आजचा दिवस मोठा विचित्र होता महेश्वरसाठी. दोन आठवड्यांपूर्वी जिची ओळखही नव्हती अशा ख्रिसच्या घरी त्याला डिनरचं बोलावणं आलं होतं. त्याचं अमेरिकेतलं वास्तव्य ध्यानीमनी नसताना, अचानक संपलं होतं. आणि सेलिंग, ज्या खेळावर त्याचं मनापासून प्रेम जडलं होतं तेही आता संपल्यातच जमा होतं. भावनांचा एक सी-सॉ चालला होता त्याच्या मनात. जाताना रस्ता वाकडा करून तो एका सुपरमार्केटजवळ थांबला. धावत जाऊन एक वाईनची बाटली उचलली. हो, म्हणजे रिकाम्या हाताने जायला नको! एक कोकही उचलला. बाहेर येऊन गाडीलाच टेकून तो रस्त्यावरची रहदारी बघत कोक प्यायला लागला. जरा मन थाऱ्यावर आणण्यासाठी एका ब्रेकची गरज होती!
पहिल्या दिवशी आपल्या वर्तनातून बुचकळ्यात पाडलं होतं मला या ख्रिसनं. पण आज तिनं जे सांगितलं त्यातून ते बरचसं उलगडलं, नाही? भारतात ती बॅकपॅकिंग करून आली आहे हे ऐकल्यावर किती किती अशुभ संकेत मनात आले होते आपल्या! पण, ॲज अ गुड गर्ल, तिनं फक्त चांगले अनुभवच सांगितले. सुसंस्कृत आहे, नाही का? हं, पण कमनशिबी आहे. या वयात नवऱ्याचं अपंगत्व झेलायचं किती कठीण असेल नै? अमेरिकन आहे, ती सोडून देईल नवऱ्याला. दिलंय का? अमेरिकन म्हणजे माणुसकी नाही का? असा आहे का तुझा अनुभव? काहीच्या काही बोलायचं! पण झालंय काय त्याला? म्हणजे घरात बसून रहावं लागेल इतकं? आणि मुलंबाळं काही? का नाही कोणी? खरं तरं इतक्या कमी ओळखीत घरी बोलवायचं ही इथली रीत नाही. मग तिनं का बोलावलं असेल? काही इन्शुरन्सचं काम वगैरे तर करायला सांगणार नसेल? काही सांगता येत नाही. असं काही असेल तर तडक नाही म्हणून सांगायचं. अजिबात खपवून घ्यायचं नाही. पण असं काही नसणार. तिच्या या थोड्याशा सहवासात लक्षात आलंय नं आपल्याला, की तिला त्या जुन्या दिवसांच्या आठवणी आणि सेलिंग शिकणारा मुलगा हे दोन्ही भावलंय. मग उगाच फालतू विचार कशाला? पण हा नवरा कसा असेल तिचा? ख्रिसचं आपल्याबरोबर चांगलं जुळतंय ह्याचा तो दुस्वास नाहीना करणार? गेल्या गेल्या सांगून टाकू या की आता लवकरच मी भारतात परतणार आहे. म्हणजे कटकट नाही! पण हा घरात बसून जर पेताड आणि पिक्चरमध्ये दाखवतात तसला सनकी... झाला नसावा! हो, ख्रिस म्हणाली नं की तोही मेडिटेशन करतो...
विचार करता करता कोक संपलं. त्यांच्या घरी कसं वागावं याचा आराखडा ठरला. महेश्वरनं गाडीला किल्ली मारली.
ख्रिस रहात होती तो मध्यमवर्गीय इलाखा होता. छोट्या प्लॉट्सवर दोन वा तीन बेडरूमची घरं, क्वचित दोन मजली, पण मुख्यत्वे बैठी. बाहेर जरा जुन्या अशा डॉज, शेव्हरले वगैरे टिपीकल अमेरिकन गाड्या उभ्या. महेश्वरला हे नवं नव्हतं कारण जिथे तो रहात होता तो भागही साधारणतः असाच होता. ख्रिसची गाडी ड्राईव्ह वे मध्ये उभी होती. म्हणजे ती पोचली होती. त्याला हायसं वाटलं. महेश्वरनं रस्त्याकडेला कार पार्क केली. व्हरांड्यात लाईट होता, आणि ख्रिसचा नवरा तिथे बसलेला दिसत होता. गाडीचा आवाज ऐकून ख्रिसही बाहेर आली. सहा फुटी, तगडा, निळ्या डोळ्यांचा पण जरा अंगानं सुटलेला ॲलन काठीचा आधार घेऊन खुर्चीतून उठला. "वेलकम यंग मॅन, हाऊ आर यू?" अशी प्रसन्न हसत त्यानं सुरुवात केली. पण डावा हात हस्तांदोलनासाठी पुढे केला. खरं तर हाय फाईव्हसारखा वरती धरला. त्याच्या उजव्या काठी धरलेल्या हाताला पंजाच नव्हता! ती काठी दंडाला आणि थोट्या हाताला बांधलेली होती. महेश्वरच्या उडलेल्या गोंधळाकडे सवयीने दुर्लक्ष करत दोघांनीही मनापासून स्वागत केलं. ख्रिसनं महेश्वरला आलिंगन दिलं. महेश्वरनं तिच्या हातात वाइन दिली. ते दोघंही खूष दिसले. बहुतेक या स्ट्रेंजरला थोडीतरी रीतभात आहे याचा आनंद असावा! ओळखदेखीच्या गोष्टी सुरू झाल्या. महेश्वरनं चटकन सांगितलं,"ॲलन, पार्डन मी. ख्रिसनं मला कल्पना दिली होती की तुला काही डिफिकल्टीज आहेत म्हणून. पण मला इथे येईतो कल्पना नव्हती. मला, टु से द लीस्ट, तुझी अवस्था पाहून धक्का बसला." ॲलननं हसून आपल्या थोट्या हाताकडे बघत मान हलवली आणि म्हणाला, "एमके, डोन्ट वरी. आता मला सवय झाली आहे. आणि तू काही चुकीचं केलं नाहीस." ॲलन बिअर पीत होता. हवा बिअरचीच होती. महेश्वरनं पण एक बिअर घेतली.
ॲलन म्हणाला, "जेव्हा ख्रिसनं सांगितलं की एक भारतीय तिला सेलिंग क्लबमधे भेटला तेव्हा माझा विश्वासच बसला नाही. मी आठवतंय तेव्हापासून या क्लबचा मेंबर आहे. माझी आणि ख्रिसची ओळखही इथेच झाली. पण इतक्या वर्षांत मी तरी कुणा इंडियनला तिथे भेटलो नाहीये. अर्थात आता तुमची अमेरिकेत येणारी संख्याही वाढते आहे..".
ख्रिसनं पुस्ती जोडली, "ॲलनची भारताशी फार ओळख नाहीये. एकदा गेलोय आम्ही. पण माझे सगळे अनुभव त्याला माहिती आहेत. त्यामुळे बऱ्याच वेळा त्याला थोडा प्रश्न पडतो की खरंच हा देश कसा असेल?!"
महेश्वर म्हणाला, "हे मात्र खरं आहे. आम्हालाही कधी कधी प्रश्न पडतोच की! ख्रिस, खरं तर माझा देश माझ्यापेक्षाही जास्त तू फिरली आहेस!" यावर सगळेच हसले.
ॲलन म्हणाला, "आता तू सांग. तुला कसा वाटला आमचा देश?"
मग गप्पा त्या दिशेला वळल्या. दुसरी बिअरची बाटली आली. त्यांना महेश्वरच्या सेलिंगच्या प्रेमाचं फार अप्रूप होतं. गप्पा मग सेलिंगकडे वळल्या. ॲलन चांगल्या मूडमध्ये होता. ख्रिस आनंदी होती. महेश्वरची भीड चेपली होती. हवा आल्हाददायक होती. गप्पांचा ओघ वाहता होता. एका अविस्मरणीय दिवसाची ही सुंदर अखेर होत होती.
थोड्या वेळानं ख्रिसनं टेबलवर डिनर मांडलं. आणि मुलीला हाक मारली "मीरा, कम डिनर इज सर्व्हड! वी हॅव अ गेस्ट टुडे".
महेश्वर चमकला. "वॉव, तू मुलीचं नाव मीरा ठेवलं आहेस? हाऊ ग्रेट इज दॅट! भारतानं केवढा खोलवर परिणाम केलाय तुझ्यावर."
ॲलन हसला, म्हणाला, "जस्ट यू वेट".
ख्रिस जरा गंभीर झाली. "एमके, ते मी तुला शब्दांत नाही सांगू शकणार. कधी कधी अशी काही वादळं आयुष्यात येऊन जातात, की त्यांच्या बाह्य खुणा काही रहात नाहीत. पण अंतर्बाह्य बदलून सोडतात."
महेश्वरला काही तरी वेगळं घडणार आहे याची जाणीव झाली.
आतून एक टिनएज मुलगी धावत बाहेर आली. ती.. ती इंडीयन होती? गोरी होती, पण तो भारतीय गोरेपणा होता, अमेरिकन नव्हे. आणि चेहेऱ्याची ठेवण तर पक्की भारतीय वळणाची! महेश्वरच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. त्याच्या चेहेऱ्यावर आश्चर्य लख्ख उमटलं असावं. ॲलन आणि ख्रिस दोघेही खळखळून हसले. ख्रिसनं तिला जवळ घेतलं. "हनी, मीट एमके फ्रॉम अवर सेलिंग क्लब! ॲन्ड एमके, धिस इज मीरा, माय डार्लिंग डॉटर!" महेश्वर आणि मीरा भलतेच कॉन्शस झाले होते. मीराला तिच्या भारतीयत्वाची जाणीव असणारच असा महेश्वरचा कयास होता. पण त्या पैलूला या कुटुंबात कितपत महत्त्व दिलं जातं होतं याचा अंदाज महेश्वरला आला नाही. नावापलिकडे फार नाही असा त्यानं ग्रह करून घेतला. त्यानं जरा सावरून मीराला हाय हॅलो केलं.
महेश्वर म्हणाला, "मीरा, तू येत नाहीस सेलिंगला? तुला नाही आवडत सेलिंग?"
ती म्हणाली, "येते की. मला आवडतं, पण सध्या शाळा चालू आहे." ती जरी चेहेऱ्यामोहऱ्यानं भारतीय असली तरी तिचं बोलणं-वागणं पक्कं अमेरिकी होतं.
आता तिच्याशी काय बोलायचं या विचारात महेश्वर पडला.
"तुला आवडतं तुझं नाव? वेगळं आहे नाही?"
मीरा लगेच म्हणाली, "का वेगळं वाटावं? कोणालाच वेगळं वाटत नाही. आय लव्ह माय नेम!"
महेश्वरकडे रोखून पहात ती म्हणाली, "माझं हे नाव माझ्या आईवडिलांनी का ठेवलं आहे हे मला माहित आहे. मी मोठी झाल्यावर भारताला भेट द्यायची इच्छा मला आहे. पण इफ यू थिंक इव्हन फॉर अ मिनिट लाईक आय ॲम ॲन इंडियन, आय डोन्ट नो व्हॉट टू टॉक विथ यू ॲज ॲन इंडियन!"
मीरा उठली आणि खुर्चीत बसलेल्या ख्रिसला तिनं मागनं गळामिठी घातली. "मी जन्माने इंडियन असेन पण आय ॲम अमेरिकन बाय अपब्रिंगिंग. हे माझे आईवडील आहेत. मला, यांना किंवा माझ्या मित्रमैत्रिणींना मी इंडियन असण्याशी काहीच घेणं-देणं नाहीये."
ॲलन उठला आणि त्यानंही मीराला कवेत घेतलं. तिच्या सुस्पष्ट विचारांनी महेश्वर भयंकर प्रभावित झाला.
तो एवढंच म्हणू शकला "मीरा, तू जशी आहेस तशीच परफेक्ट आहेस! आणि तुम्ही तिघं, व्हॉट अ लव्हली फॅमिली यू थ्री मेक! हॅट्स ऑफ!"
ती एक पक्की अमेरिकन टीनएजर होती - कूल, डीटॅच्ड, टेन्टॅटिव्ह. तिनं डिनरची डिश उचलली आणि आत जाऊन टिव्ही समोर बसली. ती आत गेल्यावर ख्रिस ओलावलेल्या डोळ्यांनी म्हणाली,
"शी इज इंडियाज मोस्ट प्रेशस गिफ्ट टू मी!"
ही काय कथा आहे हे जाणायला महेश्वर आतुर होता. पण... ॲलननं गप्पांचा ट्रॅक बदलला. महेश्वरचं काम, त्याचे अमेरिकेतले अनुभव, त्या दोघांच्या सेलिंगच्या गोष्टी, ॲलनचं बोटींवरचं प्रेम, ख्रिसचा जॉब या बरोबरच त्यांची आजची कठीण परिस्थिती, थोडी इन्शुरन्सविषयी कुरबूर अशा गप्पा चांगल्या पुढे दीड दोन तास रंगल्या. मग मीरा येऊन सगळ्यांना गुडनाईट करून गेली.
ती गेल्यावर शांततेचा भंग करत ख्रिस म्हणाली, "तुला आश्चर्य वाटत असेल ना? साहजिक आहे. मी भारतात गेले तेव्हा यंग होते. यंग, इंप्रेशनेबल ॲन्ड इमोशनली इम्मॅच्युअर. आय गॉट इन्ह्वॉल्व्ड इन सम सिली केपर्स ओव्हर देअर. मी प्रेग्नंट झाले. खूप इन्सिक्युअर वाटतं होतं मला तेव्हा. इट वॉज ए ट्राईंग टाईम." ती थांबली.
"आय गॉट सपोर्ट फ्रॉम सो मेनी गुड पीपल, कॉमन पीपल ॲन्ड होली मेन, टू. येट आय लॉस्ट दॅट बेबी. इट वॉज अ गर्ल चाईल्ड. आय ऑल्सो लाॅस्ट माय ॲबिलीटी टू कन्सिव्ह."
ती थबकली, "आठवणींची गाठोडी उघडून बसले तर खूप काही उचकटण्यासारखं आहे. पण मी ठरवलं आहे की, थोड्याच गोष्टी वरती ठेवायच्या. ज्यांचा त्रास होतो त्या गोष्टी... जाळता येत नाहीत, कितीही म्हटलं तरी. पण त्या गोष्टी मागे टाकायच्या."
महेश्वरला धक्क्यांवर धक्के बसत होते.
"लॉंग स्टोरी शॉर्ट, जेव्हा ॲलन आणि मी लग्न केलं तेव्हाच आम्ही ठरवलं होतं की भारतातील एक मुलगी आमची म्हणून दत्तक घ्यायची. सो वी वेंट बॅक देअर आफ्टर अवर मॅरेज. आम्हाला ही मुलगी, अगदी तान्ही बाहुली होती, तीच भावली. तीच आमची मीरा!"
ॲलन म्हणाला, "मी ख्रिसशी जेव्हा लग्न केलं तेंव्हाच ठरवलं. तिचं दुःख जर या एका गोष्टीनं कमी होणार असेल तर माझं ते कर्तव्य आहे. आणि खरं सांगू, देवदयेनी किती लाघवी पोर मिळाली आहे आम्हाला!"
भरल्या गळ्यानं महेश्वर म्हणाला, "ख्रिस आणि ॲलन, सलाम आहे तुम्हाला. ज्या धीरानं, ज्या उत्कटतेने तुम्ही हे जगताय, त्याला तोड नाही. मी अजून तरूण आहे. मला जगाचा खूप अनुभव नाही. पण आज, या एका भेटीत तुम्ही जे काही मला दिलं आहेत, त्याला तोड नाही. देवानंच तुमची भेट घडवून आणली. खरं सांगू, आज तुम्हाला न भेटता मी परत भारतात गेलो असतो नं, तर अमेरिकन माणसाची माझ्या मनातली प्रतिमा ही सिनेमात दाखवतात त्या अमेरिकनापेक्षा फार वेगळी नसती हो! या छोट्या मुक्कामात, थोड्याशा सहवासात कुणाचं अंतरंग कधी कळलंच नाही, ती संधीच मिळाली नाही. पण ख्रिसची भेट काय घडते आणि आज मी इथे मीराला काय भेटतो. ॲलन, तुझी भेट झाली."
ख्रिस ॲलनच्या खुर्चीच्या हातावर बसून त्याला बिलगली होती.
"ख्रिस, आपण पहिल्यांदा भेटलो, आणि तू म्हणालीस की तू भारतात बॅकपॅकिंग केलं आहेस, तेंव्हा मी जरा चरकलोच होतो. पण दैवानं मांडलेल्या प्रमेयाचं उत्तर काय झकास काढलं आहेस तू! प्रेम हे एकच उत्तर आहे ते! आज मला आठवतंय, मी शाळेत होतो त्या काळी कुणी एक वेडा अनेक भिंतींवर खडूनं लिहून ठेवायचा, 'खरा तो एकचि धर्म। जगाला प्रेम अर्पावे।।' आज तुमच्या रूपानं मला त्या ओळींची प्रचिती आली."
महेश्वरचा कंठ रुद्ध झाला होता. तो थांबला. डबडबल्या डोळ्यांनी व्हरांड्याबाहेरचं अवकाश निरखू लागला. आजूबाजूला सामसूम झाली होती. निरभ्र आकाशात एखाददुसरीच चांदणी चमकत होती. तिघांच्याही डोळ्यांत पाणी होतं, त्याचा रंग एकच होता. त्या तिघांतले जन्मजन्मांतरीचे कुठलेसे अनामिक बंध जणू दृगोच्चर झाले होते.
(समाप्त)
मस्तच! उत्कृष्ट रीतीने
मस्तच! उत्कृष्ट रीतीने डेव्हलप करून शेवटही अगदी योग्य ठिकाणी केलात! आवडली कथा. अजून लिहीत रहा.
फारच छान फुलवली आहे कथा. वावे
फारच छान फुलवली आहे कथा. वावे म्हणतात तसं अगदी योग्य वेळी शेवट केलात. Touching
अरेच्चा...संपली कथा ???
अरेच्चा...संपली कथा ???
खूप छान आणि वेगळीच थीम, छान फुलवलीत आणि तितक्याच छान नोटवर संपवलीत..
लिहित रहा..
मस्त होती कथा.
मस्त होती कथा.
अतिशय सुरेख रेखाटली आहे कथा
अतिशय सुरेख रेखाटली आहे कथा
खूप आवडली कथा. अगदी चांगल्या
खूप आवडली कथा. अगदी चांगल्या नोट वर संपवलीत हे आवडलं.
लिहीत रहा.
सुंदर कथा छान फुलवलीत
सुंदर कथा
छान फुलवलीत
वावे, सायो , मनिम्याऊ, अनघा.,
वावे, सायो , मनिम्याऊ, अनघा., झकासराव , rmd, धनवन्ती
उत्साहवर्धक प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार!
सुंदर झालीय.
सुंदर झालीय.
छान आहे कथा.
छान आहे कथा.
आवडली कथा. लिहीत रहा.
आवडली कथा.
लिहीत रहा.
too good.
too good.
अतिशय उत्तम झाली आहे कथा.
अतिशय उत्तम झाली आहे कथा.
पुलेशु.
अगदी वेगळ्या धाटणीची कथा...
अगदी वेगळ्या धाटणीची कथा... तुम्ही छान फुलवत नेलीत.
आवडली खुप.
पुढील कथा लवकर येऊ द्यात!
वाह! मस्त!
वाह! मस्त!
कधी कधी हवीहवीशी वाटत असताना पटकन संपलेल्या गोष्टीतच मजा असते.
लिहित राहा.
अप्रतीम ! एक तर वेगळ्या
अप्रतीम ! एक तर वेगळ्या धाटणीची कथा आणी त्यातुन ख्रिस व अॅलन या जोडप्याचा मनाचा मोठेपणा यातुन बरेच काही शिकवुन जाते ही कथा. लिहीत रहा.
सुंदर कथा!
सुंदर कथा!
चारी भाग एका दमात वाचून काढले
चारी भाग एका दमात वाचून काढले. पहिले तीन भाग, विशेषत: त्यातली पाण्याची, प्रकाशाची, लाटालहरींची, तिन्हीसांजेच्या काळवंडलेपणाची, लाटांच्या,वाऱ्याच्या आवाजाची वर्णने अप्रतिम आहेत.
पाण्याच्या एखाद्या विशाल साठ्यावरचा, समुद्राचा, ब्रह्मपुत्रासारख्या एखाद्या महानदावरचा निसर्ग मराठी वाक्मयात फारसा उतरला नाहीय. त्याची गूढता, गहनता, रौद्रभयंकर आणि तितकेच सौम्य शीतल रूप, नियतीचे गूढ संकेत सूचित करणारा निसर्ग अजून आपल्याला पारखा आहे. कधी क्वचित् एखादं एम् टी आयवा मारू, रणांगण, पाणकळा, अश्या विरळा पुस्तकात तो दिसतो. पण
जॅक लंडन, ओपन बोट ( स्टीफन क्रेन) आणि हेमिंगवेचा अजरामर म्हातारा (आणखीही असतील, ही नावे पटकन् आठवली)यांमधून पाणी ताकदीने येतं. महाभूतालाच शोभणारं तांडव दाखवतं, पाण्यावरची वादळं मनात घोंघावतात आणि मनातली पाण्यात. मानव आणि निसर्ग ह्यातलं द्वंद्व, मानवाची क्षुद्रता, विजिगिषा, आणि पुन्हा निसर्ग आणि मानव ह्यातलं गूढ गहन मायलेकराचं नातं असा अद्भुत पसारा मांडला आहे ह्या पुस्तकांत.
तुमच्या लेखनाने ह्या सर्वांची आठवण करून दिली. तुमची वर्णनं फार सामर्थ्यशाली आणि नेमकी आहेत. चित्रमय शैलीमुळे दृश्य डोळ्यांसमोर दिसू लागतं. खूप छान.
का कोण जाणे, तुमच्या वर्णनशैलीसारख्या शैलीतलं लिखाण आधी कुठेतरी वाचलं आहे असा सारखा भास होत होता. ह्यापूर्वी तुम्ही माबोवर दुसऱ्या कुठल्या नावाने लिहिलं आहे का?
एक उत्तम अनुभव दिलात, आभार.
एवढा विस्तृत प्रतिसाद दिल्या
एवढा विस्तृत प्रतिसाद दिल्या बद्दल हीरा तुमचे आभार.
यात पाणी अथवा समुद्र आणि त्याची वर्णनं हे जो मुद्दा मांडला त्यात मी एका महत्त्वाच्या लेखकाची भर घालू इच्छितो: जोसेफ काॅनरॅड ( Joseph Conrad)
त्याचं एक प्रसिद्ध वाक्य आहे: My task which I am trying to achieve is, by the power of the written word, to make you hear, to make you feel - it is, before all, to make you see.
चारी भाग एका दमात वाचून काढले
चारी भाग एका दमात वाचून काढले. पहिले तीन भाग, विशेषत: त्यातली पाण्याची, प्रकाशाची, लाटालहरींची, तिन्हीसांजेच्या काळवंडलेपणाची, लाटांच्या,वाऱ्याच्या आवाजाची वर्णने अप्रतिम आहेत.+११११
खूप छान उभं केलंत शब्दचित्र!!
आवडली कथा
लिहीत राहा
शुभेच्छा
आवडली.
आवडली.
हिरा ला मम. मी पण एका दमात
हिरा ला मम. मी पण एका दमात वाचून काढली गोष्ट. अफाट सुंदर आहे. तुम्हाला सेलिंग चे बरेच बारकावे माहिती आहेत हे गोष्ट वाचताना लक्षात येतं.
खूप छान अनुभव होता ह्या चार भागातल्या गोष्टींचा.
चारी भाग एका दमात वाचून काढले
चारी भाग एका दमात वाचून काढले. सुंदर कथा!