सोंग सजवण्याची कला - १. बजेटच नाही.
जानेवारी २००८ ते मार्च २००८ या कालावधीत प्रहार या वृत्तपत्राच्या रिलॅक्स या दर शनिवारी प्रसिद्ध होणार्या पुरवणीमधे माझ्या व्यवसायासंदर्भाने मी ८ लेखांची मालिका लिहीली होती. त्यावेळेला शक्य न झाल्यामुळे इथे युनिकोड स्वरूपात ते टाकू शकले नव्हते. आता सर्व लेख एकेक करून परत टाकणारे. हा त्यातला पहिला.
बाकीचे लेख
२. अमेरिकेतील शिक्षण http://www.maayboli.com/node/21592
३. डिझायनिंगची पूर्वतयारी http://www.maayboli.com/node/21595
४. तिकडची नाटकं http://www.maayboli.com/node/21602
५. माझा श्वास http://www.maayboli.com/node/21618
६. मी कॉश्च्यूम डिझायनरच आहे. http://www.maayboli.com/node/21629
७. इकडचं नाट्य http://www.maayboli.com/node/21640
८. चलता है http://www.maayboli.com/node/21641
----------------------------------------------------------------------------------------------
"आम्ही कधी कॉश्च्यूमचा विचार केलाच नाही कारण बजेटच नसायचं" असं माझे विद्यार्थी त्यांनी आधी केलेल्या एकांकिका, नाटकं याबद्दल सांगतात.
"आत्ताचं तर नाटक आहे कॉश्च्यूम्सची काही गरज नाही त्यात पैसे नकोत घालवायला" असं तर मी खूप वेळा बरोबरच्यांकडून ऐकत आलेय.
मग काय आयुष्यभर पिचलेल्या बाईच्या अंगावर कडक स्टार्च केलेली कॉटनची कोरी साडी, १९५० मधल्या व्यक्तिरेखांच्या अंगावर १९९० मधले कपडे, घरातलं वातावरण कडक आणि सोवळं असलेल्या मुलीच्या अंगावर जीन्स आणि मॉड टिशर्ट असं काहीही असायचं आणि बहुतांशी लोकांना ते चुकीचं वाटायचं नाही. तेव्हा नेहमीच हा प्रश्न पडायचा की हे असं का? पैसे नाहीत म्हणून कुणाच्या घरातून आणलेले कपडे वापरताना आपण काहीच विचार करायचा नसतो का? साडीच्या जागी साडी आणि शर्टाच्या जागी शर्ट इतकंच कसं चालेल? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपले प्रेक्षक ह्या गोष्टीचा स्वीकार करतात? नगाला नग कपडे असणं मग त्यांचा रंग, कापडाचा पोत, कपड्याचा नवेजुनेपणा कश्याचाही संबंध व्यक्तिरेखेशी असला नसला तरी फरक पडत नाही प्रेक्षकांना? व्यक्तिरेखेचे बारकावे, तिच्या कपड्यामागचं त्या त्या व्यक्तिरेखेचं तर्कशास्त्र याचा विचार कुणालाच का करावासा वाटत नाही? असे सगळे प्रश्न पडायचे. क्वचित अश्या पडलेल्या प्रश्नांवरून कुणी चेष्टाही केली. पण हळूहळू जेव्हा मी स्वत: नाटकाच्या कपड्यांची जबाबदारी घ्यायला लागले तेव्हा हे प्रश्न अजून स्पष्ट व्हायला लागले. असे प्रश्न पडण्यामधे चूक काही नाही हे ही पटायला लागलं. आणि या प्रश्नांची उत्तरं मिळवायचा प्रवास सुरू झाला.
आपण रोजचे कपडे घालताना आपल्या व्यक्तिमत्वाला योग्य ते कपडे विचार करून घालतो का असं कुणी विचारलं तर साहजिकच हसायला येईल. माझा स्वभाव अमुकतमुक आहे म्हणून मी अमुक तमुकच्या जवळ जाणार्या रंगाचे कपडे घालते असं क़ुणीच म्हणत नाही. आपल्या कपाटात जे काही असतं त्यातला एक कपडा आपण निवडतो. निवडताना जिथे जायचंय त्या ठिकाणाला, कार्यक्रमाला योग्य काय इतपतच विचार करतो. म्हणजे ट्रेकला जाताना साडी, नोकरीच्या मुलाखतीला जाताना ट्रॅकसूट आणि लग्नकार्याला जाताना फाटक्या शॉर्टस असं आपण काही करत नाही नक्कीच पण त्यापलिकडे आपण विचार करत नाही हे ही खरं.
अगदी हेच होतं नाटका सिनेमाचे कॉश्च्यूम्स ठरवताना. लग्नाचा सीन आहे म्हणजे जरीची साडी इतपतच विचार केला जातो पण त्या व्यक्तिरेखेला कुठल्या प्रकारची साडी परवडेल? बाकीच्या व्यक्तिरेखांच्या संदर्भात प्रत्येक व्यक्तिरेखा किती उठून दिसेल वा मिळून जाईल? इत्यादी गोष्टी विचारात घ्यायची गरज आपल्याला वाटत नाही. कारण आपल्याकडे म्हणे बजेटच नसतं.
पण हाच घोळ आहे. आपल्या रोजच्या कपड्यांच्याबाबतीत आपलं आपलं वेशसंकल्पन आपल्या नकळत झालेलं असतं. आपलं आपलं व्यक्तिमत्व, जडणघडण, पेशा, शिक्षण अश्या बर्याच गोष्टी आपल्या आवडीनिवडींवर परिणाम करत असतात. त्यामुळे आपलं व्यक्तिमत्व आपल्या कपड्यात दिसत असतंच. तेव्हा आपल्या कपाटात जे असतं ते आपल्या व्यक्तित्वाचं प्रतिबिंब असतं.
पण नाटका-सिनेमातल्या काल्पनिक व्यक्तिरेखेसाठी कपडे निवडणं हे असं सोपं नसतं. तिथे मात्र व्यक्तिमत्वाचाही विचार करावा लागतो. मुळात कपडे विकत घेणं/ शिवून घेणं यासाठी आणि मग नंतर दृश्यामधील ठिकाण, वेळ इत्यादींसाठी.
माझ्या सुरूवातीच्या काळात फारसे पैसे नसतानाही वेशभूषा करण्याचा बराच अनुभव माझ्या गाठी जमा होत होता. त्यातला सगळ्यात मोलाचा अनुभव म्हणजे पुणे विद्यापीठात शिकत असताना मी दिग्दर्शित केलेलं पु. शि. रेग्यांचं रङगपांचालिक हे नाटक. त्या नाटकाचं कॉश्च्यूम डिझाइनही मीच केलं होतं. हे नाटक महाभारतातील एका छोट्याश्या भागाला स्पर्श करणारं. पु शि रेग्यांच्या दैवी लेखणीतून आलेलं. भाषा म्हणजे निखळ सौंदर्य. नाटकामधे उत्तरा ह्या व्यक्तिरेखेचा अल्लड आणि बृहन्नडेमधील पुरूषाच्या प्रेमात पडलेली षोडषा ते अभिमन्यूशी लग्नाला मान्यता देणारी परिपक्व स्त्री हा प्रवास आहे. तिच्याबरोबर तिच्या दोन सख्या आहेत. या सगळ्या मिळून बाहुल्यांचा खेळ खेळत असताना हे नाटक घडत जातं. महाभारताची वेशभूषा जी विविध मालिकांच्यातून वा संगीत नाटकांतून बघितली होती त्याचा इथे उपयोगही नव्हता आणि तशी आर्थिक व्यवस्थाही उपलब्ध नव्हती. महाभारत कालीन वेशभूषेचा अभ्यास केल्यावर लक्षात आलं होतं की मालिकेप्रमाणे, नाटकाप्रमाणे चकचकीत कपडे आणि दागिने हे खरंतर त्या काळाच्या दृष्टीने अयोग्यच आहे.
चमकणारं कापड हे रंगमंचावर तितकंसं योग्यही नाही कारण ते प्रकाशयोजनेसाठी त्रासदायक ठरू शकतं. तेव्हा प्रकाश खूप परावर्तित न करणार्या पोताचं कापड वापरलं जायला हवं. महाभारतकालीन वस्त्र नेसण्याची पद्धत जी होती त्याचा वेगवेगळ्या पुस्तकांवरून अभ्यास करत होतेच त्यातून एक निश्चित झालं होतं की जे काही कापड वापरलं जायला हवंय ते नेसता येईल असं पातळ आणि चुण्या पडतील असं हवं. म्हणजे अर्थातच सुती कापड हा पर्याय पुढे आला. ९६-९७ च्या दरम्यान पातळ आणि सुती ओढण्यांची खूप पद्धत आली होती. या ओढण्यांची कापडं ताग्यातून अगदी स्वस्तात मिळत. अस्तराच्या कापडापेक्षा किंचित जाड असलेलं हे कापड अनेक रंगात आणि ४४ इंचाच्या पन्ह्यात(म्हणजे नेसायला योग्य) येत असे. आता ते क्वचित ठिकाणीच मिळतं. तर याच प्रकारचं कापड सगळ्या व्यक्तिरेखांसाठी वापरायचं ठरवलं.
उत्तरा ही अल्लड व निरागस आहे त्यामुळे तिच्या अंगावर अजिबात मलीनता नसलेले रंग वापरायचे ठरले. ते रंग तिच्यातलं राजकन्या असणं हे ही पुढे आणतील असा विचार केला होता.
तिच्या सख्या ह्या तिच्यापेक्षा खालच्या स्तरावरच्या असल्याने त्यांचे रंग थोडे गडद व मळकट ठेवले. तसेच नाटकामधे त्या सख्या दोन आहेत की एकच आहे असा संभ्रम पडावा अश्या अनेक जागा आहेत त्यामुळे त्यांचे रंग एकमेकींच्या जवळपासचे ठेवले. सोनेरी दागिन्यांची चमक ते खोटे असल्याने विचित्र असते. आणि रंगमंचावरील प्रकाशात ते पिवळे आणि विचित्र दिसतात. नाटकाची जातकुळी ही वास्तवतावादी नसल्याने दागिने हे सोन्याच्या रंगाचे असायची गरज नव्हतीच. पण एखाद्या प्राचीन शिल्पाप्रमाणे ठराविक ठिकाणी दागिने असावेच लागणार होते. महाभारताचा काळ विचारात घेता दागिने फार बारीक नक्षीचे असणं अपेक्षित नव्हतं आणि रंगमंचावरून त्या दागिन्यांचा योग्य तो परिणाम साधलं जाणं गरजेचं होतं. थोडक्यात ठसठशीत, न चमकणारे पण अंगावरच्या कपड्यांच्या रंगांवर उठून दिसणारे दागिने असायला हवे होते आणि हे सगळं करण्यासाठी ज्याला आपण झिरो बजेट म्हणू ते अस्तित्वात होतं.
सोनेरी नको आणि चमक नको असं ठरवल्यावर पर्याय उरला तो म्हणजे चंदेरी ऑक्सिडाइज्ड दागिन्यांचा. पुण्यात रविवार पेठेत स्टीलचे पैंजण घाउक बाजारात किलोवर मिळत असत ते घेऊन मग त्याला ऑक्सिडाइज्ड पॉलिश लावून घेतले. आणि हे पैंजण मग दुहेरी तिहेरी करून गळ्यातला हार, कंबरपट्टा, खांद्यावरचे अलंकार, केशरचना सजवण्यासाठी असे सगळीकडे वापरले.
तसेच बरोबर मोत्यांचा वापर भरपूर करायचा ठरलं. मोती हे रंगमंचावरून दिसताना ठसठशीत आणि राजघराण्यासाठी अत्यंत योग्य दिसतात. घाउक बाजारातून प्लास्टिक मोत्याचे घोस घेतले. ते सुद्धा वजनावर घेतले होते. रंगमंचावरून ते असे दिसले खरे मोती असते तरी काही वेगळे दिसले नसते.
मग नंतर मेटल एम्बॉसिंग वापरून प्राचीन काळातील दिसतील असे दागिने बनवणे, ऐतिहासिक वा पौराणिक काळातील कापडासाठी मांजरपाट डाय करून वापरणे, जरीच्या कामाऐवजी सोनेरी रंगाने ठसे मारून कापड जरतारी बनवणे अश्या अनेक गमतीजमती या लो बजेटच्यापायी किंवा हव्या त्या वस्तूंची उपलब्धता नसण्यापायी केल्या. अश्या काही गोष्टी अमेरीकेला शिकायला जाण्याआधी काम करता करता शिकले होते आणि बर्याच अमेरिकेतील शिक्षणात शिकले. ज्याबद्दल पुढच्या लेखात सांगीनच. अश्या क्लुप्त्या, युक्त्या करणं ही तर लो बजेट मधली गंमत आहे. काहीच नसताना उपलब्ध असलेल्या वस्तूंच्यातूनच आपल्याला हवं ते बनवता आलं पाहिजे हे पहिलं तत्व सगळ्यात महत्वाचं. शेवटी लो बजेट हे फक्त खिशाचं असतं बुद्धीचं असून उपयोगी नाही.
--- नीरजा पटवर्धन
इंटरेस्टींग आहे! इकडे
इंटरेस्टींग आहे!
इकडे आणल्याबद्द्ल धन्यवाद.
सह्हीच!
सह्हीच!
मस्त आहे! आणि आगाऊ नी
मस्त आहे! आणि आगाऊ नी म्हटल्याप्रमाणे इंटरेस्टींगही आहे.
अतिशय सुंदर, नीरजा! ते
अतिशय सुंदर, नीरजा!
ते ऑक्सिडाईज्ड दागिने मस्तच दिसतायत.
एक छोटीशी भर घालू माहितीत? (तुला माहित असेलच म्हणा..) आपल्याला भारतात अगदी आदिम वसाहती/ सिंधू संस्कृतीच्याही आधीपासून वेगवेगळ्या दगडांचे मणी मिळतात - semi-precious stones चे. विविध प्रकारचे अॅगेट, कार्नेलियन, स्टीएटाईट, लॅपिस, जास्पर, इ. त्याचबरोबर टेराकोटाचेही. शिवाय शंखाच्या आणि हस्तिदंताच्या बांगड्या, कर्णभूषणे वगैरे आहेतच.. या सगळ्यांचे छान डॉक्युमेंटेशन उपलब्ध आहे. अशासारख्या वस्तूंचा वापर करता येईल का / किंवा कुणी केलाय का?
पुढच्या भागांची वाट पहातेय
पहिले २ भाग वाचले होते
पहिले २ भाग वाचले होते तेंव्हा...
नंतर प्रोजेक्टमधे अडकल्यानी जमलं नव्हतं...
बरं केलंस इकडे टाकलंस ते...
उत्तम माहिती. पुढील लेखाची
उत्तम माहिती. पुढील लेखाची वाट पाहात आहे.
नी, इंटरेस्टिंग माहिती. एवढे
नी, इंटरेस्टिंग माहिती. एवढे ऐटीत "१" वगैरे आकडा टाकलायस पण पुढचे भाग टाकणारेस ना नक्की ?
मला आवडेल अजून यावर वाचायला.
छानच माहिती. रच्याकने :
छानच माहिती.
रच्याकने : मुंबईत कुलाबा कॉजवे वर अनंत प्रकाराचे दागदागिने खच्चून मिळतात. तु अर्थातच फेरफटका मारत असशीलच तिथे. तसेच माझी एक सख्खी मैत्रीण हिंदमाता मार्केटात जाऊन अफलातून कापडं आणते आणि स्वतःच स्वतःकरता एकसे एक सुंदर ड्रेसेस डिझाईन करत असते.
हा भाग वाचलाय तरी पुन्हा
हा भाग वाचलाय तरी पुन्हा वाचायला आवडला, पुढचे भाग नक्की टाक.
ये हुई ना बात! इंटरेस्टिंग
ये हुई ना बात! इंटरेस्टिंग विषय! या विषयावर आधी काहीच नाही वाचलंय ..
शेवटी लो बजेट हे फक्त खिशाचं असतं बुद्धीचं असून उपयोगी नाही. >> मस्त!
प्लीज दोन भाग टाकण्यात जास्त अंतर नको ठेउस.
मस्तय. बरं झालं इकडे आणला.
मस्तय. बरं झालं इकडे आणला.
मस्त लेख. बाकीचेही वाचायला
मस्त लेख. बाकीचेही वाचायला आवडतील
शेवटी लो बजेट हे फक्त खिशाचं असतं बुद्धीचं असून उपयोगी नाही. >> हे वाक्य खूप आवडलं.
खुप इच्छा होती या
खुप इच्छा होती या क्षेत्राबद्दल वाचायची. आता पुढच्या भागांची वाट बघतोय.
मस्त माहिती. पुढच्या भागांची
मस्त माहिती.
पुढच्या भागांची वाट बघते.
आभार. सगळे लेख लिहून झालेले
आभार.
सगळे लेख लिहून झालेले आहेत कधीच. त्यामुळे नुसते इथे टाकायला काय वेळ लागायची गरज नाही. दुसरा लेख टाकला सुद्धा.
हा घ्या
२. अमेरिकेतील शिक्षण http://www.maayboli.com/node/21592
भाग वाचला नाहीये पण ती
भाग वाचला नाहीये पण ती ऑफव्हाईट कपड्यांमधली शर्वरी जमेनीस आहे का?
हो
हो
छान लेख. एकदम नवीन माहिती
छान लेख. एकदम नवीन माहिती मिळाली
छान. अगदी नविन विषयाची ओळख
छान. अगदी नविन विषयाची ओळख होतेय.
मस्त माहिती नी ! खरचं
मस्त माहिती नी !
खरचं रंगसंगती बदलली तरी पर्सनॅलिटी मध्ये कितीतरी फरक पडतो हे वरील फोटोतुन दिसुन येतो.
की शर्वरी असल्यामुळे जरा जास्तच आवडली ?
सगळ्यांचे आभार. हा तिसरा लेख
सगळ्यांचे आभार. हा तिसरा लेख टाकला. http://www.maayboli.com/node/21595
की शर्वरी असल्यामुळे जरा
की शर्वरी असल्यामुळे जरा जास्तच आवडली ?<<
पण दे की थोडं क्रेडीट मलापण...
नी सगळं क्रेडीट तुलाच आहे ,
नी सगळं क्रेडीट तुलाच आहे , खरचं रंगसंगती / पोत अशा बारकाव्यांमुळे ती उच्चकुलीन वाटते.
छान लेख, शेवटी कल्पकतेला
छान लेख,
शेवटी कल्पकतेला पर्याय नाही
आणि जेव्हा साधनांची कमतरता असते तेव्हा कल्पकता बहरते
मुबलक उपलब्धतेत कल्पकतेला कधी कधी वाव मिळत नाही.
आभार जो एस. बाकीचेही लेख जरूर
आभार जो एस. बाकीचेही लेख जरूर वाचा.
हं........बरीच भर पडली या
हं........बरीच भर पडली या विषयाबद्द्लच्या ज्ञानात. आवडला लेख.
छान लेख. जो एसशी सहमत
छान लेख. जो एसशी सहमत आहे.
बरेचदा मुबलकता आणि कल्पकता यांचे व्यस्त प्रमाण असते, पण नेहेमीच नाही.
लेख आवडला.
लेख आवडला.
मस्त लिहीलेय! मला ते तुमचे
मस्त लिहीलेय!
मला ते तुमचे डिझानयर्स स्ट्रोक्स फार आवडतात. त्यामुळं एक्दम ग्रेस आणि पॉईझ दिसते त्या डिझाईनमधली. आणि लायकीच्या माणसाने घातले की अजून उठून दिसतात. शर्वरी कसली गोड दिसतेय त्या कॉस्च्युममधे! आणि त्या पैंजणांच्या नाजूक कोयर्या एकदम एथ्निक दिसतायत.
>> शेवटी लो बजेट हे फक्त खिशाचं असतं बुद्धीचं असून उपयोगी नाही
अगदी खरं.
माझ्याकडे एक बॅग आहे रस्त्यावरच्या दुकानातल्या जंक ढिगातून खूप शोधून घेतलेली. मला बर्याच मैत्रीणींनी विचारले होते कुठून घेतली वगैरे. एका मुलाने विचारले इज इट "हाय डिझाईन"? नाही म्हटल्यावर म्हणाला बट इट लुक्स ब्रँडेड. मी म्हटलं द अॅक्सेसरी इजंट बट द चॉईस इज ब्रँडेड.
क्वालिटी गोष्टींचे डीटेलिंग बर्याचदा खूप छान असते आणि त्यासाठी द्यावी लागणारी किम्मत योग्य असते. पण डोकं लढवून स्वस्तात काहीतरी युनिक वापरायला मिळालं आणि त्याला दाद मिळाली की सॉलिड युफोरिक वाटतं.
रच्याकने : त्या खांद्यावरच्या अलंकाराचं काय नाव आहे?
नीधप, मला यातलं तस काही ज्ञान
नीधप,
मला यातलं तस काही ज्ञान नाही,फक्त शर्वरी जमेनीस तेवढी ओळखली !
त्या फोटोत तुम्हीच आहात का ?
Pages