आठवणीतलं गाव
Submitted by एक नसलेल अस्तित्व on 21 January, 2012 - 02:59
सहजच जेव्हा आज गावाकडे आलो,
आठवणीतल्या त्या मळ्याकडे आलो,
ओळखीच्या त्या वाटेवरून चालत,
विसरलेल्या माझ्या घराकडे आलो!
अंगणातल्या त्या मातीमध्ये
विखुरलेली माझी स्वप्ने दिसली,
माझ्या भांबावलेल्या चेहऱ्याकडे बघत
पडकी भिंतही खुदकन हसली!
चालत-चालत जेव्हा माझ्या शाळेजवळ आलो
पाठीवरल्या दप्तराच्या आठवणीत बुडालो
आठवून इथला प्रत्येक क्षण कंठही दाटून आला,
समुद्राला आज जणू त्याचा किनाराच मिळाला!
गावच्या मंदिराजवळ आजही कुणीतरी खेळतंय
खेळता-खेळता मध्येच माझ्याकडे बघून हसतंय
हसण्यातून त्याच्या मला माझीच आठवण आली
स्वप्नांच्या त्या दुनियेत डोळ्यांची कड ओली झाली!
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा