२००५...जुलै महिना... कर्नाळा अभयारण्याजवळ माझा आणि शामिकाचा बाईकवरून पडून अपघात झालेला. जोरदार पडूनही तिचे फक्त मुक्यामारावर निभावले होते. एस.टी. वाल्याच्या चुकीचे बक्षीस म्हणून मला उजव्या हाताला एक प्लास्टर बक्षीस... महिनाभर विश्रांती घेतल्यावर ऑगस्टमधला हा ट्रेक. मी, अभिजित, हर्षद आणि आशिष असे चौघेजण कर्जत येथील वदप गावावरुन पुढे ढाक गावाजवळ असलेल्या ढाक-भैरीला आणि तिकडून पुढे कुंढेश्वरमार्गे राजमाचीला गेलो होतो. मोजून २ दिवस आधीच माझ्या उजव्या हाताचे प्लास्टर निघाले होते. त्यात धो-धो पावसाळ्याचे दिवस आणि आम्ही निघालो होतो ढाक-भैरीला. इतक्या शिव्या मी कधीच खालेल्या नाहीत... कोणाच्याच... जितक्या ह्या ट्रेकला जाताना खाल्ल्या.. पण ट्रेकला जाताना शिव्या खायला मज्जा येते... काय बरोबर ना!!!
अभिजित आणि आशिष ह्या आधी ढाक-भैरीला जाउन आले होते. गुढ असा ढाक-भैरी ... काय वर्णावे ... कुठल्याही कसलेल्या ट्रेकरला भूरळ पाडणारा असा हा ट्रेक. तेंव्हा मी हा ट्रेक चुकवणे शक्य नव्हते. बहुदा हाताला प्लास्टर असते तरी गेलोच असतो. मुळात कठीण असलेला हा ट्रेक पावसाळ्यात अतिकठीण होऊन बसतो. ह्या ठिकाणी काही अपघात सुद्धा झाले आहेत त्यामुळे नवख्यांनी याठिकाणी अनुभवी मार्गदर्शनाशिवाय जाऊ नये. आम्ही सकाळी-सकाळी पहिल्या कर्जत लोकलने कर्जतला पोचलो. नाश्ता आटोपला आणि तिकडून वदपला पोचलो. 'वदप' गावामागून ढाक किल्ल्याकडे जायची वाट आहे. गावात पोचलो की खिंड दिसते. थोडसं उजव्या हाताला एक मस्त पिटूकला धबधबा आहे. खिंडीच्या दिशेने चालायला लागलो.
पावसाळी वातावरण होते त्यामुळे मस्त वाटत होते. १५ मिं. मध्ये वर चढून खिंडित पोचलो. आता खरी चाल होती म्हणून थोड़ेफार पोटात ढकलले. मजल दरमजल करत तासाभरात वरच्या टप्याला पोचलो. वरच्या पठारावर पोचायच्या आधी एक झाडीची वाट लागते. पायाखाली लालमातीचा चिखल तुडवत ती वाट पार केली. ही वाट पूर्ण झाली की आपण वरच्या पठारावर येतो आणि समोर विस्तीर्ण पठार आणि त्यावर सगळीकडे शेतीच-शेती दिसते.
त्या शेता-शिवारांमधून आणि बांधांवरुन वाट काढत थोड्याच वेळात आम्ही गावात पोचलो आणि तिथून ढाक किल्ल्याकडे निघालो. वाटेवर सगळीकडे धुके होते. दूरचे काही दिसत नव्हते आणि मळलेली वाट नव्हती. त्यामुळे वाट अंदाजानेचं काढत होतो. आम्हाला ढाक किल्ल्यावर जायचे नव्हते तर त्याला वळसा मारून पुढे भैरीच्या गुहेकडे जायचे होते. उजवीकडे वर चढलो तर ढाक किल्ल्याच्या माथ्यावर जायला होते आणि डावीकडे खाली आपण रस्ता चुकतो. अखेर वाट आम्हाला समोरच्या दरीच्या टोकाला घेउन गेली गेली. समोरचे दृष्य फारच सुंदर होते.
डोंगर उतारावर पसरलेल्या फुलांच्या चादरी आणि समोरच्या कडयावरुन कोसाळणारे धबधबे. ते दृष्य डोळ्यात साठवून आम्ही पुढे निघालो. पुढे स्पष्ट वाट नव्हती त्यामुळे जंगलामधून अंदाजानेच वाट काढत-काढत कळकराय सुळक्याच्या दिशेने आमची पावले पडत होती. काही वेळानी अखेर धुक्यामधून पुसटसा कळकराय सुळका दिसायला लागला. आता आमच्या पावलांची गती वाढली. काही वेळातच आम्ही मळलेल्या वाटेच्या चौरस्त्यावर येउन पोचलो. येथून समोरचा रस्ता कुंढेश्वरमार्गे राजमाचीला जातो. त्याच रस्त्याने आम्हाला ढाक करून पुढे जायचे होते. चौरस्त्यावरुन डावीकडे वळल्यास भीमाशंकरला जाता येते. आम्ही आता उजवीकडे उतरून त्या छोट्याश्या घळीमध्ये उतरलो. उतार असलेली घळ संपत आली की ढाकच्या पश्चिम कड्याची भिषणता आणि दुर्गमता लक्ष्यात येते. समोरच्या दरीमध्ये धुके भरले होते त्यामुले खोलीचा अंदाज येत नव्हता. घळीमधून खाली उतरताना थोडी काळजी घ्यावी लागते कारण घळ संपता-संपताच लगेच उजवीकडे सरकून खाली उतरावे लागते. तिकडे पायाखाली एक मोठा दगड आहे त्यावर पाय टाकुन उजवीकडे सरकावे लागते. पावसामुळे सगळीकडे निसरडे झाले होते त्यामुळे काळजीपूर्वक आम्ही चौघेजण तिकडे उतरलो. आता आम्ही ढाकच्या काळ्याकभिन्न कडयाखाली उभे होतो. मागच्या बाजूला थोड़ वरती कळकराय सुळका दिसत होता.
अंगावर येणारा विस्तीर्ण कडा आणि खालच्या दरीत पसरलेलं धूक असं मस्त वातावरण होतं. त्या कडयाखालून चालत-चालत आम्ही पुढे सरकू लागलो. कडयावरुन अंगावर पाणी ओघळत होते शिवाय पायाखालची वाट निसरडी होती. उजवीकडच्या कडयाचा आधार घेत-घेत, पायाखालच्या ओबड-धोबड दगडांकडे लक्ष्य देत पुढे सरकावे लागत होते. तरीसुद्धा मी आणि हर्षद मजेत गाणी म्हणत, पण लक्ष्य देत पुढे जात होतो. अभि आणि आशीष आम्हाला जरा गप्प बसा सांगत होते. अभि आणि आशीषला मी इतका गंभीर कधी पाहिलं नव्हत. पुढे जात असताना उजव्या बाजूला २-३ खोदलेल्या कपारी दिसतात. गुहा म्हणायला त्या तितक्या मोठ्या सुद्धा नाहीत पण आपले सामान ठेवून किंवा काही वेळ बसायला त्या नक्कीच उपयुक्त आहेत. त्यातल्या एकात आम्ही आमचे सामान ठेवले आणि त्यावर जॅकेट टाकुन झाकून ठेवले. आता खऱ्या चढाईसाठी आम्ही पुढे सरकलो. थोड़ पुढे गेलो की उजव्या बाजूच्या कडयामध्येच वर जाणाऱ्या कोरलेल्या पायऱ्या दिसतात. आशिष सर्वात पुढे सरकला. त्या मागे हर्षद. त्या नंतर अभि आणि सर्वात शेवटी मी.
एका पायरीवर चढलो की त्यावरच्या पायर्या दृष्टीक्षेपात येतात. पायर्यांवर पाणी जमले होते त्यामुळे प्रत्येक पायरीवर आधी हात फिरवून मगच घट्ट पकड घ्यावी लागत होती. त्याशिवाय आधीपासून तिकडे काही किडूक-मिडूक प्राणी नाही ह्याची सुद्धा खातरजमा करावी लागत होती. कारण थोडसं दचकून सुद्धा तोल जाण्याची शक्यता असते. मी माझ्या उजव्या हातावर जास्त जोर न टाकता डाव्या बाजूवर जोर टाकून वर चढत होतो. तसा मी डावरा असल्याने मला फार त्रास पडत नव्हता. एक-एक करून त्या १०-१२ पायऱ्या चढून वर गेलो. पायऱ्या संपल्या की उजवीकडे एक मोठी स्टेप घ्यावी लागते. सर्वात वरच्या पायरीवर पाय घट्ट रोवून हाताने अगदी वरती पकड घ्यायची आणि स्वतःला वर खेचून घ्यायचे. दूसरा माणूस उभी रहायची जागा सुद्धा नसल्याने कोणी मदतीला किंवा आधाराला सुद्धा उभे राहणे कठिण होउन बसते. आशीष आणि हर्षद तिकडून पुढे सरकले तसे मी आणि अभि मागून पुढे सरकलो. आमच्या ग्रुप मधला आशिष हा निष्णात प्रस्तरारोहक. तेंव्हा तो स्वतःचे वजन सांभाळून अतिशय सहजपणे पुढे सरकत होता. आम्ही त्याच्यामागून. पाउस मध्येच थोडा-थोडा पडत होता. दाट धुक्यामुळे खाली दरीमधले काही दिसत नव्हते. आता डावीकडे तिरप्या रेषेत वर जाणारी दगडामधली खाच आहे. स्वतःचे वजन पूर्णपणे उजवीकडे ठेवून हळू-हळू वर सरकत आम्ही तो अंदाजे १५ फुटांचा टप्पा पार केला. ह्या ठिकाणी पकडायला कुठेही खाचा नाहीत. आपले हात दगडांवरुन सरकवत-सरकवत पुढे जात रहायचे. वर आलो की मात्र ६-७ जण नीट उभे राहतील इतकी मोकळी जागा आहे. एकडे येउन जरा दोन क्षण निवांत झालो कारण पुढचा टप्पा अजून बिकट होता.
आता खाच तिरप्या रेषेत उजवीकडे सरकते. पायाखालची जागा मोजून वितभर आणि धरायला काही नाही अश्या दोलायमान स्थितिमध्ये स्वतःला सरकवत पुढे जायचे. आता स्वतःचे पूर्ण वजन डाव्या बाजूला. कुठेही बसायचे नाही कारण ते शक्यच नसते. ह्या ट्रेकला येणारे भिडू हे पक्के असावे लागतात नाहीतर अश्या मोक्याच्या ठिकाणी कोणी कच खाल्ली तर पुढे सगळेच अवघड होउन बसते. खालच्या खाचेच्या दुप्पट अंतर उजव्या बाजूला पार करून वर सरकून आता आम्ही पोचलो ते गुहेच्या पायथ्याशी. ह्या ठिकाणापासून अंदाजे १५ फुट सरळ वर चढून गेलो की लागते ढाक-भैरीची गुढरम्य गुहा. ह्या ठिकाणी चढायला न आहे शिडी.. न पायऱ्या.. वर चढण्यासाठी एक बदामाच्या झाडाचे खोड जाड दोरखंडाला बांधले आहे. अर्थात तो दोरखंड वरती मोठ्या दगडाला बांधला आहे. सरळ फुटणाऱ्या फांद्यांचा शिडीच्या पायर्यांसारखा वापर करून वर चढून जावे लागते. आता ही तर सर्कस होती कारण वरच्या फांद्या पकडून खालच्या एका फांदीवर एक पाय टाकल्या-टाकल्या माझ्या वजनामुळे झाड एका बाजूला स्विंग झाले. 'सर्कस है भाई सर्कस है...' असे बडबडत मी वर चढायला लागलो.
पावसाने फांद्या निसरड्या झाल्या होत्या. एक-एक पाउल काळजीपूर्वक उचलत पुढची काही मिनिट्स अशी कसरत करत आम्ही एक-एक करून अखेर वर पोचलो.
एकदम भन्नाट वाटत होते. आपला सह्याद्री जितका रांगडा तितकाच राकट. आपल्या साहसी वृत्तीला प्रेरणा देणारा. गेल्या तासाभरामधल्या ह्या अनुभुतीने मन प्रसन्न झाले होते. इतका वेळ हाताचे दुखणे सुद्धा मी विसरलो होतो. गुहेमध्ये भैरी म्हणजेच भैरवनाथाचे स्थान आहे. बाजुलाच २ पाण्याची टाकं आहेत. त्यातल्या पाण्यामध्ये देवाची भांडी आहेत. आपल्याला जेवण बनवायचे असल्यास ही भांडी घेता येतात पण वापरून झाली की ती स्वच्छ धुवून पुन्हा पाण्यात ठेवावी लागतात. इतका वेळ दरीमध्ये पसरलेलं धुकं आता विरु लागलं. खालचे स्पष्ट दिसू लागले. आपण काय दिव्य करून वर आलो आहोत हे समजून आले होते. उतरून जाताना किती काळजी घ्यावी लागणार आहे ह्याची पूर्ण कल्पना आम्हाला आली होती. अभि आणि आशीषला बहुदा ती आधीपासूनच होती म्हणूनच ते मला आणि हर्षदला 'जरा सिरीअस व्हा' अस सांगत होते. आता आम्हाला उतरायला हवे होते कारण पुढे जाउन कुंढेश्वरमार्गे राजमाचीला पोचायचे होते. आता अभि पुढे सरकला. पुन्हा तीच कसरत; मात्र जास्त काळजी घेउन. स्वतःचा तोल सांभाळत हळू-हळू आम्ही खाली उतरायला लागलो. बदामाच्या झाडावरची सर्कस करून खाली आलो आणि वितभर खाचेवरुन खाली सरकू लागलो. समोर खोल दरी दिसत होती. उजवा हात दगडावर सरकवत-सरकवत आम्ही खाली सरकलो. मोकळ्या जागेमध्ये दम घेतला आणि पुन्हा खाली उतरलो. शेवटच्या पायऱ्या उतरताना फारसे प्रयास पडले नाहीत. पूर्ण खाली उतरून आलो तरी कड्याखालचा पॅच बाकी होताच. पण आधी सामानाकड़े गेलो आणि पेटपूजा आटोपली. दुपारचे २ वाजून गेले होते आणि अजून बरेच अंतर बाकी होतं. भराभर पुढे निघालो. कडयाखालचा उरलेला मार्ग संपवला आणि घळीमधून चढून वर आलो. ढाक फत्ते झाला होता..
आता लक्ष्य होते कुंढेश्वर... ४ पर्यंत तरी तिकडे पोचणे अपेक्षित होते. तरच कुठे अंधार होईपर्यंत आम्ही राजमाचीला पोचणार होतो. मजल-दरमजल करीत निघालो. वाटेमध्ये सगळीकड़े ओहोळ लागत होते. मध्येच अडसं-दडसं ते ओलांडत आम्ही पुढे जात होतो. आमचा वेग चांगलाच वाढला होता. आता दूरवर कुंढेश्वर देऊळ दिसू लागले होते. एक क्षण मागे वळून ढाककड़े पाहिले तर काय ... जंगलामध्ये लपून बसलेल्या गेंड्यासारखा आकार घेउन तो आमच्याकडेच पाहत होता. ढाक किल्ल्याचा माथा म्हणजे गेंड्याचे डोके तर कळकराय सुळका म्हणजे त्याचे शिंग असा तो स्पष्ट दिसत होता. डोंगराचा तो आकार आम्ही कॅमेरामध्ये टिपला आणि देवळाकडे निघालो.
देवळापासून पुढे वाट चुकलो की काय माहीत नाही पण ठळक वाट काही भेटत नव्हती. मध्येच वाट पूर्णपणे चुकलो. पुन्हा मागे आलो आणि वाट शोधायला लागलो. उजव्या हाताला मांजरझुम्याचा डोंगर होता. त्या पलिकडे राजमाचीचे जोड़किल्ले श्रीवर्धन आणि मनोरंजन दिसत होते. म्हणजे आता डाव्याबाजूला दुरवर वळवंड धरण दिसायला हवे होते. पण अजून सुद्धा काही ते दिसत नव्हते. आता निश्चितपणे राजमाचीच्या पायथ्याला असलेल्या उधेवाडीला जाईपर्यंत मिट्ट अंधार पडणार होता. आता एक स्पष्ट वाट मिळाली पण त्यावर पुढे सरकायचे की राहायला वळवंड गावाकडे जायचे अस प्रश्न मनात होता. कारण ५:३० होत आले होते. आम्ही अखेर पुढे सरकायचे ठरवले. थोडा पुढे जाउन एक चढ दिसला. तो चढून वर गेलो की वाट सापडेल असे वाटत होते. ह्या ठिकाणी आम्हाला कधी नाही इतका सोसाट्याचा वारा अंगावर घ्यावा लागला. इतका की अभिजित आणि आशिष आता हवेत उडतील की काय असे वाटत होते. वारा सारखा मागे ढकलत होता आणि त्या चढावर पुढे सरकणे अशक्य झाले होते. अवघ्या ५-७ मिं. मध्ये आमची पुरती दमछाक झाली होती. कसाबसा तो टप्पा पार करून आम्ही वर चढून गेलो आणि काय... मुळ लालमातीची वाट आमचीच वाट बघत उभी होती की तिकडे...
मळलेली पायवाट आता आम्हाला राजमाचीपर्यंत घेउन जाणार होती. त्या वाटेवर भर-भर चालत होतो. पूर्ण अंधार पडायच्या आधी किमान खंडाळ्याहून राजमाचीला जाणाऱ्या रस्त्याला लागणे आवश्यक होते. एकदा का तिकडे पोचलो की पुढचा रस्ता अंधारामध्ये सुद्धा पार करता येणार होता. मध्येच एक पाडा लागला. तिथल्या एका पोराला 'कुठला शॉर्टकट आहे का' असे विचारले. त्याने आम्हाला एक मस्त शॉर्टकट दाखवला. त्या वाटेने आम्ही राजमाचीच्या मुळ रस्त्याला लागलो. आमचा किमान अर्धा तास तरी वाचला होता. आता पूर्ण अंधार पडला होता आणि आमची वाटचाल अजून राजमाचीकड़े सुरूच होती. साधारण ७ च्या सुमारास आम्ही राजमाचीच्या तुटक्या तटबंदीमधून प्रवेश करते झालो. सर्वत्र किर्रर्र अंधार आणि सामसूम. अखेर उधेवाडी आली. गीताताईकडे मुक्काम टाकला. पथारी पसरली, निवांतपणे पहुडलो आणि गप्पा मारत बसलो. ताईने बनवलेली पिठलं भाकरी आणि सोबत कांदा.. अहाहा!!! काय हवंय अजून!!! दिवसभरात चालून इतकं दमलो होतो की जेवल्यानंतर लगेच गुडुप झालो.
दसऱ्या दिवशी सकाळी उठलो तोपर्यंत अख्खी उधेवाडी माणसांनी भरून गेली होती. एक तर रविवार त्यात पावसाळा. राजमाची हा सगळ्या ट्रेकर्सचा एकदम फेवरेट स्पॉट. सगळ आवरून गड़ बघायला निघालो. आज पाउस तितका पडत नव्हता त्यामुळे निश्चिंती होती. राजमाची हा प्रचंड किल्ला आहे. किल्ल्यात आहेत २ बालेकिल्ले. श्रीवर्धन आणि मनोरंजन. त्यामध्ये वसली आहे उधेवाड़ी आणि थोडं वर आहे काळभैरव मंदिर. मंदिराचे पटांगण प्रशस्त्र आहे आणि जवळच आहे पिण्याच्या पाण्याचे टाकं. मंदिरासमोर आहे श्रीवर्धन आणि मागच्या बाजूला आहे मनोरंजन किल्ला.
येथुनच थोड्या अंतरावर आहे गडावरील शंभू महादेवाचे मंदिर. मंदिरासमोर पाण्याचा प्रशत्र तलाव आहे. वर्षभर गडाला पुरेल इतके पाणी ह्यात साठवता येईल इतका मोठा. आजूबाजूला परिसर सुद्धा सुंदर आहे. हे मंदिर सुद्धा खूप रेखीव असून हल्लीच जमिनीमध्ये दबलेला ह्याचा खालचा अर्धा भाग खोदून मोकळा केला गेला आहे.
आता आम्ही श्रीवर्धनगडाकड़े निघालो. देवळापासून अवघ्या १५ मिं. मध्ये श्रीवर्धन गडाच्या दरवाज्यापाशी पोचता येते. दुरवर डाव्याबाजूला म्हणजेच पश्चिमेकड़े किल्ल्याचा एक बुरुज दिसतो. मध्ये तटबंदी पडली असल्याने इकडूनच थेट तेथे जता येते. आम्ही मात्र प्रवेशद्वाराची रचना आणि दुर्गबांधणी बघण्यासाठी आधी दरवाज्यावर गेलो. 'रामचन्द्रपंत अमात्य' यांच्या आज्ञापत्रात ८ व्या प्रकरणात किल्ल्यांच्या रचनेवर लिहिल आहे, "दरवाजे बांधावे ते खालील मारा चुकवून, पुढे बुरुज देउन. येतिजाती मार्ग बुरुजांचे आहारी पडोन दरवाजे बांधावे." या शास्त्राप्रमाणेच पुढे बुरुज देउन त्यामागे किल्ल्याचा दरवाजा लपवला आहे. एकुण बांधकाम १ मजली आहे. आतल्या बांधकामाची उंची आणि लाकडाचे वासे घालायच्या जागांवरुन ते लगेच समजुन येते. उजव्या बाजुच्या पडक्या देवडीच्या पहिल्या मजल्यावरुन थेट तटबंदीवर जायला छोटासा दरवाजा आहे.
इथून पुढे वरपर्यंत चढते बांधकाम आहे. ठीकठीकाणी तटबंदीमध्ये जंग्या बांधलेल्या आहेतच. इथून वर चढून गेलो की पण पोचतो गुहेसमोर. छोटेसे प्रवेशद्वार असलेली ही गुहा आतून मात्र प्रचंड मोठी आहे. हयात ३ मुख्य भाग आहेत. मध्ये एक आणि उजवीकड़े डावीकड़े अशी एक-एक. किल्ल्यावरील धान्याचा, शस्त्रांचा आणि इतर सामूग्रीचा साठा येथेच साठवला जात असणार. एकडे काहीवेळ थांबुन आम्ही पुढे बालेकिल्ल्याकडे निघालो. एकडेच उजव्या बाजूने दक्षिणेकडच्या दुहेरी बुरुजाकड़े जायचा मार्ग आहे.या ठिकाणाहून समोरच्या व्याघ्रदरी मधल्या धबधब्याचे सुंदर दृश्य पहावयास मिळते. पुढे जाउन व्याघ्रदरी मधल्या पाण्याचा उल्हास नदी सोबत संगम होतो. इकडून आता मागच्या बाजुच्या बुरुजावर गेलो की दुरवर मांजरझुम्याचा डोंगर आणि ढाक किल्ल्याचे दर्शन होते. श्रीवर्धन गडाच्या माथ्यावर दरवर्षी झेंडावंदन होते. गडावर ठिकठिकाणी पाण्याच्या टाक्या खोदलेल्या आहेत.
आम्ही गड़फेरी पूर्ण करून परत खाली मंदिरात आलो. आता लक्ष्य होते मनोरंजन. मनोरंजन किल्ल्याचा दरवाजा आणि पायऱ्या अधिक बिकट अवस्थेत आहेत. गडावर काही पाण्याच्या टाक्या आणि एक धान्य कोठी आहे. गडावरुन उधेवाड़ी आणि गावाबाहेर असलेल्या शेतीचे सुंदर दृश्य दिसते. श्रीवर्धन गडाची उतरत्या डोंगरावरची वेडीवाकड़ी तटबंदी मनोरंजन वरुन फारच सुंदर दिसते. वेळ कमी असल्याने आम्ही ही गडफेरी आवरती घेतली आणि परतीच्या मार्गाला लागलो.
पुन्हा गावात आलो, दुपारचे जेवण आटोपले आणि साधारण २ च्या सुमारास गड़ सोडला. आता खाली कोकणात उतरून कोंदीवडे गाव गाठायचे होते. खाली उतरताना बराच वेळ मनोरंजन किल्ला आपली साथ करत असतो.
ट्रेकला आम्ही चौघेच असताना, मी फोटो घेत असताना फोटोमध्ये चौथा मनुष्य कुठून आला हे गूढ आम्हाला अजूनही उलगडलेले नाही आहे. कारण राजमाची उतरताना आमच्या पुढे मागे जवळपास कोणीच नव्हते...
एक-एक करून खालच्या टप्यावर उतरु लागलो तसे मस्त धबधबे दिसू लागले. कितीही पुरेसा वेळ असला तरी एका-एका धबधब्यामध्ये डुंबायला वेळ पुरणार नाही इतके मस्त. अश्याच एका धबधब्यापाशी आहेत कोंढाण्याची सुप्रसिद्द लेणी.
अप्रतिम अशी हो कोरीव लेणी आजही थोडी दुर्लक्षित अवस्थेमध्ये आहेत. निसर्गामुळे झालेल्या नुकसानीपेक्षा मानवाने त्यांचे जास्त नुकसान केले आहे. काहीवेळ तिकडे थांबलो. इतकी काही घाई नव्हती फ़क्त पूर्ण अंधार पडायच्या आधी गावात पोचणे गरजेचे होते नाहीतर लेट झाला की तिकडचे गाड़ीवाले अव्वाच्या-सव्वा भाड़े सांगतात कर्जतला जाण्यासाठी. ५ च्या सुमारास खाली पोचून लालमातीच्या रस्त्याला लागलो. तिकडून लालमातीचा चिखल तुडवत पुन्हा चाल गावापर्यंत. अखेर चाल संपवून गावात पोचलो. कपडे असे माखले आणि भिजले होते की त्या कपड्यात प्रवास करणे शक्य नव्हते. एके ठिकाणी पटकन ते बदलून घेतले आणि गरम-गरम चहा मारला. मस्तपैकी ताजे झालो आणि कर्जतकड़े निघालो. २ दिवसामधल्या भटकंतीने मन प्रसन्न झाले होते. ढाक-भैरीची थरारक गुहा आणि राजमाची दर्शन असा दुहेरी बेत मस्त जमला होता. त्याच मूडमध्ये आम्ही पुढच्या भटकंतीचे प्लानिंग करत घरी निघालो...
*****************************************************************************************************************
राजमाचीचे काही फोटो हे नंतर पुन्हा अनेकदा गेलो तेंव्हाचे आहेत. पण जुने स्कॅन फोटो बघायला एक वेगळीच मज्जा येते...
खरोखरच जातीचा भटक्या आहेस!!!
खरोखरच जातीचा भटक्या आहेस!!! ___/\___![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
पावसात गरमागरम भज्यांऐवजी गरमागरम शिव्या
मस्त माहिती रे आणी हो..तुझ्या हॉबीला सलाम..
हॉबीला सलाम.. >>> आधीच तू
हॉबीला सलाम..![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
>>> आधीच तू शामिकाच्या 'हबी'ला __/\__ केलास ना तो पुरे की...
आणि इथे कांदाभजीबद्दल बोलायची काही गरज होती का??? अजून ३ दिवस बाकी आहेत मला हल्लाबोल करायला..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पभ, वर्णन चांगलंय. राजमाचीचे
पभ, वर्णन चांगलंय. राजमाचीचे फोटो बघितल्यावर तुला विचारणारच होते की ते पावसाळ्यातले वाटत नाहीयेत. बरं झालं तुच खुलासा केलास.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वदपचा धबधबा सॉल्लिड आहे. त्याच्या बाजूलाच एक कोणतातरी छोटूकला गड आहे, म्हणजे त्याचं नाव '****गड' असं आहे. आता आठवत नाहीये. पण वर गेल्यावर झक्कास वाटतं.
बरं असंच म्हणून एक प्रश्न : तुला उगाच (विनाकारण) रिस्क घ्यायची सवय आहे कां?
रिस्क घ्यायची सवय आहे
रिस्क घ्यायची सवय आहे कां?
>>> हे ऐकून मी रिस्क कधीच घेत नाही - ही कविता आठवली...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बर तुझा प्रश्न... मी विनाकारण रिस्क काही वेळेला घेतलेली आहे... पण सर्व विचारांती...
त्याचं नाव '****गड' असं
त्याचं नाव '****गड' असं आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>> त्याला गावातले लोक भीमगड असे म्हणतात... वरती काही नाही...
हो हो अगदी बरोबर. मला काहीतरी
हो हो अगदी बरोबर. मला काहीतरी हनुमानगड वै आठवत होतं.![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
नेहमीप्रमाणे सह्ही रे
नेहमीप्रमाणे सह्ही रे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
किल्ल्यात आहेत २ बालेकिल्ले. श्रीवर्धन आणि मनोरंजन. >>>>>रच्याकने, राजमाचीचा बालेकिल्ला "मनोरंजन" आहे कि "मनरंजन"?![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
योगेश, ते मनरंजन आहे, मनोरंजन
योगेश, ते मनरंजन आहे, मनोरंजन नव्हे.
धन्स, आडो
धन्स, आडो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अनेक ठिकाणी मनोरंजन देखील
अनेक ठिकाणी मनोरंजन देखील वाचले आहे...
अनावधानाने काळाच्या ओघात गडांची नावे बदलली जात आहेत काय?
मी जेंव्हा पहिल्यांदा
मी जेंव्हा पहिल्यांदा राजमाचीबद्दल वाचले तेंव्हा मनरंजन आणि श्रीवर्धन असेच वाचले होते. त्यामुळेच मनरंजन हेच नाव मनावर ठसलंय. पण बहुतेक लोक "मनोरंजन" असेच उच्चारताना पाहिले/ऐकले.
मला तर बुआ राजमाचीला
मला तर बुआ राजमाचीला पोचेपर्यंतचं वर्णन ज्ज्जाम आवडलं... कारण त्या दिव्यानंतर राजमाची किल्ला cakewalk होता...
पण एकुणात ट्रेकिंगमध्ये तू आम्हा सर्वांचा बाप आहेस, हे दिसतंय.. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ट्रेकला आम्ही चौघेच असताना, मी फोटो घेत असताना फोटोमध्ये चौथा मनुष्य कुठून आला हे गूढ आम्हाला अजूनही उलगडलेले नाही आहे. >>>
R U SERIOUS??? की तो जोक होता? आणि मग तोंड फाडून का हसतो आहेस??
सहि रे जबरी
सहि रे जबरी भटक्या...
ढाक-बहिरी ...पावसाळ्यात....सॉलिड रे...
अन तुझ्या जिद्दीला सलाम...
आनंदयात्री... बाप वगैरे काही
आनंदयात्री... बाप वगैरे काही नाही रे...
प्रत्येकाचा स्वतःचा अनुभव असतो आणि तो त्याप्रमाणे डोंगरात तसे तसे वागत असतो... आपल्या इथे काय एक सो एक दगड आहेत...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ट्रेकला आम्ही चौघेच असताना,
ट्रेकला आम्ही चौघेच असताना, मी फोटो घेत असताना फोटोमध्ये चौथा मनुष्य कुठून आला हे गूढ आम्हाला अजूनही उलगडलेले नाही आहे. >>>
R U SERIOUS??? की तो जोक होता? आणि मग तोंड फाडून का हसतो आहेस??
>>>>> अरे... फोटो प्रिंट काढून आणले त्यानंतर आधी जाणवले नाही...
पण नंतर जरा विचार केला तर जाणवले.. मस्करी नाही करत पण ह्या प्रश्नाचे उत्तर मला मिळालेले नाही.. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रोमा.. काही ट्रेक मला धो-धो
रोमा..
काही ट्रेक मला धो-धो पावसात करायला आवडतात...
ढाक-भैरी आणि तसाच एक अजून म्हणजे भिमाशंकर - शिडी घाट..
आता खूप वर्षे (बहुदा ८) झाली करून... जायला हवे एकदा पुन्हा.. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भटक्या या वर्षीच्या
भटक्या या वर्षीच्या पावसाळ्यात (भिमाशंकर - शिडी घाट.. ) करुया...माझा पण तो करायचा राहीलाय.
ढाक पावसात....hats off to
ढाक पावसात....hats off to you...
रोहीत, तु ट्रेक करतो आणि
रोहीत,
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तु ट्रेक करतो आणि आम्हाला नविन माहिती मिळते !
धन्यवाद !
ढाक-बहिरी
ढाक-बहिरी ...पावसाळ्यात....सॉलिड रे.... >>> खरच सलाम तुला... नाव सार्थकी लावलेस![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आप्पांच्या पुस्तकात 'मनरंजन' असाच उल्लेख आढळतो...
जायला हवे एकदा पुन्हा.. >>
जायला हवे एकदा पुन्हा.. >> जल्ला प्लिज तारीख नको !! पाउस पडायला येळ हाय...![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
पक्क्या.. नेहमीप्रमाणे सॉलिड वर्णन नि फोटोज.. !!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जंगलामध्ये लपून बसलेल्या गेंड्यासारखा आकार घेउन तो आमच्याकडेच पाहत होता. >> लै भारी..
नि जल्ला तूला भूतं तरी किती दिसतात.. तो तोरण्याचा अनुभव नि आता राजमाची...पण या फोटोत तुला मित्रांचा क्रम नव्हता का लक्षात ?
जल्ला क्रम लक्ष्यात हाय...
जल्ला क्रम लक्ष्यात हाय... सर्वात पुढे अभि मग आशिष आणि मग हर्षद आहे... वरून मी फोटो काढलाय... तो शेवटचा मुलगा(???) कुठून आला तेच कळत नाय.. जल्ला...![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
येस्स.. माझा गेस खरा होता
येस्स.. माझा गेस खरा होता तर... !!! मला त्या व्यक्तीमध्ये शंका येत होती.. (म्हंजे भुताला ओळखता येते तर.. :P) काहीही असो.. तोसुद्धा हाडाचा ट्रेकर दिसतोय.. बॅग पाठीवर घेउन अगदी..![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
आता ते भुत होते की तो मुलगा
आता ते भुत होते की तो मुलगा मला नंतर दिसला नाही काय माहित... पण हा जे काय होते ते हाडाचे ट्रेकर होते...
ट्रेक करता करता गेला असेल बहुदा.. ![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
ट्रेकला आम्ही चौघेच असताना,
ट्रेकला आम्ही चौघेच असताना, मी फोटो घेत असताना फोटोमध्ये चौथा मनुष्य कुठून आला हे गूढ आम्हाला अजूनही उलगडलेले नाही आहे. कारण राजमाची उतरताना आमच्या पुढे मागे जवळपास कोणीच नव्हते... >>> अरे तो तीन नंबरचा मुलगा नाहिये, झाडाचं खोड आहे बहुतेक.
झाडाचं खोड आहे बहुतेक. >>>
झाडाचं खोड आहे बहुतेक.
>>> तुला काहीपण बोलायची भारी खोड आहे बुवा...![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
अरे बघ ना, ती आकृती
अरे बघ ना, ती आकृती उंचापर्यंत काळी दिसतेय खोडासारखीच. हा फोटो मोठा करता येईल का?
झाडाचं खोड आहे बहुतेक. >>>
झाडाचं खोड आहे बहुतेक. >>>
त्या झाडाला भारीच खोड आहे
त्या झाडाला भारीच खोड आहे वाटतं मधे मधे यायची...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त रे..
मस्त रे..
Pages