त्यांच्याकडे व्हायोलिन होती. ती व्हायोलिन ते वाजवतही असत. कसलेतरी प्रच्छन्न उदास सूर काढत असल्याप्रमाणे त्या तारांवरून सावकाश बो फिरवत बसत. थरथरणार्या हातात बो आणि झंकारणार्या तारा. त्यांनी कुठूनतरी ही व्हायोलिन पैदा केल्यावर, जुडो कराटेसारखंच व्हायोलिन शिकायलाही पुस्तक आणलं. पण ते त्यांना बहुतेक जमलं नसावं.
कारण त्यांच्या खोलीतून कधीच व्हायोलिन ऐकू आलं नाही. जेमतेम दिड दोनशे स्क्वेअर फुटांच्या दोनखणी घरात आवाजी प्रायव्हसी तर कधी नव्हतीच. मग पुस्तकात वाचून व्हायोलिनी आरोह अवरोह निवांत काढत बसणं तर दूरच. तरीही, दोन हुशार पोरींनंतर ऍबनॉर्मल का होईना पण मुलगा झाल्यावरच आपलं पतिकर्तव्य थांबवलेल्या त्यांनी व्हायोलिन उदास भडास काढण्यासाठी वापरलीच असणार. त्यांनी बो फिरवल्यावर सूर शुद्ध किंवा तीव्र न निघता उदासच निघणार. चामडी बॅगेतली ती तुटकी व्हायोलिन बघताना, तिचा बो हातात घेऊन निरखताना अशीच उदास जाणीव मला राहून राहून होत होती. माळ्यावर धूळपाणी पीत गंजलेल्या तारांखालून एक तुकडा उचलला तर त्यामागे स्टिकर लावलेलं "मेड इन झेकोस्लोव्हाकिया"! दुःख इतकं वैश्विक असतं की झेकोस्लोव्हाक थंड धुकट उदासीतून धुळकट उष्ण तरीही रंगीबेरंगी भारतात येऊनही व्हायोलिनमधून उदासीच बाहेर पडावी?
त्यांच्याकडे पुस्तकंही भरपूर होती. अभिजात साहित्य या सदराखाली मोडणारी नव्हतीच फारशी तरीही पुस्तकांमधे विषयाला बंधन नव्हतं. "फंडामेन्टल्स ऑफ रेडिओ"च्या बाजूला "ग्लिंप्सेस ऑफ गोवा" आणि मग "संस्कृत-इंग्लिश प्रायमर"ही. शिवाय गार्डनिंग, टेक्निकल ड्रॉईंग, नकाशे, प्रवासवर्णन, स्थलवर्णन, सेक्स, संततीनियमन, पासबुकं, कोर्याच पे इन स्लीप्स, कंपन्यांचे वार्षिक अहवाल, आयपीओ प्रॉस्पेक्टस हे ही सगळं. इंटर झाल्यावर नोकरीत जे चिटकले ते घर ते नोकरी आणि नोकरी ते घर या सरळ प्रवासात तीन अपत्यांची तीन वळणं हॉस्पिटलकडे वळलेली प्रवासी कारकिर्द असलेल्या त्यांनी गोवा, काश्मिर, केरळची ट्रॅव्हल ब्रोशर्स का जमवली? आणि कसल्या अनामिक ओढीनं इतकी वर्षं संभाळून ठेवली?
की नोकरी आणि लग्न करून, बेसिक जगण्याची ददात मिटवून, कुलदिपकाला जन्माला घालून आता जगण्याच्या प्रयोजनाच्या शोधार्थ निघाले होते ते? जगण्याच्या शक्यता तपासून पहायच्या होत्या का? नाहीतर मग "ओळखा तुमची कुंडली" असल्या शीर्षकाचं पुस्तक आणि आधी पाहीलेल्या सर्व मुलीच्या कुंडल्या, केलेल्या पत्रव्यवहारासह एकत्र का जपलं होतं? "ह्या जोशीमुलीशी लग्न करण्याऐवजी त्या नाटेकरमुलीशी लग्न केलं असतं तर पहिला मुलगा झाला असता.", अशा काहीतरी निष्कर्षाप्रत येऊन, "अरेरे, उगीच त्या येणार्या एकनाडेचा बाऊ करून घेतला." असं म्हणून मग त्या नाटेकरणीचं तेव्हाचं यौवनी रूप आठवून हळहळले असतील का?
आमच्या घरी पार सत्तर ऐंशी सालापासून भाड्याने रहात असलेलं हे कुटुंब. ही सगळी, म्हणायला गेलं तर समृद्ध अशी अडगळ टाकून कुठेतरी निघून गेलं. आता वाट बघून शेवटी त्यांचं उरलंसुरलं सामान आम्ही भंगारात विकायला काढलं होतं.
मी दरवाज्यात उभा होतो. मुलींची लग्न होऊन त्या सासरी. इतक्या संसारानंतरही कशी कोण जाणे अतृप्तच दिसणारी त्यांची बायको. प्रत्येक ओळींवर बोट ठेवत पेपर वाचणारा ऍबनॉर्मल मुलगा. तो ही कुठेतरी फुटकळशा नोकरीवर. पण त्याची ऍबनॉर्मिलिटी हळूहळू दिसू लागे आणि मग काम करणं अवघड होई. एखादी जखम कधी भरूच नये. सतत हुळहुळावी. सतत ताजी रहावी. पोक्ततेची साय त्यावर कधी धरूच नये. काकू कुकर लावायला आत गेल्या की मग एकट्या काकांच्या हाती आपोआपच ती व्हायोलिन जाऊन बसली आणि बो तारांवर थरथरू लागला. उदास सुरांत त्या मुलानं मग ध्यान लावलं आशेची फोलपटं शोधत. निवडलेल्या तांदळांच्या कचर्यासोबत तर गेली नाहीत ना अशा विचारानं सैरभैर झाला आणि स्वयंपाकघर आणि संडासामधल्या बेचक्यात लपवलेली कचर्याची बादली स्वयंपाकघरात आडवी केली. व्हायोलिन शांत झाली ... ... एक दोन क्षण अवघड शांततेत गेले. काकूंनी स्वयंपाकघर झाडून घेतलं. वातावरणात अजूनही निनादणार्या प्रच्छन्न सुरांकडे दुर्लक्ष करत काका निर्विकार जेवायला बसले. तो मुलगा हमसून हमसून रडत पडला. त्याच्यापुरता भात वेगळा झाकून काकू अंथरूणावर आडव्या झाल्या.
काकू अतृप्त. काका स्पर्शापलिकडे, आढ्याला नजरेचा आधार देत, "बाबा रे तू एकटाच आहेस आमच्यावर घाला न घातलेला. असंच छत्र धरून रहा रे ऽऽऽ.". एकटदुकट हेकट अश्रू डोळ्यांतून ओघळावा. काकूंनी जराही स्पर्श न करता पदरानेच तो टिपून घ्यावा, हेच सहजीवन.
एव्हाना अर्धी रात्र उलटली होती. मग त्या मुलासाठी अन्न गरम करायला उठल्या. तो स्वयंपाकघरात फ्रिजचं दार उघडून बसलेला असतो. त्याला अंधार सहन होत नाही. हा संसार.
काकांनी खरंतर त्यांच्या अनाम स्वप्नांच्या तिरडीचा उत्सव केलाही नसता. पण त्यांनी स्वप्नंच इतकी पाहिली की मुलाला थोडी स्वप्न पहायची कुवत द्यायला विसरले. आल्यागेल्या श्वासांचा हिशोब चुकणारा मुलगा फासळ्या मोजत झोपलेला पहाताच ते फार कालवून गेले. मग त्यांनी पत्नीकडे पाहिलं. आजकाल तिचा पदर झोपेतही ढळत नाही. उद्वेगानं ते स्वतःचं आवरू लागले.
आंघोळपांघोळ करून त्यांनी स्वयंपाकघरातच प्राणायाम सुरू केला. कुठल्यातरी पुस्तकात वाचून शिकले होते ते. स्वयंपाकघरातल्या चाळीसच्या बल्बमधे वाचायला खरंतर त्रासच व्हायचा. मग त्यांनी साधी दोन तीन टेक्निक्स जमायला लागल्यावर पुस्तक वाचणं सोडूनच दिलं होतं. डोळे मिटले. पण आजही त्यांचं श्वासांवर लक्ष केंद्रित होईना. मधेच रेल्वे रुळाचे फाकलेले इंटरसेक्शन्स दिसले. आणि दोन्ही बाजूंनी वेगात येणार्या ट्रेन्स. आणि श्वासांचा जलद आवाज. आवाज त्यांच्याच श्वासांचा होता. छातीत दुखल्यासारखं वाटू लागलं, मनही रामप्रहरी अगदी विषण्ण झालं. आधी काय आणि नंतर काय हे मात्र त्यांना कळू शकलं नाही. परत जागेवर येऊन पडले पुन्हा. "अजून उजाडायचं आहे, आख्खा दिवस अजून बाकी आहे आणि तो आपल्याला आख्खा जगून काढायचा आहे.", या विचारानेच त्यांना अजून कसंतरी झालं.
झोपल्या झोपल्याच त्यांची हाती व्हायोलिन आली, बो आला आणि सूर निघू लागले. पहाटे जोरानं आवाज करणार्या रातकिड्यांइतकाही आवाज त्या सुरांचा नव्हता. खरंतर ते सूर फक्त काकांचे आणि त्यांच्यापुरतेच होते. गळा चिरल्यावर रक्त वहावं तसं डोळ्यांतून पाणी वाहू लागलं. श्वास वेगात होऊ लागला. काकांना घराचं छत आणि मंद फिरणारा पंखा धूसर दिसू लागला. पंखा अंगावरच पडतोय की काय अशी भावना झाल्याने ते ताडकन उठून बसले. त्यांची सावली काकूंच्या अंगावरून हलली आणि ते चपापलेच. डोळ्यांचा धूसरपणा जात नव्हताच. डोळे स्वतःच्याच अश्रूंनी आता झोंबत होते. त्यांना थंडी वाजू लागली. बर्फाळ थंड गंगेच्या पाण्यात बम भोले करून बुडी मारावी तशी, काकडून टाकणारी थंडी वाजू लागली. कुलदिपकाच्या हडकुळ्या छातीच्या फासळ्या धूसर दिसूनही नजरेत भरल्या आणि काकांनी निर्णय घेतलाच.
एका पहाटे पहाटे सगळ्यांशी नजर चुकवत ते नुस्त्या दोन चार बॅगांनिशी निघून गेल्याची आठवण आजोबा सांगत होते.
(सत्यघटनेवर आधारित)
(तरी सत्यघटना विचारू नये!)
(No subject)
he too lihales? I can't
he too lihales? I can't believe..
superb!
fakt,
>>>गळा चिरल्यावर रक्त वहावं तसं डोळ्यांतून पाणी वाहू लागलं.
evadhe khatakale!
!!!
!!!
लिखाण फारच प्रभावी आहे. माफ
लिखाण फारच प्रभावी आहे.
माफ करा, पण माझ्या अल्प मतिला सारांश कळला नाही..!
(No subject)
थोडीशी शब्दबंबाळ गोष्ट
थोडीशी शब्दबंबाळ गोष्ट आवडली.
सत्यकथा असली तरी.. शब्दबद्ध करण्याचे कसब चांगले आहे.
हम्म्म!!
हम्म्म!!
आवडली कथा.
आवडली कथा.
(No subject)
आवडली.
आवडली.
धन्यवाद !!!
धन्यवाद !!!
जबरदस्त लिहितात तुम्ही
जबरदस्त लिहितात तुम्ही ग्रामिण लोक!
हं... भारत सासणेंची आठवण
हं... भारत सासणेंची आठवण होतेय.
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
तीव्र....
तीव्र....
भारत
भारत सासणे!!!!!!!!!!!!!!!!!!!!
बाबा माझ्या...
धन्यवाद
फार छान लिहिलंय तुम्ही. (हे
फार छान लिहिलंय तुम्ही. (हे लिहायचं विसरलंच होतं) बॅकड्रॉप फार नवीन नसला तरी भाषा फारच प्रभावी, वाचत रहावं अशी.
>> दुःख इतकं वैश्विक असतं की झेकोस्लोव्हाक थंड धुकट उदासीतून धुळकट उष्ण तरीही रंगीबेरंगी भारतात येऊनही व्हायोलिनमधून उदासीच बाहेर पडावी?
हे एक उदाहरण. अशी बरीच.
लिहीत रहा..
अरे ही कशी काय सुटली
अरे ही कशी काय सुटली माझी?
वर्णनशैली अफाट आहे हो. लिहीत रहा.
सुंदर...एक उदास छाया राहीली
सुंदर...एक उदास छाया राहीली आहे मनावर
मस्त लिहिलं आहे. आवडलं.
मस्त लिहिलं आहे. आवडलं.
चांगलं लिहिलंय...
चांगलं लिहिलंय...
पुनश्च धन्यवाद
पुनश्च धन्यवाद सर्वांचे
संघमित्रा