सायली...!
Submitted by चैतन्य दीक्षित on 4 November, 2010 - 02:00
सायलीच्या हे फुलांनो, मी तुम्हा तोडू कसा रे?
गुंफुनी गजर्यात अन् वेणीत त्या माळू कसा रे?
मान्य आहे, ती तशी नाजूक आहे, पण तरीही,
तो फुलांचा अन् लतेचा बंध मी मोडू कसा रे?
टोचता तुम्हा सुईने यातना होतील ज्या,
त्या व्यथा माळून मी, प्रेमास त्या घेऊ कसा रे?
गुंफुनी दोर्यात किंवा लावुनी गळफास तुम्हा,
रेशमी केसांत जो ये, गंध तो घेऊ कसा रे?
माळता गजरा, कदाचित चुंबने देईल ती,
देउनी मृत्यू तुम्हाला, अमृता प्राशू कसा रे?
सायलीच्या हे फुलांनो, मी तुम्हा तोडू कसा रे?
- चैतन्य
गुलमोहर:
शेअर करा