गानभुली - मोगरा फुलला

Submitted by दाद on 16 December, 2010 - 20:56

मोगरा फुलला मोगला फुलला
फुले वेचिता बहरू कळियांसी आला
http://www.youtube.com/watch?v=kGyvZ1R8kec

सिद्धबेटी ह्या लेकरांना, आई-वडिलांविना रहाण्याची आता सवय झाली आहे. गहिनीनाथांची गुरु-कृपा लाभलेल्या निवृत्ती दादाने आपल्या अनुजाला, ज्ञानदेवाला शिष्य म्हणून स्वीकारलं आहे. ज्ञानदेवाची त्या पथावर झपाट्याने वाटचाल चालू आहे.
अन अचानक एका मऊ मवाळ सांजवेळी, जेव्हा सूर्य किरणांचा पिसारा मिटून घेत निघू लागला आहे... अशा गोरज वेळेला... समाधीस्त अशा ज्ञानदेवांच्या अंतर्यामी मात्रं वेगळीच पहाट फुटते आहे. आपले गुरू, निवृत्तीनाथांनी दावलेली वाट चालता चालता आपण, ती चाललेली वाट, अन ते पोचण्याचं अंतिम ठिकाण, ही निर्लेप समाधीची अवस्था हे सारं एकच असल्याचं ध्यानी आलं आहे.
दुजा भाव नाही. जे पंचेंद्रियांना बाहेर अनुभूत होतं आहे... ते आपल्याच आत्मरूपाचा अविष्कार आहे.
ज्ञानदेव म्हणून जातात.... ह्या ज्ञानवृक्षाला लागलेली फुलं वेचू जातो तर कळ्यांना बहर येतो आहे... नव्हे नव्हे धुमारे फुटताहेत. आपला शिष्य म्हणून स्वीकार करून जे ज्ञानवृक्षाचं बीज गुरूदेवांनी मनाच्या अंगणी रोवलं.... त्याचा वेल गगनावेरी गेला... सार्‍या स्थिर-चळावर त्याच वेलाचा मांडव, दृष्टी जाईल तिथे तिथे त्याच फुलांचा डवर, श्वासा-श्वासाला त्याच गंधाचं लेपन. आता जो प्रकाश उदेजला, त्याला अस्तावणे ठाऊक नाही.
उकललेल्या मनाच्या गुंथ्याचं हे मऊ रेशीम... आपल्याचपाशी राखलं तर परत गुंतेल, आपल्या अस्तित्वाला कातरत राहील ही जाणीवसुद्धा त्याच प्रकाशाचा जीवात्म्याला झालेला स्पर्शं.

ह्या समाधी स्थितीला येण्याचा प्रवास जरी त्यांचा स्वत:चा असला तरी, त्याच्या कृतार्थतेचंही ओझं झाल्यासारखं त्याचं श्रेय अर्पण करून मोकळं होण्याची त्यांना जणू घाई लागलीये. त्याचं श्रेयच काय, पण मनाच्या ह्या ब्रम्हस्वरूपाचंही ओझं झाल्यासारखं, त्याच सुक्षणी, आपल्याच आनंदस्वरुपी मनाच्या उकललेल्या गुंथीचं वस्त्रं विणून ते आपल्या बाप-रखुमादेवीवरास अर्पून स्वत: वेगळे झाले आहेत, ज्ञानदेव.

चितस्वरूप, आनंदस्वरूप, स्वभावमान आत्मस्वरूपाचं चिरंतर भान!

***************************************************************************
मला दिसलेलं हे गाणं असं.... प्रत्यक्षात ज्ञानदेवांनी कोणत्या स्थितीत हे शब्दं उच्चारले असतिल, देव जाणे. पण त्यांच्या ज्ञानमार्गाच्या प्रवासातला हा सुरूवातीचाच काळ असावा असं मला वाटतं. कदाचित संप्रज्ञात समाधीच्या स्थितीत आलेला हा अनुभव असेल...
ह्या अभंगात म्हटलेला बहर हा, त्यांचे गुरू निवृत्तीनाथ ह्यांनी त्यांच्या मनाच्या अंगणात लावलेल्या ज्ञानाच्या रोपाचा आहे... असं "मला" वाटतं.

आता थोडं गाण्याबद्दल.
आधीच कबूल करत्ये... ज्ञानेश्वरांच्या रचना मी मन लावून ऐकण्याआधी कान लावून ऐकण्याचं सारं श्रेय जातं संगीतकार हृदयनाथ मंगेशकर आणि गायिका लताबाईंना. माझ्यासाठी, चवीचवीने गाणं ऐकण्याच्या टप्प्यांतली पहिली पायरी म्हणजे सूर... किंवा चाल! शब्द नव्हेत.
ही ’आदतसे निहायत मजबूर’ अशा म्या पामराची मर्यादा आहे. ह्या जन्मी त्यातून बाहेर पडण्याची लक्षणं अजून तरी दिसत नाहीत.... असो..

गोरख कल्याण हा माझा एक आवडता राग. हृदयनाथांच्या अनेक संगीत रचना ह्या रागाशी रेंगाळताना दिसतात. ही त्यातलीच एक.

हे हेतुपुरस्सर आहे का नाही माहीत नाही पण, गाण्याची सम "फुलला" वर नाही. निव्वळ गीत म्हणून हा अभंग म्हणून वाचताना, आपण नकळत "फुलला" वर जोर देतो.
साधारणपणे गाण्यातल्या समेवरल्या शब्दावर आघात येतो. शब्दं जरा जोरात, ठोस म्हटला जातो. म्हणूनच गाण्याची स्वाभाविक सम "फुलला" असूनही हृदयनाथांनी तिला शब्दांवेगळीच ठेवलीये. सम मोगराच्या आधीच येते.... गाणं ऑफ्बीट चालू होतं. त्यामुळे सम आल्यानं जो साहजिक आघात येतो पूर्णतः टाळलाय.... हृदयनाथांच्या ह्या विचाराला लाख सलाम.
(हे विवेचन जरा अधिकच तांत्रिक झालय... पण तबला वाजवणार्‍या, शिकणार्‍या, गाण्यातल्या बनचुक्यांना रोचक वाटेल.. बाकीच्यांना वैतागवाडी)

व्यक्तिश: मला हे जाणून घ्यायला आवडेल की, हे गाणं गाण्यासाठी, चाल आणि शब्दांचे अर्थ समजून घेण्यापलिकडे लतादीदींनी ह्यावर अजून काय मेहनत घेतली असेल?
असं वाटण्याचं कारण म्हणजे, किती किती संयमानं गायलय हे गाणं, त्याला तोड नाही. कुठे एक जास्तीची हरकत नाही, मुरकी नाही, तान नाही, अगदी स्वराला हेलकावाही नाही... इतकच काय पण हे गाणं गाताना त्यांनी श्वासही मोजून-मापून घेतले असतील असं वाटतं.
’मोगरा फुलला’ ह्यात ’फुलला’ चा उच्चार इतका मृदू, हलके आहे की, जणू जगात कुणालाच कसलाच पत्ता नसताना अलवार उमलणारी मोगर्‍याची कळी.
’कळियासी आला’ ह्यातली तानही इतकी अलगद घरंगळली आहे की, जणू मोगर्‍याचा नुस्ता दरवळ... हा दरवळ झुळुकीवर आरुढ होऊन नाही हं... त्याला झुळुकीच्या स्पर्शाचा शाप आहे....
हा वेगळाच..... आपणासवेच, लहरत आलेला... सुक्ष्मं गंध जाणवणारा... अस्पर्श.

आपण स्वत: गुणगुणायला सुरूवात केली की जाणवतं हा संयम किती महत्वाचा. नकळत स्वरांना हेलकावे येतात, अगदी "चांगलं गातात" म्हणवणार्‍यांच्याकडूनही. गळ्यावरचे, कानांवरचे, मनावरचे संगीताचे/गायकीचे संस्कार पुसून असं आरशासारखं लख्खं कसं गाऊ शकल्या असतील, लतादीदी?

-- समाप्तं

गुलमोहर: 

दाद अप्रतिम :), काश मुझे थोडीसी सुरोकी बुंद दि होती उपरवालेने असं नेहमीच वाटतं आणि असं काही वाचलं की अधिक तिव्रतेने वाटतं. कारण मी नुसतीच कानसेन (किंवा कानसेन कॅटेगरीत जर श्रेणी लावली तर मी बिगरीतली कानसेन) मला फक्त एखाद्या स्वराने अंगावर काटा येतो, भरुन येतं इतपत जाणवतं पण ते कशामुळे हे काय कळत नाही. आणि तुम्ही स्वरांचे पुजारी जसे दैवी देणगी घेऊन येता तसे बहुतेक स्वरांची जागा आमच्या सारख्यात रिकामी ठेवल्याची भरपाई म्हणून उपरवालेने शब्दांचे पुजारी बनवलं असावं कारण बर्‍याचदा मला गाण्यात पण आधी कविता भावते मग चाल

अर्र एक लिहायचं राहिलच, अपवाद म्हणून मला नुसरत फतेह अलीच "सैया" आणि त्याची बरिचशी सुफी गाणी ही शब्दांकडे लक्षच न जाता हलवून गेल्याच आठवलं

दाद, अप्रतिम !

पहिली पायरी म्हणजे सूर >>>>> एक हजार टक्के सहमत !

असं सहमत होऊन शब्दांशी प्रतारणा वगैरे करत नाही आहे, पण मला हे फार जाणवतं की सूर शब्दांच्या , कवितेच्याही पलिकडचे आहेत.. किती नि कसे अर्थ लावाल ?

समेबद्दलचं विश्लेषण अतिशय आवडलं.
कळियासी आला’ ह्यातली तानही इतकी अलगद घरंगळली आहे की, जणू मोगर्‍याचा नुस्ता दरवळ... हा दरवळ झुळुकीवर आरुढ होऊन नाही हं... त्याला झुळुकीच्या स्पर्शाचा शाप आहे.... >>>>>> वाह! वाह!

दाद... निव्वळ अप्रतिम गं !!
मी दोन तीन वेळा पाहिला हा लेख, पण कामाच्या नादात पुर्ण वाचला नव्हता. आज ठरवुन वाचला आणि सार्थक झालं, ऑफीसमध्ये १५ मिनीटे जास्त थांबल्याचं Happy

’मोगरा फुलला’ ह्यात ’फुलला’ चा उच्चार इतका मृदू, हलके आहे की, जणू जगात कुणालाच कसलाच पत्ता नसताना अलवार उमलणारी मोगर्‍याची कळी.

काय सुरेख कल्पना! अप्रतिम लेख! असं वाटतं की एकेक सूर समोर उभे आहेत आपल्या आणि गाणं दिसतंय, परब्रम्ह दिसावं तसं!

’मोगरा फुलला’ ह्यात ’फुलला’ चा उच्चार इतका मृदू, हलके आहे की, जणू जगात कुणालाच कसलाच पत्ता नसताना अलवार उमलणारी मोगर्‍याची कळी.>>>>>> अगदी अगदी ! हा सर्व लेखच ईतका हळूवार झालाय जसे लहान मुलाबरोबर खेळताना आपणही अगदी लहान होउन जातो.
लेख वाचून कधी संपला कळलेच नाही. अजून पाहिजे होता असे वाटू लागले.

अतिशय अप्रतिम लेख,
तुमचा हेवा वाटतो दाद, कसं काय जमतं तुम्हाला?
तरल आणि अनुभव हाच ज्याचं प्रमाण अशा भावनांना इतकं छान कसं काय पकडता शब्दात?
तुम्ही शब्दात पकडता, आणि मग त्या भावनेचं आणखीनच भव्य रूप समोर तरळतं (अनुभवता येतं असं नाही म्हणणार).

अवांतरः
मूळ रचनेत - 'फुले वेचता अतिभारू कळियासि आला' असं आहे, चालीच्या सोयीसाठी 'बहरू' केलंय हृदयनाथांनी.
वारकरी सांप्रदायिक चालीत हे ऐकलंय का? (कार्तिकीने गायलेलं सोडून)
त्यात ते फुलला वर जोर देतात. आणि कुठे तरी असंही जाणवतं की 'आतून फुलणं' महत्वाचं.
(वारकरी लोक त्यांच्याकडे बघून कोण काय म्हणेल याचा विचार न करता नामाचा गजर करत असतात.
फूलसुद्धा कोण काय म्हणेल असा विचार करून फुलत नाही. आणि 'निर्लेप समाधीची अवस्था' ही तशीच सहज येणारी)

दाद,

गोरख-कल्याण हा माझ्याही अतिशय आवडत्या रागांपैकी एक. अर्थातच 'मोगरा....' अतिशय आवडतं. रेशमाला मोगर्‍याच्या सुवासानेच फुंकर घालावी असे लतादीदींनी नाजूकवार म्हटले आहे. ऐकल्यावर मन कसं तॄप्त होतं.
लीखाणात तू ते अतिशय सुंदर पकडलं आहेस. ऊत्तम.

दादूमिया

माझ्या मनावरसुद्धा सुरांचं गारूड आधी चढतं. शब्दांकडे मुद्दाम लक्ष द्यावं लागतं.
कसलं जबरदस्त लिहितेस गं तू. अप्रतीम. तुझ्या लेखनाची मी पंखा आहे.
रुणुझुणू, सूर्यकिरण, माधव यांना अनुमोदन.

दाद, हा भाग पण प्रचंड आवडला Happy

तु मांडलेले भाव-विचार केव्वळ जबरदस्त!!

चवीचवीने गाणं ऐकण्याच्या टप्प्यांतली पहिली पायरी म्हणजे सूर... किंवा चाल! शब्द नव्हेत<<, अगदी अगदी Happy

दाद खुप आवडला. पुरंदरे काकांनी सांगितलं मला या लेखांबद्दल! काय सुंदर लिहिलंय. मी अण मोगरा फुलला लतादीदींच्या आवाजातील गोरख कल्याण यासाठी ऐकत होतो. आता तर तुमच्या नजरेतुन पहायचा प्रयत्न करतो!

आणि ते समेबद्दल बोललात याबद्दल खुप खुप धन्यवाद! तालातलं कळत नाही त्यामुळे अशी माहिती जाणुन घ्यायला फार आवडतं! Happy

काय प्रतिसाद देणार यावर ?
इतक्या उंचीचं लिखाण वाचायला मिळतं हेच खूप झालं.
तुमचं ओघवतं लिखाण, संगीताची जाण, त्या संगीतातून येणार्‍या शब्दकळा या सर्वांचाच सुरेख संगम असतो लेखात.
पुन्हा पुन्हा अनुभव घ्यावा असे ललित.
ललित कशाला म्हणायचं हे तुमचे लिखाण वाचताना कधी प्रश्न पडत नाहीत.

हा लेख वाचल्यावर मोगरा फुलला म्हणून पाहिलं होतं.
पण लताबाईंच्या आवाजाचा प्रभाव असेल किंवा हृदयनाथांची रचनाच अशी आहे कि तीत लताबाईंच्या जातकुळीचाच आवाज खुलत असावा असे वाटते. मूळ गाणेच ऐकत रहावे असे वाटते तसेच तुमच्या ललितलेखांचे आहे..

आज १३ वर्षांनीही तितकाच आनंद देणारा लेख! संपूर्ण गानभुलीच पुनःपुन्हा भुलवून घ्यावी अशी आहे. दाद तुम्ही मायबोलीवर अप्रतिम लिखाण करुन आम्हाला आनंदाचा ठेवा दिला आहे.

ग्रेट लिहिलं आहे . पंचेंद्रियांना बाहेर अनुभूत होतं आहे... ते आपल्याच आत्मरूपाचा अविष्कार आहे .. सतत चिंतन करण्यासारखी ओळ आहे ..

Pages