“.....मोटाभाई, हे येडं आपल्या कडे कसं पहात होतं बघा, ‘आ’ वासून!!” राकेश चा ऑफिस च्या काम्युनिकेटर वर आलेला मेसेज पाहून मी नजर इकडे-तिकडे फिरवली, तर खरंच “सख्या” आमच्याकडे अजून ही अनिमिष नेत्रांनी का काय म्हणतात तसा पहात बसला होता. तोंडाचा ‘आ’ अजून ही न मिटलेला... मी त्याच्याकडे पाहून कसनुसं हसलो, तरी “सख्या” ची रि-एक्शन शून्य!! मी राक्याला मेसेज टाकला.... “पार वाय. झेड. आहे रे हा!!” आणि माझ्या कामाला लागलो.....
मी राहत असलेल्या 'San Antonio ' ह्या शहरी सार्वजनिक वाहतूक सेवा अर्थात 'public transport service' बेताच्या सोयीचीच होती. तुम्हाला जर कुठे बस ने जायचे असेल तर आधीपासून योजना आखायला लागायच्या. कारण बस ची 'फ्रीक्वेन्सी' ही दर एका तासाने अशी होती. अमेरिका हा कितीही विकसित देश असला तरीही काही प्रमुख शहरं सोडली तर सगळीकडे हीच तऱ्हा आहे. गाडी घेण्याची संस्कृती असलेल्या देशात ( ह्याचा संबंध कृपया श्रीमंतीशी लावू नये) गाडी न घेणाऱ्यांचे वांदे नाही झाले मगच आश्चर्य! आणि अमेरिकन सामान्य माणसं न्याहाळणाऱ्या माझ्यासारख्या मुलाला गाडी घेऊन कसे चालेल?