तुझी भेट

तुझी भेट व्हावी असे वाटले

Submitted by क्रांति on 17 September, 2011 - 10:29

तुझी भेट व्हावी असे वाटले अन् तुझ्या आठवांचे थवे हासले
पिसारे किती सप्तरंगी क्षणांचे मनाच्या रित्या अंगणी नाचले!

तुझी भेट व्हावी असे वाटले, मी तुझी वाट शोधीत आले खरी,
न वारा तुझा की न चाहूल आली तुझी, फक्त डोळ्यांत आल्या सरी!

तुझी भेट व्हावी असे वाटले तोच आला तुझ्या वेणुचा नाद रे
खरा तो असे की असे भास? काही कळेना मला, घाल तू साद रे

तुझी भेट व्हावी असे वाटले त्या क्षणी भेट झालीच नाही कधी,
किती वाट पाहू इथे एकटी मी? तुझा अंत ना पार लागे कधी

तुझी भेट व्हावी असे वाटले की मनाच्या तळाशी जरा वाकते,
तुला पाहते, बोलते मी तुझ्याशी, क्षणी चोरकप्पा पुन्हा झाकते!

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - तुझी भेट