१७ डिसेंबर,स्थळ: ठाणे स्टेशन.... "अरे सुट्टी नाही मिळणार आणि वैयक्तिक कारणांमुळे पियुष पण येऊ शकणार नाही." गोपिचा फोन आला. हरीहर चा बेत बोंबलला.सगळी तयारी झाली होती अन नेमक्या वेळेवर दोन मित्रांना प्रॉब्लेम आला.दोन दिवसांची सुट्टी वाया जाणार म्हणुन थोडा निराश झालो.शेवटी या निराशेवर उतारा म्हणुन एक दिवसाचा ट्रेक करायच ठरवल.पवनामावळ प्रांतातल्या रखवालदाराला भेटण्याच ठरल.त्यात पण दुसर्या दिवशी रोहनने टांग मारली.मग गोपी,प्रदिप आणि मी असे तीन शिलेदारांनी जायच नक्की केल.शनिवारी (१८ डिसेंबर) रात्री निघायच पक्क झाल.ठाण्यावरुन कामशेतला जाणार्या पॅसेंजर ट्रेनची तिकिटे (प्रवासी भाडे: दर माणसी १८ रु.) काढली.साडे-अकराची शिर्डी-पंढरपुर फास्ट पॅसेंजर पकडली.त्या पॅसेंजरचे मागचे अर्धे डबे शिर्डीला अन पुढचे पंढरपुरला असे पुण्याहुन अलग होणार होते.जनरल डब्यात चढलो.गर्दी बर्यापैकी कमी होती.सिटवर बसायला भेटल नाही तरी आरामात उभ राहु शकलो.पुढे कल्याण गेल्यानंतर मधल्या पॅसेजमध्ये ठान मांडुन बसलो.झोप तर येत नव्हती पण आमच्या गप्पा सुरु होत्या.रात्रीचा गारवा आता वाढला होता.या पॅसेंजरला फास्ट का म्हणत असतील अस सारख वाटत होत.प्रत्येक दोन स्टेशनानंतर थांबत होती.सिग्नलनी पण हैराण करुन सोडल होत.शेवटी डुगुडुगु करत सव्वातीन च्या दरम्यान कामशेतला पोहोचली.
'थंडी'.... कामशेतला उतरल्यानंतर या शत्रुने आम्हाला चहुबाजुने घेरले.कानटोपी,जर्कीन अशी हत्यार बाळगली होती म्हणुन आम्ही निर्धास्त होतो.त्यात पण प्रदिपने स्वेटर आणला नव्हता.मग आमच्याकडच्या शाल त्याला बहाल केल्या.स्टेशनवर शुकशुकाट होता.बाहेर आलो तर रस्तेसुद्धा ओसाड होते.फकस्त चंद्र आमच्या सोबतीला होता.आता येथुन कुठे जायच काहीच माहित नव्हत.कारण आंतारजळावरुन गोळा केलेल्या माहीतीचा कागद गोपी घरी विसरुन आला होता.येथुन काळे कॉलनी पर्यंत जायच एव्हढच त्याला माहीत होत.थोड पुढे जाऊन बघुया म्हणुन आम्ही चालु लागलो. तर कुत्र्यांचा भुवभुवाट कानी पडला मग आम्ही माघारी फिरलो.उजडेपर्यंत येथेच थांबुया असे ठरविले.थंडितला गुलाबी चंद्र बघत बसलो.तेव्हढ्यात एक डुक्करगाडी (सहा आसनी रिक्षा) येताना दिसली."काळे कॉलनी पर्यंत जाणार का?",आम्ही विचारले.गाडी कामशेत गावातलीच होती.त्यांनी आम्हाला शिवाजी चौकात सोडले.येथुन काळे कॉलनीला जायला सकाळी एस.टी मिळेल असे त्याने सांगितले.चौकातुन पुढे गेल्यावर पुढे एक हायवे (जुना मुंबई-पुणे)लागला.तेथेच थोडा वेळ घुटमळ्यानंतर कामशेत गावातुन एक ओमनीवाला येताना दिसला.त्याने सांगितले हायवे क्रॉस करुन पलिकडे जो रस्ता आहे तो काळे कॉलनीकडे जातो.तेथुन सकाळी जाणार्या दुधाच्या गाड्या भेटतील.हायवे क्रॉस करुन पलिकडे गेलो.काळे कॉलनी-१३ कि.मी,तिकोना पेठ- २० किमी. चा बोर्ड दिसला.थोड्या वेळाने एका मागोमाग एक अशा दोन दुधाच्या गाड्या येताना दिसल्या. आम्ही हात केला पण शहाणा थांबला तर नाहीच,पण कट मारुन पुढे गेला.आम्ही थोडा वेळ एका दुकानाच्या व्हरांड्यात कुडकुडत बसलो.अजुन एक दुधाची गाडी आली.पण ती काळे कॉलनी ला जाणार नव्हती.शेवटी परत आम्ही हायवे ओलांडुन चौकात आलो.समोरच्या कामशेत हॉस्पिटलच्या पायर्यावरती लवंडलो. त्या हॉस्पिटलच्या व्हरांड्यात दोघेजण झोपले होते.प्रदिप ने तर कहरच केला .त्याच्या बाजुला असलेल्या बिछान्यात जाऊन लवंडला.थंडी आता बोलायला लागली होती.पायर्यावरती एक डुलकी काढली.जाग आली तर पावणे सहा वाजले होते.हॉस्पिटलच्या समोरच हॉटेल उघडल होत.मस्त गरमागरम चहा मारला तेव्हा थोड हायस वाटल.चहा मारुन हॉटेलच्या बाहेर आलो तोच एस.टी येताना दिसली.दर माणशी अकरा रुपयाची काळे कॉलनीला जाणारी तिकिटे फाडली.
काळे कॉलनीला पोहोचलो तर हळुहळु उजडायला लागल होत.येथुन तिकोना पेठ ला जाणारी गाडी आठला येणार होती.आताशी कुठे पावने-सात वाजत होते.म्हणुन आम्ही हे सात-आठ कि.मी. अंतर चालत जायच ठरविले.तीन कोनांची टोपी चढविलेला तिकोना लांबवर दिसत होता.क्षितिजावर हळुहळु लाली फुटु लागली होती.थोड पुढ गेल्यानंतर काळे गाव लागल.पक्ष्यांची किलीबिलाट सुरु झाली.मस्त अशी रम्य पहाट झाली होती.रात्रीचा क्षीण कुठल्याकुठे पळुन गेला होता.
उजळल्या दिशा...
चढली एक अनोखी नशा...
ओसरली मंद निशा..
उगवली धुंद उषा..
पहाटेच्या त्या मंत्रमुग्ध वातावरणाचा आस्वाद घेत चाललो होतो.
थोड चालल्यानंतर समोर पवना धरण दिसले.त्या धरणाच्या अलीकडे आता दोन रस्ते फुटले.एक धरणाच्या उजवीकडे जातो अन दुसरा डावीकडे तिकोना पेठकडे.आम्ही डावीकडे वळलो.त्या रस्त्याने पुढे गेल्यावर एक पुल लागला.पुलाखालुन धरणातुन सोडलेल्या पवना नदीच्या पाण्याचा प्रवाह वाहत होता.
हा परिसर खुप मोहक अन वेड लावणारा होता.त्या पाण्यावरती धुक्याची दुलई पसरली होती.आम्ही अचंबित होऊन सृष्टीचा तो नजारा बघत होतो.थंडीमुळे आमच्या तोंडातुन तर वाफा निघत होत्याच पण त्या नदिच्या सुद्धा...
पाण्यावरची धुक्याची दाट चादर पाहुन अस वाटत होत की तिच्यात हरवुन जाव.
सकाळी न्याहरीसाठी आलेला हा खंड्या.....
डोळ्याचे पाते लवते न लवते तोच आपले भक्ष्य घेऊन पसार झाला.पाण्यावरती फक्त जलतरंग उमटले.
बगळा सुद्धा आपल्या कार्यात मग्न होता.
अशा या निसर्गाच्या दर्शनाने मन तृप्त झाले.पण पोट अजुन भरल नव्हत.गाड्यांची वर्दळ आता चालु झाली होती. पण आम्ही चालत जाणे पसंत केले.
पुर्वेकडुन सुर्यदेव डोंगराआडुन हळूहळू वरती सरकत होते.
त्यांच्या या लाल-पिवळ्या किरणांनी सगळा आसंमत भारून टाकला.सुर्याच हे बाल्यावस्थेतील्(सकाळचे) रुपड डोळ्यांना सुखावणार होत.
थोड पुढे गेल्यावर उघड्या माळरानावर भटक्या लोकांची पालं पडलेली दिसली.पोटापाण्यासाठी सर्व लवाजम्यासोबत यांना दाही दिशा कुठ कुठ भटकायला लागेत असेल ना. ..
डोईवर छप्पर...
निळ्या आकाशाचे ...
झोपायला अंथरुन...
काळ्या मातीचे ...
डोंगराची एक चढण पार करुन वरती आलो.सुर्यनारायण आपले तेजोवलय फेकत होते.त्याच्या किरणांनी धुक्याच साम्राज्य मिटवायला सुरुवात केली होती.आता फक्त त्याचेच राज्य चालनार ना..
पुढे एका वळणावरती तुंगचे दर्शन झाले.
हा मुळ रस्ता सोडुन आम्ही बाजुच्या पायवाटेकडे वळलो.पवना जलाशय आम्हाला खुणावत होता.पाण्याच्या ओढीने आम्ही धावतच तेथे गेलो.
मोदकासारख्या दिसणार्या तुंगचे पवनामध्ये प्रतिबिंब पडल होत.
निळ पाणी ...
निळ आकाश...
कसली हि वाणी..(खळखळणार्या पाण्याची)
अन कसला हा पाश...
हि अशीच एक होडी....पवना
मोडकळीस आलेली... हा किनाराच आता तिचा शेवटचा साथिदार...
या पाण्याने हात-पाय धुऊन घेतले.पोटात भर टाकली.थोडा विसावा घेतला.
पाण्याच्या या लहरींवर सुर्यकिरण स्वार झाले होते.
येथुन निघायचा मोह होत नव्हता.पण पुढच ल़क्ष्य गाठायच होत म्हणुन पुढे आम्ही कुच केले.तिकोना बराच लांबवर दिसत होता.गडाच्या पायथापर्यंत जायला अजुन एक डोंगर चढुन जायचा होता.
एकाबाजुला पवना जलाशय अन तुंग वर नजर ठेवत तिकोनाकडे सरकत होतो.
रस्त्याच्या बाजुला जाताना काही फार्महाऊसेस दिसली.फुलांच्या बागा लावलेल्या दिसल्या.
कुठे गुर तर कुठे शेळ्या-बकरी चरायला आलेली दिसली.
पुढे गेल्यावर परत रस्त्याला दोन फाटे फुटले.एक सरळ पौड,जवन कडे जातो अन दुसरा वरती तिकोना पेठ.घाटाच्या रस्त्याने चढुन वरती आलो.गोपी थोडा थकल्यासारखा वाटत होता.कारण जवळ-जवळ वर्षभरानंतर तो ट्रेक करत होता.अडीज-तीन तासाच्या पायपिटीनंतर गावात पोहोचलो.पण सकाळचे जे वातावरण अनुभवल त्यामुळे त्या पायपीटीच सार्थक झाल्यासारख वाटल.त्यामुळे न थांबता आम्ही गडाकडे वाटचाल चालुच ठेवली.गाव तस छोटस.२०-२५ उंबर्याच असेल.गावाच्या सुरुवातीला शाळा नजरेला पडते.रस्त्याच्या दुतर्फा कौलारु घर अन प्रत्येक घराच्यासमोर झाडे लावलेली आढळली.अशाच एक घरासमोर प्रदिप एक छोट्या मुलाचा फोटो काढायला गेला.बाळ अंगणात मस्त खेळत होत अन प्रदिपला पाहुन त्याला रडुच फुटल.
पुढे गावातल एक मंदिर लागल.त्या मंदिराच्या मागुन जाणारी ही वाट गडाच्या पायथ्यापर्यंत जाते असे गावकर्यांकडुन कळल.
आता एकच लक्ष्य ......
तिकोना...... तीन कोनांची टोपी चढविलेला म्हणजे याचा आकार पिरॅमिडसारखा आहे.वितंगगड या नावाने सुद्धा हा गड ओळखला जातो.या गडाची उंची समुद्रसपाटीपासुन साधारणतः ३६३३ फुट आहे.मलिक अहमद निझामशहा याने १५८५ च्या सुमारास हा गड ताब्यात घेतला.नंतर बरेच वर्षे हा निझामशाहीच्या अधिपत्यात होता.१६५७ च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांनी तिकोना तसेच लोहगड,विसापुर,सोनगड,कर्नाळा,माहुली असे कोकणपट्ट्यातले किल्ले जिंकले.पुढे १६६५ च्या पुरंदरच्या तहात हा गड गमवावा लागला.पण नंतर मराठ्यांनी हा परत मिळवला.
तिकोनाला पवनामावळ प्रांताचा रखवालदार म्हणतात. कारण हा गड या प्रांताच्या मध्यभागी येतो.येथुन चहुबाजुला नजर ठेवता येते.सह्याद्रीतला बोरघाटच्या रांगेत प्राचीन गुहा,लेण्या (कारले,भाजे,बेडसे,भंडारा आणि शेलारवाडी )कोरलेल्या आहेत.तुंग,तिकोना,विसापुर्,लोहगड या गडाची बांधणी त्या लेण्यांच्या सरंक्षणासाठी केलेली असावी. या गुहा,लेण्या बुद्ध आणि हिन्यानाच्या काळातील आहेत.म्हणजे या प्रांतातले गड इसवी सन ८०० -१००० या काळात बांधलेले असावेत.तिकोनावरसुद्धा सातवाहन काळातील गुहा आहेत.
आता सुर्य तळपायला लागला होता.पण मध्ये अशी झाडी आली कि हायस वाटायच.
या रस्त्याने जाताना बांबुची बरीच झाडे दिसली.
तिकोनाचा बालेकिल्ला,दरवाजा अन गडाची तटबंदी नजरेस पडली. पण या दरवाजाने जाणारी वाट वेगळी आहे हे नंतर आम्हाला समजले.
वाटेत हि (खाज्-खुजली) सुद्धा भेटली.
जवळ-जवळ वीस ते पंचवीस मिनिटानंतर येथे पोहोचलो.येथपर्यंत चार-चाकी गाडी आरामात येऊ शकते.
आता येथुन ट्रेकला खरी सुरुवात होणार होती.
पाण्याने तहान भागवल्यानंतर चढणीसाठी सज्ज झालो.सुरुवातीला थोडी अंगावर येणारी चढण लागली.
नंतर एका डोंगराच्या सोंडेने चालत राहिलो.किल्ल्याच्या खुणा दर्शविणार पडलेल दगडी बांधकाम मध्ये-मध्ये दिसत होत.
उन्हाची दाहकता आता चांगलीच जाणवायला लागली होती.त्यात गोपीची बॅटरी डाऊन झाली होती.हा गड खर म्हणजे सोप्या प्रकारात मोडतो.पण बर्याच दिवसांनी ट्रेक केल की अस होतच.
पुढे गेल्यावर एक छोटीशी कोरलेली गुहा दिसली.
गुहेच्या सावलीत थोडावेळ विसावा घेऊन पुढे कुच केले.गडाच्या या वाटेने जाताना पहिला दरवाजा लागतो.पण आता या दरवाज्याच्या दोन्ही बाजुचे बुरुज फक्त शिल्लक आहेत.दरवाजा उरला नाही.पण या पडलेल्या बांधकामात (काळ्या कातळात) एक अशी जादु आहे की त्यांना पाहिल्यावर अनोखी उर्जा शरीरात संचारते.आपसुकच पायात बळ येते.
पुढे वाटेवर मारुतीचे दर्शन झाले.शक्तिचे हे मुर्तिमंत रुप पाहुन मन प्रसन्न झाले.
थोड चालल्यानंतर एक खोपटे लागले.तेथे आधीच एक डोंबीवलीचा ग्रुप येऊन थांबला होता.पहाटेची इंद्रायणी पकडुन ते कामशेतला आले होते. अन तेथुन एस.टी ने येथे पोहोचले होते.आम्ही काळे कॉलनीपासुन चार- साडेचार तासात निसर्गाचा आस्वाद घेत रमत-गमत आलो होतो.ते खोपट तिकोनापेठ गावातल्या मावशीच होत. तेथे फकस्त झुणका भाकर अन लिंबु सरबत मिळत होत.थंड गार-गार लिंबु सरबत घशाखाली उतरवल.खाण्याच सामान आणल होत त्यामुळे तेथे न थांबता वर बालेकिल्ल्याकडे आम्ही मोर्चा वळविला.त्या खोपटापाशी पुढे हे एक पाण्याच खोदलेल टाक लागल.त्या टाक्याच्या वरती छोट्या तीन गुहा होत्या.त्यापैकी एका गुहेत श्री तुळजाईचे मंदिर आहे. मंदिर असलेले हे लेणे सातवाहन काळातील असावे.
या पाण्याच्या टाक्याच्या पुढे एक रस्ता खाली जातो अन दुसरा वरती बालेकिल्ल्याकडे.खाली जाणारा रस्ता त्या दरवाजाकडे जातो जो आम्हाला खालुन दिसला होता.येताना त्या रस्त्याने जाऊ असा विचार करुन आम्ही वरचा रस्ता पकडला.
पुढे गेल्यावर एक चक्र दिसल.
चुना दळण्याचे जाते....
आता वरती गडाचा दरवाजा अन तटबंदी खुणावत होती.दगडात बांधलेल्या या पायर्या सरळसोट आहेत.
................................
या दरवाज्यातुन आत गेल्यावर उजव्या बाजुला एक छोटस पाण्याच टाक लागल पण त्यातील पाणी पिण्यायोग्य नव्हते.परत दगडी पायर्या चढुन त्या दरवाज्याच्या वरती बुरजापाशी आलो.येथुन आजुबाजुचा परिसर नजरेच्या टप्प्यात भरतो.तिकोना पेठ गाव,गावातुन येणारा रस्ता,पवना जलाशय अन त्यातुन वर डोक काढणारा तुंग ....
दोन्ही बाजुला कातळभिंत अन त्यातुन कोरलेल्या या पायर्या मुख्य दरवाजाजवळ घेऊन जातात. या उंच पायर्या दमछाक करणार्या आहेत.
या खडी चढणीच्या पायर्यांनी वरती आलो की गडाचा मुख्य दरवाजा सामोरी येतो.हा दगडी दरवाजा बघुन मन उल्हासित होते.ऊर अभिमानाने फुलुन येतो.
याच्यासाठीच तर केला होता अट्टाहास.....
दरवाजाजवळची आखीव रेखीव तटबंदी अजुनही चांगल्या स्थितीत असलेली दिसते.
त्या दरवाज्यातुन उजव्या बाजुने एका अरूंद वाटेने वरती आल्यावर कातळात कोरलेल्या या गुहा लागतात.
गुहातील दोन टाक्यात पाणी होत.पण त्यातील एका टाक्यातील पाणी पिण्यासारख होत.खाली झालेल्या पाण्याच्या बाटल्या भरुन घेतल्या.त्या गुहेच्या समोरच आम्ही आणलेली शिदोरी उघडली अन पोटातल्या आगीला शमविले.गार वारा सुटला होता.इतक्या दुपारीसुद्धा त्या गुहेच्या सावलीत थंड वाटत होत.
आता बालेकिल्ला बघण्यासाठी सज्ज झालो.
शिवदुर्ग संवर्धन संस्थेने गडावर स्वच्छता चांगली ठेवलेली दिसली.त्यांचा एक द्वारपाल सुद्धा नेमलेला आहे.
गडावर मस्त फुलांची बाग फुलविलेली आहे.
याच डोंगराच्या सोंडेने आम्ही चालत आलो.
गडाच्या समोरचा हा डोंगर अन गडाची तटबंदी......
गडाच्या माथ्यावर आल्यावर त्र्यंबकेश्वर महादेवाचे मंदीर दिसते.मंदिराच्या बाहेर नंदी स्थानापन्न झालेला दिसतो.या मंदिराच्या खालच्या बाजुलासुद्धा पाण्याचे टाके आहे.
मंदिराच्या पुढे धान्य कोठाराचे पडीक अवशेष आढळतात.तसच एक तळेही नजरेस पडत.
बालेकिल्ल्याच्या माथ्यावरून तिन्ही बाजूंनी धरणाच्या निळ्याशार पाण्याने वेढलेला मोदकासारख्या भासणार्या तुंग सुळक्याचे मनोहरी दृष्य दिसले.पावसाळ्यात येथला नजारा काही औरच असतो. या निसर्गाच्या सौंदार्याचे रुपड डोळ्यात साठवुन घेतल.
माथ्यावरून उत्तरेस लोहगड-विसापूर ही दुर्गजोडी दिसली.गडावरून आजुबाजुचा नजारा पाहुन परत आम्ही त्या गुहेपाशी आलो.मस्तपैकी चुलीवर मॅगी शिजवली अन खाल्ली.पोटाचा व्यवस्थित बंदोबस्त झाल्यानंतर गड उतरण्यास सुरुवात केली.तिकोनापेठ गावातुन चार वाजताची कामशेतला जायला शेवटची एस.टी मिळेल असे किल्ल्यावरच्या द्वारपालाकडुन कळले.पन आता सव्वातीन झाले होते.ती भेटेल की नाही याबाबत साशंक होतो.गडाच्या माथ्यावरुन दुसर्या दरवाजाने(जो दरवाजा आम्हाला खालुन दिसला होता) जाणारी वाट वरतुन बघितली होती.त्या दरवाजाने जायचा मानस होता.पण त्या द्वारपालाने सांगितले की ती वाट वापरात नाही म्हणजे थोडी अवघड आहे.पण तरीही निदान त्या दरवाजापर्यंत जाऊन बघुया म्हणुन त्या वाटेला लागलो.दहा-पंधरा मिनिटानंतर त्या दरवाज्यापाशी पोहोचलो.
या दरवाजातुन बालेकिल्ल्याची तटबंदी दिसते.येथुन खाली गावात जायला वाट होती.पण झाडी वाढल्यामुळे दिसत नव्हती.त्यामुळे या वाटेने जायला गोपी अन प्रदिप तयार नव्हते.पण माझी खुप इच्छा होती.आमच्या तिघांची यावर खुप चर्चा झाली नाहीतरी एस.टी मिळणार नव्हतीच.मग "मी पुढे जाऊन वाट शोधतो ..भेटली तर जाऊया "असे म्हणून मी ती वाट उतरायला लागलो.
वाटेत पिवळ्या गवतामुळे ती वाट दिसत नव्हती.त्या वाटेवर दगडात कोरलेल्या पायर्या होत्या.फकस्त त्याची उंची कुठे कुठे जास्ती होती.मी अर्ध्या वाटेवर पोहोचलो अन त्यांना येण्यासाठी आवाज दिला.त्या पायर्या संपल्यानंतर दाट झाडीतुन जाणारी पायवाट दिसली.त्या पायवाटेने गडाच्या दुसर्या सोंडेने आम्ही खाली उतरलो.
......................................................................................................................
या तिकोना गडाचा त्रिकोण आम्ही साधला.तिकोना अन त्याच्या समोरच्या डोंगराच्या घळीतुन जाणार्या सोंडेने चढुन गडाच्या या सोंडेने खाली उतरलो.
गावात पोहोचलो तर अपेक्षेप्रमाने एस.टी निघुन गेली होती.काळे कॉलनीपर्यंत चालत जाण्याची ताकद आता उरली नव्हती.पण आमच्या नशीबाने थोड्या वेळाने एक टेम्पो आला.त्या टेम्पोत मागच्या बाजुला जुन्या कपड्यांची बोचकी होती.त्यालाच आपल सिंहासन बनवुन आमचा घराकडे प्रवास सुरु झाला.(काळे कॉलनीपासुन कामशेतला परत जायला जिप्स मिळतात.अन कामशेतवरुन ट्रेनने किंवा रस्त्याने लोणावळ्यामार्गे मुंबईला पोहचु शकतो.)पण आम्हाला जो टेम्पो भेटला तो मुंबईपर्यंत येणार होता.मग काय ...
अशी ही आठवण हृदयाच्या कप्प्यात कायमची कोरलेली आहे.कामशेत गावातील रात्री अनुभवलेली थंडी,पहाटेचे धुंद वातावरण,मनाला भुरळ पाडणारा पवना जलाशय अन तीन कोनांची टोपी चढविलेला तिकोना कायमचा लक्षात राहील.खर म्हणजे पावसाळ्यातला तिकोना बघायला परत जायचेय अन तुंग सुद्धा साद घालतोय.
तेव्हा भेटुया परत.......
तोपर्यंत ......
रोहीत.. जीयो यार ! ढासू फोटोज
रोहीत.. जीयो यार ! ढासू फोटोज !! खासकरून त्या मंदधुंद पहाटेचे !! सुंदरच..
नि वर्णन तर खासच !! मजा आली वाचताना..
बाकी पॅनोरामा तंत्र चांगले अवगत करुन घे रे.. आपल्याला काढायचे आहेत बरेच फोटो अजुन..
मस्त वर्णन आणि फोटो पण खुप
मस्त वर्णन आणि फोटो पण खुप छान आलेत... तुमच्यामुळे आम्हाला पण भटकती चा आनन्द घेता येतो.
धन्यवाद तुमचे...
अगदी स्वप्नवत फ़ोटो आहेत. मी
अगदी स्वप्नवत फ़ोटो आहेत. मी हललोच नसतो तिथून.
फोटो भारी!!! योशी सहमत...
फोटो भारी!!!
योशी सहमत...
तुळजाईमंदिर अगदी अलीकडचं आहे...
पूर्वी त्या फक्त गुहा होत्या.. आम्ही तिथे राहिलो होतो पावसाळ्यात...
(लोक काहीही करत असावेत, म्हणून मंदिर केलं असावं तिथे...)
क्लास फोटो वर्णनसुद्धा झ
क्लास फोटो
वर्णनसुद्धा झ क्का स
धन्यवाद...
धन्यवाद... यो,कौशी,दिनेशदा,आनंदयात्री,जिप्सी.... आभारी आहे.
रोहीत.. छान . २००३ ला केला
रोहीत.. छान . २००३ ला केला होता पाउसात त्याचि आथ्व्नन आलि
अप्रतिम फोटोज वर्णन वाचायचंय
अप्रतिम फोटोज
वर्णन वाचायचंय अजून..
उत्कृष्ट वर्णन आणि
उत्कृष्ट वर्णन आणि प्रचि....थांकु
धन्यवाद ..
धन्यवाद .. neeu,डॅफोडिल्स,ईनमीन तीन आभारी आहे.
रोहीत सही फोटो, चारोळ्या आणी
रोहीत सही फोटो, चारोळ्या आणी ट्रेकचे वर्णन...
आतातर काळे कॉलनीला (नवीन नाव पवनानगर) जायला कामशेतलापण जायला नको.. लोणावळ्याहुन लोहगड खिंडितून एक रस्ता काळे कॉलनीलाच जातो. तुंगवाडी वरुनही एक बैलगाडी रस्ता जवणच्या रस्ताला येऊन मिळतो.
धन्यवाद मनोज .... आतातर काळे
धन्यवाद मनोज ....
आतातर काळे कॉलनीला (नवीन नाव पवनानगर) जायला कामशेतलापण जायला नको.. लोणावळ्याहुन लोहगड खिंडितून एक रस्ता काळे कॉलनीलाच जातो. तुंगवाडी वरुनही एक बैलगाडी रस्ता जवणच्या रस्ताला येऊन मिळतो.>> पण त्या रस्त्याने लाल डबा जातो का? कारण प्रत्येकाजवळ स्वतःची गाडी असेलच असे नाही.बाईक असेल तर तुंग अन तिकोना एका दिवसात होऊ शकतो.
फारच सुरेख. अप्रतिम. यु मेड
फारच सुरेख. अप्रतिम.
यु मेड माय डे. मनःपूर्वक धन्यवाद !
जबरी फोटो आणि वर्णन
जबरी फोटो आणि वर्णन रे...
एकदमच क्लास
पहाटवेळ आणि नंतरचेही फोटो काय सुरेख आलेत..एकेक फोटो दृष्ट लागण्यासारखा...
पॅनो कशावर काढलास????
रच्याकने, किल्ल्याची बरीच साफसफाई झालेली दिसतीये..खूप वर्षांपूर्वी मी गेलो होतो तेव्हा अशक्य झाडी माजली होती. काही म्हणजे काहीच कळत नव्हंतं
धन्यवाद... रैना,आशुचँप ....
धन्यवाद... रैना,आशुचँप .... मनापासुन आभारी आहे.
पॅनो कशावर काढलास???? >>
अरे त्या नजार्याचे तीन वेगवेगळे फोटो काढले अन नंतर फोटोशॉपमध्ये तांत्रिक संस्कार करुन एक केले.
अफलातून आहे हा अनुभव! वर्णनही
अफलातून आहे हा अनुभव! वर्णनही भन्नाट जमलय!!!
भन्नाट रे भावा ! वर्णन तर
भन्नाट रे भावा !
वर्णन तर सुरेखच आणि त्यात एकापेक्षा एक सरस प्रकाशचित्रे म्हणजे दुधात साखर.............!!
सगळीच प्रकाशचित्रे अप्रतिम
मस्त फोटो... आणि वर्णन पण
मस्त फोटो... आणि वर्णन पण झकास...
अरे मावळ्या, काय सुंदर फोटो
अरे मावळ्या, काय सुंदर फोटो आहेत रे...
तो नदीचा श्वास मी इथुनच अनुभवला.. अफलातून प्रचि आणि वर्णन मित्रा
पण त्या रस्त्याने लाल डबा
पण त्या रस्त्याने लाल डबा जातो का? कारण प्रत्येकाजवळ स्वतःची गाडी असेलच असे नाही.बाईक असेल तर तुंग अन तिकोना एका दिवसात होऊ शकतो>>>>> कुठला रस्ता म्हणयतोस तु?
लोणावळा ते काळे कॉलनी व्हाया लोहगड खिंड रस्ता पक्का आहे पण त्या रस्त्याने सध्या एस्टी जाते का नाही काय कल्पना नाही. बहुधा नसावी कारण २ वर्षापुर्वी पर्यंततरी नव्हती.
तुंगवाडी ते तिकोना जायला मात्र बाईकच हवी कारण तो रोड अगदीच आतला आहे आणी माझ्यामते फक्त बाईकच जाऊ शकतील असा आहे..
र्रापचिक... फोटो, ट्रेक,
र्रापचिक... फोटो, ट्रेक, रोहित, लेख वगैरे सगळंच.!!
' कुत्र्यांचा भुवभुवाट....'
पण त्या रस्त्याने लाल डबा जातो का? कारण प्रत्येकाजवळ स्वतःची गाडी असेलच असे नाही.बाईक असेल तर तुंग अन तिकोना एका दिवसात होऊ शकतो.
आम्ही तुंग-तिकोना-कोरीगड फेब्रु. २००८ ला २ दिवसांत केला होता. त्याचा प्रवासीहिशेब खालीलप्रमाणे-
१ ला दिवस- कामशेत ते तिकोनापेठ बसभाडे १५/-, तिकोना करून जवणला टेम्पोने रु.५/-, जवणहून साधारण दुपारी १ वा. मोरव्याला जाणारी बस होती, पण ती उशीरा आली. जवण ते मोरवे बसभाडे रु. ११/- (तुंगवाडीत चढायला मोरव्याच्या थोडं अलिकडे उतरावे लागते. पाऊण तास चालल्यावर तुंगवाडी. सॅका एका घरात टाकून तुंग केला. मुक्काम भैरवमंदिरात.
२ रा दिवस- सकाळी ७ वा. लोणावळा बस होती. (ही दिवसांतली एकमेव बस. संध्या. मुक्कामी येते) तिने घुसळखांबपर्यंत बसभाडे रु. ६/-. तिथून पेठशहापूर टेंपो. कोरीगड करून दुपारी लोणावळ्यात जोशींच्या अन्नपूर्णांत जेवायला हजर.
तुंगवाडी ते घुसळखांब रस्त्यावर कुठेतरी मोरवे गांवचा फाटा लागतो. बाईक असेल तर मोरव्यातून या फाट्यावर येऊन तुंगवाडी गाठावी लागेल, नाहीतर मध्येच पार्क करून तुंगवाडीत चढावं लागेल. तेव्हा रस्ता बर्यापैकी उखडलेला होता.
तात्पर्य- तुंग- तिकोना बाईकवर एक दिवसांत होऊ शकतो..:)
कुठला रस्ता म्हणयतोस
कुठला रस्ता म्हणयतोस तु?
लोणावळा ते काळे कॉलनी व्हाया लोहगड खिंड रस्ता पक्का आहे पण त्या रस्त्याने सध्या एस्टी जाते का नाही काय कल्पना नाही. बहुधा नसावी कारण २ वर्षापुर्वी पर्यंततरी नव्हती.>>>>>मनोज, तोच रस्ता. आम्ही गेल्यावर्षीच (एप्रिल महिन्यात) तिकोना बाईकने केला होता. तोपर्यंत तरी एस्टी जात नव्हती.
दुधिवरे खिंडितुनच पुढे पवनानगर - तिकोना पेठेत गेलो होतो. खिंडितला पुढचा रस्ता पवनेच्या बाजुने जानारा माझा ऑल सीझन फेव्हरीट आहे.
हा माझा झब्बु (जुनाच)
पवनामाळेचा राखणदार वितंडगड ऊर्फ किल्ले तिकोना
http://www.maayboli.com/node/15114
धन्यवाद...
धन्यवाद... हबा,विशाल्,हिरकु,स्मितहास्य,हेम... तुम्हा सगळ्यांचा लय आभारी आहे
तात्पर्य- तुंग- तिकोना बाईकवर एक दिवसांत होऊ शकतो..>> हेम अनुमोदन..
हेम आमचासुद्धा या ट्रेकचा सरासरी दर माणसी खर्च जवळ-जवळ ८०-९० रुपये झाला.
जिप्सि तुझा झब्बु पण मस्तच
पावसाळ्यात हा परिसर पुन्हा पाहायचाय .. बघुया तेव्हा ..तुंग अन तिकोना एकत्र होतोय का ते...
झकास मित्रा... फोटोज् आणि
झकास मित्रा...
फोटोज् आणि वर्णन, दोन्हीही मस्त.
दोन नंबरचा व कातळभिंतीचा फोटो
दोन नंबरचा व कातळभिंतीचा फोटो खल्लास.
वॉव!!!!!!!!!!!!!!!!
वॉव!!!!!!!!!!!!!!!!
वा छान वर्णन व प्र. चि.
वा छान वर्णन व प्र. चि.
आर sssssssss कसल भारी लिवलयस
आर sssssssss कसल भारी लिवलयस रं आन फोटु त नुस्त बघत बसावं अस हायती.कसल भारी म्हणजी बग एकदम बेस , तोड्लस बे.....:-).
रोहीत एकदम खिळवुन ठेवलंस
रोहीत एकदम खिळवुन ठेवलंस यार.. ! निव्वळ अप्रतिम लेख आणी माहीती दिलीस मित्रा..!
फोटोंना तर काही तोड्च नाहीय, प्रत्येक फोटो जसा "चित्तारुन" काढला आहे.
रोहीत एकदम खिळवुन ठेवलंस
रोहीत एकदम खिळवुन ठेवलंस यार.. ! निव्वळ अप्रतिम लेख आणी माहीती दिलीस मित्रा..!
फोटोंना तर काही तोड्च नाहीय, प्रत्येक फोटो जसा "चित्तारुन" काढला आहे.
Pages