मोगरा, पावसाचा वास आणि बीएमडब्ल्यू!!
जुनेच ललित. अजून काय फारसा फरक पडलेला नाही.
----------------------------------------------------
"खरं सांगतो, त्या गाडीची टेस्ट राइड घेतली तेव्हा मनापासून वाटलं की काय करतोय आपण हे सगळं? कला बिला सब झूठ आहे गं. आपण पण आता पैसा कमावला पाहिजे."
मित्र भारावून सांगत होता. आम्ही गारूड्याच्या पुंगीवर डोलावं तसं त्या बीएमडब्ल्यू स्पोर्टसकारचं वर्णन मंत्रमुग्ध होऊन ऐकत होतो.
"असा तो सिल्व्हर कलर. आतमधे थोड्या डार्क सीटस त्याही लेदरच्या. नव्या कोर्या लेदरचा तो वास! म्हणजे मोगर्याचा आणि पहिल्या पावसाचा वास सोडून इतका महान वास अजून कशाचा असू शकेल असं वाटत नाही."
आम्ही गाडीत आधीच बसलो होतो.
पहिल्या पावसात, नव्याकोर्या लेदर सीटस असलेल्या बीएमडब्ल्यूमधे मोगर्याचा गजरा हातात घेऊन बसायचं.. सुखाची परमावधीच की. झालं! ठरलं! हे कधीतरी जमलं पाहिजेच.
पैसा कमवायचाच हे परत एकदा अधोरेखित झालं होतं डोक्यात. बास झालं आता कलेसाठी समर्पण.
इतकं खपलो, आत्ता पैसा नाही कमावला तर कधी?
येणार्या कामाचं बजेट विचारल्याशिवाय बाकी काही बोलायचंच नाही असा परत एकदा मी निश्चय केला. आणि मोबाइल वाजला. नोकियाचं ते जुनं पुराणं मॉडेल बघत मी स्वत:लाच वचन दिलं की आता बास ही गरीबी.
नृत्यांगना अमुक तमुक नवीन बॅले करतायत त्यासाठी त्यांनी डिझाइन करायला बोलावलं. शक्यच नव्हतं वेळेचं. घरात एका पाठोपाठ एक ८ दिवसाच्या अंतरानी दोन लग्नं होती. अगदी जवळची. पण घरातली धावपळ बाजूला ठेवून मी गेले धावत. जेवढं शक्य तेवढं करून दिलं. हाती आला एक चेक ज्यावरची रक्कम बघून स्पॉटबॉय पण लाजला असता. वर 'तुला वेळ नव्हताच ना तपशीलात सगळं करायला त्यामुळे या ताइंनीच सगळं निभावून नेलं.' अशी उगाच गिल्टी वाटायला लावायची मखलाशी. निश्चय गेला तेल लावत!
नंतर दिल्लीहून फोन होता. एका बाइंचा. कुठूनकुठून त्यांना माझा संदर्भ मिळाला होता. आणि आता त्यांना त्यांच्या पुस्तकातल्या महाराष्ट्राच्या विभागासाठी माझ्या 'एक्सपर्टीज' ची गरज होती.
दिल्लीवाला फोन, मधाळ हिंदी आणि माझ्या 'एक्सपर्टीज' चा उल्लेख. पैशाचं विचारायचं राहूनच गेलं ना.
बाईंच्या सहायिकेबरोबर इकडे फिर, तिकडचे फोटो काढ असं करत करत ४ - ५ दिवस नुसतेच निघून गेले. यातच मराठी साडी नेसवून दाखवायला त्या मागच्या नृत्यांगनेच्या एका नवख्या शिष्येचे दोन तास मागितले तर नृत्यांगना बाई म्हणतात, "पैशे किती देणार?"
"मी नंतर फोन करते!"
आता आयत्यावेळेला काही प्रात्यक्षिक स्वत:वर काही अश्याच एका दत्तूवर दाखवून. दिल्लीवालीचं काम पूर्ण झालं. दिल्लीहून एक इमेल आला (यावेळेला फोन नाही!) आभाराचा.
आमचा खिसा रिकामाच राह्यला.
मराठी फिल्म करायचीये म्हणून जुनी ओळख सांगत एक जण आला. ऐतिहासिक चित्रपट. आणि बजेट म्हणाल तर डोकीच्या वस्तूलाही पुरणार नाही. इथे आमचा निश्चय होता मोठा. कपड्यांचे एवढे, माझे एवढे. जमत असेल तर ठिक नाहीतर जाउदेत. "आपली जुनी ओळख म्हणून मी तुझ्याकडे आलो. आणि तू एवढं बजेट सांगतेस?" "अरे पण ऐतिहासिक करायचं तर बजेट लागतं तेवढं. नगाला नग वस्तू वापरायच्यात का? शेवटी माझ्या reputation चा पण प्रश्न आहे." "पण ही काय रक्कम झाली?" "तुला १०० चा मॉब हवा, २५ ब्रिटिश शिपाई आणि २५ ब्रिटिश पोलिस हवेत, महत्वाच्या व्यक्तिरेखा १०, भरपूर अॅक्शन सीक्वेन्सेस म्हणजे कपडे डबल डबल एवढं सगळं जमवायचं/ बनवायचं तेही इतिहासाप्रमाणे तर किमान दोनेक लाख तरी नकोत? आणि मी, माझे असिस्टंट राबणार ५० दिवस मग मला काहीतरी पैसे मिळायला नकोत? माझ्या असिस्टंटस ना काहितरी द्यायला नको?" "ते काय मला माहित नाही. तुझ्या पेमेंटसकट कपड्याचं सगळं ८०००० मधे भागव!" "शक्य नाही तू दुसरी व्यक्ती बघ!"
माझ्यावर पैशाची हाव असल्याचा शिक्का बसला.
माझा खिसा रिकामाच होता तेव्हा.
तशी तक्रार अशी काहीच नाही. पण चांगलं काम तेच ज्यात पैसे मिळतात मग ते कितीही अ आणि अ का असेना हे आता पटायला लागलंय.
सध्या मला मोगरा परवडतो. पावसाचा वास आपला आपण येत असला तरी तो उपभोगायला सवड होत नाही आणि बीएमडब्ल्यू चं चित्रही मी विकत घेतलेलं नाही.
- नी
सहीच. 'पैसे मिळतात की मिळत
'पैसे मिळतात की मिळत नाहीत?' आणि 'क्रिएटिव्ह काम करायला मिळतंय की मिळत नाही?' या दोन प्रश्नांमधला कळीचा कुठचा, ते मी अजूनही नाही ठरवू शकलेलो- जगायचं आहे तोवर पाट्या टाकायलाच लागणार हे आजवर साडेसत्तावन्न हजार वेळेला ढळढळीत कळून चुकल्यावरही.
जुनेच ललित. अजून काय फारसा
जुनेच ललित. अजून काय फारसा फरक पडलेला नाही. ...
खरंच कला आणि पैसा यांचा ताळमेळ घालणं कठीण आहे का? पण नितीन देसाईंच उदाहरण आहे की. नी, तुला पैशांबाबत ठाम रहायलाच हवं. जर तू १००% देत असशील तर तुला १००% मिळालेच पाहिजेत. भावना, मैत्री आपल्या जागी, व्यवहार आपल्या जागी.
लवकरच तुझ्या दारी दोन-दोन बीएमड्ब्ल्यु झुलोत अशा शुभेच्छा.
अगदी अगदी साजिर्या.... त्यात
अगदी अगदी साजिर्या....
त्यात आपला थुकरट भिडस्त स्वभाव. स्वतःचे पैसे मागायला लाज वाटणारा...
सहीय, आवडलं हे पण.
सहीय, आवडलं हे पण.
नी, खरच ग खरच काही एक बदल
नी, खरच ग खरच काही एक बदल झालेला नाही परिस्थितीत. भिडस्तपणाचे वारसदार.
>सध्या मला मोगरा परवडतो. >>
>सध्या मला मोगरा परवडतो. >> मलाही फक्त मोगराच परवडतो. भापो अगदी.
चांगलं काम तेच ज्यात पैसे
चांगलं काम तेच ज्यात पैसे मिळतात मग ते कितीही अ आणि अ का असेना हे आता पटायला लागलंय.<< सहीये
भारी..
भारी..
मस्तच लिहिलेय एकदम.. सध्या
मस्तच लिहिलेय एकदम..
सध्या मला मोगरा परवडतो
अजुन किती दिवस असेच फक्त मोगरा परवडण्यातच घालवणार हा विचार मनात येऊन डोळे अचानक पाणवले
प्रत्येकाची स्वप्ने वेगळी आहेत पण त्यांच्याकडे घेऊन जाणारा मार्ग मात्र एकच आहे आणि तो मार्गच वेळोवेळी हुलकावण्या देतो. अगदीच जास्त जळजळ वाटायला लागली तर 'समयसे पहले और भाग्यसे अधिक कभी किसीको मिलता नही' हे गीतावाक्य आहेच मलमपट्टी करायला....
चांगले काम तेच ज्याच्यात पैसे मिळतात... हे सोला आने सच.. मोग-याच्या पुढेही प्रगती करायची असेल तर जिथे पैसे आहेत तेच चांगले म्हणायलाच पाहिजे. एकदा खिशे भरुन सांडायला लागले की मग क्रियेटिवीटीची ऐश पोटभर करता येईल.
नीरजा, जुनं म्हणते आहेस पण
नीरजा,

जुनं म्हणते आहेस पण आधी वाचल्याचं स्मरणात नाही.. जुनं ते सोनं म्हणायचं का?
असो.
माझा अनुभव असा आहे: काम चांगले असेल तर पैसा मिळतोच फक्त तो वसूल करता यायला हवा. (मराठी आणि मारवाडी यात नेमकी हाच फरक आहे!)
आणि "धंदे मे कोई बाप, भाई, बेहेन...." हे नानाचं परिंदा मधलं वाक्य लक्षात ठेवायच
नीधप तुमच्या या लेखावरून मला
नीधप तुमच्या या लेखावरून मला डोंबार्याचा आणि चाबकाचे फटके मारणार्यांचं चित्र डोळ्यासमोर आलं.
शेवटी काय दोरीवरची कसरत करताना हातात काठी असते पण नशिबाच्या काठीचं काय तिथं सावरायला कुठली काठी आणायची. पोटापाण्यासाठी का होईना पण तोल सावरावाच लागतो. मलाही जिवघेणी कसरत करता येते, मलाही सर्कशीत जाऊन चार पैसे कमवायचे आहेत, जरीचे कपडे घालून हवेत झेप घ्यावीशी वाटते. पण करणार काय? त्यापेक्षा बरंय ना रंगेबीरंगी ठिगळांचा झगा घालून थोड्यावेळासाठी का होईना मनोरंजन करता येतंय.
पण माझ्या कलेचं मोल आणि सर्कशीतल्या जरीच्या कपड्यातल्या परीचं मोल कोण मला समजावून सांगणार? आणि कोण मला मिळवून देणार?
त्यापेक्षा पहिल्या पावसातल्या मातीचा सुगंधच बरा.. निदान तो कुठल्याही कुपीत सहजासहजी बंद करून बाजारात तस्साच्या तसा तर मिळत नाही ना?
मी माझ्यापरीने जितकं सुंदर करता येईल तितकं सुंदर बनवण्याचा प्रयत्न करेल एवढं मनाशी निश्चय केला कि तोलमोल के बोल बदलायला वेळ लागत नाही.
नी, मोगर्याचा आणि पावसाचा
नी, मोगर्याचा आणि पावसाचा वास चकटफू असतो.
बी एम डब्ल्यू ला वट्ट पैसे पडतात..
हाच धडा घ्यायचा ना ?
'पैसे मिळतात की मिळत नाहीत?'
'पैसे मिळतात की मिळत नाहीत?' आणि 'क्रिएटिव्ह काम करायला मिळतंय की मिळत नाही?' या दोन प्रश्नांमधला कळीचा कुठचा, ते मी अजूनही नाही ठरवू शकलेलो- जगायचं आहे तोवर पाट्या टाकायलाच लागणार हे आजवर साडेसत्तावन्न हजार वेळेला ढळढळीत कळून चुकल्यावरही.>>
त्यात आपला थुकरट भिडस्त स्वभाव. स्वतःचे पैसे मागायला लाज वाटणारा...>>
अगदी अगदी. दोघांना १००% अनुमोदन. पाणीच आलं डोळ्यात. अस्तित्वाच्या प्रश्नांना सोपी उत्तरे नसतात.
मनाची ओढाताण, नाहीतर पैशाची. सध्या रात्रीचा अंधार ह्या प्रश्नानेच व्यापलेला असतो.
अजुन किती दिवस असेच फक्त मोगरा परवडण्यातच घालवणार > तुम दिल छोटा मत करो साधना. आपण ताजमहाल बांधतो आहोत असे समजून असायचे.
त्यापेक्षा पहिल्या पावसातल्या
त्यापेक्षा पहिल्या पावसातल्या मातीचा सुगंधच बरा.. निदान तो कुठल्याही कुपीत बंद करून बाजारात विकायला ठेवत तर नाही ना.>> ठेवतात ना. मिट्टी का अत्तर म्हणतात त्याला.
नी, माबोवर वावरताना मला जर
नी, माबोवर वावरताना मला जर कुणी विचारलं की इथली अगदी भंकस, भांडकुदळ, ....... व्यक्ती कोण? तर कुठलाही विचार न करता अगदी तुझच नाव तोंडात येईल. हे सगळं मत बनतं तुझ्या इतरांच्या बीबीवरील प्रतिक्रियांवरुन.
पण अधे मधे तु असे काही लेख टाकतेस ना, की सगळं विसरुन म्हणावसं वाटतं, "ये गं नी... एक कप कॉफी पिऊ...."
त्या प्रतिक्रियामधली कणखर नीपेक्षा ही नी... आवडेशु.......
मी देखील या अवस्थेतून गेलोय
मी देखील या अवस्थेतून गेलोय जातोय. पण हळूहळु म्हणजे २० वर्षांनंतर पैसे वाजवून घेण्यास सुरवात केलीय आणि हळूहळू यश येउ घातलेय. काही आपली किंमत अवाच्या सव्वा सांगितली तरच लोकांना ती पटते. फार रिझनेबल सांगितली तर टेकन फॉर ग्रांटेड असा माझा अनुभव आहे. तेव्हा तुम्ही ज्या क्षेत्रात काम करताय त्यात तर हे अगदी लागू पडते.पहा ट्राय करून.
चांगलं लिहिलयं, बकासुरला
चांगलं लिहिलयं, बकासुरला अनुमोदन.
माणसाने नेहमी अंथरुण बघुन पाय पसरावेत.
*
*
अश्विनीमामी मी हे पहिल्यांदाच
अश्विनीमामी मी हे पहिल्यांदाच ऐकलं. यापुर्वी मला ते माहित नव्हतं. पण १०० % तसंच्या तसं अत्तर मिळतं या बद्दल अजूनही शंका आहे. मी ती लिंक तुम्हाला विचारपुस मधून पाठवत आहे.
ठीकच आहे.. काम चांगले असेल तर
ठीकच आहे..
काम चांगले असेल तर पैसा मिळतोच फक्त तो वसूल करता यायला हवा. >>>> पटला..
@ नी, अगदी मस्त लिहिलायेस अणि
@ नी, अगदी मस्त लिहिलायेस अणि पूर्ण मान्य, ( आमचा ह्या टीपिकल situation साठी एक ठरलेला dialog आहे, cleint ला मारुती च्या price मधे mercedes पाहिजे )
creative काम अणि त्याचे चांगले पैसे हा सुवर्ण मध्य गाठन खरच खुप अवघड आहे. "पैसे मिलने ही एक टास्क, अणि वेलेवर मिलने ही त्याहुनही खुप्प्प्प अवघड अणि डोकेखाऊ टास्क. आणि त्यात भिडस्त स्वभाव :(" (सगळ्या आर्टिस्ट चा असतो की काय? )
मी ही हल्लीच ४ मह्नियापुर्वी पाट्या टाकायला पुन्हा एकदा सुरुवात केलिए.
cleint ला मारुती च्या price
cleint ला मारुती च्या price मधे mercedes पाहिजे <<<

करेक्ट आमच्याकडे सायकलच्या किमतीत हवी असते मर्सिडिझ!
मामी, योग्य उदाहरण. प्रयत्न आहे बघूया.


योग, शिकतेय मी अजून.
अमा, गहिवरलात ना!!
बाकी सगळे...
नी, मस्त लेख... साजिर्याच्या
नी, मस्त लेख...
सुरूवातीला माझी बर्याचदा ही गोची व्हायची.
साजिर्याच्या संपूर्ण प्रतिक्रियेला अनुमोदन!
आणि त्यात आपला थुकरट भिडस्त स्वभाव. स्वतःचे पैसे मागायला लाज वाटणारा... >>
हल्ली मात्र भिडस्त स्वभाव बदलला मी प्रयत्नपूर्वक! कोणाची कसली रिक्वायरमेंट आली तर लग्गेच मेल करून कोटेशन पाठवून देते ५०% अॅडव्हान्स अशी ठळक नोंद असलेली. नवीन जॉब साठी एच आर वाल्यांचे फोन आल्यावर सरळ सांगते, माझे नॉलेज व एक्स्पिरिअन्स निगोशिएबल नाहीये, जमतंय तर सांगा नाहीतर दोघांचाही अमूल्य वेळ वाया नको जायला.. सगळ्याच ऑफर्स मंजूर नाही होत पण एक समाधान की आपले कष्ट, क्वालिटी काम आणि क्रिएटिविटी चकटफू नाहीये, त्याला मोल आहे ही जाणीव!!!
हा आता अगदीच बीएमडब्ल्यू नाही पण काही छोट्या छोट्या गोष्टी घेतानाही दहावेळा विचार करणारी मी, हल्ली मनाला कमीवेळा मारते...
अगदीच आवाक्याबाहेर नाहीये पण थोडी जास्त महाग आहे आणि गरज नाहीये, पण तरीही मनाच्या आतून सतत वाटतेय एखादी गोष्ट घ्यावीशी तर मन का मारा?
मोगर्याचा वास मात्र अजूनही आवडतो... आणि म्हणून मोगरा फक्त परवडतो म्हणून नाही तर मनापासून आवडतो म्हणून घेते... आजही घ्यावासा वाटला, घेतला, घातला...
काम चांगले असेल तर पैसा मिळतोच फक्त तो वसूल करता यायला हवा.>>१०००% अनुमोदन!!!
>सध्या मला मोगरा परवडतो. >>
>सध्या मला मोगरा परवडतो. >> हे सही.
काही आपली किंमत अवाच्या सव्वा
काही आपली किंमत अवाच्या सव्वा सांगितली तरच लोकांना ती पटते. फार रिझनेबल सांगितली तर टेकन फॉर ग्रांटेड असा माझा अनुभव आहे.>> सुनिल जोग, १००००००००% अनुमोदन!!! त्यामुळे स्पर्धक चिकीत्सा (Competition Analysis) आणि बाजारमूल्यमापन (Market Research) हे फक्त मार्केटिंगवाल्यांसाठीच नव्हे तर सर्व फ्रीलान्सर्स व बिझीनेस वाल्यांसाठी महत्वाचं आहे.
खामोश. ( दिवे दिवे ) आपल्याला
खामोश. ( दिवे दिवे )
आपल्याला फारवेळ भावनाप्रधान राहता येत नाही. मोगरा व मिट्टीका अत्तर. प्रत्येकी १० ग्रॅम ची बाटली घ्या. सर्व सुगंध कायम आपल्या पाशी.
अगदी बरोबर लिहीले आहेस ग. यू मस्ट कीप रायटिंग.
मोगरा व मिट्टीका अत्तर.
मोगरा व मिट्टीका अत्तर. प्रत्येकी १० ग्रॅम ची बाटली घ्या. सर्व सुगंध कायम आपल्या पाशी.<< इसको कहते है मार्केटिंग!!
मिट्टीका अत्तर. <<< एकदम नविन
मिट्टीका अत्तर. <<< एकदम नविन माहिती, आता याबद्दल उत्सुकता वाढलीये, मामी तुमच्या कडून माहिती अपेक्षीत
मस्तच लेख. आधीपण खूपच आवडला
मस्तच लेख. आधीपण खूपच आवडला होता. हे मस्त काम केलंस सगळं परत टाकायचं.
आणि हो, तुम्हा कलाक्षेत्रातल्या लोकांना नमस्कार !!
पैसे डावलून फक्त कलेची सेवा करणं खरंच खूप अवघड. तुझ्या कोर्या BMW साठी खूप सार्या शुभेच्छा. सगळ्याचा वास कसा वाटतो ते सांग इथे येऊन नक्की.
छान लेख.
छान लेख.
Pages