ठरेन या जगात मी महान एकदा तरी.. हझल
करेन वादग्रस्तसे विधान एकदा तरी
ठरेन या जगात मी महान एकदा तरी
सदैव भालदार चोपदार का रहायचे
बनेन नाटकात या प्रधान एकदा तरी
तुला बघून रोज काव्य पाडले नि धाडले
बघायचेस कागदी विमान एकदा तरी
हजार अल्टरेशने, कितीक बेल्ट घातले
मला बसेल का तुझी तुमान एकदा तरी
किती भकार अन किती फुल्या फुल्या लिहायच्या
जपून वापरायची जबान एकदा तरी
चुना,लवंग, कात टाकुनी तयार जाहले
खुशाल पिंक मार खाच पान एकदा तरी
कशास नेहमीच बाँड, बॅटमॅन पाहिजे
बघायचा उगीच शक्तिमान एकदा तरी