शब्दाएवढा दाणा
Submitted by पॅडी on 13 March, 2024 - 03:46
कलंदर आयुष्याने ठेवला
हातावर शब्दाएवढा दाणा
म्हटला असू दे गाठीपदरी
जगायला एखादा बहाणा
हळूवार हातांनी रुजव
पाहून सुपीक काळी माती
सावली धरेल सांजसकाळ
जेव्हा गळून पडतील नाती
ह्यात दडलीय भविष्याची हाक
उफानत्या सागराची गाज
हुरड्यात आल्यावर कणीस
फिरवून फिरवून खमंग भाज
कैकदा आडवे येतील लोभ
वधारल्यागत वाटेल भाव
तेव्हाही फुलाफळांवर भागव
घालू नकोस मुळांवर घाव
सजग सावध काटी-कुपाटी
थोडा चोरा - ढोरांचा बंदोबस्त
जरा कुठे गाफील राहिल्यास
व्हायचे उभे आयुष्य फस्त..!
विषय: