"केल्याने भाषांतर...."

Submitted by संयोजक_संयुक्ता on 27 January, 2011 - 18:29

mbs_kelyane_bhasha.jpg

भाषा हे मूलत: संवादाचं माध्यम असलं तरी तो एक संस्कृतीचं प्रतिबिंब दर्शवणारा आरसाही असतो. अनुवादित साहित्याचं मोल म्हणूनच मोठं आहे. एका बाजूला आपल्या हाडीमांशी मुरलेल्यांहून निराळ्या जाणिवा, चालीरीती, जीवनपद्धती आणि विचारधारांची ओळख त्यातून होते, तर दुसर्‍या बाजूला जगाच्या पाठीवर कुठेही गेलं तरी माणसाच्या मूळ अंतःप्रेरणा अगदी तशाच असल्याचं भानही येतं.

मराठी भाषा दिवसाच्या निमित्तानं म्हणूनच यावर्षी आपण "केल्याने भाषांतर" हा कार्यक्रम करायचं ठरवलं आहे. इतर कोणत्याही भाषेतील कथा, कवितांचं मराठीत भाषांतर करुन आम्हाला पाठवा.

ही स्पर्धा नाही.

१. ज्या साहित्याचे भाषांतर केले जाणार आहे ते प्रताधिकारमुक्त असावे. इंग्रजी भाषेतील असे काही साहित्य आंतरजालावर उपलब्ध आहे. प्रताधिकारमुक्त साहित्य असल्यास परवानगीची गरज नाही. परंतु याशिवाय मूळ लेखकाची अथवा प्रकाशकांची परवानगी घेऊन भाषांतर करता येईल. मूळ लेखकाची/प्रकाशकाची परवानगी मिळवण्याची कायदेशीर जबाबदारी भाषांतरकाराची आहे. मायबोली या गोष्टीला जबाबदार असणार नाही.

२. मूळ साहित्याचे शीर्षक, लेखक, भाषा यांचा स्पष्ट उल्लेख असावा.

३. "स्वैर" भाषांतर नसावे.

४. प्रवेशिका लिखीत (स्कॅन स्वरुपात) किंवा ई-पत्रामध्ये देवनागरीत पाठवता येतील. आलेल्या प्रवेशिकेतील साहित्य प्रकाशित करताना त्यावर कोणतेही संस्करण केले जाणार नाही.

५. एका आयडीला एकापेक्षा जास्त प्रवेशिका पाठवता येतील

६. प्रवेशिका marathibhasha@maayboli.com या पत्त्यावर पाठवावी.सोबत आपला मायबोलीवरचा आयडी कळवावा. प्रवेशिका पाठवताना ई-पत्राच्या विषयात कृपया Marathi Bhasha : kelyaane bhaaShaaMtar असे नमूद करावे.

७. प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीखः २० फेब्रुवारी २०११

अधिक माहितीसाठी संयोजक समितीशी marathibhasha@maayboli.com इथे संपर्क करावा किंवा ह्याच बातमीफलकावर आपला प्रश्न लिहावा.

मराठी भाषा दिवस २०११ च्या इतर कार्यक्रमांसाठी इथे बघा.

धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चैतन्य दीक्षित,

जालावर पूर्वप्रकाशित असलेलं तुम्ही स्वतःच केलेलं भाषांतर पाठवलत तरीही अर्थातच चालेल. पण लोकांना नवनविन वाचायला मिळावे, आणि दुसर्‍या भाषेतले जास्तीत जास्त साहित्य मराठीत यावे हा एक उद्देश्य असल्याने नविन अप्रकाशित साहित्य पाठवलेत तर खुपच चांगले.

धन्यवाद

सुंदर भाषांतर, स्वातीताई!
केल्याने भाषांतर - कल्पना आवडली.

मूळ लेखकाची परवानगी मिळवण्याची कायदेशीर जबाबदारी भाषांतरकाराची आहे."
अहो पण तो 'हेन्री वाड्स्वर्थ लाँगफेलो' आता मेला हो!!!

"स्वाती_आंबोळे, निनावी, ईबा, बाई" या पैकी आज तुमचे जे नाव असेल ते, तुम्ही रविंद्रनाथ टागोरांची परवानगी कशी मिळवलीत? जरा सगळयांना सांगाल तर मी पण बुधकौशिक ऋषींना विचारून माझे रामरक्षेचे सुंदर भाषांतर इथे लिहीन म्हणतो.

बाकी या बाबतीत हेन्री वाड्स्वर्थ लाँगफेलो स्वतः काय म्हणाला होता माहित आहे का? तो म्हणाला ........
......
......

अरे देवा, त्याचे एव्हढे लांबलचक नाव लिहीता लिहीता तो काय म्हणाला तेच विसरलो!

हा 'विनोद' अ‍ॅबट अँड कॉस्टेलो च्या एका सिनेमात आहे. त्याचे मी "स्वैर" किंवा 'भावनिक' का काय म्हणतात तसे भाषांतर केले आहे. शब्दशः नव्हे. अभ्यासूंनी नोंद घ्यावी.
Happy Happy Happy Light 1 Light 1 Light 1

झक्की, नुसते ठळक केलेले वाक्य वाचू नका. पहिला सगळा मुद्दा वाचा!

>>माझे रामरक्षेचे सुंदर भाषांतर इथे लिहीन म्हणतो.
नक्की लिहा. Happy

>> "स्वाती_आंबोळे, निनावी, ईबा, बाई" या पैकी आज तुमचे जे नाव असेल ते, तुम्ही रविंद्रनाथ टागोरांची परवानगी कशी मिळवलीत?

मला माझी इटर्निटी सापडली तेव्हा शेजारी त्यांच्या इटर्निटीत पट्कन डोकावून विचारून आले. Proud

विनोदाचा भाग वगळता (म्हणजे इथपर्यंतची पोस्ट वगळता :P) :

इथून घेतली मी ती कविता. त्यांच्या मुख्य पानावर

>> Our ebooks are free in the United States because their copyright has expired. They may not be free of copyright in other countries. Readers outside of the United States must check the copyright laws of their countries before downloading or redistributing our ebooks.

असं लिहिलंय. तेव्हा अमेरिकेत राहणार्‍या वाचकांसाठी तिथलं साहित्य प्रताधिकारमुक्त आहे. (इतर ठिकाणी राहणार्‍यांनी बघा बॉ! :P)

खरच अप्रतिम अनुवाद , स्वातीताई....!
असा अनुवाद करणे हे कुण्या मामूली व्यक्तीचे काम नाही.

नमस्कार संयोजक, तुम्हाला माझी प्रवेशिका मिळाल्याची इ-मेल मला आली आहे. पण ती प्रवेशिका मायबोलीवर मात्र दिसत नाहीये. असे का? ह्या प्रवेशिकांची काही निवड प्रक्रिया आहे का? माझी प्रवेशिका प्रकाशित होणार आहे की नाही?

सानी, मराठी भाषा दिवसाच्या कार्यक्रमासाठी प्रवेशिका ज्या क्रमानी आल्या, त्या क्रमानी त्या प्रकाशित होतील. तुमची प्रवेशिका लवकरच प्रकाशित होईल. संपुर्ण कार्यक्रम २७ फेब्रुवारे पर्यंत चालणार आहे. (तुम्हाला तशी इमेल केली आहे)

-धन्यवाद!

Pages