम करत असतं त्यातून आपली सगळ्यांची सौंदर्यदृष्टी घडत असते. कशाला एवढा मोठा शब्द वापरायचा... आपल्या सगळ्यांना काय बघावसं वाटतं, कसं दिसायला आवडतं हे सगळं आकार घेतं ते या वेगवेगळ्या कारणांच्यातून आणि मग त्यातून एक पद्धती जन्माला येते जी समाजमान्य असते किंवा कालांतराने होते.
कळपात किंवा विशिष्ठ गटात असणे ही माणसाची मूलभूत प्रवृत्ती आहे. या प्रवृत्तीतूनच फॅशन जन्म घेते. एखादी पद्धत जन्माला येते काही लोक ती स्वीकारतात. त्या पद्धतीला प्रतिष्ठा प्राप्त होते आणि मग ती पद्धती अनुसरणे हे प्रतिष्ठीत मानले जाऊ लागते. आणि मग त्या पद्धतीची फॅशन होते. म्हणजे कसं की माझ्या आधीच्या पिढीने मुलींनी पँट घालण्यावरून खूप विनोद ऐकले होते पण मी कॉलेजमधे पोचेपर्यंत ते सगळं विरून गेलेलं होतं. सब घोडे बाराटक्के पँट असं न म्हणता जीन्स, ट्राउझर्स, फॉर्मल्स इत्यादी शब्द रूळले होते. आणि आता शिक्षण संपल्यानंतर १०-१२ वर्षांनी मी जेव्हा शिकवायला जाते तेव्हा जीन्स हा तरूणाईचा गणवेश झाला आहे.
जेव्हापासून शरीर झाकण्याची सुरूवात झाली तेव्हापासून फॅशन अस्तित्वात आहे हे बघता हे फॅशन नावाचे प्रकरण केवळ झाकण्या-सजवण्यापुरते मर्यादीत नाहीये हे आपल्या लक्षात येतं. समाजात घडणार्या सगळ्या बर्यावाईट गोष्टींचे परिणाम फॅशनवर होत असतात आणि फॅशन ही ही समाजमनावर परिणाम करत असते. ही देवाणघेवाण खूप गमतीशीर असते. ती थोडीशी समजून घेऊया.
वस्त्रालंकार ही एक चिन्ह व प्रतिकांची भाषा असते जी शब्दांशिवाय त्या व्यक्तीबद्दल खूप माहिती देत असते. त्या व्यक्तीचे लिंग, वय, सामाजिक स्थान, आर्थिक स्थान, व्यवसाय, समाजातील ठराविक गटाचे असणे, वैवाहिक स्थिती, प्रादेशिकता, त्या ठराविक वेळेचे महत्व इत्यादींसाठी संपूर्ण कपडा किंवा त्यातला एखादा भाग हे चिन्ह असते. उदाहरणार्थ नऊवारी साडी म्हणजे मराठी स्त्री मग त्या नऊवारी साडीची नेसण त्या स्त्रीची जात, कामाचं स्वरूप सांगते आणि साडीचा रंग, मंगळसूत्र, जोडवी, हिरव्या बांगड्या हे तिच्या विवाहित असण्याचे सूचन करतात तर नाकातली नथ आणि आंबाड्यावरची वेणी कुठला तरी शुभप्रसंग असल्याचे सूचित करते. इतकं दूर कशाला जायचं जीन्स तीच पण त्यावर गमतीदार रंगाचा तोकडा टॉप कन्या कॉलेजकुमारी आहे हे सांगतो तर कॉटनचा शॉर्ट कुडता व्यक्ती आयुष्यात थोडी स्थिरावल्याचे दाखवतो. अशी काही ढोबळ उदाहरणं..
अशी चिन्हे वापरणारे कळप बनत जातात आणि मग ही चिन्हे असणारे कपडे हे त्या त्या गटाचे गणवेश असल्यासारखे होतात. उदाहरणार्थ; स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधींनी पगड्या, मुंडास्यांच्या ऐवजी गांधीटोपी घालण्याचं आव्हान केलं. महात्मा गांधींना मानणारे सर्वजण गांधीटोपी घालू लागले आणि मग गांधीटोपी घालणं हे देशभक्ती आणि स्वार्थत्यागाचं लक्षण मानलं जायला लागलं. देशभक्तीचा शिक्का बसण्यासाठी गांधीटोपी गरजेची पडू लागली. किंवा मग थोडं पल्याडचं उदाहरण, फ्रेंच राज्यक्रांतीनंतर सामान्यत्वाचं प्रदर्शन किंवा सामान्यांच्याबद्दलच्या आस्थेचं प्रदर्शन हे महत्वाचं ठरायला लागलं. अमीरउमरावांच्यासारखे कपडे असणं म्हणजे आपली मान कापून घेणं अशी दहशत पसरल्यामुळे सामान्यांच्या पट्टेरी ब्रीचेस लांब निमुळत्या टोप्या (फ्रिजियन हॅटस किंवा लिबर्टी बॉनेट) अश्या अनेक गोष्टी अमीरउमरावांच्या अंगावर दिसू लागल्या. आता या ठिकाणी मुळातल्या सामान्यत्व दाखवणार्या गोष्टी ह्या एका गणवेशाचा भाग झाल्या आणि त्या कळपात शिरण्यासाठी अमीरांनी त्या गोष्टी आपल्याश्या करून अजून एक वेगळा गणवेश निर्माण केला.
तंत्रज्ञान व शास्त्रात नवनवीन शोध लागत गेले आणि रोजच्या वापरातल्या गोष्टी बदलायला लागल्या. प्लॅस्टीकच्या शोधानंतर कृत्रिम कापड, कृत्रिम कातडं, कृत्रिम फर या गोष्टी बनू लागल्या. त्यामुळे या शोधानंतर १९५० च्या आसपास संपूर्ण कापडउद्योगाचेच रूप पालटले. याचा अर्थातच जगभरातल्या फॅशनवर परिणाम झाला. वेगळ्या प्रकारचे रंग, रेषा, वेगळ्या प्रकारचे कापड आणि वेगळ्या प्रकारचे आकार वस्त्रांच्यात वापरले जाऊ लागले.
फॅशन या संकल्पनेचं समाजाशी असलेलं नातं आहे ते असं. पण मग ज्याला फॅशन जगत म्हणतात ते नक्की काय आहे? शरीर झाकण्या-सजवण्याची सुरूवात झाली तेव्हापासून वेगवेगळ्या पद्धती येत गेल्या आणि कालबाह्य होत गेल्या आणि नवीन रूजत गेल्या. फॅशन डिझायनिंग/ फॅशनचे जगत या घटना मुळात पाश्चात्य. तर तिथे काय नि कसं घडलं त्याचाच धांडोळा घेऊ.
अमीरउमरावांच्या आवडीनिवडी, आजूबाजूची परिस्थिती इत्यादी गोष्टींतून पद्धती बदलत असत. अमीरउमरावांच्या स्त्रिया व राजघराण्यातील व्यक्ती त्यांना कश्या प्रकारची फॅशन हवी हे आपापल्या कुटुरियेंना सांगत असत. कुटुरीये या शब्दाचा अर्थ अत्यंत सुबक आणि सुंदर काम करणारे कपड्यांचे कारागिर असा घेता येईल. उच्च दर्जाचे शिवणकाम, विणकाम, भरतकाम आणि वापरलेल्या वस्तूही अत्युच्च दर्जाच्या असा सगळा हा मामला. अश्या कपड्यांना ऑत कुटूर (Haute Couture) म्हटले जाते. ऑत या फ्रेंच शब्दाचा अर्थ उच्च दर्जाशी निगडीत आहे तर कुटूर चा अर्थ सुबक कारागिरीशी. उच्च दर्जाची सुबक कारागिरी असलेले कपडे म्हणजे ऑत कुटूर किंवा हाय फॅशन. अर्थातच हे फक्त राजघराणी आणि अमीरउमराव यांनाच परवडू शकत होते. या ऑत कुटूर संकल्पनेचा इतिहास अठराव्या शतकातपर्यंत मागे जातो. नवीन पद्धतीचे कपडे चढवलेल्या लाकडी बाहुल्या एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी पाठवून त्यातून त्या त्या पद्धतीचा प्रसार करण्याची प्रथा या काळात होती. पण पद्धती बदलायला हव्या असे सांगणारे किंवा घडत असलेल्या गोष्टींचा आढावा घेऊन नवीन बदल कसा असेल हे सूचित करणारे लोक या ठिकाणी नव्हते.
पद्धती ठरवणारे वा घडवणारे हे एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अस्तित्वात आले. ज्यांना फॅशन डिझायनर्स अशी संज्ञा मिळाली. १८५८ साली चार्ल्स फ्रेडरीक वर्थ या माणसाने स्वतःचे टेलरींगचे दुकान उघडले वेगवेगळ्या प्रकारचे, रंगांचे गाउन्स बनवून त्याचे खर्याखुर्या माणसांच्या अंगावर त्यांचे प्रदर्शन करण्याची त्याने सुरूवात केली. या नवीन कल्पनेला सर्वांनी उचलून धरले. असा जन्म झाला फॅशन शो या संकल्पनेचा. तस्मात फॅशन शो म्हणजे माणसांनी वेगवेगळ्या पद्धतीने चालून दाखवण्याचा प्रयोग नसून डिझायनरने बनवलेल्या वेगवेगळ्या कपड्यांचे खरेदी करू इच्छिणार्यांसमोर मांडलेले प्रदर्शन. असे प्रदर्शन ज्यात कपडे माणसांच्या अंगावर घातलेले असतात आणि अनेक कोनांतून फिरून ही माणसे ते कपडे कुठल्याबाजूने कश्यापद्धतीने दिसेल हे सर्वांना दाखवत असतात. आपण जेव्हा एफटीव्ही वर एखादा फॅशन शो बघतो तेव्हा त्या फॅशन शो ला त्या त्या डिझायनरचे नाव असते. मॉडेल्सचे चालणे, थबकणे, फिरणे हे सगळे त्या त्या कपड्यातले महत्वाचे भाग, कपड्यातले सौंदर्य उठून दिसावे या पद्धतीने बसवलेले असते. तर अश्या प्रकारच्या फॅशन शोजचा आद्य प्रणेता हा चार्ल्स फ्रेडरीक वर्थ हा होता. याला पहिला फॅशन डिझायनर मानले जाते. १८७० व १८८० च्या दशकात पॅरीस मधल्या फॅशन जगताचा तो सर्वेसर्वा होता.
मोठी मोठी कुटूर हाउसेस, फॅशन सिंडीकेट, वेगवेगळे डिझायनर्स, भारतातलं फॅशन जगत, जगाच्या नकाशावर भारतीय फॅशन या गोष्टींची अजून ओळख आपण पुढच्या काही भागात करून घेणारच आहोत. फॅशन, कापड आणि कपड्यांच्या दुनियेची माहिती करून घेण्याच्या या आपल्या मोहिमेतलं हे पहिलं पाउल. आत्ता कुठे दार थोडसं किलकिलं झालंय आणि आपण तोंडओळखीच्या दालनात प्रवेश केलाय. मग तयार रहा पुढच्या प्रवासासाठी. भेटूया पुढच्या महिन्यात.
संदर्भसूची:
- Survey of Historic Costume: Tortora,Phyllis & Eubank, Keith: Fairchild Publication
- Costumer’s Manifesto: www.costumes.org
- http://www.fashion-era.com
Haute coutureचा उच्चार 'ओत
Haute coutureचा उच्चार 'ओत कुत्यूर' असा आहे. 'ओत' = उंच. >>.
अहो बास आता! कीती लाजवता त्यांना!
नी, चांगली सुरवात केली आहेस,
नी, चांगली सुरवात केली आहेस, 'फॅशन' म्हणजे काय याचा छान आढावा घेतला आहेस. आता पूर्ण कर ही मालिका. वर चिन्मयने लिहील्याप्रमाणे Haute Couture चा उच्चार 'ओत् कुत्यूर' असा आहे. 'त' चा उच्चार पूर्ण करायचा नाही आणि 'त्यू' चा उच्चार अलगद करायचा. माझे '२ पैसे' इथेच लिहीले तर चालतील का? तुला काय वाटत ते कळव म्हणजे मी हे लेखन इथून हलवते.
'फॅशन डिझायनिंग' आणि 'कॉस्च्यूम डिझायनिंग' या दोन्ही वेगवेगळी क्षेत्रं आहेत. दोन्हीची व्यापकता वेगळी आहे. 'कॉस्च्यूम डिझायनिंग' बद्दल नीरजानं सखोल लिहीलं आहे. माझा त्या क्षेत्रातला अभ्यास नाही त्यामुळे मी त्यावर जास्त लिहू शकत नाही. पण 'फॅशन डिझायनिंग' शिकल्यामुळे थोडंस त्याबद्दल लिहीते.
'फॅशन' ही फक्त कपड्यांशी संबंधीत नाही, नसते. 'फॅशन' या संकल्पनेत अनेक गोष्टी अंतर्भूत असतात. वर नीरजानं लिहलं आहे त्याप्रमाणे या संकल्पनेची व्याप्ती अगदी घराची अंतर्गत सजावट ते रोजच्या वापरातल्या छोट्या छोट्या गोष्टी अशी अमर्याद आहे. पण फक्त कपड्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर केसाच्या रचनेपासून पायातल्या चपलांपर्यंत सगळ्या गोष्टी अंतर्भूत होतात. त्यात अगदी कुठल्या प्रकारच्या धाग्यानं ड्रेस शिवायचा, कपड्यांना कुठल्या रेशमी धाग्यानं भरतकाम (Embroidery) करायचं या गोष्टीही येतात. तसंच कपड्यांची 'फॅशन' ही फक्त स्त्रियांच्या कपड्यांच्या संदर्भात नसते, नाही. लहान मुलांचे कपडे, पुरूषांचे कपडे, तरूण मुला-मुलींचे कपडे, त्यांच्या सर्व accessories इतकंच नाही तर प्रसंगानुरूप, वेळेनुसार, ऋतूंनुसार वापरण्याचे पर्फ्युम हे सर्वदेखिल त्यात येतं. यातल्या प्रत्येक गोष्टींचा सखोल अभ्यास करण्याइतपत वेगळा विषय होऊ शकतो.
फॅशनची सुरूवात फ्रान्समधे झाली. कारण मुळात 'कला' या प्रकाराला सुरवातीपासून फ्रान्समधे प्रोत्साहन मिळालं आणि तिथे फॅशनकडे एक कला म्हणूनच पाहिलं गेलं. तसंच उच्च अभिरूचीच्या, वेगळ्या धाटणीच्या कपड्यांबाबत दृष्टीकोन, ते स्विकारण्याची वृत्ती, त्यासाठी मिळणारं प्रोत्साहन, परवडण्याची क्षमता या सगळ्या गोष्टी फ्रान्समधे होत्या. शेजारचं जगावर साम्राज्य गाजवणारं इंग्लंड परंपराप्रिय असल्याने तिथे वेगळ्या प्रकारचे, धाटणीचे कपडे स्विकारणं तसं कमी होतं. पण तरीही इंग्लंडमधले अमीर उमराव, सरदारांच्या बायका फ्रान्समधून उंची कपडे खरेदी करत आणि हळूहळू फ्रेंच डिझायनरचे कपडे हा 'Status Symbol' झाला, जो अजूनही जगभरात मानला आहे. आज 'पॅरीस' आणि इटली मधलं 'मिलान' हे फॅशनचे मक्का-मदिना किंवा फॅशनची पंढरी, 'फॅशन' मधला शेवटचा शब्द मानला जातो. त्यानंतर लंडन. हळू हळू स्पेनमधल्या माद्रीद या शहराला देखिल पॅरीस, मिलान, लंडन या शहरांच्या बरोबरीनं महत्व येत आहे. असं म्हटलं जातं की संपूर्ण जगात खरे Haute Couture कपडे परवडणारे आणि खरेदी करणारे फक्त २०० च्या आसपास लोक आहेत. 'ऑस्कर' साठी वापरले गेलेले गाऊन्स/कपड्यांकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं असतं. त्यामुळे त्या समारंभात वापरले गेलेले कपडे हा अभिनेत्यांसाठी अत्यंत महत्वाचा मुद्दा असतो, पण कित्येक अभिनेत्यां त्या ड्रेसेसच्या किंमती परवडू शकत नाहीत. त्यामुळे त्या अभिनेत्याने/अभिनेत्रीने ज्या चित्रपटात काम केले आहे, त्या चित्रपटाची निर्मीती करणारी संस्था त्यांच्या मदतीला येते आणि या कार्यक्रमाच्या वेषभूषेचा खर्च उचलते जो अगदी ५-६ मिलीयन डॉलर्सपर्यंत किंवा त्यापेक्षाही जास्त जाऊ शकतो. आज फॅशन इंडस्ट्री 'बिलीअन डॉलर इंडस्ट्री' मानली जाते. सध्या जगभरातली वार्षिक उलाढाल १० बिलिअन डॉलर्सपेक्षा जास्त आहे.
'फॅशन डिझायनींग' शिकणे म्हणजे काय? मी फॅशन डिझायनींग शिकत असताना विचारला गेलेला प्रश्न. या क्षेत्राकडे बघण्याचा निदान मध्यमवर्गीय लोकांचा दृष्टीकोन थोडा तुच्छतेचाच होता. शैक्षणिक यश मिळवता न येणार्या मुलांसाठी हे क्षेत्र आहे असं लोकांना वाटायचं. 'फॅशन डिझायनींग' = टेलरींग किंवा कपडे शिवणं असं समीकरण होतं. पण फॅशन हे फक्त तेव्हढंच नाही. ती एक कला आहे. एका ६-७ मीटर लांबीच्या कपड्याच्या ताग्याला एखाद्या व्यक्तीच्या अंगकाठीला, personality ला शोभेल, त्या व्यक्तीच्या मूळ सौंदर्यात भर घालतील किंवा ते सौंदर्य खुलवतील, इतरांच्या नजरेला सुखावाह होईल, एखाद्या समारंभासाठी योग्य असे final product तयार करणे. त्यासाठी मूळ डिझाईन, त्याचं pattern making, cut, शिवण्याची पध्दत, वरून केलेले भरतकाम, जरीकाम, पेंटींग अशासारख्या गोष्टींचा विचार करावा लागतो. या सगळ्या गोष्टींमधे सर्वात महत्वाची आणि डिझायनरची ओळख निर्माण करणारी गोष्ट म्हणजे कपड्यांचे 'Cuts'. एखादं अगदी साधं डिझाईन, अगदी साधं कापड असूनही कपड्याच्या कट्समुळे अप्रतिम दिसतं तर अत्यंत भारी कापड वापरून बनवलेलं सुंदर डिझाईन कट्स गंडले असतील तर बेढब, विद्रूप दिसू शकतं. कटस शरीरबांध्याला शोभून दिसतील असे असणं अतिशय महत्वाचं आहे.
ही कला काय आहे किंवा वर लिहीलं आहे इतपतच मर्यादित असते का? नक्कीच नाही. आम्हाला डिझाईन्ससाठी वेगवेगळ्या 'थीमस' दिल्या जायच्या. एकदा 'वांगं' ही थीम दिली होती. आता वांगं वापरून काय डिझाइन करणार? तर वांग्याचे वेगवेगळे रंग, देठाचा रंग, किंवा हे दोन्ही रंग एकत्रित करून त्यारंगाचे ड्रेसेस तयार करायचे, वांग्यावर असलेले रेषांचे डिझाईन्स, त्याच्या पोताप्रमाणे दिसणारं, त्याप्रमाणे स्पर्श जाणवणारं कापड वगैरे गोष्टी वापरून केलेली डिझाईन्स अशा असंख्य प्रकारची वेगवेगळी डिझाईन्स तयार झाली होती. तसंच एकदा 'गॉसीप' हा विषय दिला होता. एका विद्यार्थ्याने सगळी डिझाईन्स एकाच cycle मधल्या रंगात बनवली होती म्हणजे निळा, हिरवा आणि पिवळा आणि एकच डिझाईन लाल रंगात बनवलं होतं. कागदावर डिझाईन्स काढताना त्याने निळा, हिरवा आणि पिवळा या रंगाचे एकत्र काढले आणि लाल रंगाचं जरा लांब.
मला विचारलेला दुसरा प्रश्न म्हणजे मॉडेल्स रँपवर चालताना अशा वेगळ्या पध्दतीनं का चालतात? या चालण्याच्या पध्दतीला 'कॅटवॉक' म्हणतात. मांजर कसं चालतं याचं बारकाईनं निरीक्षण केलत तर लक्षात येईल की पाय टाकताना ते बरोबर एका रेषेत, एका पुढे एक टाकतं. तसंच मॉडेल्स चालताना एकापुढे एक सरळ रेषेत पाय टाकून चालतात. अशा पध्दतीनं चालताना कपड्यांच सौंदर्य खुलावं, त्याचे कटस नजरेत भरावेत हा हेतू असतो.
लोक करतात म्हणून, ट्रेण्ड आहे म्हणून किंवा दुसर्या कुणी केलेली आवडली म्हणून फॅशन करण्यात अर्थ नाही. आपल्याला जे सूट होतं, चांगलं दिसतं ती फॅशन. आणि अशी 'योग्य' फॅशन तुमचा ट्रेण्ड म्हणून रुढ होऊ शकते, तुम्ही असा ट्रेंड सुरू करू शकता. ग्रेसफुल दिसण महत्वाचं, फॅशनेबल नाही. रूढार्थाने अभिनेत्री रेखा सुंदर नाही. ती फार फॅशनेबल मानली जात नाही. पण तिचा मेक-अप, साड्या, दागिने याचा तिने एक ट्रेण्ड सुरु केला. तिला जे शोभलं तेच तिनं वापरलं. त्यामुळे फॅशन इंडस्ट्रीमधे तीचं उदाहरण नेहमी वापरतात.
सुंदर लेख नीरजा मालिका
सुंदर लेख नीरजा मालिका पुर्ण कर नक्की.
मुळ लेखापेक्षाही अंजलीचा
मुळ लेखापेक्षाही अंजलीचा प्रतिसाद्/माहिती जास्त आवडली. खुपच छान लिहिलं आहे.
अंजली, मी तुला म्हणणारच होते
अंजली, मी तुला म्हणणारच होते की लेखमाला मी एकटीने लिहिण्यापेक्षा( जे होईल अशी शक्यता कमीच) तू पण अॅड कर तुझे लेख.
मला क्लोदिंग हिस्टरी या अंगाने बर्यापैकी माहिती आहे कारण कॉश्च्युम आणि फॅशन दोन्हीमधे ती एक समान गोष्ट शिकायला लागते.
पण चार्ल्स फ्रेडरीक वर्थ नंतरचे फॅशन जगत कसे कसे विस्तारत गेले. सिंडीकेट म्हणजे काय, कसे बनले हे सगळे? किंवा वरती बहुतेक डेलियाने जो प्रश्न विचारलाय आर्थिक गणितासंदर्भाने (कुटूर ते मासप्रॉडक्शन/ नॉकआउट्स इत्यादी) याची मला केवळ तोंडओळख आहे. तुझा या विषयातला अभ्यास असल्याने तू जास्त चांगलं लिहू शकशील त्याबद्दल. किंवा तुला अजून काय महत्वाचे मुद्दे वाटत असतील तर तेही घेऊन.
आशुचँप,
डिस्क्लेमरची गरज नाही.
>>>>>मला विचारायचे आहे की ही जी फॅशन तुम्ही म्हणाला तशी बदलत आलीये ती बदलण्यात हातभार पुरुषांचाच असेल ना. कारण स्त्रीयांनी कुठले कपडे घालावे हे देखील पुरुषच ठरवत असतील ना.<<<<<
याला हो आणि नाही अशी दोन्ही उत्तरे देता येतील. समाजाची मानसिकता हा मुद्दा कळीचा ठरेल. रिक्षा वा जाहिरात म्हणून नाही पण शक्य झाल्यास मार्च महिन्याच्या माहेर च्या अंकातला माझा 'आतली गोष्ट' हा लेख वाचून बघा. तुमच्या प्रश्नाची उत्तरे काही प्रमाणात तिथे नक्कीच मिळतील.
लेख माहेरसाठी लिहिलेला असल्याने तो मी ऑनलाइन टाकणार नाहीये.
>>>हो पण मला असे म्हणायचे आहे की तो पेहराव करण्याची सक्ती होती का त्यांच्यावर...आणि बदल पुरुषांपासून स्त्रियांकडे होत गेला का उलटं. (फॅशनच्या बाबतीत पुरुष स्त्रियांच्या दहा पावले मागे असतात असे म्हणतात). पण इतिहासात आधी पुरुषांचा पेहराव बदलला आणि त्या अनुषंगाने स्त्रियांचा का उलटे का दोघांचा परिस्थितीतनुसार बदलत गेला?<<<
हो पुरूषांवर पण ठराविक डेकोरमची सक्ती होती. दरबार, देवाधर्माची कृत्ये वगळता इतर ठिकाणी ती स्त्रियांवरच्या सक्तीपेक्षा कमी रिजिड होती इतकच. स्त्रियांनी आधी बदल स्वीकारले की पुरूषांनी याचं उत्तर प्रत्येक कालखंडासाठी, प्रत्येक प्रदेशासाठी वेगळे आहे. आणि त्यामागची कथा प्रत्येक ठिकाणी तितकीच इंटरेस्टींग आहे. आपल्याकडे आज जी आपली म्हणून गोल साडी नेसली जाते तिच्या आत नेसला जाणारा परकर हा पाश्चात्य आहे... तर पुरूषांचे पँटशर्ट हे आख्खेच पाश्चात्य आहे मुळात.
>> गांधीटोपी घालण्याचं आव्हान
>> गांधीटोपी घालण्याचं आव्हान केलं.
इथे आवाहन म्हणायचय का?
>> ऑट कुटूर. आधी निदान नीट काय शब्द आहे ते समजून घ्या.
एवढी चुकीची माहिती एवढ्या आत्मविश्वासाने ! अंजलीने सांगितल्या प्रमाणे 'ओत् कुत्यूर' असा उच्चार आहे.
(अरे बाबांनो... देवानी गुगल दिलाय ना... ते वापरा की... इथे काय भांडत बसता.)
आमच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातही फॅशन शो व्हायचा.. त्यात बरेच प्रवेश असायचे.. (तसं मुलांना एकाच प्रवेशाशी घेणं देणं असे ). एकंदर आपल्याकडे फॅशन शो बदनाम झालाय. बाहेरचे 'साधे' फॅशन शो (ज्यात रोज वापरायचे कपडे दाखवले जातात) कोणी बघत नाही. त्यामुळे एकंदर फॅशन शो कपड्यांसाठी नसून मॉडेल्ससाठी असतो असा समाज असतो. तुझ्या लेखांमुळे आमच्या ज्ञानात भर पडेल!
आम्ही फ्रांसमधे आल्यावर बऱ्याच जणांनी विचारलं की 'फॅशन शो पहिला का?'! जसं काही पॅरिसच्या रस्त्यांवर फॅशन शो होतो... ते पण बरोबर आहे म्हणा.. इथे येण्याआधी मलापण असच वाटत असेल पण परत यायच्या आधी एखादा शो बघायचा बेत आहे!
पॅरिस फॅशनची राजधानी असली तरी इथल्या लोकांचे कपडे 'कै च्या कै' नसतात. साधारण माणसांचे कपडे साधेच पण नीटनेटके असतात. शिवाय सिझन (हिवाळा-उन्हाळा) नुसार बदलतात.
इथले टीनेजर्स इतके विचित्र कपडे घालतात! बहुतेक 'तरुण रक्त', मनमानीपणा वै मुळे सगळ्यांपेक्षा आपण हटके दिसायला पाहिजे अशी इच्छा असेल. पण होतं काय... त्यामुळे सगळे टीनेजर्स एकसारखेच दिसतात!!!
वाचते आहे. लिहीत रहा.
वाचते आहे.
लिहीत रहा.
नी चा लेख आणि अंजलीचा उपलेख
नी चा लेख आणि अंजलीचा उपलेख दोन्ही आवडले. दोघी मिळून पूर्ण करा लेखमाला.
लोक करतात म्हणून, ट्रेण्ड आहे म्हणून किंवा दुसर्या कुणी केलेली आवडली म्हणून फॅशन करण्यात अर्थ नाही. आपल्याला जे सूट होतं, चांगलं दिसतं ती फॅशन. आणि अशी 'योग्य' फॅशन तुमचा ट्रेण्ड म्हणून रुढ होऊ शकते, तुम्ही असा ट्रेंड सुरू करू शकता. ग्रेसफुल दिसण महत्वाचं, फॅशनेबल नाही. >>>>
ह्या सगळ्याला अनुमोदन.
फॅशन शो मधले कपडे जसेच्या तसे
फॅशन शो मधले कपडे जसेच्या तसे घालणं अवघड किंवा अशक्य आहे. ती पिसं बिसं लावतात ते मला वाटतं कापडाला आणि कपड्याला कॉम्प्लिमेन्टरी असतात. बाकी रंग, कापड, त्यावरचे वर्क ह्याचे काय काँबिनेशन होउ शकते हे त्या फॅशन शो मधल्या कपड्यांवरुन कळते. स्वतः डिझायनर तरी ते कपडे जसेच्या तसे विकायला ठेवत नसतील.
आणखी एक, भारतीय कपड्यांच्या विशेषतः सांड्यांच्या नेसायच्या, पदर घ्यायच्या पद्धती सुद्धा फार विचित्र वाटतात. पुन्हा ते साडी आणि ब्लाउजचे डिझाइन एक्स्पोझ करण्यासाठी तशा नेसतात.
ही वेगवेगळे फॅशन शो बघताना मी स्वतःचीच केलेली समजुत आहे
बाकी लहानपणापासून मांजरीच मांजरी पाळल्याने कॅट वॉकला 'कॅट वॉक' का म्हणायचं हा प्रश्न कधी पडला नाही
सॅम, साधनाने सांगितल्या
सॅम,
साधनाने सांगितल्या प्रमाणे 'ओत् कुत्यूर' असा उच्चार आहे.>>> साधनाने नाही, चिन्मय आणि मी लिहीलय त्याच्याबद्दल.
पॅरिस फॅशनची राजधानी असली तरी इथल्या लोकांचे कपडे 'कै च्या कै' नसतात. साधारण माणसांचे कपडे साधेच पण नीटनेटके असतात. >>>> याबद्दल आणि वर साधना, डेलिया, मामी, गोजिरी यांनीही काही प्रश्न विचारले आहेत. त्याबद्दल थोडं लिहीते.
गणेशोत्सवासारख्या कार्यक्रमांमधून, कॉलेजच्या गॅदरींगमधून सध्या फॅशन शो होतात, लोक अगदी इंटरेस्ट घेऊन पहातात. पण नक्की काय पहातात? मॉडेल्स! कारण भारतात फॅशनकडे पहाण्याचा दृष्टीकोनच वेगळा आहे. वर मी म्हटल्याप्रमाणे 'फॅशन' ही एक 'कला' आहे, असं पाश्चात्य देशात समजलं जातं. आपल्याकडे लोक 'फॅशन' कडे कुठल्या दृष्टीनं पहातात? 'कॅटवॉक' करणं ही देखिल एक कला आहे. कारण असं चालताना कपड्यांचं डिझाईन, pattern, highlight व्हावं असा उद्देश असतो. मॉडेलची अंगकाठी त्यासाठी महत्वाची असते, त्यासाठीच उंच मॉडेल्सना मागणी असते. तिच्या/त्याच्या कातडीचा रंग, सौंदर्य या गोष्टींना महत्व दिलं जात नाही. आपल्याकडे नेमका उलट प्रकार बघायला मिळतो. असा कॅटवॉक करत चालताना कपडे संभाळता येणं, चालता चालता पोझेस देउन विशीष्ठ कोनातून कपडे दाखवणं हे देखिल महत्वाचं आहे. या सगळ्या गोष्टी करताना तांत्रिक सफाईप्रमाणेच 'ग्रेस' असणं फार आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टी गणेशोत्सवात फॅशन शो करणार्या हौशी कॉलेज कन्यकांना जमतील का? या सगळ्या गोष्टी जमल्या नाहीत की मग तो कॅटवॉक हास्यास्पद, विनोदी वाटतो. भारतातल्या अगदी हाताच्या बोटांवर मोजण्या इतक्या कमी मॉडेल्सना पाश्चात्य देशात 'फॅशन मॉडेल' म्हणून जम बसवता आला याचं कारणही हेच आहे- या मॉडेल्सचा कॅटवॉक नीट नसतो. आपल्याकडे याबाबतीत ट्रेनिंग नसणे ही एक मोठी अडचण आहे. पण तेच नाओमी कँप्बेल सारखी कृष्णवर्णीय तरूणी 'सुपर मॉडेल' बनली. ती रूढार्थानं सुंदर नाही, तरी आजपर्यंतची सर्वात यशस्वी मॉडेल आहे. तिच्या कॅटवॉकची पध्दत अतिशय ग्रेसफुल आहे. ज्यांनी फॅशनचा अभ्यास केला आहे किंवा त्यातली माहिती आहे, अशा लोकांना बाकी मॉडेल्सचे चालणे आणि नाओमीचे चालणे यातला फरक लगेच लक्षात येईल.
फॅशन शो करताना त्यात लाईटस, साऊंड, रँप, ambiance या सगळ्या गोष्टी प्रभावीपणे वापराव्या लागतात. तरच तो फॅशन 'शो' होईल ना? या सगळ्या गोष्टी हौशी फॅशन शो मधे असतात का? थोडक्यात (जुन्या) लता मंगेशकरांचा गाण्याचा प्रोग्रॅम आणि गल्लीतल्या एखाद्या हौशी मुलीचा गाण्याचा प्रोग्रॅम या जेव्हढा फरक आहे, तेव्हढाच फरक प्रोफेशनल फॅशन शोज आणि हौशी फॅशन शोज मधे आहे.
क्रमश:
oops.. अंजली, चूक सुधारली!
oops.. अंजली, चूक सुधारली!
अंजली खुपच छान लिहिलयं ,असं
अंजली खुपच छान लिहिलयं ,असं प्रतिसाद म्हणुन टाकण्यापेक्षा , स्वतंत्र लेख म्हणुन टाकलं तर सगळ्यांना वाचता तरी येईल.
नीधप, छान लेख! मामींचा प्रश्न
नीधप, छान लेख! मामींचा प्रश्न मलाही पडला...
अंजलीचे प्रतिसादही आवडले!
फॅशन शोज मधले जे कपडे मॉडेल घालतात ते बाहेर कुणी घालू शकतं का - ह्या प्रश्नाबाबत:
माझ्या माहितीप्रमाणे - ते कपडे कुणी बाहेर घालून फिरावं म्हणून नसतातच... ते डिझायनरची क्रिएटिविटी दाखवण्याकरता असतात.
फॅशन शोज मधले जे कपडे मॉडेल
फॅशन शोज मधले जे कपडे मॉडेल घालतात ते बाहेर कुणी घालू शकतं का - ह्या प्रश्नाबाबत:
माझ्या माहितीप्रमाणे - ते कपडे कुणी बाहेर घालून फिरावं म्हणून नसतातच... ते डिझायनरची क्रिएटिविटी दाखवण्याकरता असतात.>>> बरोबर. मी लिहीते आहे त्याबद्दल.
नी, अंजली, दोघींचीही माहिती
नी, अंजली, दोघींचीही माहिती उपयुक्त. आणखीन येऊ द्या.
मला एक प्रश्न आहे - बेफिकिर
मला एक प्रश्न आहे - बेफिकिर यांच्या कथांची भलावण करणारे येथे का येत नाहित वा इथले लोक बाकी कोणाच्या कथांची भलावण का करत नाहित ?
अच्छा, तर नीधप ह्यांना सुद्धा
अच्छा, तर नीधप ह्यांना सुद्धा उच्चाराबद्दल प्रश्ण पडु शकतात तर. मला वाटले त्यांच्या व्यवसायाशी संबधित वापरात येणारे शब्द , त्यांचे उच्चार सर्व त्यांना ज्ञात असतील. असो.
लेखाचे हे नाव वाचून असेच वाटले की लोकं इतकी 'बहुधा' अजाण नसावीत कि अगदी फॅशन कशाशी खातात अशी स्थिती असेल. आता काकू(वरच्या लेखातील काकू टाईप) टाईप लोकं अथवा काही जणं असतिल अनभिज्ञ. त्या विषयाची गोडी नसली तर नसते माहिती इतकेच. का तो त्यांचा प्रश्ण आहे.
पण आताच्या ई-जगात वा मार्केटिंग व चॅनलचा सुळसुळाट असताना फॅशन काय असते, ट्रेंड कसा सेट होतो, फॅशन शो का होतात असे मॅगझिन(vogue etc), टीवी द्वारा कळतेच. प्रत्येकाचा खोल अभ्यास नसतो/नसेल वा तितका ईंटरेस्ट नसतो/नसेल.
टीवीवर एक चॅनल यायचा(नाव नाही आठवत) त्याच्यावर यूरोप सारख्या व इतर देशातील फॅशन शो दाखवत व अशीच माहिती देत कि फॅशन शोचा उद्देश काय असतो.. क्रियटीविटी, नवीन प्रकारच्या कापडी मालाचे(मटेरियल) प्रदर्शन,नवीन मौसमाचे कपडे, बाहेरचे मार्केट मिळवणे असे व वगैरे वगैरे हेतु.
नाहितर गूगलला देव मानले की मिळते बेसिक माहिती.
पोस्ट खवचट वाटत असेल तर काहि करु शकत नाही पण हे एकदम स्प. व प्रा. मत आहे.:)
अच्छा, तर नीधप ह्यांना सुद्धा
अच्छा, तर नीधप ह्यांना सुद्धा उच्चाराबद्दल प्रश्ण पडु शकतात तर. मला वाटले त्यांच्या व्यवसायाशी संबधित वापरात येणारे शब्द , त्यांचे उच्चार सर्व त्यांना ज्ञात असतील >>>
खुप मस्त लेख. अजंलीच्या
खुप मस्त लेख. अजंलीच्या पोस्टी पण खुप मस्त.
नी, अंजली, लिहीत रहा. वाचतेय
नी, अंजली, लिहीत रहा. वाचतेय मीही.
नी, मस्त लेख, नविन वेगळं
नी, मस्त लेख, नविन वेगळं काहीतरी वाचायला मिळतंय!
अंजलीचा उपलेख ही छान... अजुन पुढे वाचायला आवडेल.
अंजली, सुरेख माहिती.
अंजली, सुरेख माहिती.
नीधप, मस्त माहिती. संपूर्ण
नीधप, मस्त माहिती. संपूर्ण लेखमाला वाचायला नक्कीच आवडेल.
अंजलीच्या पोस्टस् पण छान.
डेलियाला पडलेला प्रश्न मलाही पडतो नेहमी.
नी, मस्त लेख. लेखमाला पूर्ण
नी, मस्त लेख. लेखमाला पूर्ण कर.
अंजली, तुझेही लेखन मस्त आहे. एका लेखमालेअंतर्गत तुम्ही दोघींनी स्वतंत्रपणे लेखन केलेत तर ते जास्त वाचनीय होईल असे मला वाटते.
नी, माहितीपुर्ण लेख, अंजलीने
नी, माहितीपुर्ण लेख, अंजलीने लिहिलेले उपलेख सुद्धा आवडले.
अर्थात फॅशनबद्दल बरेच प्रश्न आहेत ते हळुहळु उलगडतील अस वाटतय.
अंजली, खुप संयत पणे लिहित आहेस.
पहिला लेख टाकतेय म्हणजे मी
पहिला लेख टाकतेय म्हणजे मी पूर्ण लेखमाला लिहेन असं काही नाही.
>>
पाय दाखवा आपले जरा. पहिल्याच पॅरात असं लिहिलंयस म्हणजे 'पुर्ण करच' असा हट्ट करता येणार नाहीय, तरीही वेळात वेळ काढुन लेखमाला पुर्ण करायचं मनावर घेच. आम्हालाही एका नवीन दुनियेची ओळख होईल त्यानिमित्ताने.
नीरजा, आवडला लेख. लिहित राहा.
नीरजा, आवडला लेख. लिहित राहा.
अंजलीच्या पोस्ट्स सुरेख. मंजूडीला अनुमोदन.
नीरजा, चांगला लेख.
नीरजा, चांगला लेख. अंजलीच्याही पोस्ट माहितीपूर्ण. दोघींनी मिळून लेखमालिका लिहीलेली आवडेल.
छान माहिती. अजुन वाचयला
छान माहिती. अजुन वाचयला नक्की आवडेल !
लोक्स सध्या अंजलीला पिडा...
लोक्स सध्या अंजलीला पिडा... ती फायनली लिहायला घेतेय या विषयावर. वो मेरेसे बेटर लिखेंगी इसपे
Pages