आयुष्याची दोरी
आयुष्याची दोरी
हे सजीवसंख्येचे नियमन करणार्या मृत्यो,
कधीही, कुठेही आणि कसेही
आयुष्याची दोरी कापून टाकण्याचे
तुझे अधिकार मान्य आहेत मला
पण सन्मानाने मरण्याचे अधिकार
मलाही असावेत की नाही?
हे “जीवन” तुझे असले तरी
“मी” तर “माझा” आहे ना?
तुझ्यामुळे आयुष्य सरणार असले तरी
मी मात्र उरणारच आहे. आणि म्हणून...
माझी तुझ्याबद्दल तक्रार नसली तरी
एक छोटीशी नाराजी आहे
आयुष्य छाटण्याबद्दल हरकत नाही, पण...
पण असा देहाला का छाटतोस रे?
तुकड्यांतुकड्यांमध्ये का वाटतोस रे?
कधी चिंध्या, कधी लगदा,
कधी खाद्य मासोळ्यांचे
आणि कधीकधी तर आरपार
उमटतात छेद गोळ्यांचे