अवकाळी आला पाऊस
Submitted by पाषाणभेद on 24 October, 2021 - 09:26
अवकाळी आला पाऊस त्यानं सारं रानं धुतलं
हाती आलेलं पीक गेलं ते डोळ्यासमूर घडलं
काय सांगावी दैना चहूबाजूनी तो आला
ढगफुटी झाली जणू एकाजागी बरसला
किती निगूतीनं केलं व्हतं शेत आवंदा
बैलं नव्हते मदतीला औताला लावी खांदा
खतं बियाणं आणूनीया येळेवर केला पेरा
पाण्यासारखा पैसा पाण्यातच वाया गेला
पाऊस आला घेवून पाण्याचा मोठा लोंढा
न उरली बांधबंदिस्ती न उरला माती भेंडा
दु:ख सारं गेलं वाहून आलेल्या पाण्यात
उभारीनं करू पुन्हा तेच आपल्या हातात
- पाषाणभेद
२४/१०/२०२१
शब्दखुणा: