आजचा दिवस मोठा विचित्र होता महेश्वरसाठी. दोन आठवड्यांपूर्वी जिची ओळखही नव्हती अशा ख्रिसच्या घरी त्याला डिनरचं बोलावणं आलं होतं. त्याचं अमेरिकेतलं वास्तव्य ध्यानीमनी नसताना, अचानक संपलं होतं. आणि सेलिंग, ज्या खेळावर त्याचं मनापासून प्रेम जडलं होतं तेही आता संपल्यातच जमा होतं. भावनांचा एक सी-सॉ चालला होता त्याच्या मनात. जाताना रस्ता वाकडा करून तो एका सुपरमार्केटजवळ थांबला. धावत जाऊन एक वाईनची बाटली उचलली. हो, म्हणजे रिकाम्या हाताने जायला नको! एक कोकही उचलला. बाहेर येऊन गाडीलाच टेकून तो रस्त्यावरची रहदारी बघत कोक प्यायला लागला. जरा मन थाऱ्यावर आणण्यासाठी एका ब्रेकची गरज होती!
महेश्वरनं दुसऱ्या दिवशी ख्रिसच्या मेसेजची वाट पाहिली. पण वीकेन्डही संपला तरी तिचा मेसेज काही आला नाही.
दोन दिवसांनी ख्रिसचा एसएमएस आला. "आज संध्याकाळी मला वेळ आहे, तुला सेलिंगची प्रॅक्टिस करायची आहे नं?"
महेश्वरला अगदी हायसं वाटलं. त्यानं एक दीर्घ श्वास सोडला.
निश्वास सोडला, अन् तो विचारात पडला. का? ख्रिसचा निरोप आल्यावर माझा जीव का भांड्यात पडला? कसली काळजी होती मला? का वाट पहात होतो मी तिच्या काॅलची? मला तिच्या पसंतीची का गरज भासली? ती अमेरिकन आहे म्हणून, का ती गोरी आहे म्हणून, का ती बाई आहे म्हणून, का ती भारत जवळून पाहूनही माझ्याशी, एका भारतीयाशी संपर्क ठेऊ पहातेय म्हणून? महेश्वर भांबावला. कामावर असल्याने त्याने विचार झटकले.
त्यादिवशी महेश्वर डॉकवर पोचला तेव्हा शुकशुकाट होता. अंधार व्हायला तास-दीडतासच राहिला होता. मावळतीला झुकलेल्या सूर्याची किरणं पाण्याला सुवर्णझळाळी देत होती. डॉकच्या पायऱ्या चढून वर येताना त्याला सेलिंग क्लबच्या टूल चेस्टवर एक स्त्री बसलेली दिसली. "आज ही कोणे डॉकमास्टर?" तोपर्यंत तिचंही लक्ष महेश्वरकडे गेलं होतं. त्यानं हाय म्हणताच तिनंही हसून प्रतिसाद दिला.
"आय ॲम महेश्वर. आर यू द डॉकमास्टर टुडे?" असं म्हणताच तिच्या चेहेऱ्यावर आश्चर्य उमटलं.