संत नामदेवांच्या गुरुमुखी अभंगांमधील चमत्कार प्रसंग
ग्रंथसाहिबातील गुरुमुखीमध्ये लिखित व पंजाबी भाषेत रचलेल्या ''शबद'' रचनांचे वाचन करत असताना ईश्वराच्या अगाध लीलांचे वर्णन करणार्या संत नामदेव रचित सुंदर रचना वाचणे हा खरोखर प्रासादिक अनुभव आहे. एरवी हरीभक्तीबरोबरच समाजातील अंधश्रद्धा, भोंदूगिरी व पाखंडीपणावर आपल्या अभंगांमधून शब्दांचे आसूड उगारून खरमरीत टीका करणार्या संत नामदेवांच्या या एकूण ६१ रचनांमध्ये त्यांच्या आयुष्यातील काही चमत्कारांचे त्यांनी काव्यरूपात केलेले वर्णनही आगळे व अभ्यास करण्याजोगे आहे. नवरसांमधील अद्भुतरसाला, विस्मयाला जागृत करणार्या या रचनांमधील शब्दप्रयोग काहीवेळा मराठी धाटणीचेही आहेत.