जय मल्हार
जेजुरी नगरी । कडे पठारी ।
मार्तंड मल्हारी । विराजतो ।। १॥
शिव अवतरे ।मार्तंड भैरव ।
मल्हारी खंडेराव । देवा नामे ।।२॥
मणि मल्ल दैत्य । देवे संहारिले ।
मल्हारी साजले । नाम थोर ।।३॥
म्हाळसा बाणाई । राणीयांसमवेत ।
अश्वारुढ देव । शोभतसे ।।४॥
भंडारा उधळी । भक्त थोर थोर ।
येळकोट उच्चार । तोषोनिया ।।५॥
मार्गशीर्ष मासी । प्रतिपदे पासोन ।
चंपाषष्ठी सण । विशेषत्वे ।।६॥
रोडगे भरीत । नेवैद्य अर्पिती ।
मल्लारी स्तविती । भक्तजन ।।७॥
दिवटी बुधली । तळी उचलोन ।
येळकोट स्मरण । चांगभले ।।८॥
उधळली हळद भंडार गडावर जागर हा मंदिरी
खंजिरी वाजली तशी गरजली सोन्याची जेजुरी
म्हाळसा सुंदरी उभी सोबती बानू हरहुन्नरी
यळकोट मल्हारी तुझा संबळे दुमदुमले अंबरी...
पायरी शेकडे चार उत्तरी द्वार कैक दिपमाळी
हेगडीप्रधानापुढे बांधुनी कडे गरजते टाळी
भंडार उधळ भंडार उधळ भंडार शिवाच्या घरी
यळकोट मल्हारी तुझा संबळे दुमदुमले अंबरी...
पायथ्यास मोठा थाट वाकडी वाट गडाच्या दारी
बैसला रुद्र रानात रुंद हातात तेज तलवारी
मानात उभी पार्वती तसा संगती मेघडंबरी
यळकोट मल्हारी तुझा संबळे दुमदुमले अंबरी...
सोन्याची जेजुरी.... उजळली रायाची पंढरी
टाळ नाल पखवाज ...वाजला थरथरली पायरी..