जाणिवा
Submitted by पुरंदरे शशांक on 3 April, 2023 - 01:51
जाणिवा
डोळे जाणतीना काही
व्योम अफाट केवढे
दिसे पटलावरी ते
पाहूनीच धन्य होते
गंध फुलांचा मोहक
जरी जाणिवा सजग
जग सुगंधाचे थोर
काय जाणवे सलग !
स्पर्श रुप रस गंध
जाणिवेत मावेना की
एका सानुल्या देहात
लाभे जरासी झुळुकी
विश्व होऊनिया जरी
भोगे विशाल सोहळे
थिटी जाणिव फाटता
माझे मीपण मावळे
----------------------------------------
व्योम......आकाश, अंतराळ
पटल.....मानवी डोळ्याच्या आतील पडदा ज्यावर प्रतिमा उमटते/रेटिना
थिटी.... मर्यादित, क्षुद्र
विषय: