भूपतीवैभव वृत

घेईन रजा

Submitted by जिओ on 18 January, 2025 - 09:02

घेईन रजा गावाला जाण्यासाठी
परतून जुन्या त्या क्षणांत रमण्यासाठी
मी गावाला जाईन खूप काळाने
भेटेन वृद्ध आजीस तिथे प्रेमाने

काढेल दृष्ट ती थरथरत्या हाताने
घेईल जवळ ती मला खूप प्रेमाने
वाढेल करून मग गरम भाकरी भाजी
देईल छानशी फळे खायला ताजी

फिरण्यास जरा जाईन नदीच्या काठी
धावेन पुन्हा मी गुरावासरां पाठी
पाहीन रांग ती पक्ष्यांची उडताना
ते सूर्यबिंब मावळतीला झुकताना

स्मरतील खुणा मग बालपणीच्या न्याऱ्या
करतील मनाला आनंदित त्या साऱ्या
जाईल मनाची निघून मरगळ सारी
लाभेल मनाला नवीन छान उभारी

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - भूपतीवैभव वृत