जेव्हा किरणोत्सार एखाद्या माध्यमातून जात असतो तेव्हा त्या माध्यमाचे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या मूलकीकरण होते किंवा ते माध्यम उत्तेजित अवस्थेत पोहोचते. सजीवांमध्ये हे मूलकीकरण किंवा ही उत्तेजना, शरीराचे अनेक कण जसे की प्रथिने, न्यूक्लिक आम्ल इत्यादींना नष्ट करते. हे सर्व कण शरीराकरता अत्यंत महत्वाचे असतात. म्हणून किरणोत्सार, सजीवांच्या शरीरांसाठी धोकादायक असतो. अल्फा आणि बीटा किरणे माध्यमास प्रत्यक्षरीत्या मूलकित करतात.
चुंबकीय क्षेत्र आणि विद्युतक्षेत्र यांत घनिष्ट संबंध असल्याचे खूपच पूर्वीपासून लक्षात आलेले आहे. एका क्षेत्रात कुठलेही बदल घडत असल्यास ते दुसर्या क्षेत्रास जन्म देतात असेही आढळून आले. या नव्या क्षेत्राच्या निर्मितीची दिशा निश्चित करणारा अभ्यास फ्लेमिंग यांनी केला होता.
आकाशातून पडणारी वीज हा ऊर्जेचा एक लोळच असतो. या लोळातील ऊर्जा, असंख्य ऊर्जाकणांनी बनलेली असते. या प्रत्येक कणांवर किमान काही परिमाणात ऊर्जा असतेच असते. किमान ऊर्जेपेक्षा जास्त ऊर्जा धारण करणारे कण अतिरिक्त ऊर्जेच्या प्रमाणानुरूप गतीमान तरी असतात किंवा विद्युत भार तरी धारण करत असतात. अशा कणांतील ऊर्जा, त्यांना त्यांच्या वस्तुमानामुळे, विद्युत भारामुळे आणि गतीमुळे प्राप्त झालेली असते. वस्तुमानाने सर्वात लहान, किमान ऊर्जा धारण करणार्या, तसेच किमान विद्युत भार धारण करणार्या अशा कणाला "विजक" म्हणतात. वीज तयार करतो तो (वीज+ कण) "विजक". विजकांचा अभ्यास करणार्या शास्त्रास "विजकविद्या" म्हणतात.