मिशीनीची चोरी
Submitted by जेम्स वांड on 26 November, 2021 - 05:35
रामा खरात जवा बाळू सुताराच्या घरी पोचला, तवा बाळ्या तोंडात तंबाखूची गुळणी धरून उकिडवं बसून पायात दाबल्याल्या दगडावर घासून रंध्याच्या पात्याला धार काढत बसलं हुतं. आजूबाजूला कोंबड्यांचा कलकलाट अन मदीच गुळणीमुळं त्वांडाचा चंबू करून बसल्यालं बाळ्या मजेदार दिसत हुतं. दुनी पाय प्वाटाशी घिऊन बसनं त्येला काय साधत नव्हतं, कारण मुदलातलं डेऱ्यावानी असनारं त्याचं गरगरीत प्वाट मजबूत दिसत हुतं. एकंदरीतच घायकुतीला आलेलं बाळ्या जवा पुढं वाकून रंध्याच्या पात्यावर जोर मारी त्यावेळी त्याचं मागं खोवलेलं धुतर मजेदार फुगा होऊन वरखाली होई. बाळ्या सवताच एखाद गरगरीत पांढऱ्या कोंबड्यावानी आसमंतात मिसळून गेलंवतं.