बघता बघता भटकंतीची १० वर्षे सरली. कधी? कशी? काहीच कळले नाही. ह्या १० वर्षात अनेक चांगले-वाईट अनुभव आले. गावागावातून विविध स्वभावाची लोक भेटली. खूप काही शिकलो. खूप काही घेतलं. काही देता आलं आहे का माहीत नाही. म्हणतात ना 'निसर्ग सर्वोत्तम शिक्षक आहे' पूर्णपणे पटले ह्या १० वर्षात. कधी उन्हात करपुन निघालो तर कधी पावसात भिजून. कधी वाटले नदीत वाहून जाईन की काय तर कधी वाटले दरीत पाय सरकतो की काय. नुसत्या पाण्या आणि पार्ले-जी च्या पुड्यावर सुद्धा दिवस काढले तर कधी गुलाबजाम सुद्धा हाणले. माझी प्रत्येक भटकंती काहीतरी नवीन देऊन जातेय मला.
सह्याद्रीत पहिले पाऊल टाकल्यापासून ते आजतागायत सह्याद्रीने माझ्यावर प्रेमाचा अक्षरशः: वर्षाव केलाय. त्याने कधी पावसाळी अनुभवांनी मला चिंब भिजवलंय, कधी गडावर कडाक्याच्या थंडीत गारठवलय तर कधी उन्हातान्हात रानोमाळ फिरवलंय. तुम्ही म्हणाल हे का प्रेम?. तर मी म्हणीन होय. त्याचे प्रेम असेच असते. आपली रांगडी परीक्षा बघत, आपली झोळी अनुभवांनी भरत आपल्यावर तो स्वतःच्या प्रेमाचा वर्षाव कधी करतो हे आपल्याला देखील समजत नाही. कळत तेंव्हा आपण एखाद्या सह्यशिखरावर कुठेतरी हरवून सभोवतालचा नजारा बघत असतो. मग तो नानाचा अंगठा असो नाहीतर नागफणी, कोकणकडा असो नाहीतर टकमक टोक. राजगडावरचा सूर्योदय असो नाहीतर मग सूर्यास्त. त्याच्या रांगड्या सौंदर्याचे वर्णन करताना शब्दच तोकडे पडू लागतात.
जसा पाउस तप्त जमिन थंड करू लागतो तसा सह्याद्रीसुद्धा आपला रौद्रप्रतापी चेहरा लपवित एक नवे रूप घेऊन आपल्या समोर येतो. ह्या हिरवाईने नटलेल्या सह्याद्रीची मजा काही औरच. मग आपण सुद्धा मनमुराद भिजण्यासाठी नवे ट्रेक आखत त्याच्या भेटीला निघतो. पण माथ्यावर त्याला गाठायचे तर आधी परीक्षा ही द्यावीच लागते. मग तो एखादा भरून वाहणारा ओढा असो, दुथडी भरून वाहणारी नदी असो नाहीतर एखादी वर चढणारी पाण्याची वाट असो. त्याला भेटायचे म्हणजे ते पार करणे आलेच. आपली मजा बघत असतो तो पण त्यालाही मनातून आपण तिथवर पोचावे हे मनात असतेच. दोघांमधली ही ओढ अनिवार होते आणि मग आपली पावले वेगाने शिखराकडे पडू लागतात. माथा जसा जवळ येतो तसे आपण 'आता माथ्यावर पोचूनच टेकायचे रे' हे उगाच नाही म्हणत. पावसाळी वातावरणात राना-रानातून गार वारे साद घालत फिरत असतात आणि मनावर एक वेगळीच धुंदी निर्माण करितात. वर्षोनुवर्षे ऑफिसच्या वातानुकीत यंत्राचा वारा घेणाऱ्या लोकांनो, हे गार वारे अंगावर घेतले आहेत कधी? ते वातानुकीत यंत्र झक मारेल ह्यापुढे. खळखळत वाहणारे ओढ्याचे पाणी ओंजळीत भरून प्यायला आहात कधी? एकदा हे करून बघाच. आयुष्यभराची तहान भागेल तुमची.
पाउस जरा परतीच्या मार्गाला लागतो तसा एक सुखद गारवा सह्याद्रीमध्ये पसरू लागतो. आता आपण खास रग जिरवणारे आणि उंची गाठणारे प्रचंडगड, रतनगड, अलंग-मंडण-कुलंग असे ट्रेक प्लान करू लागतो. पाऊस थांबलेला असला तरी धुक्याचे खास खेळ आपल्यासाठी सुरू असतात. सूर्यदेवाने आपली द्वाही चहूकडे फिरवण्याआधी पहाटे पहाटे दऱ्याखोऱ्यात पसरलेले हे धुके खूपच आल्हाददायक असते. अश्या धुक्यातून ट्रेक करायला तर काय अजूनच मजा!!! हवे तेंव्हा निघावे, हवे तिथे विश्रांतीसाठी बसावे. तो असतोच कधी झाड बनून तर कधी दगड बनून आपल्याला टेकायला द्यायला. आपल्याला तहान लागली आहे हे कळते त्याला मग मध्येच एखादा ओहोळ देतो सोडून आपल्या वाटेवर. काळजी घ्यावी ती त्यानेच. गडावर चूल बनवून जेवण बनवावे तर हा.... वारा. मग कधी थोड्यावेळासाठी वाऱ्याचा वेग जरा कमी करेल आणि आपल्याला जेवण बनवू देईल. आपण निवांतपणे जेवून गप्पा मारत टेकलो की हा परत आपला वेगाने सुरू... गडावर रात्र जागवून निवांतपणा अनुभवावा. भले १० जण सोबत असतील पण प्रत्येकाने शांत राहून फक्त आकाश बघावे. सर्व काही नि:शब्द. आवाज यावा तो फक्त वाऱ्याचा आणि झाडांच्या सळसळीचा. अजून काय हवे!!!
नवा ऋतू आणि सह्याद्रीचे नवे रूप न दिसले तरच नवल. पुन्हा एकदा तो आपले रौद्र रूप धारण करू लागतो. पुन्हा एकदा आपली रांगडी परीक्षा पाहण्यासाठी डोंगर-कडे तप्त होऊ लागतात. आपण देखील मग काही जिद्दी ट्रेक प्लान करू लागतो. स्वतःच्या अगणित हातांनी तो आपली झोळी भरत असतो आणि आपण अधाशासारखे फक्त घेत असतो. मला नाही वाटत तो कधी थांबेल आपल्यावर प्रेम करणे.. आणि मलाही नाही वाटत की मी कधी थांबीन त्याच्याकडे जाणे. कुठलेही संकट पेलण्याची संपूर्ण ताकद, आवश्यक आत्मविश्वास मला दिलाय तो ह्या सह्यकड्यांनी. मला नाही वाटत हे कुठल्या पुस्तकी शिक्षणातून कधी मिळेल. स्वावलंबन, प्रसंगावधान, ध्येयाशक्ती, निसर्गप्रेम असे अनेक पैलू माझ्या आयुष्याला डोंगरातच मिळालेत. आज जगण्याचा अर्थ जो मला कळतोय तो ह्या सह्याद्रीने दाखवलाय मला.
आज फक्त १० वर्षे झालीत. अजून खूप हिंडायचे आहे. रानोमाळ भटकायचे आहे. गड-किल्ल्यावर अभिमानाने शिवरायांचे स्मरण करायचे आहे. इथल्या मातीत उमटली आहेत शिवरायांची पावले. इथल्या वाऱ्यामध्ये आहे त्यांचा श्वास. इथल्या कणाकणात आहे त्यांच्या शौर्याची गाथा. ह्या सर्वांनी मी पावन झालो हे नक्की. खूप अनुभव मिळालेत पण अजून खूप घ्यायचे आहेत.
हे सह्याद्री... मी येतोय लवकरच पुन्हा एकदा असेच काही नवे अनुभवायला..तुझ्या भेटीला आसुसलेला... डोंगर यात्री... डोंगर वेडा...
... पक्का भटक्या...
आवडलं
आवडलं
खर आहे
रोहन, अगदी खरं आहे रे. सुंदर
रोहन, अगदी खरं आहे रे. सुंदर प्रवास १० वर्षाचा.. तुला पुढच्या सगळ्या प्रवासाला शुभेच्छा. अन आम्हाला आनंद आहे कि तुझ्यासोबत आम्ही सुद्धा सह्याद्रीच्या कुशीत भटकायला येऊ.
युही चला चल राही.. युही चला चल... !
VERY VERY TRUE.... अशा
VERY VERY TRUE....
अशा भटकंतीच्या सवयीमुळे इतर आयुष्यात सुद्धा कुठेही, कशीही adjust करून घ्यायची सवय लागली आहे, आणि माझ्या मते हा मोठा फायदा आहे. जेवायचे, झोपायचे नखरे नसतात आता...
(No subject)
मस्त
सह्हीच!!!!! स्वावलंबन,
सह्हीच!!!!!
स्वावलंबन, प्रसंगावधान, ध्येयाशक्ती, निसर्गप्रेम असे अनेक पैलू माझ्या आयुष्याला डोंगरातच मिळालेत. आज जगण्याचा अर्थ जो मला कळतोय तो ह्या सह्याद्रीने दाखवलाय मला.>>>>अगदी अगदी
भटक्या, सह्याद्रीबद्दलच्या
भटक्या, सह्याद्रीबद्दलच्या तुझ्या भावना पोचल्या. मी देवाचे अनेकदा आभार मानते, महाराष्ट्रात जन्माला घातल्याबद्दल ज्याला शिवरायांचा इतिहास आहे व रक्षण करायला रांगडा सह्याद्री.
छान लिहिलं आहेस तुझे बरेच
छान लिहिलं आहेस
तुझे बरेच लेख वाचायचे राहिलेत. वेळ असेल तेव्हा वाचेन.
मस्तच !!!! तुला पुढच्या
मस्तच !!!! तुला पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा !!!
सही रे भटक्या.. मस्त मनातल
सही रे भटक्या..
मस्त मनातल लिहिलयस....(प्रत्येक भटक्याच्या)
छान लिहिले आहेस रोहन. काहि
छान लिहिले आहेस रोहन. काहि खास अनुभव पण, इथे लिहीलेस तर आणखी छान.
दिनेशदा, त्याचे खास अनुभव
दिनेशदा, त्याचे खास अनुभव असतातच कि त्याचा दुर्गभ्रमण लेखनात. लेह लडाखच्या मालिकेत तर मस्तच लिहिले होते खास अनुभव.
सह्याद्रीची साद अन शिवदुर्ग लेखनात फोटोंचा तेवढा अभाव जाणवला.
मनोगत आवडल... मस्तच आडोला
मनोगत आवडल... मस्तच
आडोला अनुमोदन
आवडलं खुप सुन्दर
आवडलं खुप सुन्दर
मस्त हा आढावा घेताना 10
मस्त
हा आढावा घेताना 10 वर्षातले वेचक अनुभव लिहिले असतेस तर जास्त आवडला असता लेख.
तो उतरणीवरचा झाडांचा फोटो मस्त आलाय.
मित्रा.. मस्तच लिहीलेयस !!
मित्रा.. मस्तच लिहीलेयस !! अशीच भटकंती सुरू राहू दे !
आवडलं मनोगत! पर भटकंती १०
आवडलं मनोगत!

पर भटकंती १० साल की और फोटो ३? बहोत नाइन्साफी है ये!! (कुछ गिने चुने 'इस्पेशल' फोटो चल जाते)
रच्याकने...तो एकच हिरवी फांदी असलेला वाळक्या झाडाचा फोटो लई आवडला!
मस्त!! पुढील भटकंतीला
मस्त!!
पुढील भटकंतीला शुभेच्छा!
सर्वांचे मनापासून आभार....
सर्वांचे मनापासून आभार....
सूर्या.. आता माबो बरोबर एक
सूर्या.. आता माबो बरोबर एक ट्रेक मारायचं...
लवकरच...
मंजूडी... खरय तुझ. असे अनुभव घेऊन लेख लिहायला हवा होता. दिवाळी अंकासाठी...
हा हा..
मी_आर्या.. १० वर्ष मधल्या पहिल्या ४-५ वर्षातले फोटो जवळ जवळ नाहीच. आहेत ते अगदी मोजके आहेत आणि ते त्या त्या भटकंती बरोबर येतीलच...
यो आणि योगेश ... कधी निघायचे ट्रेकला??
आता माबो बरोबर एक ट्रेक
आता माबो बरोबर एक ट्रेक मारायचं... लवकरच... <<< कर रे अवश्य कर.. कारण माबोकरांबरोबर ट्रेक केलास तर तूला अनुभवापलिकडे लिहिता येईल.
मस्त वेचक अनुभव खरंच अजूनही
मस्त
वेचक अनुभव खरंच अजूनही समाविष्ट कर यात.
मस्तच
मस्तच
कर रे अवश्य कर. >>>> करू रे
कर रे अवश्य कर. >>>> करू रे अवश्य करू.. असे म्हण...
आणि अनुभवापलीकडे म्हणजे काय रे भाऊ??? 
सही रे भटक्या, तुझा प्रवास
सही रे भटक्या,
तुझा प्रवास खरचं अजब आहे !
एकदा आम्हाला पण घेऊन जा कुठेतरी गडावर !!!
छान लिहिलय
छान लिहिलय