घेईन रजा

Submitted by जिओ on 18 January, 2025 - 09:02

घेईन रजा गावाला जाण्यासाठी
परतून जुन्या त्या क्षणांत रमण्यासाठी
मी गावाला जाईन खूप काळाने
भेटेन वृद्ध आजीस तिथे प्रेमाने

काढेल दृष्ट ती थरथरत्या हाताने
घेईल जवळ ती मला खूप प्रेमाने
वाढेल करून मग गरम भाकरी भाजी
देईल छानशी फळे खायला ताजी

फिरण्यास जरा जाईन नदीच्या काठी
धावेन पुन्हा मी गुरावासरां पाठी
पाहीन रांग ती पक्ष्यांची उडताना
ते सूर्यबिंब मावळतीला झुकताना

स्मरतील खुणा मग बालपणीच्या न्याऱ्या
करतील मनाला आनंदित त्या साऱ्या
जाईल मनाची निघून मरगळ सारी
लाभेल मनाला नवीन छान उभारी

लागली असे ही ओढ मनाला माझ्या
मन व्याकुळ हे भेटीसाठी आजीच्या
जाईन त्वरेने गावाला मी तेव्हा
मज कामावरुनी मिळेल सुट्टी जेव्हा

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

सुरेख कविता!

दोन्ही आज्या होत्या माझ्या, पण माझ्यावर विशेष माया नव्हती. इतर नातवंडे भाग्यवान ठरली.

यमकानुसारीत्व या गोष्टीचा सर्वोत्तम बळी मी असल्याने त्याबाबत काही लिहीत नाही

गरम भाकरी भाजी या ओळीत करून मधील रु जर दीर्घ टाईप झाला असेल तर तो टायपो आहे (वृत्त पाळले आहेत म्हणून नोंदवले)

थरथरत्या हातांनी दृष्ट काढली जाणे - खूप गहिरी ओळ आहे

छान, सुबक, संयत कविता