आपुला चि वाद आपणांसी - श्री. चंद्रकांत वानखडे

Submitted by चिनूक्स on 7 February, 2011 - 00:59

आपल्याला हवं तसं जगणं फारसं सोपं नसतं. सर्वसामान्यांनी एक चाकोरी स्वीकारलेली असते. अमुक इतकं शिक्षण, मग नोकरी, लग्न, दोन मुलं. सामाजिक भान असेल तर थोडंफार घरानोकरीव्यतिरिक्त सामाजिक कार्य. ही चाकोरी मोडून आपल्या आनंदाला प्राधान्य देणारे फार कमी. श्री. चंद्रकांत वानखडे मूळचे विदर्भातले. कॉलेजात असताना जयप्रकाश नारायणांच्या 'तरुण शांती सेने'च्या संपर्कात आले, आणि त्यांना त्यांच्या आयुष्याची दिशा सापडली. नागपूरला भरलेल्या शांती सेनेच्या शिबिरात आर्थिक क्रांती, संघर्ष, अहिंसा, श्रमदान अशा सर्वस्वी अनोळखी शब्दांनी त्यांना भुरळ घातली. आपल्या मित्राकुटुंबाव्यतिरिक्त 'समाज' नावाची काही चीज अस्तित्वात आहे, आणि या समाजाचं आपण काही देणं लागतो, हे त्यांना तिथे कळलं आणि त्यांनी चळवळीत सामील होण्याचा निर्णय घेतला.

ही वाट अर्थातच सोपी नव्हती. सत्तरीच्या दशकात वातावरण बदल घडवण्याच्या ईर्ष्येनं भारलं असलं तरी रुळलेली वाट सोडून चालणं कोणालाच मंजूर नव्हतं. सामाजिक परिवर्तन, समाजातील दुर्बल घटकांचा विकास इत्यादी इत्यादी दुसरे बघून घेतील, आपण कशाला त्या भानगडीत पडा? पहिला विरोध घरातून झाला. घर सोडावं लागलं. मित्रानातेवाइकांनी पाठ फिरवली. प्रसंगी चेष्टाटिंगलही झाली. वानखडे आपल्या निर्णयावर ठाम होते.

एस. एम. जोशी यांच्याबरोबर आणीबाणीच्या काळात वानखड्यांनी महाराष्ट्र पालथा घातला, आणि नंतर लग्न करून त्यांनी विदर्भातलं मेटखेडा हे गाव गाठलं. तिथे शेतमजुरांची चळवळ उभारली. त्यांच्या पत्नी माया वानखडे तिथे शिक्षिका होत्या. या गावात आलेले विलक्षण अनुभव, शेतकरी चळवळ, या चळवळीतल्या नेत्यांचा ढोंगीपणा, शरद जोशींसारख्या नेत्याची सत्तालालसा, चळवळीत पदरी पडलेलं नैराश्य, निवडणुका यांचा लेखाजोखा म्हणजे 'आपुला चि वाद आपणांसी' हे चंद्रकांत वानखड्यांचं मनोविकास प्रकाशनानं प्रसिद्ध केलेलं आत्मचरित्र.

हे पुस्तक एक परखड आत्मपरीक्षण आहे. निष्ठा, जाणिवा आणि संघर्ष यांचा गुंता न सोडवू शकलेला एक कार्यकर्ता, समाजकारण आणि राजकारण एकत्र येऊ शकत नाहीत, हे भान फार उशिरा आलेला एक नेता आणि कुटुंबाच्या दृष्टीनं नालायक ठरलेला एक मुलगा, अशी एकाच माणसाची वेगवेगळी रुपं या आत्मकथनात आपल्याला भेटतात.

'आपुला चि वाद आपणांसी' या आत्मचरित्राच्या शेवटी चंद्रकांत वानखड्यांनी ते जगलेल्या आयुष्याबद्दल फार सुरेख लिहिलं आहे. पुस्तकातली ही शेवटची आणि नंतर सुरुवातीची काही पानं..

हे पुस्तक मायबोलीच्या खरेदीविभागात उपलब्ध आहे - http://kharedi.maayboli.com/shop/Aapulachi-Wad.html

ApulachiWaadQ.jpg

कधी कधी प्रश्न पडतो की, आपण जे काही जगलो, ते तसे का जगलो? सर्वसामान्यांनी स्वीकारलेली चाकोरी सोडून जगलो याबद्दल शंका नाही. पण अशा जगण्यामागची प्रेरणा काय होती? वेगळे जगण्याला सुरुवात केली तेव्हा त्याचा विरोध घरापासूनच झाला. घराबाहेरही टिंगल, टवाळी, विरोध झाला. प्राथमिक अवस्थेत दोषावरोपही झाले. परंतु या सर्वांना न जुमानता आपल्याला जसे वाटेल तसे, ज्यात आनंद येईल असे जगणे सुरूच राहिले म्हटल्यावर दोषावरोपण करणारेच पुढच्या अवस्थेत गुणावरोपण करू लागले. दोषावरोपणापेक्षाही गुणावरोपणाची अवस्था अधिकच बिकट. कोणावरही दोषावरोपण जेव्हा केले जाते, तेव्हा ते मनुष्यस्वभावाप्रमाणे नाकारले जाते, झिडकारले जाते. दोष स्वतःला चिकटवून घ्यायला कोणीही तयार नसते. पण गुणावरोपणाच्या बाबतीत ह्याच्या उलट घडते. आपल्याला कोणी गुण, जे आपले असो नसो चिटकवतो, तेव्हा ते आपल्याला हवेसे वाटतात. रस्त्यावर पडलेले पाकीट आपले नाही हे माहीत असते, तरीही ते पाकीट तुमचे आहे असे लोक म्हणून लागतात, तेव्हा ते पाकीट लोक म्हणतात म्हणून आपले नसतानाही खिशात घालतो, आणि आपल्यातील भामटा एका अर्थाने जागा होतो. तुम्ही जे काही केले त्याबद्दल तुम्ही थोर आहात, त्यागी आहात, गोरगरिबांचे कैवारी आहात असे म्हणणे सुरू झाले की आपणही त्याचा स्वीकार करणे सुरू करतो.

सामाजिक कामात मी पडलो, हा माझा निर्णय होता. लोकांनी त्यासाठी मला काही विनंतीअर्ज केला नव्हता. नोकरी न करता शहर सोडून गावात दोन दशके राहिलो. कष्टाचे जीवन जगलो. हालअपेष्टाही सहन केल्या असतील. पण यासाठीसुद्घा लोकांनी आग्रह केला नव्हता. ती माझी खाज होती, मी खाजवली. मी लोकांसाठी जगलो, हे तेवढे खरे नव्हते. मी जगलो माझ्याचसाठी, माझ्या आनंदासाठी. मी जे काही केले त्यात मला आनंद मिळत होता. म्हणून ते मी करत राहिलो. लोक भलेही त्याला समाजसेवा म्हणोत, इतरांच्या भल्यासाठी मी हे करतो आहे असे म्हणोत, पण मी ते करीत होतो, करीत राहिलो ते माझ्या आनंदासाठीच. जे काही केले त्यात इतरांना काय मिळाले, मला नाहीत नाही, पण मला त्यातून आनंदच मिळत गेला एवढे मात्र खरे.

या बाबतीत मला सिद्धार्थची कथा आठवते.

कोणे एके क्षणी सिद्धार्थ राजवाड्यातून बाहेर येतो. राजवाड्याच्या बंदिस्त व्यवस्थेतून त्याला बाहेर डोकावण्याची संधी मिळते. तेव्हा त्याला मृत्यू दिसतो. महारोगाने पीडित म्हातारीची वेदना दिसते. वार्धक्याने कमरेत वाकलेला गृहस्थ दिसतो. मृत्यू, वेदना, दुःख, वार्धक्य हे सर्व पाहून तो दुःखी होतो. राजवाड्याबाहेरील जगात पाहिलेली, अनुभविलेली वेदना, दुःख, मृत्यू, वार्धक्य या संबंधातील प्रश्नांनी तो अस्वस्थ होतो. हे सर्व काय आहे? हे असेच का आहे? यामागील कारणं काय असावीत? या दुःखावर काही उपाय असेल का? का हे सर्व असेच असते? आणि हे सर्व असेच असेल तर असे का म्हणून असेल? एक नाही अनेक प्रश्नांचे काहूर त्याच्या मनात उठले असणार. त्या प्रश्नांची उत्तरे राजवाड्याच्या बंदिस्त वातावरणात त्याने शोधण्याचा प्रयत्न केला असणार. पण त्या राजवाड्याच्या बंदिस्त वातावरणाने प्रश्नच पाहायचे नाकारले असल्यामुळे सिद्धार्थाला त्याच्या प्रश्नांची उत्तरे कशी, कोठून आणि कोणाकडून मिळणार? प्रश्न पडताहेत, प्रश्नांची उत्तरही बंदिस्त चौकटीत मिळण्याची सुतराम शक्यता दिसत नाही आणि प्रश्नांची उत्तरे मिळाल्याशिवाय जगणेही असह्य होते. अशा अवस्थेत दोनच मार्ग शिल्लक असतात. एकतर बंदिस्त वातावरणात मन मारून जगणे वा बंदिस्तपणाची चौकट मोडून, झिडकारून प्रश्नांना सरळसरळ भिडणे. सिद्धार्थ एका तिरीमिरीत राजवाड्याची बंदिस्त सुरक्षित चौकट सोडून मोकळ्या वातावरणात जातो. प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेतो, वेध घेतो. अथक परिश्रमानंतर त्याला सत्य प्राप्त होते. तो आनंदाचा धनी होतो. बुद्धत्वाला पोहोचतो आणि परिणामस्वरूपी जगालाही आनंद देऊन जातो.
मला नेहमी वाटते, प्रत्येकामध्येच एक सिद्धार्थ दडलेला असतो. तो माझ्यामध्येही होता. या सिद्धार्थाला प्रश्न पडतच असतात. पण सुरक्षिततेच्या बंदिस्त राजवाड्यात या प्रश्नांचा गळा घोटूनच सिद्धार्थ बुद्धत्वाला नाकारत असतो. सुरक्षितता का बुद्धत्व यात सर्वसामान्यपणे सुरक्षिततेला होकार व बुद्धत्वाला नकार दिला जातो. सुरक्षिततेच्या राजवाड्यात मन मारूनच 'जगणं' पत्करले जाते. तर काही अपवाद मन मारून जगण्याला जगणेच समजत नाही, ते प्रश्नांना भिडतात, सुरक्षितता नाकारतात आणि खर्‍या अर्थानं रसरशीतपणे जगतात. माझ्यातील सिद्धार्थाने अशाप्रकारचे जगणे स्वीकारले, एवढाच काय तो वेगळेपणा.

घरच्या मध्यमवर्गीय बंदिस्त चौकटीतून बाहेर डोकावण्याची संधी मिळाली. बिहारचा दुष्काळ जवळून पाहिला. त्या दुष्काळातील अन्नाला मौताद झालेली माणसे. भुकेने खपाटी गेलेली पोटे. पोटात अन्न नाही. अंगावर कपडे नाहीत. डोक्यावर छप्पर नाही. शिक्षण नाही. आरोग्याची कुठलीही सोय नाही. आपल्याला कधी या गोष्टींची ददात पडली नाही. पण ह्यांच्या नशिबातच हा अभाव का? कोणी गरीब का? कोणी श्रीमंत का? ही विषमता का? पूर्वी हे सर्व दिसत नव्हते असे नाही. पण दिसणे व दृष्टी असणे ह्यात फरक आहे. हे या वेळेस दिसत होते. एवढेच नव्हे तर ते पाहण्याची दृष्टीही गांधी, विनोबा, जयप्रकाशजींच्या विचारांतून मिळत गेली. दुष्काळ पाहत असताना नवीन विचारांचे वारे लागले. ते अंगात भिनले. त्या विचाराच्या प्रकाशात जग पाहू लागलो. त्यातून प्रश्न पडायला लागले. ते प्रश्न अस्वस्थ करू लागले. त्या प्रश्नांनी बेजार होत गेलो. त्या प्रश्नांची उत्तरे घरच्या बंदिस्त वातावरणात मिळण्याची शक्यता नव्हती. उलट त्या प्रश्नांनीच घर हादरायला लागले. प्रश्नांची उत्तरे तर सोडाच, पण घर प्रश्नांचा गळाच घोटायचा प्रयत्न करू लागले. त्यात गुदमरून मरण्यापेक्षा जगण्यासाठी घर सोडले. कधी काळी शहर सोडले. नोकरीतही अडकायचे नाही असे ठरवले आणि सरळसरळ बंदिस्त चौकटीतून मोकळ्या वातावरणात आलो.

अवतीभवतीचा निसर्ग जेव्हा पाहतो तेव्हा कुंडीत फुलणारा व जमिनीत फुलणारा गुलाब यातील फरक स्पष्टपणे जाणवतो. कुंडीत फुलणार्‍या गुलाबाला एका सुरक्षित मर्यादेतच फुलावे लागते. मिळेल तो सूर्यप्रकाश, कुंडीत मावणार्‍या मातीतीलच मर्यादित अन्नघटक. माळी देईल ते खत, अन्न, पाणी. माळ्याने ठरवून दिलेली त्याची फुलण्याची जागा. मुळांना खोलवर जायचे असल्यास कुंडीच्या मर्यादेतच खोलवर जायचे. खोल जाण्याची मर्यादा संपताच मुळांनी स्वतःभोवतीच वेटोळे घेत घेत वाढायचे. कुंडीने ठरवून दिलेल्या लांबी, रुंदी, उंचीच्या मर्यादेतच, पण सुरक्षितपणे स्वतःला वाढवायचे. कुंडीची मर्यादाच त्या गुलाबाच्या वाढीची व विकासाची मर्यादा. मी काही वेगळे केले असेल तर कुंडीची ही मर्यादा तोडून जमिनीत मूळ टाकत खोल खोल जाण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नांना समाजसेवा, त्याग वगैरे शब्दांनी गुणावरोपित करू नये असे मला वाटते.

दरदरून फुलणे, फळणे, बहरणे, डवरणे ही निसर्गाची मूळ व उपजत प्रेरणा असावी. तीच माझ्यातही होती. या मूळ प्रेरणेला नकार देण्याचा करंटेपणा मी केला नाही. या फुलण्या-फळण्या-बहरण्याच्या प्रयत्नांत परिणामस्वरूपी काहींना सावली मिळाली असेल. काहींना फळं, फुलं मिळाली असतील. तर काहींना माझा काटाही बोचला असेल. कोणाला सावली, फुले, फळे देणे हे जसे माझ्या जगण्याचे प्रयोजन नव्हते तसेच कोणाला काटा बोचावा असेही प्रयोजन असण्याचे कारण नव्हते. ज्यांना माझ्याकडून काही मिळाले असेल त्यांनी मला खतपाणी दिले; तर ज्यांना काटा बोचला असेल त्यांनी झोडपाही दिला असेल, तर त्यात काही वावगे नाही.

पहिल्यांदा गांधी विचाराच्या प्रभावाने भारावलो होतो. परंतु काम करता करता इतर विचारसरणींच्याही संपर्कात आलो. त्यांचाही प्रभाव पडत गेला. जयप्रकाशजींच्या चळवळीत प्रवाहीपण होते, तोपर्यंत त्या चळवळीत होतो. त्याच प्रभावातून खेडे समजल्याशिवाय देश समजणार नाही, या भावनेतून खेड्यात राहिलो. दोन दशके खेड्यात राहिलो. प्रथम प्रथम विचारांमध्ये अभिनिवेश, आक्रमकता नव्हती असं नाही. ती होती म्हणून आकर्षकताही होती. आपले तेवढेच खरे, ही आग्रही वृत्तीही होती. एवढेच नव्हे तर उद्घारकर्त्यांचा अहंकारही होताच. परंतु कालांतरानं तो गळत गेला. जमिनीत मुळे जशी आतआत जात राहिली तसतसा अभिनिवेश, अहंकार कमी होत गेला. अंकुरण्यासाठी टरफलांचे गळून पडणे आवश्यक आहे हे उमजायला लागले. तसतसे बीज आतमध्ये थोडेबहूत रुजायला लागले.

कोणत्याही विचारांच्या मठांमध्ये रुळलो नाही. मठांमध्ये सुरक्षितता असते, पण सृजनाची शक्यता संपते. त्यामुळे कुंडीची मर्यादा जशी मानली नाही. तशीच मठांची कुंडीही नाकारत राहिलो. प्रवाहीपण असेल तिथे तिथे झेपावत राहिलो. आणि साचलेपण आले, तिथून बाजूला होत राहिलो.

माझ्यातील सिद्धर्थाला फुलण्या-फळण्या-बहरण्याची आकांक्षा आहे. माझ्यातील सिद्धर्थाला बुद्ध जरी होता आले नाही, तरी समृद्ध जरूर होता आले.

हीच समृद्धी माझ्या आयुष्याची कमाई आहे.

***

सुहासची आणि माझी पहिली भेट झाली होती ती नागपूरच्या तरुण शांती सेनेच्या शिबिरात. शिबिरात हा गाणे म्हणायचा आणि योगासने करवून घ्यायचा. खादीचे कपडे अंगात, जिभेवर साखर आणि गांधी, विनोबा तोंडात, हे त्याचे खास वैशिष्ट्य. पान, तंबाखू तोंडात असणारा जसा इकडे तिकडे पिचकार्‍या मारत असतो तसा हाही गांधी, विनोबांच्या पिचकार्‍या इथे तिथे मारायचा. तो स्वतः कधी काही म्हणायचाच नाही.

गांधींनी असे म्हटले, विनोबा तसे म्हणाले, जयप्रकाश नारायणांनी शिक्षणात क्रांतीबद्दल असे म्हटले. आणि समजा ह्या महापुरुषांनी नावे चुकून नाहीच आलीत तर, ह्या बाबतीत लोक असे म्हणतात तसे म्हणतात. तो कधीच स्वतः काही म्हणायचा नाही. त्याच्या तोंडून गांधी, विनोबा, जयप्रकाश नारायण किंवा लोकच बोलायचे. ह्या सर्व थोर पुरुषांनी व समस्त जनतेनी त्याचे तोंड कायम भाडेपट्टीवर घेतले होते की काय असेच वाटायचे.
एकदा तो माझ्याकडे आला आणि सुरू झाला. गांधी, विनोबांनी शिक्षणात क्रांतीचा विचार मांडला. तरुण शांती सेनेनेही शिक्षणात क्रांतीचे अभियान राबविले. सर्व शाळाकॉलेजांमध्ये जाऊन शिक्षणात क्रांतीचे विचार मांडले. परंतु दुसर्‍यांच्या शाळाकॉलेजांमध्ये जाऊन असे विचार मांडण्यापेक्षा आपण गांधी-विनोबांच्या विचारांप्रमाणे स्वतःचीच शाळा का काढू नये? अखेर किती दिवस दत्तक पुत्रांचे संगोपन करणार? त्यापेक्षा आपण स्वतःचेच मूल जन्माला का घालू नये?

त्याच्या बोलण्याचा सारांश एवढाच होता की त्याला शाळा काढायची होती. पण सरळसरळ असे म्हणण्यापेक्षा त्याला गांधी-विनोबांचा क्रांतीचा लेप लावणे ही त्याची सवय होती. अर्थात गांधी, विनोबांच्या विचारांचा मुलामा देत का होईना, तो शाळा काढत असेल, तर आक्षेप घेण्याचे कारण नव्हते. पण मामला येथेच संपणारा नव्हता. तो पुढे म्हणाला, "त्यासाठी संस्था काढावी लागेल".
"अर्थातच", मी बोलून गेलो. त्याचा चेहरा उजळला.
तो उत्साहात बोलू लागला, "संस्थेचे नावही ठरले आहे. नवसमाज निर्माण संस्था. संस्थेचे संचालक कोण असावेत हे मी ठरविले आहे. राम शेवाळकर, श्याम मानव ह्यांनी त्यासाठी संमतीही दिली आहे. तूही ह्या संस्थेत राहावेस अशी माझी इच्छा आहे".

मी त्या संस्थेत राहण्यावर मात्र माझा तीव्र आक्षेप होता. माझे स्वतःचे संघर्षात्मक कामाला प्राधान्य होते. संघर्षात्मक कामात गुंतलेल्या माणसाने अशा प्रकारच्या संस्थांमध्ये स्वतःला अडकवून घेऊ नये, कारण त्यामुळे संघर्षाच्या कामात अडसर येतो, अशी माझी धारणा होती. त्यामुळे त्याच्या संस्थेमध्ये राहण्याला मी ठामपणे नकार देत राहिलो. त्याला परोपरीने समजावून सांगू लागलो, "माझा तुला कवडीचा फायदा नाही. मी तुला कोणतीही मदत करणार नाही. संस्थेची कोणतीही जबाबदारी मी स्वीकारणार नाही. मी कायम संघर्ष करीत राहणार असल्यामुळे उलट मी त्या संस्थेत राहण्याचा संस्थेला तोटाचा होईल".

पण तो ऐकायलाच तयार नव्हता. तो इरेस पेटला होता. अखेर नाईलाज म्हणून का होईना मी त्याला संमती दिली.

माझ्या नावाचा त्याला कवडीचा फायदा होणार नाही, हा माझा भ्रम होता. एस. एम. जोशी यांच्यासोबत राहिल्याने त्यांचे सर्व सहकारी मला चांगले ओळखत होते. पुलोदचे सरकार होते आणि त्या सरकारमध्ये शिक्षणमंत्री होते सदानंद वर्दे. सुहासच्या संस्थेमध्ये माझे नाव पाहताच संस्थेच्या मागणीप्रमाणे शाळेला तात्काळ मान्यता मिळाली. अर्थात अशाप्रकारे आपल्या नावाचा उपयोग होऊ शकतो व कोणी करून घेऊ शकतो, हे तर माझ्या ध्यानीमनीही नव्हते. माझ्या नावाचा अशाप्रकारे उपयोग करायचा ठरवूनच त्याने इरेस पेटून मला आग्रह केला होता, हे अर्थात फार उशिरा कळले. त्याने शाळा सुरूही केली. शिक्षणमंत्री साने गुरुजींच्या नावाने खुष होऊन जातील हे हेरून त्याने शाळेला नाव दिले - साने गुरुजी विद्यालय. हे सर्व तपशीलवार सांगितले एवढ्याचसाठी की पुढील आयुष्यात ह्या शाळेशी माझा अप्रत्यक्ष, आणि ही शाळा ज्या गावात होती त्या गावाशी प्रत्यक्ष संबंध येणार होता. थोडाथोडका नव्हे, तर दोन दशकांचा म्हणजेच तब्बल २० वर्षांचा.

लग्नानंतर माया कोकणात, तर मी विदर्भात, अशी परिस्थिती होती. आमचा प्रपंच चालवायचा असेल तर तिला नोकरी करणे भाग होते. मी कोकणात जाऊन राहावे तर ते मला शक्य वाटत नव्हते. एकतर त्या अनोळखी भागात मला नव्याने सुरुवात करावी लागणार होती. आठ-दहा वर्षापासून जिथे आपण सामाजिक काम करतो ते सर्व सोडून कोकणात नव्याने श्रीगणेशा करणे जीवावर येत होते. नवी माणसे, नवा प्रदेश समजून घेणे, त्याच्या प्रश्नांची नव्याने ओळख करून घेणे, त्यांची भाषा, चालीरीती यांचे आकलन होणे ह्यात बराच काळ जाणार होता. त्यातही ज्या तरुण वर्गात काम करायचे तो तरुण वर्गच नोकरीच्या निमित्ताने मुंबईला पळालेला. त्यामुळे तेथील म्हातार्‍यांमध्ये व महिलांमध्येच काम करायला मन धजावत नव्हते. त्यामुळे सामाजिक काम करायचेच झाल्यास ते आपल्या भागातच असे मी ठरविले. पण मग प्रश्न होता की माया कोकणात व मी विदर्भात, असे किती वर्ष चालणार? विदर्भ व कोकणाचे अंतरही कमी नव्हते. मी तिकडे वारंवार जाऊ शकणार नव्हतो आणि मायाही नोकरी सोडून इकडे येऊ शकणार नव्हती. लग्नानंतर काही वर्षे अशीच गेली.

बिहार छात्र-युवा संघर्ष वाहिनीने बोधगयाची सद्यनक्षेत्र म्हणून निवड केली. बिहारच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी व्यापक कामापेक्षा बोधगयामध्ये सर्व ताकद पणास लावावी असा निर्णय झाला. बोधगयाच्या मठाकडे ९० हजार एकर जमीन होती. मठाच्या महंताकडे असलेली ही जमीन भूमिहीन शेतमजुरांना देण्यात यावी, ह्यासाठी मोठ्या प्रमाणात भूमिहीन शेतमजूर स्त्री-पुरुषांचे संगठन करून महंताविरुद्ध लढा उभारण्यात येत होता. ह्या कामासाठी प्रभात, कारू, प्रियदर्शी, मणीमाला, कांचन, नरेन्द्र ही सर्व संघर्ष वाहिनीची प्रमुख मंडळी कामात लागली होती. बोधगयाच्या लढ्याची राष्ट्रीय स्तरावर व्यापक चर्चाही होऊ लागली. त्यामुळे अशा प्रकारचे लढे देशभर उभे करण्यासाठी सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी खेड्यात जाऊन तेथेच राहून सद्यनक्षेत्र निर्माण करावे अशी मागणी छात्र-युवा संघर्ष वाहिनीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत जोर धरू लागली. त्याप्रमाणे महाराष्ट्रातही प्रमुख कार्यकर्त्यांनी कोठलेतरी सद्यनक्षेत्र निवडावे व तेथेच दलित, आदिवासी, भूमिहीन शेतमजुरांच्या संघटना बांधून त्यांच्या हक्कासाठी संघर्ष करावा, असा निर्णय झाला. त्याप्रमाणे महाराष्ट्रात भीमराव म्हस्के, राजेन्द्र मानव, कुंजविहारी रावत ह्यांनी धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा ह्या गावात जाऊन राहण्याचा निर्णय केला. सातारा जिल्ह्यात विजय सिन्हा, चेतना गाला ह्यांनी म्हसवड ह्या गावाची निवड केली. तर जतीन देसाई, शुभा शमीम हे ठाणे जिल्ह्यातील आदिवासी भागात जावून राहिले. मी, देवेन्द्र व अरविंद ह्यांनी अमरावती जिल्ह्यातील मेळघाट ह्या भागात जाण्याचा निर्णय केला.

त्याच दरम्यान सुहास भेटला. नेहमीप्रमाणे त्याच्या अंगात खादी, जिभेवर साखर आणि तोंडात गांधी-विनोबा होतेच. तो म्हणाला, "किती दिवस तुम्ही नवराबायको असे दोन टोकावर राहणार? गांधीविनोबांच्या विचारांची आता आपलीच शाळा आहे. त्या शाळेतच ती नोकरी का करीत नाही?"

मला तरी यापेक्षा वेगळे काय हवे होते? नाहीतरी मी मेळघाट ह्या आदिवासी भागात जाणारच होतो. पण मायाला जर ही नोकरी मिळाली, तर मेळघाट ऐवजी यवतमाळ जिल्ह्यातील मेटीखेडा या गावात मला जाता येईल. माया तिथेच नोकरी करेल व मी त्याच भागात काम करेन. काही का असेना ह्या निमित्ताने आम्हांला एकत्रित राहताही येईल, ह्या एकमेव कारणासाठी मी त्याचा प्रस्ताव तात्काळ डोळे मिटून स्वीकारला.

थोड्या वेळाने तो हळूच म्हणाला, "पण एक अडचण आहे. तिथे मायाला पूर्ण पगार मिळत असेल. आपली शाळा नवीन. अजून अनुदान सुरू झालेले नाही. त्यामुळे पगार देता येणार नाही".
"अरे पगार देऊ नकोस. पण किमान जगण्याइतपत तर काही व्यवस्था करशील की नाही?" मी विचारले.
"अवश्य. ती मी निश्चितपणे करेन. पण तुम्हाला जगण्यासाठी किती लागेल?" सुहासचा प्रश्न.
"ते आताच कसे सांगता येईल? तुझ्या गावात येऊन राहतो. महिन्याभरात कमीत कमी खर्चात कसे जगता येईल याचा अंदाज घेतो आणि तुला सांगतो". मी म्हणालो.

मायाला खेड्यात जाऊन राहायचे हे आधीच सांगितले होते. तिला सुहाससोबत झालेले बोलणे कळविले. तिने तात्काळ कोकणातील नोकरीचा राजीनामा दिला. कोकणातील ज्ञात प्रदेश सोडून विदर्भातील अज्ञात भागात ती कोणतीही तक्रार न करता आली. स्थायी नोकरी सोडून अस्थायी नोकरी पत्करली. मिळणार्‍या भरभक्कम पगारावर पाणी सोडून जवळपास बिनपगारी नोकरीचा तिने स्वीकार केला. प्रेमात माणसे आंधळी होतात हे ऐकून होतो, पण आम्ही ध्येयाने आंधळे झालो होतो.

आधी कधीच न पाहिलेल्या गावात, मेटीखेड्यात आम्ही जून १९८०मध्ये दाखल झालो. सुहासचे घराणे त्या गावचे मालक, इजारदार मोठे जमीनदार. मालकाच्या गोठ्यामध्ये एक कुडाची भिंत उभारून आमची राहण्याची व्यवस्था केली गेली होती. मालकाच्या गोठ्यात दावणीला बांधलेल्या जनावरांमध्ये आमची भर पडली, असेच कदाचित सर्वोदयी असलेल्या सुहासला वाटले असेल. त्याला काय वाटले असेल माहीत नाही, पण आम्ही आपल्याच धुंदीत होतो. साधेपणाने रहायचे, कमीत कमी खर्चात कसे जगता येईल याचा प्रयत्न करायचा. अवाजवी खर्चाला फाटा द्यायचा. अवाजवी खर्चात माझ्या सिगारेटचा खर्च येतो म्हणून सिगारेट पिणे बंद केले. अशी सर्व काटकसर करीत करीत महिनाभर जगण्यासाठी किती खर्च येतो त्याचा चोख हिशोब काढला आणि एक दिवस तो सुहासला सांगितला.

"महिन्याभरात जगण्यासाठीचा खर्च ३९९ रु. आला. तू मायाला महिना ४०० रु. दिलेस तरी चालेल".
हे ऐकून सुहास खदाखदा हसला असेल. पण त्याचे हसणे त्यावेळेस आम्हांला ऐकू आले नाही. पुढील काळात ते ऐकू येणार होते.

गाव २००० लोकवस्तीचे. गावात आदिवासींची संख्या अधिक. आदिवासींमध्ये कोलाम, गोंड, गवारी ह्या जातींचा समावेश. आदिवासी लोकानंतर संख्येच्या दृष्टीने क्रमांक दलितांचा व नंतर इतर जातींचा. शेतकर्‍यांची संख्या कमी, तर भूमिहीन शेतमजुरांची संख्या अधिक आहे. प्रामुख्याने आदिवासी व दलितांमध्ये मला काम करायचे होते. ते भूमिहीन शेतमजूर, आदिवासी व दलितांमध्ये, पण 'मालकाचा माणूस' ही ओळख त्याच्या आड येत होती. माझी दुसरी ओळख म्हणजे गावातील शाळेच्या मुख्याध्यापक बाईचा रिकामचोट नवरा. काहीही कामधाम न करता बाईच्या पगारावर जगणारा ऐतखाऊ नवरा. यापेक्षा पहिल्या अवस्थेत माझी दुसरी ओळख काय असणार? तरीदेखील मी माझे गरीब लोकांसोबतचे उठणे-बसणे वाढविले. गावच्या बसस्टॅंडवर, पानाच्या टपरीवर, मिळेल त्या जागेवर त्यांच्याशी अनौपचारिक गप्पा मारू लागलो. ओळखीपाळखी वाढवू लागलो.
एक दिवस असाच स्टॅंडवरील हमालांच्या टोळक्यात बसलो असताना एक काळाकभिन्न धिप्पाड माणूस उतरला. त्याच्या हातात तलवार होती. आणि तो हरी नावाच्या हमालाची चौकशी करीत होता. कोणीतरी त्याला दुरूनच बोट दाखवून 'तो हरी' म्हणून सांगितले असावे. तो तलवार उपसून हरीच्या दिशेने झेपावला. ही बाब माझ्या ध्यानात येताच एका क्षणात मी उठलो व कसलाही विचार न करता त्या माणसाकडे धावलो आणि त्या माणसाच्या ज्या हातात तलवार होती तो हात घट्टपणे पकडला आणि दरडावूनच विचारले, "क्या कर रहे हो?"
असा कोणीतरी मधात येईल, तलवारीचा हात घट्ट पकडेल आणि दरडावून विचारेल, अशी त्याने अपेक्षाच केली नसावी. त्यामुळे तो ह्या अनपेक्षित प्रसंगाने दांदरल्यासारखा झाला. त्यातून सावरायलाच त्याला वेळ लागला. त्यामुळे माझ्या प्रश्नाला उत्तर द्यायलाही त्याला उशीर लागला असावा. तो कसाबसा म्हणाला, "हरी को मारना है".

त्याने असे म्हणताच मी संतापाने भडकून माझ्या तोंडाचा पट्टा सुरू केला, "ऐसे कैसे मारना है? मेरे गावमे आ के तुम उसे मारोगे? तुम्हारी मोगलाई है क्या?"

माझ्या चढलेल्या आवाजाने तोपर्यंत अवतीभवती गर्दी वाढली होती. त्याचा फायदा घेत, "तुरंत भागो यहॉं से, नही तो बहुत बुरा होगा", असे त्याला धमकावले. त्यानेही लगेच तिथून काढता पाय घेतला. तो तर निघून गेला, पण माझ्या भोवताली जमलेली गर्दी बराच काळ माझ्या अवतीभवती रेंगाळत होती. तिच्या नजरेत ह्या प्रसंगाने फरक पडला होता हे ठळकपणे जाणवत होते. गर्दी बोलू लागली.

गर्दीने पुरविलेल्या माहितीप्रमाणे तो यवतमाळचा कुविख्यात गुंड काला मज्जीद होता. त्याच्यावर खुनापासून ते खुनाचा प्रयत्न करण्यापर्यंतचे अनेक गुन्हे दाखल होते. खंडणी गोळा करण्यापासून ते लुटमारी, दरोड्याची अनेक प्रकरणे त्याच्या नावावर होती. त्याची दहशत जिल्ह्यात होती आणि अशा खतरनाक माणसाच्या हातात तलवार असतानादेखील मी त्याला न घाबरता आडवा गेलो. त्याचा हात पकडला. त्याला दरडावले, खडसावले व शेवटी पिटाळून लावले, म्हणून गर्दी माझ्याकडे आदराने पाहत होती.

खरे तर मला हे काहीही माहीत नव्हते. माझ्यासमोर कोणीतरी अनोळखी माणूस हातात तलवार घेऊन माझ्या गावातील ओळखीच्या हरी नावाच्या माणसाला मारायला धावतो म्हणून मी धावलो होतो. त्या माणसाबद्दल मला काहीच माहिती नव्हती म्हणून माझ्या मनात त्या माणसाबद्दलची दहशतही नव्हती. परंतु जेव्हा गर्दीने त्या माणसाची ओळख करून देणे सुरू केले, तेव्हा मात्र मला दहशत वाटायला लागली.

तो मला अनोळखी होता, म्हणून मला त्याची दहशत वाटली नाही. पण तो मला घाबरला होता. तो त्यालासुद्घा मी अनोळखी होतो म्हणूनच की काय? त्याने कसा विचार केला असेल? ज्याअर्थी हा समोरचा अनोळखी माणूस एवढ्या हिंमतीने येऊन आपला हात पकडतो, दरडावतो, त्याअर्थी हा आपल्यापेक्षा तर ह्या क्षेत्रातला दादा नसेल ना, असा तर विचार त्याच्या मनात येऊन गेला नसेल?

प्रत्यक्ष त्याचा हात पकडताना भीती वाटली नाही, परंतु नंतर मात्र भीती मनाला चाटून गेली. माझ्या मनाला नंतर काहीही वाटले असेल, पण गर्दीसाठी मी हिरो ठरलो होतो. निर्भय, बेधडक, डेअरिंगबाज सिद्घ झालो होतो.
मालकाचा माणूस किंवा मुख्याध्यापक बाईचा नवरा एवढ्या मर्यादेतच मला ओळखणार्‍या गावाला ह्या प्रसंगाने एक वेगळीच ओळख करून दिली. गावाला स्वतंत्रपणे झालेली माझी ही पहिलीच ओळख. पुढे वेगवेगळ्या छोट्या मोठ्या प्रसंगांतून ही ओळख पटत गेली. अखेर छोट्यामोठ्या प्रसंगांत तुम्ही कसे वागता ह्यातूनच तुमचा चेहरा आकार घेत असतो. तुमची ओळख बनत जाते. तुम्ही तत्त्वज्ञान काय सांगता, तुमची विचारधारणा काय आहे, हे सांगून भागत नाही. कारण हे सांगणारे खूप असतात. परंतु तुम्ही मानत असलेल्या तत्त्वज्ञानानुसार एखादी साधी कृतीही तुमच्या विचारधारेची ओळख पटविण्यास पुरेशी असते किंवा ती कृतीच तुमचे तत्त्वज्ञान बोलून जाते. त्यासाठी वेगळी पोपटपंची करण्याची गरज नसते. माझ्याबाबत घडलेला हा साधा प्रसंग 'गरिबांचा माणूस' म्हणून गावाला ओळख पटविण्यास बराच उपयोगी पडला व त्यामुळे शेतमजुरांना संघटित करणेही मला पुढे सोपे गेले.

गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात. खेड्यात यालाच मांडोस म्हणतात. या मांडोशीच्या दिवशी जमीन मालक सालदार ठेवतात. सालदार म्हणजे वर्षभराच्या कराराने नेमलेला नोकर किंवा गडीमाणूस. त्याचे वेतन म्हणजे साल. मांडोशीच्या दिवशी ठरविले जाते. ते रोख पैशामध्ये व धान्यरूपात ठरते. गावात राहत असताना हे साल किमान वेतनाच्या खूपच कमी ठरविले जाते, हे माझ्या लक्षात आले. त्यामुळे हे साल किमान वेतनाइतके असावे ह्यासाठी मागणी करण्याचे ठरले. प्रत्यक्षात दिले जाणारे वेतन व किमान वेतनानुसार द्यावयाचे वेतन ह्यात जे अंतर असेल ते मालकांनी सालदारांना द्यावे, अशी मागणी आम्ही केली. त्यासाठी मालकांना एक महिन्याची मुदत दिली गेली. ह्या मुदतीच्या आत मागणी मान्य न झाल्यास काम बंद केली जाईल, असाही इशारा दिला गेला. ही घोषणा होताच गावात हलकल्लोळ माजला. सर्व मालकवर्ग संतप्त झाला. माझ्या नावाने शिवीगाळ होवू लागली.

"कोण हा दाढीवाला? बाहेरून आला आणि मजुरांना भडकावू लागला?"
"ह्याच्या बापाने कधी शेती केली काय? ह्याला शेतीतले काही समजते काय? मजूर-मालकाचे चिखलपाण्याचे संबंध हा बिघडवून राहिला. "
"पूर्वी गाव कसं शांत होतं. गुण्यागोविंदानं नांदत होतं. पण हा दाढीवाला, भाकर्‍या, लंढूर्‍या आला आणि गावाचं वातावरणच खराब करून राहिला."
"ह्याला गावातून हाकलला पाहिजे."
दुसरा म्हणे, "ह्याला बदडून काढला पाहिजे."

अर्थात हे कोणी माझ्या तोंडावर बोलत नव्हते. कोणाची तशी हिंमतही नव्हती. नाही म्हटले तरी काल्या मज्जीदसारख्या गुंडाच्या हातात तलवार असताना बेधडकपणे मनगट पकडणारा म्हणून माझी ख्याती झालीच होती. काल्या मज्जीदला जो घाबरला नाही, तो आपल्याला काय घाबरणार, असाही त्यांचा ग्रह झालेला असावा आणि गावात मी एकटा कोठे राहिलो होतो. मला कोणी काही म्हटले तर मजूरच त्यांना उत्तर देऊ लागले. तेच माझ्या बाजूने प्रतिवाद करू लागले. माझ्या जिवाला कोणतीही इजा पोहोचणार नाही, ह्याची काळजी घेऊ लागले.
खरोखरच पूर्वी गाव शांत होते. वाघाच्या पोटात बकरीने शांत पहुडावे तसे. पण ही शांतता खरी नव्हती. वरवरची होती. मजुरांचा काही इलाज नाही म्हणून ते मुकाट्याने, निमुटपणे कोणताही प्रतिकार न करता मालकशाही सहन करीत होते. ते बोलत नव्हते. तक्रार करीत नव्हते. ह्या अर्थाने गाव त्यांच्या लेखी शांतच होते. पण किमान वेतनाप्रमाणे साल मिळाले पाहिजे. किमान वेतनाप्रमाणे कमी दिल्या जाणार्‍या वेतनातील अंतर मिळाले पाहिजे. नियमानुसार सुट्ट्या मिळाल्या पाहिजेत, ह्या मागण्या करताच गाव अशांत झाला. कोणत्याही आंदोलनातील आर्थिक मागण्या महत्त्वाच्या नसतात असे नाही, पण त्याहीपेक्षा त्या आंदोलनाच्या माध्यमातून दबलेला, पिचलेला माणूस ताठ मान करून उभा राहतो, कायम मूक असलेला माणूस बोलका होतो, त्याला स्वतःचे म्हणून आत्मभान येते. हेच सर्वाधिक महत्त्वाचे योगदान आंदोलनाचे असते. एका अर्थाने आतापर्यंत मूक असलेली संस्कृती ह्या आंदोलनाने बोलकी होऊ लागली होती. ती बोलकी जसजशी होत जाते तसतसे प्रस्थापितांना अडचणीचे होऊ लागते.

सालदारांनी मालकांना दिलेली महिन्याभराची मुदत संपण्याची वेळ जसजशी जवळ येऊ लागली तसतशी गावाची अस्वस्थता वाढू लागली. मालकांमध्ये गुफ्तगू होऊ लागले. काय करावे, काय करू नये, ह्यावर विचार विनिमय होवू लागले.

"देऊन टाकू त्याहीचे अ‍ॅरिअर्स, कटकट नको." एक जण.
"अरे ऍरिअर्स असे सहजासहजी दिल्यानेच कटकट वाढणार आहे. नाहीतरी आजच मजूरवर्ग डोक्यावर चढला आहे, उद्या त्याहीची मागणी अशी सहजासहजी मान्य केली तर आपल्या डोक्यावर नाचल्याशिवाय राहणार नाही." दुसरा.
"तुमचं ठीक आहे दादाजी, पण आमचे कसे होईन त्याहीनं काम बंद केलं तर? गुरंढोरं काय खुट्यालेच राहतील. त्याहीले चारापाणी कोण करेन? चरायले कोण नेईल? त्याहीनं काम बंद केलं तर का मी नेवू त्याहीले चरायले?"
"हो ना जी. माह्या येवढ्या गाई-म्हशी कोन दोहन? मी तं लंबाच होऊन जाईन."
त्यावर चवथा म्हणे, "अरे पण त्याहीनं काम बंद केलं तर मजूर काय खातीन? त्याहीचंही पोट आपल्यावरच आहे ना? आपल्याले काही दिवस नेट लागन. पण त्याहीनं काम बंद केलं तर त्याहीची पण शेकन ना? शेकू द्या नं काही दिवस. जातीन कुठं?"

दरम्यानच्या काळात सालदारांना, 'तू काम बंदच्या दिवशी का कामाला आला नाही तर तुला मी कामावरून बंदच करेन. दुसरा गडी ठेवेन', अशा प्रकारे धमकावणे सुरू झाले. पण त्याचा परिणाम झाला नाही. सालदारांनी काम बंद केलेच तर पर्याय म्हणून रोजंदारीवर मजूर कामावर येतील का याचीही चाचपणी मालकांनी करून पाहिली, पण तेही शक्य नाही असे त्यांना आढळून येऊ लागले. शेवटचा उपाय म्हणून मजुरांमध्ये भांडणं लावता येतात का म्हणून प्रयत्न करून पाहिला गेला, पण त्यातही त्यांना यश आले नाही. सर्व प्रयत्न करून पाहिल्यावर मात्र त्यांनी हात टेकले व कामबंद आंदोलनाच्या आदल्या रात्री चर्चेसाठी मला बोलाविले.

मला एकट्याला चर्चेला बोलावण्यापेक्षा सर्वच सालदारांना बोलावणार असाल तरच मी त्यांच्या सोबत येईन, असा उलट निरोप मी पाठवला. अखेर हो नाही करता करता सर्वांना बोलविण्यात आले. काकाजींच्या अंगणात ही बैठक बोलावण्यात आली. सर्व मालक मंडळी बसली होती, मलाही बसण्यास सांगण्यात आले. पण सालदार व मजूर मंडळी मात्र उभीच होती. मालक मंडळी मला बसा बसा म्हणत होती, पण मीही मजुरांसोबत उभाच होतो. मजुरांना आदरपूर्वक मालकांनी बसा म्हटल्याशिवाय आपणही बसायचे नाही, हे मी ठरविले होते. कोणाच्यातरी ही बाब ध्यानात आली. त्याने सर्वांनाच बसायला सांगितले. सर्व बसल्यानंतर मीही बसलो आणि चर्चेला सुरुवात झाली. पहिल्यांदा थोडे आढेवेढे घेतले गेले. मालक मंडळींनी त्यांच्या अडीअडचणींचा पाढा वाचून पाहिला.
'आधी ठरलेल्या सालात तुम्ही अशी अचानकच वाढ मागता हे बरोबर नाही. ह्या वर्षी जसे सुरू आहे तसेच राहू द्या. पुढच्या मांडोशीला मात्र आम्ही निश्वितपणे किमान वेतनाप्रमाणे साल देऊ', असेही सर्व सालदारांना सांगून पाहिले गेले. पण ह्याचा काहीच परिणाम होत नाही म्हटल्यानंतर अखेर त्यांनी महिन्याभरात सर्व सालदारांचे किमान वेतनानुसार द्यावयाचे वेतन व वास्तवात असलेले वेतन ह्यातील अंतर द्यावयाचे मान्य केले.

मजुरांनी एकच जल्लोष केला. काम बंद न करताच त्यांच्या मागण्या मान्य झाल्या होत्या. प्रथमच त्यांना त्यांच्या ताकदीचा प्रत्यय येऊन गेला. त्यांना किती आर्थिक लाभ झाला ह्यापेक्षाही त्यांचा तो प्रत्यय माझ्यासाठी लाखमोलाचा होता.

गावात पडलेल्या ठिणगीचा वणवा व्हायला वेळ लागला नाही. भोवतालच्या चाळीस-पन्नास गावांमध्ये आगीसारखी ही बातमी पसरली. गावोगावचे मजूर भेटीला येऊ लागले. त्यांची परिस्थिती सांगू लागले. आमच्या गावात या, म्हणून निमंत्रण देऊ लागले. त्या त्या गावात जाऊन मी बैठका घेऊ लागलो. बैठकीनंतर परिस्थितीचा अंदाज घेऊन कृती ठरू लागली. त्यात यशही येत गेले. काही मालकमंडळी सहजासहजी अ‍ॅरिअर्स द्यायला तयार होत नव्हती, तेथे तेथे संघर्ष होवू लागला. संघर्षानंतर का होईना तेथे मालक नमते घेऊ लागले.

***

आपुला चि वाद आपणांसी

लेखक - श्री. चंद्रकांत वानखडे
मनोविकास प्रकाशन
पृष्ठसंख्या - २१६
किंमत - रुपये २००

***

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एवढेच नव्हे तर उद्घारकर्त्यांचा अहंकारही होताच. परंतु कालांतरानं तो गळत गेला. जमिनीत मुळे जशी आतआत जात राहिली तसतसा अभिनिवेश, अहंकार कमी होत गेला. अंकुरण्यासाठी टरफलांचे गळून पडणे आवश्यक आहे हे उमजायला लागले. तसतसे बीज आतमध्ये थोडेबहूत रुजायला लागले. >>
वा!
धन्यवाद चिनूक्स.

नेहमीप्रमाणे वेगळ्या विषयावरचे पुस्तक आणि छान परिचय. धन्यवाद. Happy
सिद्धार्थ -सिद्घार्थ, उद्धारकर्ता- उद्घारकर्ता असे काही टाइपो आहेत ते बघणार का?

सुंदर......
हे वाचलेच पाहिजे.
अशा पुस्तकांची सतत आम्हाला ओळख करुन देत राहिल्याबद्दल धन्यवाद चिनूक्स

चंद्रकांत वानखेडे.
छात्र युवा संघर्ष वाहिनी- शेतमजूर संघटना आणि त्यानंतर म्हणजे १९८२-८३ च्या दरम्यान शेतकरी संघटना
असा त्यांचा प्रवास.

१९८७-८८ च्या सुमारास मी आणि नाशीकचे मुरलीधर खैरनार मेटीखेडा येथे त्यांच्या कुडाच्या झोपडीवजा घरी जेंव्हा गेलो तेव्हा त्यांच्या घरगुती साधेपणामुळे मी बराच प्रभावीत झालो होतो.

त्यांनी बराच काळ शेतकरी संघटनेत सक्रिय कार्य केले.
नंतर वैचारीक मतभेदामुळे ते संघटनेपासून दूर गेलेत.

या पुस्तकाच्या दुसर्‍या आवृत्तीच्या प्रकाशनाच्या निमित्ताने पुण्यात एक कार्यक्रम आयोजित केला आहे -
Patrika.jpg