पावसाने एकदा जम बसवला की हिरव्या निसर्गाचे सौंदर्य बघण्यासाठी मुंबईतील निसर्गरम्य ठिकाण म्हणजे नॅशनल पार्क(संजय गांधी राष्ट्रीय उद्यान).. तशी अधुनमधून फेरी असतेच इकडे.. पण पावसात जाण्याची मजा काही औरच असते... गेल्याच शनिवारी हे पार्क गाठले तेव्हा जवळपासचा परिसर बघून परतायचा विचार होता.. पण खुललेल्या निसर्गामध्ये दंग झालो.. नि चालता चालता थेट कान्हेरीच गाठले.. !
कृष्णगिरी उर्फ कान्हेरी... बोरीवली. मुंबईच्या राष्ट्रीय उद्यानाचा एक भाग. म्हणतात की लोकल रेल-वे म्हणजे मुंबईची जीवनरेखा.. पण खरेतर हे राष्ट्रीय उद्यानच मुंबईची जीवनरेखा आहे. हे जंगल नसते तर मुंबई-ठाणे आणि आसपासच्या परिसराची प्रदूषणाची पातळी कित्ती वाढली असती ह्याचा अंदाज देखील येणार नाही. ह्या उद्यानात प्राण्यांच्या आणि माणसांच्या दृष्टीनेही उजाडायच्या आधी आणि मावळल्यानंतर प्रवेश बंद असतो. आत मध्ये राहायचा तर प्रश्नच नाही. असे असतानाही जर मी ह्या ब्लॉगपोस्टला हे नाव दिलेले पाहून तुम्हाला जरा आश्चर्याच वाटले असेल नाही???