झाशीची राणी आणि शाबासकी
"या आपल्या झाशीच्या राणी." जाधवसरांनी जोरजोरात टाळ्या वाजवल्या म्हणून सगळ्या वर्गानेही वाजवल्या. गुरु सांगतील ती पूर्वदिशा त्यामुळे टाळ्या का वाजवतोय ते कळलं नाही तरी आम्ही टाळ्या वाजवत राहिलो. सरांनी खूण करून मला बोलावलं. अतीव आनंदाने मी उभी राहिले. बाकड्यामधून बाहेर आले. बाकड्यांच्या मधल्या अरुंद गल्लीतून वाट काढत किल्ला लढवल्याच्याच आवेशात सरांजवळ पोचले. मागचा फळा म्हणजे किल्ला असल्याचा भास मला होत होता.